‘पब्लिक प्रॉसिक्युटर कहते है, वो मुसलमानों का सम्मान करते है, वहाँ उनका स्वागत भी करते है। पर मेरे घर में मेरा स्वागत करने का उनको किसने हक दिया? ये मेरा घर है, जितना की उनका था और अगर उंगली उठाकर पुछोंगे तो कहता हूँ - मेरी जिम्मेदारी सिर्फ मेरी इमानसे है, मेरे मुल्क से हैं।’
कोर्टरूम दृश्यात ‘मुल्क’ सिनेमात जेव्हा मुराद अली मोहमदची भूमिका अदा करणारा ऋषी कपूर ज्या सात्त्विक संतापानं व तीव्र विषादानं तुम्हाला (पक्षी : हिंदुसमाज), आमचं (पक्षी : मुस्लीम समाजाचं), आमच्या घरी (पक्षी : या भारत देशात), असं विचारतो, ते पाहताना व ऐकताना माझ्या अंगावर सर्रकन काटा आला.
हा सवाल आजच्या विषारी धार्मिक दुराव्याच्या काळात आम मुस्लिमांचा प्रातिनिधिक सवाल आहे. खरं तर १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी देशातील करोडो मुसलमानांनी ‘महजब’ (धर्म)ऐवजी ‘मुल्क’ (देश) निवडला, तेव्हाच ते भारतीय असल्याचं सिद्ध झालं होतं. आणि आज सत्तर वर्षांनंतरही मूठभर कट्टर मुस्लिम समाज वगळता आम मुसलमान अमन-पसंत व देशाप्रती इमान राखून आहेत.
१५ ऑगस्टला राष्ट्रपतींनी वीर सैनिक औरंगजेबाला तो मुस्लिम आतंकवाद्यांशी लढताना शहीद झाला म्हणून शौर्यचक्र दिलं. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना दोन्ही हात फैलावत ‘भारत माता की जय’ व ‘जय हिंद’ म्हटलं होतं. तरीही आज प्रत्येक आतंकवादी घटना घडली की, मुस्लिमांकडे शंकेनं पाहिलं जातं.
अलीकडच्या काळात मणीशंकर अय्यर ते नवज्योत सिद्धू अशा अनेकांनी पाकिस्तानशी संवाद करावा असं म्हटलं, तेव्हा त्यांना ‘गो बॅक टु पाकिस्तान’ म्हटलं गेलं. ‘आम्हाला राष्ट्रीय मुसलमान प्रिय आहेत. उदाहरणार्थ - ए. पी. जे. अब्दुल कलाम’ असं आपण वारंवार ऐकतो, पण आम्हाला ‘राष्ट्रीय हिंदू’ पण हवे आहेत, असं कधी ऐकलं नाही. बऱ्याच अंशी हिंदू समाजातील एका मोठ्या वर्गाची मानसिकता ‘इस्लामफोबिया’ची झाली आहे. त्यामुळे आम मुस्लिमांच्या देशभक्तीबाबत आक्षेप घेतला जातो. त्याचं प्रमाण अलीकडे वाढत आहे. त्यामुळे मुस्लिमांपुढचा आजचा सर्वांत मोठा प्रश्न हा झाला आहे की, त्यांनी कसं सिद्ध करायचं की, ते देशप्रेमी आहेत, हा त्यांचा ‘मुल्क’ आहे आणि ‘माय नेम इज खान, बट आय अॅम नॉट टेररिस्ट’?
या महत्त्वाच्या प्रश्नाला थेट व निर्भीड हात घालणारा आणि हिंदू समाजातल्या एका वर्गाचा ‘इस्लामफोबिया’ हा कसा पूर्वग्रहदूषित व जाणीवपूर्वक घडवण्यात आला आहे, याचं थेट भाष्य करणारा अनुभव सिन्हाचा ‘मुल्क’ हा ताजा सिनेमा हिंदी-बॉलिवूड सिनेमातला एक दुर्मीळ योग आहे.
या पूर्वी १९५९ व १९६१ मध्ये यश चोप्रांचे ‘धूल का फूल’ व ‘धरमपुत्र’, १९७३ मध्ये एस. एस. सत्युचा ‘गर्म हवा’, नंतर सईद मिर्झाचा अपवाद वगळता आजच्या जागतिकीकरणानंतरच्या मल्टीप्लेक्सच्या जमान्यात नवश्रीमंत एनआरआय हिंदूंच्या परंपरागत भावनांना कुरवाळणाऱ्या गुडी गुडी चित्रपटांच्या परंपरेत मुस्लिम एक तर चांगला, पापभिरू ‘रहिमचाचा’ (शोले) असतो किंवा मैत्रीसाठी जीव देणारा ‘शेरखान’ (जंजीर) असतो. त्यांचा जगण्याचा संघर्ष, आयडेंटीटी क्रायसिस आणि इस्लामशी जोडल्या गेलेल्या जागतिक दहशतवादामुळे त्याच्याकडे संशयानं पाहणं, पुन्हा शिक्षण व रोजगाराची वानवा - अलीकडे गोरक्षणाच्या नावाखाली होणारं ‘मॉब लिंचिग’ या त्या समाजाच्या वास्तव जगण्याकडे हिंदी सिनेमे मुळीच वळत नाहीत. मात्र २०१८ मध्ये अनुभव सिन्हानं ‘मुल्क’द्वारे एका आतंकी तरुणामुळे त्याच्या पूर्ण कुटुंबाला कसा संकटाचा सामना करावा लागतो, याचं अत्यंत प्रभावी व थेट चित्रण धीटपणे करून राष्ट्रवाद, दहशतवाद व इस्लामफोबियावर नेमकं बोट ठेवत काही प्रश्न विचारले आहेत.
ज्या प्रेक्षकांना आजच्या देशस्थितीचं थोडंबहुत ज्ञान आहे, तो ‘मुल्क’ पाहताना अस्वस्थ होतो व त्याला नक्कीच प्रश्न पडू शकतो, तो म्हणजे आपण मुस्लिमांकडे आपल्यासारखेच भारतीय म्हणून का पाहत नाही? कोण आमच्या मनात व विचारात त्यांच्याविषयी जहर भरतंय? आम्हाला ‘इस्लामफोबिया’ झाला आहे?
‘मुल्क’ हिंदी सिनेमांच्या रूढ चाकोरीतला स्वप्नं दाखवत हलकंफुलकं मनोरंजन करणारा सिनेमा नाही, तर तो प्रेक्षकांना अस्वस्थ करतो आणि काही भेदक प्रश्न विचारतो. त्यासाठी दिग्दर्शकानं पूर्वार्धात कुटुंबनाट्याचा, तर उत्तरार्धात काहीशा मेलोड्रॅमॅटिक पद्धतीच्या कोर्टरूप नाट्याचा वापर करत सामान्य भारतीय मुस्लिमांचं जीवन रेखाटलं आहे. त्यातून हा समाज त्यांच्यातील बहकलेल्या व दहशतवादाकडे झुकलेल्या मूठभर तरुणांचा आततायीपणा आणि हिंदू समाजातील काहींच्या ‘इस्लामफोबिया’मुळे कसा कात्रीत सापडला आहे, याचं प्रभावी दर्शन घडवलं आहे.
काय आहे ‘मुल्क’चं कथानक?
मुराद अली मोहंमद हा बनारसचा एक प्रतिष्ठित सेवानिवृत्त वकील. तो मोहल्ल्यातल्या लोकांना युनानी औषधं देत असतो. त्याचं नव्वद वर्षांपासून हिंदू वस्तीत घर असतं. त्याची पत्नी, धाकटा भाऊ बिलाल, त्याचं कुटुंब, ज्यात धर्मांध बनत आतंकवादी झालेला शाहिद आहे, असं एकत्र कुटुंब आहे. त्याचा मुलगा लंडनला व्यवसाय करत असतो आणि त्यानं एका हिंदू मुलीशी - आरतीशी प्रेमविवाह केलेला असतो. मुरादअलीच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ती घरी आलेली असते. मुरादचा वाढदिवस धुमधडाक्यात नाच-गाणं व खाण्यानं साजरा होतो. त्यात मोहल्ल्यातील सारे हिंदू व मुस्लिम शेजारी सामील होतात. मात्र दुसऱ्या दिवशी कानपूरला एका बसमध्ये बॉम्बस्फोट होतो. त्यात सोळा प्रवासी मारले जातात. त्याचा संशय शाहिदवर येतो आणि तो दानिश या मुस्लिम पोलीस अधिकाऱ्यामार्फत मारला जातो. आणि बिलालला दहशतवादी गुन्ह्यात सामील म्हणून अटक केली जाते. पुढे मुराद व पूर्ण मोहंमद कुटुंबाकडे आतंकवादी म्हणून कसा समाज पाहू लागतो, संतोष आनंद हा सरकारी वकील साक्ष घेताना हिंदूंच्या मनातला ‘इस्लामफोबिया’ कसा प्रगट करतो आणि वकील असलेली सून - आरती मोहंमदचा कसा बचाव करते, त्याची ‘बाइज्जत’ सुटका करते, हे ‘मुल्क’चं थोडक्यात कथानक.
आज देशात राजकारणासाठी जे धार्मिक ध्रुवीकरण चाललं आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘मुल्क’च्या केंद्रस्थानी एक सामान्य मुस्लिम कुटुंब असणं हेच त्याचं धाडसी वेगळेपण आहे. पुन्हा या कुटुंबातील माणसांचं जगणं, तुम्हाआम्हा आम भारतीयांप्रमाणे आहे, हे पूर्वार्धात अत्यंत प्रभावीपणे दिग्दर्शक दाखवतो. पण त्याच वेळी मुस्लिमांमधली अस्वस्थ तरुणाई व त्यांचं समाजानं केलेलं ‘घेटोनायझेशन’ यामुळे त्यातील मूठभर कसे कडव्या इस्लामीकरणाच्या जाळ्यात सापडतात व दहशवादाला ‘जिहाद’ कसं समजू लागतात, याचं दर्शन शाहिद या पात्राद्वारे प्रत्ययकारी रीतीनं सिनेमा पाहताना जाणवतं. पण मुख्य म्हणजे त्यानंतर पूर्ण कुटुंबाकडे मोहल्ला व हिंदू शेजारी देशद्रोही व दहशतवादी म्हणून कसे पाहू लागतात आणि त्यांना कोणकोणत्या प्रसंगातून जावं लागतं हा सिनेमाचा अस्वस्थ करणारा भाग आहे. तो वास्तव आणि धीटपणे येतो. त्यामुळे हा एक राजकीय व सामाजिक भाष्य करणारा पोलिटिकल सिनेमा झाला आहे. ते आजच्या अस्वस्थ काळात येणं याला फार महत्त्व आहे. त्यानं भारतीयांच्या सर्व मुस्लिमांकडे पाहण्याचा अनुदार दृष्टिकोन चर्चेत आणला आहे आणि समाजमाध्यमात त्यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. एवढी की शेखर गुप्तासारखे राजकीय लेखन करणारे पत्रकार तसेच पाकिस्तानच्या ‘डॉन’ वृत्तपत्र व अरबस्तानच्या ‘खालिज टाइम्स’नंही ‘मुल्क’ची समीक्षा केली आहे. आणि अनुभव सिन्हा अणि अभिनेत्री तापसी पन्नू (जिनं आरती मोहमंदची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे) यांचं सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं, तेव्हा प्रतीवाद करताना त्यांनी मुलाखती व ट्विटरद्वारे आपली मते स्पष्टपणे नोंदवत राष्ट्रवाद व दहशतवादाबाबत व्यापक चर्चा- संवाद सुरू केला. तो माझ्या मते महत्त्वाचा आहे.
इथला हिंदू समाज हा मूलत: सहिष्णू आहे. मुस्लिमांसह सर्व धर्मीयांसोबत शांततामय सहअस्तित्व व सौहार्दासह जगणं म्हणजेच इथली सर्वसमावेशक ‘गंगा-जमनी तहजिब’ म्हणजे संस्कृती आहे. पण धर्माधारित फाळणी, साठ-सत्तरच्या काळात झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगली- भिवंडीसारख्या दंगली, शिक्षण व रोजगारात त्यांची झालेली पिछेहाट व त्यांच्यातील तरुणांचे छोटे-मोठे गुन्हेगारी ते स्मगलिंग - एस्कटॉर्शनकडे वळणं, बाबरी मशिद पाडली जाणं आणि आज लोकशाहीमध्ये ‘अठरा टक्के मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात बेदखल करत त्यांच्याविना हिंदू मत ध्रुवीकरणानं धर्माच्या नावानं करत सत्तारूढ झालेलं आजचं सरकार... हे भारतीय मुस्लिम समाजाचे स्वातंत्र्योत्तर काळातील मार्गात सत्तर वर्षांचे टप्पे आहेत. त्यांची आजची असुरक्षितता (ती मानसिक मोठी असली तरी खरी आहे), जगण्याची भ्रांत, त्याच वेळी इस्लामच्या नावानं फोफावलेला जागतिक दहशतवाद - ‘इस्लाम खतरे में हैं’ या घोषणेनं मुस्लिम तरुणांचं आकृष्ट होत दहशतवादाकडे वळणं - मुख्य म्हणजे काश्मीरचं सतत धगधगतं असणं व सीमापार आतंकवादानं मुस्लिम समाजमन कट्टरतेकडे वळवणं, हा पाकिस्तान खेळत असलेला डाव आहे. त्याचा विपरित परिणाम हिंदू मानसिकतेवर होत त्यांना ‘इस्लामफोबिया’ होणं, त्या बळावर ध्रुवीकरण करत निवडणुका लढवणं, हा प्रकार भारताचे दोन प्रमुख राष्ट्रव्यापी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष व काँग्रेस करत आहे. त्याची धग आता तीव्रतेनं साऱ्या देशाला बसू लागली आहे. अशा पार्श्वभूमीवर अनुभव सिन्हानं आजचा नव उग्र राष्ट्रवाद, त्याला मानवतेऐवजी धर्मवादाचं दिलेलं रूप आणि आतंकवाद म्हणजे काय यावर भाष्य करत लोकशाहीला आवश्यक असणारा एक महत्त्वाचा संवाद ‘मुल्क’द्वारे सुरू केला आहे. म्हणून त्याचं स्वागत केलं पाहिजे. हे सारे प्रश्न त्यांनी कशा खुबीनं, प्रसंग व पात्रांद्वारे सिनेमात सादर केले आहेत, ते पाहण्याजोगं आहे.
सिनेमाची सुरुवातच मुळी सिनेमातील बॉम्बस्फोटानंतर एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या शाहिदच्या ‘रॅडिकलायझेशन’ने होते. त्याला इस्लामी दहशतवादाची दीक्षा देणारा महफूज आलम त्याला सांगत असतो की, ‘घुटने के नीचे पाजामा पहनकर, बारा रुपये की टोपी सरपर पहनकर पांच बार नमाज पढने से कोई मुसलमान नहीं होता।… ‘लढकर हमें अपनी जगह बनानी है और इन्शाल्ला हम लढकर अपनी जगह यकिनन लेंगे।’
या एका प्रसंगातून दिग्दर्शकानं तरुण मुस्लिम कसा दहशतवादी जिहादकडे वळतो, हे प्रभावीपणे दाखवलं आहे.
आरतीनं आफताब मोहमंदशी माणूस म्हणून लग्न केलं, त्याआड त्यांचे धर्म आले नव्हते, हे आपल्या सासूला सांगताना ती म्हणजे की, आता जन्मास येणाऱ्या मुलाचा धर्म कोणता हे आफताब ठरवू पाहत आहे, ते मला साफ नामंजूर आहे... पण अशा आंतरधर्मीय विवाहात मुलीनं नवऱ्याचा धर्म स्वीकारून मुलांना तो धर्म दिला जातो, पण आजची आधुनिक-पुरोगामी पिढी त्याबाबत प्रश्न विचारते, ते त्यातून व्यक्त झालं आहे.
चौबे हा मुराद अलीचा हिंदू शेजारी आहे. त्यानं १९९२ साली बाबरी मशिद पाडल्यानंतर झालेल्या दंग्यांच्या वेळी शेजारधर्म निभावत मुरादचं रक्षण केलेलं असतं, पण २०१८ येईतो पुलाखालून एवढं पाणी वाहून गेलेलं आहे की, चौबेला आपला मुलगा कट्टर हिंदू होणं मंजूर झालं आहे. मुरादचा पुतण्या दहशतवादी असल्याचं कळताच तो त्याला सुनावतो, ‘एवढं सारं या देशानं तुम्हाला दिलं आहे, तरी आतंकवाद करणार असाल तर तुम्ही पाकिस्तानला का जात नाही?’ मग मुरादअलीला प्रश्न पडतो की, शाहिद जरी आतंकवादी असला तरी मी-माझं कुटुंब देशद्रोही नाही, हे कसं पटवून द्यायचं? तो एका हळव्या मन:स्थितीत आरतीला सांगतो, ‘जब मेरी बीबी तबस्सु निकाह कर के घर आई थी नयी नयी, बहोत लढती थी की, मैं उससे प्यार नहीं करता हूँ। मैं कहता - करता हूँ, बहोत करता हूँ। वो कहती - साबित करो... अब प्यार को कैसा साबित किया जाये? प्यार करके ही ना! आज अदालत में पुछा मुझे साबित करो अपना मुल्कसे प्यार? कैसे साबित करू? बेटी, तुम ये साबित करो अदालत में । नहीं तो मै हार जाऊंगा. मैं - मैं देशद्रोही नहीं हूँ।’
मुरादच्या घरावर ‘पाकिस्तान जाओ’ असं लिहिलं जातं, त्यावरून काही मुस्लिम त्याला छेडतात. तेव्हा तो म्हणतो, ‘पाकिस्तान लिखा है ना? अगर कुछ मुसलमान पाकिस्तान की जीत पर पटाखे फोडते है, तो लिखेंगे ही ना!’ या संवादातून दिग्दर्शकानं लहानसहान कृत्यं कशी पूर्ण कौमला बदनाम करतात व इतरांना ‘प्रेज्युडाईस’ करतात, हे सांगितलं आहे.
मुरादचा भाऊ बिलाल. त्याबाबत सरकारी वकील संतोष आनंद कोर्टात युक्तिवाद करताना म्हणतो की, ‘सात सो साल पहले बिलाल पांच बार अजान देणे का काम करता था। आज भी लाऊड स्पीकर से पाच बार अजान देकर बताया जाता है की, ईश्वर एकही है - वो अल्लाह है। हमारे ब्रह्मा-विष्णु-महेशजी की कोई भी हैसियत नहीं रही।’ हे वाक्य फार मार्मिक आहे. त्यातून रस्त्यावरून धर्म कसा आणला जातो व त्याची हिंदूंवर कशी प्रतिक्रिया उमटते हे दाखवून दिलं आहे. त्यावर शेवटी न्यायाधिश मार्मिक टिपणी करतात – ‘बिलाल नाम लेकर यदि आप पाच सो साल पिछे जाओगे, तो पांच हजार साल पिछे जा सकते है। आज बिलाल का नाम लेकर डिस्कस करते रहोगे, तो २०१८ के आज के प्रॉब्लेम कैसे सॉल्व्ह करोगे?’
शेवटी आरती जो युक्तीवाद करते, त्यातून दिग्दर्शकाला आपल्याला काय सांगायचं आहे, हे व्यक्त केलं आहे. ‘पब्लिक प्रॉसिक्युटरने वाकई अच्छा शेर कहा है की, हम उन्हे अपना बनाए किस तरह? वो हमे अपना समझते ही नहीं। ये केस है पुरा का पुरा - हम और वो का। अस अॅण्ड दे का। मुल्क कागीज की लकिरों से नहीं बनता, वो दिल-दिमाग में बसता है, लेकिन उसको हम और वो में बाट दिया... ये केस आंतकवाद का है, रिलिजन का नहीं. धिस केस नॉट अबाऊट कम्युनल अॅक्ट, बट ऑफ क्रिमिनल अॅक्ट !’
निकाल देताना न्यायाधीश मार्मिक पण नेमकं विधान करतात. ‘मुरादअलीजी, किसीने आप की दाढी पर सवाल उठाया, तो इमोशनल मत होना. ये किताब है - संविधान। उसके पहले पन्ने की फोटोकॉपीज बनावो दो-चार और उनको दो। आप लोग अपने लड़कों पर नजर रख नहीं पाये। संभालो उनको - किससे मिलते है... क्या करते है? इस्लाम के एजंट नहीं है, आतंकवादी वो उसे नाम से धंदा करते है।
दानिजशी (पोलीस अधिकारी), आप प्रेज्युडिस है, अपना चष्मा साफ किजिए, दुनिया साफ हो जायेगी। ‘हम और वो’ में समाज को बाटने की कोशिश नहीं करना चाहिये. हम अच्छे है, वो बुरे है... तो समझो इलेक्शन का टाइम आया है...’
अशा असंख्य छोट्या-छोट्या प्रसंगांतून व संवादातून दिग्दर्शकांनी ‘मुल्क’मध्ये जो विचार प्रेक्षकांना दिला आहे, तो महत्त्वाचा आहे. सर्व मुस्लिम आतंकवादी नसतात, पण प्रत्येक आतंकी मुस्लिमच कसा व या प्रच्छन्न प्रश्नात कसा ‘इस्लामफोबिया’ ठासून भरला आहे, हे परिणामकारक रीतीने दर्शवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
शांततावादी व देशप्रेमी मुरादअली मोहंमदची भूमिका ऋषी कपूरनं साकारली आहे. त्याचा ‘अमर, अकबर अॅन्थनी’मधला प्रेमळ, दिलखुलास तरुण अकबर इलाहाबादी प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्याचा अकबर ते मुरादअली हा प्रवास केवळ प्रगल्भ होत जाणाऱ्या व्यक्तीरेखांचा नाही तर तो भारतीय समाजाची मुस्लिमांप्रती बदलत जाणाऱ्या दृष्टिकोनाचा आहे. तो देशासाठी इष्ट नाही, म्हणून ‘हम और वो’मधील फरक मिटला गेला पाहिजे. जुना इतिहास उगाळत बसलो तर आजचे कळीचे प्रश्न आपण कसे सोडवणार?, हा न्यायाधीशांचा सवाल प्रातिनिधिक अर्थानं या देशाच्या भवितव्याची चिंता असणाऱ्या साऱ्या सुजाण नागरिकांचा आहे. त्याचा समर्पकपणे प्रत्यय आणून दिल्याबद्दल आणि दाखवलेल्या धाडसाबद्दल अनुभव सिन्हाचं कौतुक केलं पाहिजे.
माझा शेवटचा टेक आहे तो ‘मुल्क’मधून स्पष्ट केलेल्या दहशतवादाच्या व्याख्येबाबत. ‘टेररिझम’ का मतलब है राजनैतिक और सामाजिक उद्देश के लिए आम आदमीपर किया गया हिंसा का प्रयोग’ ही व्याख्या प्रमाण मानत युक्तीवाद करताना आरती म्हणते, ‘अनटचेबिलिटी का टेररिझम नहीं है? आदिवासीपर होनेवाला अत्याचार टेररिझम नहीं है?’ मुरादअलीचं एक विधान पण येथे नमूद केलं पाहिजे – ‘खाली मारने से आतंकवाद नही होता. किसी को डराके कोने मे चुपचाप बिठाना भी आतंकवाद है जनाब!’ यावर अधिक भाष्य करायची गरज नाही.
या लेखाचा शेवट मला अनुभव सिन्हांनी त्यांना ट्रोलिंग करणाऱ्या लोकांना उद्देशून जे पत्र ट्विटरवर लिहिलं, त्यातील दोन-तीन विधानांनी करायचा आहे. ते ट्रोलर्सना ‘ए लोनली लाऊडस्पिकर ऑन मोल’ असं संबोधत म्हणतात, “तुम्ही ज्यांना ट्रोल करत आहात (म्हणजे मला व ‘मुल्क’मधील कलावंतांना) त्यांना स्वत:चा आवाज आहे, जो तुमच्या मालकांना (‘इथं मालक कोण हे सांगितलं पाहिजे का?’) पसंत नाही. पाऊस येवो की ऊन पडो, तुम्हाला काही फरक पडत नाही. तुमच्या त्यांच्या द्वेष करण्याच्या नजरेत काही फरक पडत नाही. मला तुमची दया येते… हा सिनेमा तुम्ही जसा विचार करत आहात, तसा नाही. तो तुमचा मालकांचा (प्रपोगंडा करणारा) सिनेमा नाही. तो तुमच्याबद्दल आहे, माझ्याबद्दल आहे व प्रामुख्यानं तो आपल्या (सर्वां)बद्दल आहे.”
हा देश-मुल्क हा तुमच्या-माझ्या मन-मस्तकात बसलेला आहे. त्या देशाचं ‘हम’ आणि ‘वो’मध्ये रूपांतर करणं हे १९४७ प्रमाणे पुन्हा एकदा देशाची सामाजिक-मानसिक फाळणी करण्यासारखं आहे. हा देश ‘गंगा-जमनी’ तहजिबचा आहे. तो बहुधार्मिक व बहुसांस्कृतिक आहे. शांततामय सहअस्तित्व मान्य केलं, तरच तो अभंग, एकसंध राहणार आहे. ते नीटपणे समजून घेण्यासाठी हा सिनेमा विचारप्रवृत्त करण्यात यशस्वी झाला आहे. हा सिनेमा साऱ्यांनी आवर्जून पाहावा असा आहे.
हा आपल्या देश-मुल्कच्या भविष्याचा प्रश्न आहे. तो समजण्यात हा ‘मुल्क’ मदत करणारा व संवाद छेडणारा आहे!
.............................................................................................................................................
लेखक लक्ष्मीकांत देशमुख ९१व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
laxmikant05@yahoo.co.in
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment