‘गली गुलियाँ’ : आपल्या अंर्तमनात दडून बसलेल्या हिंसेकडे बोट दाखवणारा सिनेमा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अलका गाडगीळ
  • ‘गली गुलियाँ’चं पोस्टर
  • Sat , 08 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie गली गुलियाँ Gali Guleiyan मनोज वाजपेयी Manoj Bajpayee Dipesh Jain दिपेश जैन

‘गली गुलियाँ’ या सिनेमात एक मानसशास्त्रीय नाट्य आहे. यातलं प्रमुख पात्र कॅमेरे लावून सर्वत्र नजर ठेवून असलं तरी ते आंबट शौकीन नाही. हा सिनेमा आपल्या अंर्तमनात दडून बसलेल्या हिंसेकडे थेट पाहतो.

रात्र पडल्यानंतर बाबा घरात प्रवेश करतात. त्यांची चाहूल लागताच आतल्या खोलीत गुजगोष्टी करत बसलेल्या आई आणि मुलाला दचकायला होतं. त्यांचं बोलणं थिजतं. हा बाबा दरिंदा असतो. घराबाहेर हा याचक असतो आणि घरात जाचक.

पिवळ्या दिव्याच्या उजेडाता मोठी दिसणारी बाबांची सावली आणि त्यांच्या उगारलेल्या हातची सावली दिसते. जमिनीवरल्या जाजमावर पालथं पडलेलं पोर दिसतं. कॅमेरा जवळ येतो आणि त्याच्या पाठीवर उमटणारे वळ दिसायला लागतात.

जुन्या दिल्लीतल्या काळोख्या आणि गिचमिड गल्ल्यातनं कॅमेरा फिरतो आणि एका फटिचर दुकानात बसलेल्या खुडूसवर स्थिर होतो. रात्रीची वेळ असते. खुडूसनं सगळ्या गल्ल्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात आणि त्याच्या असंख्य कम्प्युटर स्क्रिनस्वर त्यांचं प्रक्षेपण होत असतं. परिसरातल्या रस्त्यांवर नजर ठेवणाऱ्या कॅमेऱ्यानं टिपलेलं दृश्य आपल्याला दिसतं.

या गल्ल्यांत कोठीला कोठी खेटून असते. सर्वत्र लोंबकणाऱ्या केबल्स, अँटिनावर अडकलेली लादीपुसणी, पतंग, पतंगांचे मांजे, जमिनीवरची घाण आणि दलदल दिसते. नंतर खुडूस एका घरावर लावलेल्या कॅमेऱ्यातली दृश्यं बघू लागतो. एक जोडपं सगळं आवरून बिछान्यावर आडवं होताना दिसतं. मात्र हा आंबटशौकीन खुडूस त्रस्त दिसतो. त्याची अस्वस्थ नजर काही तरी शोधत असते. त्याच्या दारावर थाप पडते आणि क्षणार्धात खुडूसच्या कॅमेऱ्यांतून आपण बाहेर पडतो.

या एकलकोंड्या खुडूसला एकच मित्र असतो, गणेशी. तो खुडूससाठी वाणसामान घेऊन आलेला असतो. हा मित्र सोडून त्याला कोणी नसतं.

‘अरे यार, त्या पलिकडल्या घरात एका मुलावर अत्याचार होतायत. तो बाप मारून टाकेल मुलाला.’ खुडूस काळजीनं सांगतो. या काळजीनंच तो गांजलेला असतो. पण गणेशीला त्याचं काही वाटत नाही. ‘असेल’ तो म्हणतो. घरात मुलांवर होणाऱ्या मारहाणीचं काय एवढं? ती बहुतेक घरात होतेच ना?, हेच गणेशीला सुचवायचं असतं. मात्र खुडूसला हे मान्य नसतं.

‘बच्चे की चीख कौन सुनता है?’ खुडूस उद्गारतो. ‘गली गुलिये’तील हा संवाद समाजानं मुलांच्या केलेल्या प्रतारणेबद्दल बरंच काही सांगतो.  

फ्रॉईडच्या म्हणण्यानुसार घराच्या चार भिंतींआड मुलांवर केलेल्या अन्वनित अत्याचाराचे ओरखडे मुलांच्या मनावर उमटतात आणि ते सुप्त मनात साठवले जातात.

सुप्त मनात दडलेले हे अनुभव मुलांच्या आकलनापलीकडील असतात. मुलं त्यांच्याबद्दल फार बोलत नाहीत, याचा अर्थ ते या आठवणी विसरलेले असतात असा होत नाही. खोल दडलेल्या कटू आठवणी अजाणतेपणे वेगळ्या स्वरूपात बाहेर येतात.

फ्रॉईडची ही थिअरी लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासंदर्भातील होती. पण सायकोअनॅलिसिस थिअरीनंतर मानसशास्त्रात नवनवीन संकल्पना आल्या आणि मुलांवर होणाऱ्या शारिरीक, मानसिक आणि आर्थिक हिंसेचेही मुलांवर दूरगामी परिणाम होतात, हा विचार पुढे आला.

या विषयात झालेल्या अभ्यासांनुसार सतत हिंसा भोगावी लागलेली मुलं पुढे हिंसक प्रवृत्ती दाखवतात आणि आपल्या जवळच्या व्यक्तींवरही हिंसा करतात. हिंसा भोगलेल्या काही जणांना स्किझोफ्रेनियासारखे मानसिक विकार जडतात.

शेजारच्या कोठीतील हिंसा खुडूसला अस्पष्ट ऐकू येते. पण ती दिसत नसल्यामुळे तो अस्वस्थ होतो. मध्यरात्रीच्या सन्नाट्यात तो त्या कोठीच्या खिडकीजवळ कॅमेरा लावतो.

नंतर त्याच्या खोलीतल्या स्क्रिनवर त्या घरातील दृश्यं पाहण्याचा प्रयत्न करतो. पण कॅमेरा सगळंच काही कॅप्चर करू शकत नाही. जे दिसतं त्यानं त्याचं समाधान होत नाही. मग हा त्या घराभोवती घिरट्या घालू लागतो. अत्याचारित मुलाचं नाव इदू असतं. आई आणि मुलाची जवळीक असते. दोघंही हिंसक बाबाच्या सावटात वावरत असतात.

खुडूस इदूचा आणि त्याच्या मित्राचा पाठलागही करतो. ही दोघं बाहेर पडतात आणि एका कोठीतल्या पहिल्या मजल्यावर जातात. रात्रीची वेळ असते. तिथं ठेवलेल्या स्टूलावर उभं राहून मित्र दारावरचं शटर हळूच उघडतो आणि आतलं दृश्य पाहू लागतो. खाली उभा असलेला इदू विचारत राहतो- ‘अरे सांग ना काय दिसतंय? खाली उतर मला पाहू दे.’

या गल्ल्यांमध्ये भिंतीला भिंतं लागून असते. घराच्या चोहोबाजूनी घरंच असतात. टिचकी मारली तरी ऐकू जावं एवढी ती जवळ असतात. मुलांना जोडप्यांचा रोमान्स बघायचा असतो.

बाबाची मारहाण, आदळआपट शिवीगाळ आई आणि मुलाला सतत सहन करावी लागते. आईला आपलं माहेर आठवत असतं. तिच्या माहेरचं घर मोठं असतं. पुढे फुलांची बाग, बागेतलं कारंज, घरापलीकडची विस्तीर्ण शेतजमीन तिला आठवते. इदू ऐकण्यात गुंग झालेला असतो. आई त्याला कुशीत घेते. मुख्य म्हणजे तिचे बाबा, भाऊ, काका आणि काकांची मुलं स्त्रियांशी आदबीनं वागणारी असतात, हे ती इदूला आवर्जून सांगत असते. इदूचे डोळे चकाकतात. खरंच असंही कुटुंब असतं?

सगळीकडे असलेल्या भिंती आणि कोठ्या पाहून आईला माहेरच्या मोकळ्या अवकाशाची सतत आठवण येते. पण या काळोख्या गिचमिडीतून सुटकेचा मार्ग दोघांना दिसत नसतो.

मुलांवर होणाऱ्या अत्याचारांची असंख्य रूपं असतात. त्याचा मागोवा घेण्यासाठी युनिसेफनं २०१५ साली राज्यव्यापी संशोधन अभ्यास हाती घेतला होता. या अभ्यासातून पुढे आलेल्या हिंसा आपल्या समजुतींना धक्का देणाऱ्या आहेत.

हातात जे काही असेल ते फेकून मारणं, लाथा-बुक्क्यांनी तुडवणं, गरम पळीचा डाग देणं, उपाशी ठेवणं, पाण्यानं भरलेल्या हौदात श्वास कोंडेपर्यंत मुलाचं डोकं बुडवणं, इतरांसमोर अपमान करणं अशा हिंसा सर्रास घरातच होतात. घरात होणाऱ्या हिंसबेदद्ल मुलं जास्ती बोलत नाहीत. मुलींपेक्षा मुलग्यांवर अधिक शारीरिक हिंसा होते. अनेक कुटुंबात मुलग्यांना कामाला लावलं जातं. त्यांचं शालेय शिक्षण त्यामुळे बंदं होतं. हे मुलांचं आर्थिक शोषण आहे.

इदूलाही काम करावं लागतं. त्याचे वडील खाटिक असतात. घरोघरी मास पोचवण्याचं काम करून हा मुलगा थकतो. रात्री घरी आल्यावर अभ्यास करतो, आईला मदत करतो. मदत करता करता आईशी बोलत राहतो. आई-मुलाचा संवाद आपल्याला काही क्षणासाठी आश्वस्त करतो. रोज या ना त्या कारणावरून तो वडलांचा बेदम मार खातो. आई मध्ये पडते आणि तिलाही हिंसेचा सामना करावा लागतो.

युनिसेफच्या संशोधनामुळे अनेक भ्रम दूर होण्यास मदत झाली. बालकांवर होणाऱ्या हिंसेच्या केवळ लैंगिक आयामाला केंद्रत्व मिळतं. घरातील शाब्दिक हिंसा, रक्त येईपर्यंत मारहाण, शिवीगाळी, कडाक्याची आवाजी भाडणं, कौटुंबिक हिंसा, दारूचं व्यसन आणि त्यातून होणाऱ्या हिंसेचे मुलांवर काय परिणाम होतात यांचे फारसे अभ्यास होत नसत. या विषयीचे अकॅडमिक अभ्यास आता केले जातात.

मारहाणी पलीकडील अत्याचार अती हिंसक असू शकतात. दोन वर्षांपूर्वी हैदराबादच्या चौदा वर्षीय मुलीवर आई-वडिलांनी धर्माच्या नावाखाली निर्दयी अत्याचार केले. आराधना समधारिया या मुलीनं ६८ दिवसांचा उपास करण्याचं ठरवलं. त्याआधी तिच्या वडिलांना धंद्यामध्ये खोट आली होती. कुटुंबातल्या सदस्यानं ६८ दिवसांचा कडकडीत उपास ठेवला तर बरकत येऊ शकते, असं धर्मगुरूंनी सांगितलं होतं.

आराधनानं उपास करायचं ठरवलं. तिची प्रकृती ढासळत चालली तरी उपास थांबवण्याचे प्रयत्न आई-वडिलांनी केले नाहीत. आणि उपासाच्या ६४व्या दिवशी ती मरण पावली. मृत्युनंतर तिच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली. ती मरण्याच्या खूप आधीच हा उपास थांबवावा असा प्रयत्न आई-वडिलांनी का केला नाही? तिला अगोदरच हॉस्पिटल मध्ये का हलवलं नाही? अंधश्रद्धांसाठी मुलीचा बळी दिला गेला.

मुलांवर असे अत्याचार होतात कारण मुलांना काही समजत नाही, त्यांना हक्क नसतात असंच प्रौढांना वाटतं. भारतीय उपखंडामध्ये कुटुंबं मुलांवर मालकी हक्क गाजवतात. मोठ्या झालेल्या मुलांवरही.

‘गली गुलियाँ’ या सिनेमातल्या वास्तवाला अनेक पदर आहेत. एक वास्तव आपल्याला खुडूसनं लावलेल्या अनेक कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसतं. दुसरं वास्तव सिनेमाच्या कॅमेऱ्यातून दिसतं. या दोन्ही वास्तवांमध्ये फरक असतो कारण खुडूस इदूला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण या बाहेरच्या कॅमेऱ्याला इदूचं काही पडलेलं नसतं.

मुलावर होणाऱ्या अत्याचारांचं सत्यशोधन करण्याचा खुडूस प्रयत्न करत असतो. त्यात त्याला यश मिळतं का? ते शोधून काढण्यासाठी सिनेमा पाहवा. तसंच यातल्या दृश्यांची पुनरावृत्ती, अनिर्णायक शेवट, न संपणाऱ्या गल्ल्या, एका गल्लीतून फाटे फुटणाऱ्या असंख्य गल्ल्या, गल्ल्याचं जंजाळ, पात्रांच्या मनातल्या गल्ल्या आणि गल्लती समजून घेण्यासाठीही सिनेमा पाहावा.

मनोज वाजपेयी त्रस्त खुडूस जगले आहेत. इदूची भूमिका ओम सिंग या नवख्या बालकलाकारांनं उत्कृष्टपणे वठवली आहे. शहाना गोस्वामी अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. तिची इदूच्या आईची भूमिका दीर्घकाळ लक्षात राहील. नीरज काबींचा बाप हिंसेचं विकृत रूप दाखवतो.

या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक दीपेश जैन जुन्या दिल्लीतच वाढले. एकात एक घुसलेल्या कोठया आणि गल्ल्यांच्या जंजाळावर चित्रपट काढावा असं त्यांना वाटायला लागलं आणि रिसर्च केल्यावर त्यांना कथाही सापडली. दिल्लीतल्या गल्ल्यांमध्ये त्या कथेचं रोपण त्यांनी चपखलपणे केलं आहे. 

युनिसेफच्या संशोधनादरम्यान विदर्भातील एका मुलाची कळकळ समोर आली. ‘आपल्या राष्ट्रपित्यानं अहिंसेची शिकवण दिली. माझ्या दारुड्या बाबांनी त्या शिकवणीचं घरात पालन केलं तर किती बहार येईल!’.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख