अजूनकाही
जी. भगवान या शिक्षकाची बदली तामिळनाडूतील थिरूवल्लुरमधील वेलीआग्राम येथून झाल्यावर रडणारी मुलं, गावकरी आणि पालक हे छायाचित्र देशभर सोशल मीडियात आणि माध्यमांत फिरत होतं. या शिक्षकानं या शाळेत फक्त तीन वर्षांत असं काही काम केलं की, त्याची बदली ही राष्ट्रीय चर्चेची घटना ठरली. अवघ्या २८ वर्षांच्या भगवानला मिळालेलं हे प्रेम थक्क करणारं आणि हेवा वाटावं असंच आहे.
जी. भगवानच्या बदलीची बातमी शाळेत कळताच मुलांनी शाळेचे दरवाजे बंद करून घेतले. त्याची स्कूटर दूर नेऊन लावली. त्याची बॅग लपवून ठेवली. मुलांनी त्याला मिठी मारली व सर्व शाळा रडायला लागली. प्रभू रामाला निरोप देताना ‘गीत रामायणा’तील ‘थांब सुमंता थांबवी रे रथ’ या गीताची आठवण झाली.
भगवानसारखीच महाराष्ट्रातल्या इगतपुरी तालुक्यातल्या पांगुळ गव्हाण गावातल्या वैभव गगे या शिक्षकाची बदली झाली. त्यालाही असंच प्रेम मिळालं. त्याला निरोप देतानाही मुलांसोबत गावकरीही ढसाढसा रडले. या तरुण शिक्षकाची बातमी ‘एबीपी माझा’वर झळकल्यावर मी आवर्जून त्याची उत्सुकतेनं चौकशी केली. त्यानं वयाच्या २० व्या वर्षी पहिली नोकरी या गावात स्वीकारली. सलग ११ वर्षं तिथं काम केलं. आगरी आणि कातकरीबहुल असलेल्या या गावाची पोलीस रेकॉर्डला सतत अशांत गाव म्हणून नोंद आहे. अनेकांवर गुन्हे असलेल्या या गावातील गावकरी ढसाढसा रडतात हे खूप थक्क करणारं आहे.
शिक्षक म्हणून या दोघांनी असं काय गारुड केलं?
भगवानचा शिकवण्याचा विषय इंग्रजी. तो म्हणाला, “मी मुलांना गोष्टी सांगत होतो. मुलांशी इतर विषयांवर संवाद करायचो. गाणी म्हणत होतो. मुलांशी बोलून त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घेत होतो, त्यांना भविष्यातल्या करिअरच्या संधी सांगायचो. प्रोजेक्टरवर विविध माहिती द्यायचो. मी मुलांसाठी शिक्षक नव्हतो तर मित्र किंवा भाऊ होतो.”
मुलांनी रोजची डायरी लिहिणं हा त्याचा विशेष उपक्रम होता. इंग्रजी या विषयापलीकडे तो मुलांना सामान्य ज्ञानाची माहिती सांगायचा. ती मुलांना खूप आवडायची. ही त्याची शिक्षक म्हणून असलेली वैशिष्ट्यं, कोणत्याही शिक्षकाला अगदी सहज अमलात आणण्यासारखीच आहेत. मुलांचं इतकं प्रेम मिळाल्याबद्दल तो म्हणाला, “मला केवळ पगारच मिळाला नाही, तर प्रेमही मिळालं.”
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
वैभवनं मुलांमध्ये भावनिक विकसनासाठी त्यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकातील गोष्टी मुलांना सांगितल्या. त्यातून मुलं संवेदनशील होण्यास मदत झाली. संगीतमय परिपाठ सुरू केला. कवितांना चाली लावल्या. शाळा डिजिटल केली. पालकांशी घरगुती संपर्क स्थापित केला. त्यातून गावातील भांडणं कमी झाली.
मी वैभवला विचारलं, “अशिक्षित पालकांना तू शाळेत जे काही उपक्रम करत होतास, ते कळत होते का?” त्यावर तो म्हणाला, “त्यांना मी काय शिकवतो, ते कळत नव्हतं, पण आपल्या मुलांसाठी काहीतरी चांगलं घडतं आहे, हे समजत होतं.”
भगवान आणि वैभव हे दोघंही शिक्षक खूप तरुण, ऐन तिशीतील आहेत. इंग्रजी आणि गणित या दोन विषय कसे शिकवले जातात यावर अभ्यासात गोडी लागणं अवलंबून असतं. त्यामुळे इंग्रजी विषय भगवान व वैभवनं खूप सोप्या पद्धतीनं शिकवला असावा. त्यामुळे मुलांना विषयाबरोबर हा शिक्षकही आवडून गेला. त्याचबरोबर तो इतर माहितीही मुलांना सांगत होता आणि मुलांनाही ती आवडत होती. अशी वेगळी माहिती सांगणारा शिक्षक मुलांना आवडतो.
या दोघांचा समाजसंपर्क ही अतिशय चांगला होता. मुलांबरोबर पालकही रडले यातून गावकरी आणि शिक्षक यांच्यातलं प्रेम दिसतं. विशेष म्हणजे या दोन्हीही खेड्यातील बहुसंख्य पालक हे निरक्षर आणि कष्टकरी आहेत. या वर्गाला शिक्षणाचं खूप महत्त्व वाटतं. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळून त्यांचे आर्थिक-सामाजिक वर्ग बदलावेत, आपले कष्ट या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, असं त्यांना मनोमन वाटत असतं.
आणि असा आमविश्वास देणारा आणि त्यांच्या सुख-दु:खाशी जोडणारा शिक्षक भेटला तर ते त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात.
आज खेड्यात न राहता येऊन-जाऊन असणाऱ्या शिक्षकांमुळे या नात्याची वीण काहीशी उसवली आहे. शिक्षक गावात येतात, तेव्हा गावकरी कामाला गेलेले असतात आणि गावकरी गावात येतात, तेव्हा शिक्षक गेलेले असतात. विदर्भात एका शाळेतील शिक्षक गावातील रोज एका घरी चहा पिण्यासाठी जात.
भगवान आणि वैभव या दोन शिक्षकांना इतकं प्रेम का बरं मिळालं असेल, यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला साने गुरुजींची आठवण झाली. मध्यंतरी मी अमळनेरला गेलो होतो. आता गुरुजींचे फारसे विद्यार्थी हयात नाहीत. बोहरी मुस्लीम जमातीतील एक ९० वर्षांचे वृद्ध आजोबा होते. मी त्यांना भेटायला गेलो आणि ‘गुरुजी’ हे केवळ नाव काढताच जणू साने गुरुजी काल गेले अशा वेदनेनं ते वृद्ध गृहस्थ रडू लागले. मी थक्क झालो. गुरुजी गेल्यावर ६७ वर्षांनी त्यांचा ९० वर्षांचा विद्यार्थी रडत होता.
तेव्हा एखादा शिक्षक मुलांच्या भावविश्वात किती खोलवर रुजू शकतो, याचा प्रत्यय आला.
विद्यार्थ्यांचं प्रेम मिळण्याचं आणखी एक कारण शिक्षा न करणं हे असतं. साने गुरुजींनी मुलांना उगाच धाक लावणं, शिक्षा करणं असं केलं नाही. त्यातून मुलं भीतीविना त्यांच्याकडे आकृष्ट झाली. कोणत्याही शिक्षकाचा भर विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी शिक्षा करण्यावर असतो किंवा चुका दाखवण्यावर असतो. साने गुरुजींनी चुका दाखवण्यापेक्षा त्या दुरुस्त करण्यावर भर दिला. वसतिगृहात विद्यार्थी कपड्यांच्या घड्या करत नसत, अंगणातच संडास करत, पण गुरुजी मुकाटपणे ते सारं साफ करत. त्यांनी मुलांना कृतीतून उपदेश केला आणि मुलं खजील झाली. शिक्षकांनी न्यायाधीश आणि पोलीस होण्यापेक्षा अशीही एक वेगळी पद्धत मुलांना सुधारण्याची असते.
मुलांनी मारामारी केली तर साने गुरुजी काय करायचे, असा प्रश्न मी त्यांचे विद्यार्थी सराफ यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, “दोन्ही मुलांना गुरुजी जवळ घेऊन कवटाळत आणि ‘अरे, असं नसतं करायचं’ असं म्हणत राहायचे.” प्रेमानं चुकांची जाणीव करून देण्यातून मुलांना शिक्षकांविषयी जास्त माया वाटते.
भगवान व वैभव या दोन शिक्षकांचं वर्तन या प्रकारचं असलं पाहिजे. साने गुरुजी म्हणायचे, शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वात एक सौम्यता असली पाहिजे. मुलांशी बोलताना आणि त्यांना हाताळताना खूप सौम्यता असली पाहिजे. हे दोन शिक्षक नक्कीच तसे आहेत.
या शिक्षकांच्या निमित्तानं मला ओशो रजनीश आठवले. ओशो लिहितात की, ‘लहान मुलांशी खूप प्रेमानं आणि सौम्यतेनं वर्तन करणं आवश्यक असतं. त्यामुळे प्राथमिक शाळेतील सर्व पुरुष हटवले पाहिजेत आणि त्यांच्या जागी सर्व शिक्षिका असल्या पाहिजेत.’ रजनीशांच्या नेहमीच्या धक्कातंत्र शैलीमुळे यावर चर्चा झाली. पण त्यापुढे जाऊन ओशो जे म्हणतात ते महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, शिक्षक महिला असाव्यात, पण शिक्षणात स्त्रैण असणारे शिक्षक असायला हवेत. म्हणजे प्रेम, करुणा, सौम्यता, सेवाभाव, वात्सल्य, ममता ही स्त्रैण असणारी मूल्यं त्या शिक्षणात असायला हवीत. महिलांमध्ये ही मूल्यं प्रधान असल्यानं त्या शिक्षणक्षेत्रात असल्या पाहिजेत. पण ही मूल्यं पुरुषांतही असतात. म्हणूनच ज्ञानेश्वर आणि साने गुरुजी यांना आपण ‘माउली’ म्हणतो. या वयात मुलांना जर कठोर वागणारे शिक्षक असले तर त्यांच्या भावविश्वाची मोडतोड होते, असं त्यांचं म्हणणं होतं.
आपल्याकडे ‘शाळेत मुलांना मारू नका’ यासाठी कायदा करावा लागतो, यातच सारं आलं. पण तरीही मुलांवर प्रेम करणारे भगवान आणि वैभव सारखे खूप शिक्षक आहेत. प्रेम हा त्यांचा स्थायीभाव आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्रात, दोन्हीकडेही एकाच वेळी शिक्षक-विद्यार्थी नातं दिसलं. भगवान व वैभव हे दोन्ही शिक्षक प्रेममय शिक्षकांचे प्रतिनिधी आहेत. प्रेम हीच शिक्षकांची आणि शिक्षणाची भाषा असली पाहिजे, हाच या विद्यार्थ्यांच्या अश्रुचा सांगावा आहे.
.............................................................................................................................................
लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आहेत.
herambkulkarni1971@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment