धर्माचा असा बाजार कुठल्या व्यवस्थेस हितकारक ठरणार आहे? 
पडघम - सांस्कृतिक
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 06 September 2018
  • पडघम सांस्कृतिक हिंदू Hindu मुस्लिम Muslims धर्म Religion

समाजधारणेसाठी म्हणून धर्मसंकल्पना विकसित झाली. एका प्रचंड जनसमुदायाच्या सामूहिक वर्तनाचे परिचालन योग्य दिशेने व्हावे यासाठी धर्मश्रद्धा आणि त्यातील नैतिक मूल्यांच्या रुजुवातीस प्रारंभ झाला. ही रुजुवात व्यवस्थेच्या शिस्तबद्ध वाटचालीसाठी होती की, एका सुव्यवस्थित रचनेतील विवेक सुटून तिच्या झुंडी व्हाव्यात यासाठी होती, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. धारणेत अडसर निर्माण झाल्यास अथवा काही संकल्पना कालबाह्य ठरत असल्यास या धर्मसंकल्पनांची परखड चिकित्सा व्हायला हवी, असाही विचार या नीतिविषयक संकल्पना, श्रद्धाभाव रुजू करणाऱ्यांनी मांडून ठेवलेला असणारच. पण मग तरीही अशा धर्मश्रद्धांची चिकित्सा करण्याचे का टाळले जाते?

कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती अंधश्रद्धांना निमंत्रण ठरत असते, मानवी इतिहासातील उत्क्रांतीच्या टप्प्यावर आधुनिकतेच्या प्रबोधनपर्वानंतरही सुधारणांचा आग्रह धरण्यात आलेला आहेच. वास्तवाचे परीक्षण करणारा हा प्रवाह थोडासा अंधुक असेल, पण अखेरीस त्याचे अस्तित्व कायम राहिलेले आहे. मग तरीही जनसमुदायांकडून विवेकाला सोडचिठ्ठी देण्याचे प्रकार का घडतात? झारखंडमधील एका मृतदेहाचा धर्म ठरवण्याची चढाओढ ही अशाच प्रकारे आपल्या समाजव्यवस्थेच्या वाटचालीची दिशा स्पष्ट करणारी आहे.

या घटनांमुळे पुन्हा आपल्या वाटचालीसमोरील प्रश्न आ वासून उभे राहतात. धनबादनजीक झालेल्या अपघातात जागीच मृत्युमुखी पडलेल्या या युवकाचा मृतदेह नेमका कोणत्या धर्माचा, असा प्रश्न स्थानिक पोलिस यंत्रणेसमोर पडला आहे. त्याचा मृतदेह कोणाकडे सोपवावा, यासाठी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. त्यानंतर दोन भिन्नधर्मीय कुटुंबीयांनी या मृतदेहासाठी दावा केला आहे. या युवकाच्या हातावर ‘जय श्रीराम’ असे गोंदवल्यामुळे एका हिंदू कुटुंबाने त्याच्या पार्थिवाची मागणी केली आहे, तर याचवेळी या युवकाची खतना झाल्याचेही समोर आल्यामुळे एका मुस्लिम कुटुंबानेही त्याच्या मृतदेहाचा ताबा मागितला आहे. तपासासाठी आता यंत्रणा डीएनए चाचणीचाही पर्याय आजमावून पाहणार आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

या घटनेत भलेही स्थानिक पोलिसांसमोर मृतदेहाचा धर्म कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला असला तरी हा प्रश्न खरा आपल्या समाजव्यवस्थेसमोरील अडसर मानायला हवा. व्यक्तीच्या मृत्यूनंतरही धर्माचे भूत असे मानगुटीवर बसायला हवे का? मृतदेहाला असतो का कुठला धर्म? हा प्रश्न पडण्याइतपत आपला विवेक ढळावा अशी आपली वाटचाल झाली आहे का? अर्थात त्या घटनेत त्या मृतदेहावरील सोपस्कार पार पाडण्यासाठी त्याच्या निकटवर्तीयांचा शोध घेतला जाणे साहजिक आहे. पण एक समाज म्हणून, व्यवस्था म्हणून आपल्याकडे एखाद्याचे निव्वळ माणूस असणे एवढे गौण ठरावे का? ही खरोखरच अस्वस्थ करणारी बाब आहे.

प्रथमदर्शनी साधी वाटणारी ही घटना आपल्या वाटचालीचा पट नीट तपासून पहायला हवा. मानवता हाच मोठा धर्म आहे, हे मूल्य आपल्या व्यवस्थेला का महत्त्वाचे वाटत नाही? त्या-त्या काळातील समाजव्यवस्थेच्या धारणेसाठी म्हणून दृढमूल झालेल्या नीतीविषयक संकल्पना या मुळात माणसातला आपपरभाव नाहीसा करण्यासाठी, तसेच हे जनसमुदाय अधिक उन्नत व्हावेत यासाठी प्रस्थापित झालेल्या आहेत. असे असतानाही आज या समूहाचे वर्तन याच्या अगदी विरुद्ध टोकाचे का बनते आहे? नीतिविषयक संकल्पनांचे स्थल-काल-व्यक्तीसापेक्ष फरक आज असे विद्रूप स्वरूप धारण करून अखिल मानवतेसमोरील अडसर का बनायला लागले आहेत? 

पाश्चिमात्त्य व्यवस्थांवरील धार्मिक पगडा झुगारून देताना आधुनिकीकरणाच्या टप्प्यात धर्माचे वर्णन अफूची गोळी म्हणून करण्यात आलेले आहे. समूहातील विवेकवाद, चिकित्सक वृत्ती संपल्यास या नीतीविषयक आचारसंहितेच्या अवडंबरावर स्वार झालेल्या झुंडींचा इतिहास ताजा असल्यामुळे हे विवेचन अनाठायी मानता येत नाही. पण भारतीय उपखंडातील नीतीविषयक संकल्पनांच्या मुळाशी खोलवर कुठेतरी अखिल मानवजातीच्या कल्याणाचे, वैविध्यातील ऐक्याचे सूत्र निश्चितपणे आढळते. हे सूत्र अधिक प्रज्ज्वलित करण्याऐवजी आपला समूह त्याच्यावरील अनुषंगिक आवरणे कवटाळत बसला आहे का? उपनिषदांमधील मानवतावादाच्या अंत:प्रेरणेपेक्षा माणसा-माणसांत द्वेष निर्माण करणाऱ्या बेगडी अस्मितांचे जाळे आपल्याला जास्त महत्त्वाचे वाटते का? 

या संकल्पनांची काळानुरूप चिकित्सा करायला हवी, तरच समाजव्यवस्थेच्या विकासातील उर्ध्वगामी टप्पे पादाक्रांत करता येतील. अन्यथा सध्या अनुभवण्यास मिळत असलेल्या आंधळ्या अस्मितांचा अनाचार व पोकळ धर्मश्रद्धांचा बाजार कोणत्याही मानवीसमूहाचे कसलेच हित साधू शकणार नाही. 

अखिल मानवजातीच्या कल्याणास आक्षेप घेणारी धर्मश्रद्धा कुठल्याही समूहाच्या उपयोगाची नसते. मानवी समुदायाच्या विकासात अडसर निर्माण करणारे विचार प्रवाहात टिकू शकत नाहीत. नीतीविषयक संकल्पनांचा विधायक, व्यापक विचार हा उदारमतवादाचा, मानवतावादाचा आविष्कार असतो. त्यामुळेच धर्म हा अखिल मानवी समूहाच्या उत्थानाचा मार्ग ठरावा; त्याचा असा बाजार कुठल्या व्यवस्थेस हितकारक ठरणार आहे? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......