अजूनकाही
१. राज्यातील सरकार म्हणजे नोबिता – डोरेमॉनचं कार्टून आहे. जनता नोबिता आहे आणि सरकार हे नवनवीन गॅजेट दाखवणाऱ्या डोरेमॉनच्या भूमिकेत आहे : राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
विरोधी पक्षात असल्यामुळेच विखे पाटील इतकं मौलिक बोलू शकत आहेत, यात शंकाच नाही. पण, त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की, आपल्या पक्षाचं आणि विचारसरणीचं सरकार सर्वाधिक काळ सत्तेत असताना जनतेची बालबुद्धी काही कमी झाली नाही आणि राजकीय नेत्यांकडे पाहिल्यावर पोगो किंवा कार्टून नेटवर्क पाहत असल्याचा भास होणंही थांबलं नाही. आता आलटून पालटून डोरेमॉन आणि टॉम अँड जेरी पाहण्याशिवाय तिच्याकडे तरी पर्याय काय?
…………………
२. उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. नोटाबंदी आणि त्यामुळे देशातील सामान्य जनतेला सहन करावा लागत असलेला त्रास या विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती उद्धव यांनी दिली.
म्हणजे मुंबई महानगरपालिकेत युती कायम आहे, हे स्पष्ट झालं. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने जनतेला गॅसवरच ठेवायचं आणि उद्धव यांच्या पक्षाने जनतेच्या मनातल्या खदखदत्या असंतोषाच्या कुकरची शिटी वाजवून वाफ बाहेर काढत राहायचं आणि दोघांची मतं एकमेकांच्यात सेफ राहतील, असं पाहायचं, ही स्ट्रॅटेजीही समजून गेली!
…………………
३. काळ्या पैशावर ‘सर्जिकल स्ट्राइक’चा आव आणून केलेल्या नोटाबंदीमुळे काही लाख कोटींचा काळा पैसा बँकिंग व्यवस्थेत येऊ न शकल्याने निकामी होऊन जाईल, हा सरकारचा अंदाज चुकला असून रद्द नोटा जमा करण्याची चार आठवड्यांची मुदत बाकी असताना साडे नऊ लाख कोटी रुपये जमा झाल्याने काळा पैसाही बँकांमध्ये येऊन शुभ्रसफेद झाल्याचं स्पष्ट होत आहे.
आताही देशभरात वीस-पंचवीस टक्क्यांच्या दराने काळा पैसा नव्या नोटांमध्ये बदलून मिळत असला म्हणून काय झालं? चिंता करू नका… देशाच्या प्रमुख जादूगारांकडच्या छडीच्या एका झटक्याने काळा पैसा कोणता ते स्पष्ट होऊन तो गरिबांच्या खात्यात जमा होणार आहे.
…………………
४. काळ्या पैशाविरुद्ध लढाई करणारा मी गुन्हेगार कसा? मी एक फकीर आहे. मी झोळी घेऊन निघून जाईन. : पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्या झोळीवरही तुमच्या नावाची नक्षी असेल आणि पंचतारांकित सुखसोयीयुक्त, वातानुकूलित गुहेत निवास करण्यासाठी तुम्ही गौतम किंवा मुकेश किंवा अन्य शिष्योत्तमाच्या पुष्पक विमानातून अवघे शे-दोनशे सेल्फी कॅमेरे आणि चार-पाचशे महागडे पोषाख सोबत घेऊन तुम्ही साश्रुनयनांनी प्रयाण कराल, याबद्दल आम्हा भक्तगणांच्या मनात काहीच शंका नाही.
…………………
५. १३ हजार कोटींची संपत्ती जाहीर करणाऱ्या महेश शहाने जाहीर केलेले सगळे पैसे अमित शाह यांचे; महेश शहाच्या तीन महिन्यांतल्या सगळ्या हालचालींची माहिती घ्या, तो कोणत्या पक्षाशी आणि नेत्यांशी संबंधित आहे ते समजून घ्या : हार्दिक पटेल
हार्दिक भाऊ, आधार कार्डाच्या आधारे जी माहिती सरकार बसल्याजागी काढू शकतं, ती माहिती भाजपच्या आमदार-खासदारांनी पक्षाला 'पुरवायची' आणि मग त्या बँक खात्यांतल्या व्यवहारांच्या आधारावर क्लीन चिट मिळवायची, अशी अफलातून परस्पररंगसफेदी योजना ज्यांच्या त्याग आणि सचोटीच्या बळावर उभी आहे, त्या फकीर क्रमांक दोन यांच्याबद्दल असं बरोबर नाही.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Sindamkar
Mon , 05 December 2016
नेहमी प्रमाणेच उत्कृष्ठ धुलाई.... !! स्तंभ लेखकाचे नाव कळू शकेल काय... ??