‘द नन’ : आणखी एक केवळ स्वीकारार्ह चित्रपट
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘द नन’चं पोस्टर
  • Sat , 08 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie द नन The Nun

‘द नन’मध्ये एक संवाद आहे. तो साधारण असा - ‘व्हॅटिकनला तर गुपितांची भलतीच आवड आहे!’ या संवादाला सिनेमॅटिक निकषांनुसार विशेष महत्त्व नसलं तरी व्हॅटिकन सिटी, चर्च इत्यादी गोष्टी आणि त्यांचा इतिहास पाहता यामागे असलेले बरेच अंडरकरंट्स लक्षात येऊ शकतात. पोप, फादर आणि एकूणच धार्मिक व्यवस्थेशी निगडित जवळपास प्रत्येकाला पाठीशी घालण्यापासून ते जगापासून अलिप्तता बाळगण्यापर्यंत अनेक गोष्टींना हा संवाद लागू पडू शकतो. अर्थात तो पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीच्या अनुषंगानं आला असला तरीही त्याची सत्यता तशीच राहते.

‘काँजरिंग’ चित्रपट मालिकेत दिसून आलेली आणि त्या भयपटांतील आकर्षण ठरलेली वॅलाक (बॉनी आरॉन्स) ही नन अर्थातच तिच्या लोकप्रियतेमुळे स्वतःच्या अशा चित्रपटाची दावेदार बनली. मात्र लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्याच्या नादात एका चांगल्या ‘ओरिजिन स्टोरी’चा अभाव असल्यानं ‘द नन’ बोटावर मोजण्याइतक्या काही दृश्यांचा अपवाद वगळता विशेष परिणामकारक ठरत नाही. त्यामुळे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर वॉरेन द्वयीच्या सत्याचं विस्तारित स्वरूप समोर आणत भयपटांच्या चाहत्यांमध्ये नावाजलेल्या ‘काँजरिंग युनिव्हर्स’मधील ही नवीन भर केवळ पाट्या टाकण्याचं काम करते.  

रोमेनियामधील कार्टा मोनास्टरी किंवा अॅबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील एका चर्चमधील नन, सिस्टर व्हिक्टोरियानं (चार्लॉट होप) आत्महत्या केल्याचं समोर येतं. त्याची चौकशी करण्यासाठी व्हॅटिकन फादर बर्कची (डेमियन बिचर) नेमणूक करतं. त्याला सिस्टर आयरीन (टैसा फर्मिगा) सहाय्य करणार असल्याचं ठरवण्यात येतं.

व्हिक्टोरियाच्या आत्महत्येचं कारण आपल्याला माहीत असलं तरी बर्क आणि आयरीन त्यापासून अनभिज्ञ असतात. व्हिक्टोरियाचा मृतदेह आढळून आलेल्या फ्रेंची (जोनास ब्लकेट) चौकशी करण्याच्या हेतूनं आलेली बर्क-आयरीन द्वयी त्यालाच सोबतीला घेऊन तेथील चर्चमध्ये पोचते. आणि ओघानंच ‘गुड व्हर्सेस इव्हिल’ प्रकारच्या संघर्षाला सुरुवात होते.

‘द नन’चं मूलभूत कथानक चांगलं असलं तरी त्याभोवती तयार केला जाणारा आवाका बराच अधिक आहे. ज्यामुळे एका चांगल्या पे-ऑफची जी किमान अपेक्षा निर्माण होते, ती बऱ्याच साधारण शेवटाकडे पाहता चित्रपटाच्या ओव्हर ऑल प्रभावावर नकारात्मक दृष्टीनं परिणाम करणारी ठरते.

दिग्दर्शक नकळतपणे स्वतःच्याच शैलीतील दृश्यांची पुनर्निर्मिती करू पाहतो. ज्यामुळे भयपटाला हानिकारक ठरणारी क्लिशे नामक संकल्पना इथंही अस्तित्वात येते. ज्याला मुख्यतः पटकथा कारणीभूत असली तरी दृश्य परिणामांतील पुनरावृत्ती टाळता न येणं, ही बाब दिग्दर्शकाच्या मर्यादांना अधिक ठळकपणे अधोरेखित करते.

रात्रीच्या वेळी चर्चजवळील जंगलात फिरणारी पात्रं आणि त्यांच्या भाकित करता येतील अशा कृती, आपोआप उघडणारी आणि बंद होणारी दारं, आरशांमधील प्रतिमा, कॅमेरा मध्यवर्ती पात्रावर फोकस्ड असताना त्यासमोरून जाणाऱ्या ‘आसुरी’ आकृत्या अशा बऱ्याच क्लिशेड बाबींच्या अस्तित्वामुळे समृद्ध असलेल्या ‘द नन’मध्ये लिखाणातील अपेक्षित असण्याच्या उणीवेला पडद्यावरील दृश्य स्वरूपातील चतुराईमधून मात करता यायला हवी होती. जेणेकरून हा भयपट सिनेमॅटिक पातळीवर अधिक चांगला आणि सुखावह झाला असता.

या चित्रपटाचं साऊंड डिझाइन ही जमेच्या बाजूंपैकी एक. कारण जर या अचूक आणि परिणामकारक साऊंड डिझाइनचा अभाव असता तर चित्रपटात अंगावर येणारी जी काही मोजकी (अर्थातच जम्प स्केअर्स असलेली) दृश्यं आहेत, तीही परिणामकारकतेनं अनुभवता आली नसती.

एकूणच भयपटाच्या नावाखाली गूढ, अगम्य आणि भयावह पार्श्वसंगीताच्या वापरानं खुश होत त्यालाच चांगला भयपट समजणाऱ्यांच्या दृष्टीनं हा चांगला चित्रपट ठरू शकतो. मात्र जॉर्ज रोमिरोचे चित्रपट, अलीकडील ‘अ क्वायट प्लेस’सारखे वेगळ्या वाटेनं जाणारे भयपट, इत्यादी खऱ्या अर्थानं सिनेमॅटिक अंगांनी उजव्या चित्रपटांवर वाढलेल्या लोकांसाठी तरी हा ‘आणखी एक केवळ स्वीकारार्ह चित्रपट’ अशा अर्थाचाच ठरण्याची शक्यता अधिक आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख