उदाहरणार्थ त्यांचं ‘ते’ असणं...
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
वासंती दामले
  • ज्येष्ठ पत्रकार सईद नक़वी
  • Sat , 22 October 2016
  • वासंती दामले Vasanti Damle Vinod Mehta Saeed Naqvi विनोद मेहता सईद नक़वी Being the Other बीइंग द अदर

सईद नक़वी यांचं ‘बीइंग द अदर’ हे नवं पुस्तक त्याच्या शीर्षकामुळे कोड्यात पाडतं. विनोद मेहता व सईद हे ला मार्तीनेरसारख्या, ब्रिटिशकाळापासून उच्चवर्गीयांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शाळेत, एकाच वर्गात शिकले, हे मेहतांच्या ‘लखनौ बॉय’ या आत्मचरित्रातून कळलं होतंच. दोघेही यशस्वी व प्रसिद्ध पत्रकार! त्यांची आत्मचरित्रं वाचताना त्यांच्यातील साम्य इथंच संपतं हे लक्षात येऊ लागतं. विनोद मेहता पंजाबी, परंतु फाळणीपूर्वीच त्यांचे वडील भारतात, लखनौला येऊन वसले. फाळणीचा त्यांचा अनुभव, त्यावेळी असंख्य नातेवाईक घरात होते आणि त्यांची आपापसातील फाळणीविषयीची बोलणी एवढाच सीमित होता. ही बोलणीसुद्धा कानावर पडली तेवढीच, कारण विनोद तेव्हा लहान होते. त्यामुळे नंतरही सुखी व स्वच्छंदी आयुष्य घालवण्यापलीकडे त्यांच्या आयुष्याबद्दल इतर काही कल्पना नव्हत्या. त्या काळातील वातावरणाचा परिणाम म्हणून ते उदारमतवादी, मानवतावादी झाले. यात लखनौच्या संस्कृतीचा हिस्साही असणार, कारण तिथला हिंदूही सवयीनं आदाब व खुदा हाफिज करणार. सहजतेनं त्याला अनेक शेर मुखोद्गत असणार. अदब व उर्दू भाषा या  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक हिस्साच असणार. त्याचबरोबर त्यापैकी काही कट्टर हिंदू जातीवादी व धार्मिकही असणार. यात त्यांना काही विसंगत वाटणारही नाही, कारण ते तसं नसतंही. धर्म व संस्कृती या बाबी वेगळ्या असतात हे त्यांना माहीत होतं.

नक़वींचं घर उच्चवर्णीय- सय्यद. त्यांच्या घरातील रीतभात आजूबाजूच्या वातावरणाला साजेशी. सईद लिहितात की, धर्म मुसलमान पण संस्कृती जास्त हिंदू. उदा. त्यांच्या घरात गर्भवती असली की, जी गाणी म्हटली जायची त्यापैकी त्यांच्या आईचं सर्वांत आवडतं गाणं होतं- ‘ अल्लामिया हमरे भय्याको का दियो नंदलाल’. अवधच्या इतर स्त्रियांप्रमाणे त्यांच्या घरातील स्त्रियाही कायम साडीत असायच्या. त्यांचं कुटुंब इराणहून आलेलं शियापंथीय. पण त्यांच्या आजीच्या पिढीच्या स्त्रिया घरात अवधी बोलायच्या. फारफार तर नंतरच्या पिढ्या औपचारिक बोलताना उर्दूचा वापर करत. त्यांच्या कुटुंबातील, पर्यायानं अवधी कुटुंबातील संस्कृतीचं वर्णन सईद यांनी फार मनोहारी केलेलं आहे. मेहता व नक़वी यांच्या अवधी संस्कृतीचं वर्णन वाचताना, साऱ्या भारतातच असलेल्या संस्कृतीच्या वैविध्याचं सहज भान येतं.

फाळणीचा परिणाम साहजिकच याही कुटुंबावर झाला, कदाचित जास्त झाला. जे कुटुंब स्थिर व घट्ट कौटुंबिक धाग्यानं बांधलं गेलं होतं ते अचानकपणे विभागलं गेलं आणि तेही फाळणीविषयी स्पष्ट आकलन न होता. ते स्पष्ट करताना नक़वी त्यांच्या नानीअम्माचं उदाहरण देतात. त्या कधी अवधच्या बाहेर गेल्या नाहीत. त्यांना पासपोर्ट हा प्रकारच समजायचा नाही. त्यांना हेही कळायचं नाही की त्यांच्या दोन मुलींनी परका देश- पाकिस्तान- राहण्यासाठी का निवडला? त्यांची इच्छा होती की, त्यांचं दफन मुस्तफाबादला व्हावं, पण त्या मुलींना भेटायला लाहोरला गेल्या असताना आजारी पडल्या. त्याच वेळी त्यांचा भारतीय पासपोर्ट संपला. ‘माझा भारतीय पासपोर्ट द्या’चा जप करत त्या वारल्या. त्यांना इकडं आणणं अशक्य होतं, त्यांचं तिकडंच दफन करावं लागलं. प्रथमपासूनच त्यांचा पाकिस्तानात मुलींचा विवाह करण्यास विरोध होता, पण मुंबईपेक्षा लाहोर जवळ आहे असं नकाशावर दाखवून त्यांना फसवण्यात आलं होतं. इतर अनेक पुस्तकांनीही फाळणीचं हे वास्तव मांडलं आहे.

कमलाबेन पटेल फाळणीनंतर कराचीत अपहरण केलेल्या स्त्रियांसाठी काम करत होत्या. त्याही हेच म्हणतात. के.ए. अब्बास आपल्या आत्मचरित्रात लिहितात की, त्यांच्या कुटुंबातील शिकलेल्या लोकांनी पाकिस्तानात जाणं मान्य केलं, कारण मुसलमानांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यानं पाकिस्तानात नोकरीत बढती लवकर मिळेल. पण अब्बासना ते म्हणाले, ‘घर विकणार नाही कारण निवृत्तीनंतर आपल्याच ‘भूमीत’ परत येणार.’ राही मासूम रझाही आपल्या गावातील मुसलमानांबद्दल हेच सांगतात. हे सर्व वाचताना वाटतं की, फाळणी ही काहींना लाभदायक असेल, परंतु असंख्यांची फसवणूकच झाली. अनेक कुटुंबं परत कधीच एकत्र येऊ शकली नाहीत. जमीन सुधारणा कायदा हा त्यांच्या दृष्टीतून त्यांच्यावर आणखी एक आघात झाला असं नक़वी यांचं म्हणणं आहे.

नक़वी यांनी जे वर्णन केलं आहे त्यावरून आपल्याला, ‘स्वत:च्या जगण्याच्या प्रेमात पडलेली जमात’ म्हणजे अवधी मुसलमान असं समजतं. त्यांची उर्दू भाषा, तिचे उच्चार, तहजीब इत्यादी. त्या लखनवी वागण्या-बोलण्यातलं मार्दव व अदबही टोकाची. दिवसभराचे त्यांचे उद्योग म्हणजे चटपटीत बोलत, शायरी पेरत, चतुर संभाषण करणं हेच असायचं. नक़वी म्हणतात, तसं सुखासीन आयुष्य व ऱ्हास यात फक्त एक बारीक रेषा असते. कुळे आणून द्यायची त्या पैशांवर यांची कालक्रमणा चालायची. नोकरी करण्याची मानसिकता वा योग्य शिक्षणाअभावी कुळकायदा झाल्यावर नक़वी यांच्या अनेक नातेवाईकांची परवड झाली.

स्वत:च्या संस्कृती व भाषेच्या आत्यंतिक अभिमानानं ज्या इंग्रजी शिक्षणाला आजवर विरोध केला, त्याच शिक्षणाची कास स्वातंत्र्यानंतर व जमीन सुधारणांमुळे उत्पन्न घटल्यानंतर नक़वी घराला धरावी लागली. सईद म्हणतात की, महाविद्यालयात त्यांच्याबरोबर आणखी दोन शिया विद्यार्थी होते. एक श्रीनगरचा व दुसरा बंगलोरचा. तेव्हा त्यांना जाणवलं की, लखनौचे शिया ही एक वेगळीच जमात आहे. त्यांच्या घरातच कधी नमाजी कट्टरपण नव्हतं. त्यासाठी ते सूफी संताच्या प्रभावाचं कारण देतात. त्यांच्या मते, सुफी संतांची अल्लाशी एवढी एकतानता झालेली असते की, नमाज, रोजे वा हजला ते बाह्य अवडंबर समजतात. 

अशा वातावरणात वाढलेला लेखक पुढे पत्रकारितेचा व्यवसाय स्वीकारतो आणि समाजाला सन्मुख जाऊ लागतो तेव्हा त्याला अनेक प्रश्न पडतात. जेव्हा धार्मिक दंगली घडतात तेव्हा त्याला त्या दंगलींच्या मुळाशी जावंसं वाटतं. तसं तो जातोही. त्यासाठी तो पुस्तकं वाचतो, दंगलींच्या जागांना भेट देतो. तो म्हणतो की, जिन्नांनी पाकिस्तानची मागणी केली, पण मुसलमानांना स्वतंत्र भारतात योग्य स्थान मिळावं यासाठी खेळलेली ती एक खेळी होती. आयेशा जलाल व अब्दुल कलम आझादांच्या पुस्तकाचा त्यासाठी ते आधार देतात. ते म्हणतात की, शेवटी जिन्नांपेक्षा पटेलच फाळणीला उत्सुक होते. त्यामुळे जिन्ना व मुस्लीम लीगपेक्षा, काँग्रेस व नेहरू-पटेलच फाळणीला जास्त जबाबदार आहेत. आजच्या हिंदुत्वाचा उदयही यामुळेच झाला आहे. इतिहासकार प्रा. बिपनचंद्र या युक्तीवादाशी असहमत होते. त्यांच्या मते धर्माचं राजकारण एकदा सुरू केलं की, त्याचा अंत आपल्या हातात नसतोच. मुस्लीम लीग व जिन्नांच्या राजकारणाचा अंत फाळणी हाच होता.

नक़वींनी मुरादाबादपासून ते २००२च्या दंगलींचा अभ्यास केला. त्याचा सविस्तर अहवाल या पुस्तकात दिला आहे. तो वाचनीय आहे. या दंगलींचा अभ्यास करताना त्यांना जाणवतं की, लहानपणापासून ते स्वत: अथवा त्यांच्या कुटुंबाला कधी भारतात परकं वाटलं नाही. अगदी फाळणी झाल्यावरही नाही. कारण फाळणीची मीमांसा करताना ते म्हणतात की, मुस्लीम लीग व पाकिस्तानला पाठिंबा देणारा वर्ग तालुकदार व जमीनदार यांचा होता. त्यांना स्वत:चं उच्च सामाजिक स्थान व जमीनजुमला अबाधित ठेवायचा होता. आजही पाकिस्तानच्या सत्ताधारी वर्गात हेच बहुसंख्येनं आहेत. नक़वींच्या मते, सामान्य मुसलमानांना गंडवण्यात आलं. (याची असंख्य उदाहरणं आहेत.) फाळणी नंतरही ते त्यांचं जीवन नेहमीसारखंच, म्हणजे इथंच त्यांचे पारंपरिक उद्योगधंदे सांभाळत जगत आले. पण हळूहळू दंगलींमुळे आपण ‘ते’ आहोत (त्याला नक़वी ‘other’ म्हणतात), अशी भावना व असुरक्षितता मुसलमानांच्या मनात येऊ लागली. नकवी म्हणतात, ही परकेपणाची भावना माझ्यासाठी लोकांच्या डोळ्यात मी पाहिली व त्याचं मला अपार दु:ख झालं.

हे पुस्तक नक़वीचे आरोपपत्र नाही तर कैफियत आहे. त्यासाठी स्वत:ची बाजू पटेल अशा युक्तीवादांसह त्यांनी मांडली आहे.

मेहता आणि नक़वी यांची पुस्तकं चित्तरंजक व माहितीपूर्ण आहेत. नक़वींनी स्वत:च्या बालपणाची माहिती सविस्तर दिली असली तरी नंतरच्या खाजगी आयुष्याविषयी फार काही लिहिलेलं नाही. मेहतांनी आवश्यक तेवढं लिहिलं आहे. मात्र गुगलवर दोघांवर बरीच माहिती आहे. दोन्ही पुस्तकं वाचनीय आहेत. (मेहतांचं दुसरं पुस्तक  ‘एडिटर अनप्लगड’हेही पत्रकारीतेविषयीच आहे.) पत्रकारितेच्या जगात आलेली ही दोन्ही पुस्तकं वाचनीय व विचारणीय आहेत. 

बिइंग द अदर : द मुस्लिम्स इन इंडिया - सईद नक़वी, अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली, पाने - २५६, मूल्य - ५९९  रुपये.

 

लेखिका मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.

vasdamle@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......