अजूनकाही
पंजाबी-हिंदीतील आघाडीच्या लेखिका अमृता प्रीतम यांचं जन्मशताब्दी वर्ष ३१ ऑगस्टपासून सुरू झालं आहे. त्यानिमित्तानं त्यांची ओळख करून देणारा हा लेख...
.............................................................................................................................................
“माझी कहाणी ही प्रत्येक देशातल्या स्त्रियांची कहाणी आहे आणि अशा आणखी कितीतरी कहाण्या आहेत, ज्या कधी कागदावर उतरल्या नाहीत; पण ज्या स्त्रियांच्या शरीरावर आणि मनांवर लिहिल्या गेल्या आहेत,” अमृता प्रीतम यांच्या ‘काळा गुलाब’ या आत्मचरित्रातील हे विधान या लेखिकेची भूमिका तर व्यक्त करतेच, पण त्याचबरोबर आपली शब्दांतून व्यक्त होण्याची पद्धत, नाजूक संवेदना, व्याकूळ भावना, अस्वस्थता आणि आपल्या दु:खाचे वैश्विक परिमाण शोधण्याची वृत्ती या बाबीही दृग्गोचर करते. अमृता प्रीतम यांचे सारे आयुष्यच असे राहिले. त्यांचा जन्म ज्या शीख समाजात झाला, त्याच्या रोषाला तर त्यांना आयुष्यभर तोंड द्यावे लागले. पण म्हणून त्या कधी खचून गेल्या नाहीत, उद्विग्न झाल्या नाहीत आणि आयुष्याबद्दल कडवटही झाल्या नाहीत. आपल्या वाट्याला आलेले आयुष्य त्या नेहमीप्रमाणेच जगल्या. त्यामुळेच त्यांच्यातील संवेदनशीलता, हळूवार, अलवारपणा आणि व्याकुळता शेवटपर्यंत कायम होती.
‘कविता’ हे पहिले प्रेम
अमृताजींनी कथा, कादंबऱ्या, अनुवाद असे विपुल लेखन केले असले तरी ‘कविता’ हे त्यांचे पहिले प्रेम होते. आपल्या लेखनातून आपले कर्तृत्व सिद्ध करत त्यांनी जसे समाजाच्या रोषाला तोंड दिले, तसे त्या आपल्या लेखनाच्या सोबतीने जगल्या. त्यांचे जगणे म्हणजे एक अलवार कविताच होती.
अमृताजींचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९चा. गुजरांवालाचा (आता हे ठिकाण पाकिस्तानात आहे.). आई-वडिलांचे त्या एकुलते एक अपत्य. त्यामुळे त्यांचे बालपण तसे लाडाकोडात गेले. आई-वडील दोघेही शिक्षक होते. वडील कर्तारसिंग ‘पीयूख’ या नावाने लेखन करत. एका मासिकाचेही संपादन करत. ‘पीयूख’ म्हणजे अमृत. कर्तारसिंगांनी हेच नाव आपल्या कन्येसाठी मुक्रर केले.
घरचे वातावरण असे साहित्यिक असल्याने अमृताजींवर त्याचे नकळत संस्कार घडले. वडिलांबरोबर त्यांनाही आपण लिहावे, कविता कराव्यात असे वाटू लागले. त्यातून वयाच्या सोळाव्या वर्षी ‘ठंडियाँ किरणन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. पुढे १९३८मध्ये ‘नयी दुनिया’ हे स्वतंत्र नियतकालिक त्यांनी काढले.
जिवाभावाचे मित्र
अमृताजींच्या आई त्या अकरा वर्षांच्या असतानाच वारल्या. त्यामुळे पुढील जडणघडण वडिलांच्या मार्गदर्शनाखाली होत असली तरी काहीसे एकलकोंडे आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. पण त्याचबरोबर आपल्या आईच्या मनातील राग, विद्रोह त्यांनी घेतला. त्यांच्यातील बंडखोर वृत्ती त्यातून फुलत, रुजत गेली. इतर मुलांसोबत खेळायचे नाही, त्यांच्याशी बोलायचे नाही, अशी वडिलांची त्यांना सक्त ताकीद होती. वडील अतिशय कडक स्वभावाचे होते. त्यामुळे अमृताजींनी पुस्तकांनाच आपले जिवाभावाचे मित्र मानले. त्यांच्याशीच मैत्री केली.
त्या काळी मुलींची त्यांच्या लहाणपणीच लग्न ठरवली जात. अमृताही त्याला अपवाद नव्हत्या. त्यांचे लग्नही वयाच्या चौथ्या वर्षीच ठरवण्यात आले. पुढे त्या १६ वर्षांच्या झाल्यावर गुरुबक्षसिंह यांच्याशी त्यांचा ठरल्याप्रमाणे विवाह करण्यात आला. गुरुबक्षसिंह ‘प्रीतलडी’ या पंजाबी पत्रिकेचे संपादन करत. अमृता दोन मुलांच्या आई झाल्या. पण सासरच्या मंडळींना त्यांच्या लेखनावर होणारी टीका, आक्षेप सहन होत नसत. परिणामी त्यांनी अमतृताजींना लेखन थांबवावे अशी ताकीदच दिली.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
साहिर यांच्यावरील प्रेम
पुढे १९४४मध्ये त्यांची साहिर लुधियानवी या हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून ख्यातकीर्त असणाऱ्या कवीशी ओळख झाली. अक्षरांच्या साथसोबतीने उभयतांना भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ आणले खरे, पण त्यांचे हे नाते सामाजिक नीतीनियमाच्या जोखडात अडकून पडले आणि विरळ होत गेले. मात्र अमृताजींनी साहिर यांच्यावरील प्रेमाची कबुली वेळोवेळी दिली. हे त्यांचे प्रेम किती उत्कट होते याची प्रचिती पुढील विधानातून येईल. ‘साहिर तुझे वडील आहेत’ असे वर्गात चिडवल्याने त्यांच्या मुलाने घरी आल्यावर अमृताजींना विचारले की, ‘आई, मी कुणाचा मुलगा आहे? साहिरचा की इमरोजचा?’ त्यावर अमृताजींनी तेवढ्याच स्पष्टपणे सांगितले – ‘बेटा, तू साहिरचा मुलगा असतास तर मला अभिमान वाटला असता, पण वस्तुस्थिती तशी नाहीये.’
साहिरसोबतच्या त्यांच्या या प्रेमसंबंधांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनावरही पडले आहे. ‘सुनहरे’ या कवितासंग्रहात त्याची अनेक उदाहरणे सापडतात. याच त्यांच्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
आशयघनता व सखोलता
फाळणीनंतर त्या भारतात आल्या. सुरुवातीला काही काळ डेहराडूनला राहिल्या. १९४७मध्ये दिल्लीला स्थायिक झाल्या. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी हिंदीतून लिहायला सुरुवात केली. लेखनात बस्तान बसत असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच घडामोडी घडल्या. साहिर यांच्यावरचे त्यांचे प्रेम अमूर्तच राहिले. १९६०मध्ये त्यांनी गुरुबक्षसिंह यांच्याशी घटस्फोट घेतला आणि १९६६पासून त्यांचे प्रसिद्ध चित्रकार इमरोज यांच्याबरोबर सहजीवन सुरू झाले. इमरोजबरोबरचे त्यांचे सहजीवन खूपच समाधानी आणि तृप्त करणारे होते. इमरोज यांची चित्रे आणि अमृताजींच्या कविता या व्यामिश्रतेतून उभयतांच्या नात्याला एक आशयघनता व सखोलता प्राप्त झाली.
ऐ कबीरन
लालटेनकी रोशनी में लिखी
इस दुआ को कबूल कर
क्यों कि, अक्षरों की खड्डी पर तुझे
बुनना है अमन, दोस्ती, प्यार का ताना बाना
अमृताजींची ही कविता त्यांच्या स्वत:बद्दलही खूप काही सांगून जाणारी आहे. त्यांच्या साहित्यापासून व्यक्तिगत आयुष्यापर्यंत टीका, आक्षेप त्यांना सहन करावे लागले. विशेषत: त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर तर त्यात खूपच भर पडली. खूप अवहेलना सहन करावी लागली. मानहानी सोसावी लागली. इस्मत चुगताई, सआदत हसन मंटो यांच्यासारखे एका एका शब्दामुळे त्यांच्यावरही खटले भरण्याचे प्रयत्न झाले. ‘जिन्दगीनामा’ या शब्दामुळे त्यांच्यावर वीस वर्षांपेक्षाही जास्त काळ खटला चालवला गेला. शब्द कुणाची खासगी मालमत्ता असू शकतात आणि त्यावरून अमृताजींना एवढा प्रदीर्घ काळ जाच सहन करावा लाहतो, हे सत्य पचवणे तसे अवघड जाते खरे, पण ही वस्तुस्थिती आहे. पण त्यावर अमृताजींना एकदा प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा त्यांनी आपल्या कवितेच्याच ओळी सांगितल्या –
एक दर्द था
जो सिगरेट की तरह मैंने चुपचाप पिया है
सिर्फ कुछ नज्मे हैं
जो सिगरेट से मैंने राख की तरह झाडी है
विपुल लेखन
अमृताजींनी विपुल लेखन केले. कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, निबंध आणि आत्मचरित्र या वाङ्मयप्रकारात मिळून ऐंशीच्यावर पुस्तके त्यांनी लिहिली. पंजाबी, हिंदी आणि उर्दूतून लेखन केले. त्याचे अनेक भारतीय भाषांत आणि इंग्रजीसह जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषांतही अनुवाद झाले आहेत. धुळ्याच्या लेखिका हेमा जावडेकर या अमृताजींच्या साहित्याच्या विचक्षण अभ्यासक. त्यांनी त्यांच्या काही पुस्तकांचे मराठीतही अनुवाद केले आहेत. ‘ना राधा, ना रुक्मिणी’ ही त्यांनी अनुवादित केलेली कादंबरी नॅशनल बुक ट्र्स्टने प्रकाशित केली असून तिला १९९९चा उत्कृष्ट अनुवादाचा साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘सारा शगुफ्ता’ या उर्दू कांदबरीचाही त्यांनी अनुवाद केला आहे.
‘डॉक्टर देव’, ‘पिंजर’, ‘चक्करनंबर छत्ती’, ‘बुलावा’, ‘बंद दरवाजा’, ‘कोरे कागद’, ‘एरियल’, ‘सारा शगुफ्ता’, ‘एक थी अनिता’, ‘गाव नंबर ३६’ या त्यांच्या काही कादंबऱ्या. ‘पाँच बरस लंबी सडक’ हे कथापंचक. यात त्यांनी स्त्री-पुरुषांच्या नात्यासंबंधी व त्यांच्यातील संबंधांच्या कंगोऱ्याबद्दल लिहिले आहे. ‘कडी धूप का सफर’ हे त्यांचे जगभरातील स्त्री लेखिकांनी अनुभवलेल्या संघर्षात्मक जीवनाबद्दल आणि समाजाकडून झालेल्या अडवणुकीबद्दलचे पुस्तक आहे.
‘साहित्याच्या क्षेत्रात पुरस्कार महत्त्वाचा असतोही आणि नसतोही’, असे म्हणणाऱ्या आणि तसे मानणाऱ्या अमृताजींच्या वाट्याला अनेक मानसन्मान, पुरस्कार आले. साहित्य अकादमी, पद्मश्री, यांसारखे मानाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. राज्यसभेचे सन्माननीय सदस्यत्वही त्यांना देण्यात आले होते. फ्रेंच सन्मान, डी. लिट अशा अनेक सन्मानांनी त्यांना आभूषित केले गेले आहे. १९८२ साली त्यांना ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००० साली केंद्रीय सरकारने त्यांचा ‘सहस्रकातील कवयित्री’ म्हणून सन्मान केला. पद्मविभूषण सन्मानही त्यांना जाहीर झाला होता, पण त्यावेळी त्या आजारी असल्याने तो सन्मान स्वीकारू शकल्या नाहीत. २००४मध्ये त्यांना साहित्य अकादमीने ज्येष्ठ कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांच्याबरोबर सन्माननीय फेलोशिप जाहीर केली होती.
अमृताजींचा जन्म ३१ तारखेचा आणि निधनही. २००५च्या ऑक्टोबर महिन्यात वयाच्या ८६व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
भारत हा देश असा आहे की, जिथे ग्लॅमर नावाची गोष्ट फक्त राजकीय पुढारी, चित्रपट अभिनेते-अभिनेत्री, क्रिकेटपटू यांनाच काय ती अनुभवायला मिळते. शास्त्रज्ञ, लेखक-कवींच्या वाट्याला हे भाग्य सहसा येत नाही. पण अमृताजींच्या वाट्याला ते आले. किंबहुना एवढे ग्लॅमर मिळालेल्या त्या बहुधा एकमेव लेखिका असाव्यात.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment