स्वरा भास्कर, अरुंधती रॉय, नंदिता दास, शबानासह अनेक जणी...
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • स्वरा भास्कर, नंदिता दास, रेखाचित्र - संजय पवार, अरुंधती रॉय आणि शबाना आझमी
  • Tue , 04 September 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar स्वरा भास्कर Swara Bhaskar नंदिता दास Nandita Das रेखाचित्र - संजय पवार अरुंधती रॉय Arundhati Roy शबाना आझमी Shabana Azmi

स्वरा भास्कर ही तरुण अभिनेत्री गेल्या तीन-चार वर्षांत मोदीभक्त, पुनरुज्जीवनवादी आणि मुख्यत: पुरुषी मानसिकतेने पीडित लोकांच्या रोषाचं कारण होत आलीय.

दोन दिवसांपूर्वी तिनं केलेल्या विधानानं उपरोक्त सर्वांचा पापड पुन्हा एकदा मोडलाय. काय विधान होतं स्वराचं? आणि निमित्त काय होतं? निमित्त होतं ‘अर्बन नक्षल’ म्हणून झालेल्या अटका. समर्थन अथवा समर्थक या न्यायानं गांधीहत्येनंतर ज्यांनी टाळ्या पिटल्या, पेढे वाटले, त्या विचारांचे लोक आज सत्ताधारी आहेत, तर मग ते पाप यांच्या नावावर नोंदवायचं काय, असा सवाल आहे स्वराचा.

हे विधान अनेकांना बालिश व सवंग प्रसिद्ध मिळवण्यासाठी तिनं केलंय असाही निष्कर्ष काहींनी काढलाय. ही मंडळी एवढ्या निष्कर्षावरच थांबली नाहीत, तर एक अभिनेत्री म्हणून काहीच ओळख व कर्तृत्व नसलेल्या या बाईनं फुकटची प्रसिद्धी मिळते म्हणून ही राजकीय बडबड केली असून हे अनाठायी आत्मविश्वासाचंच लक्षण आहे, अशीही खरडपट्टी काढलीय. (हे वाचताना ‘लोकमान्य लोकशक्ती’ असणाऱ्या दैनिकाच्या संपादकांची ‘तुच्छता’ आठवली!)

स्वरा भास्कर हिच्या वैचारिक दारिद्रयावर अर्धवट माहितीतून फटकारे मारणाऱ्यांना हे माहीत नाही की, अवघ्या तिशीमध्ये असणाऱ्या या अभिनेत्रीनं अभिनयाच्या क्षेत्रात येऊन नऊच वर्षं झालीत, त्यात तिनं एकूण नऊ सिनेमे केले असून त्यात ‘तनू वेडस मनू’ (भाग १ व २), ‘अनारकली ऑफ ऑरा’, ‘रांझना’, ‘लिस्टन अमाया’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘चिल्लर पार्टी’, ‘नील बट्टे सन्नाटा’, ‘वीर दी वेडिंग’ अशा बॉक्स ऑफिस हिट आणि आऊट ऑफ बॉक्स दोन्ही प्रकारातल्या चित्रपटात काम केलं असून पॉप्युलर आणि क्रिटिक अवॉर्ड विजेती ठरलीय.

आर्मीतील वडील आणि जेएनयूमध्ये सिनेमा शिकवणारी आई यांची मुलगी असणाऱ्या स्वरानं नाटक क्षेत्रातही काम केलंय. इंग्रजी साहित्यात पदवी आणि समाजविज्ञानात जेएनयूमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या स्वराची ओळख राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक भान असलेली व त्याविषयी ठाम मतं असलेली व ती कुठल्याही दबावाला बळी न पडता मांडणारी अभिनेत्री म्हणून आहे. अशा अभिनेत्रीला कल्पना दरिद्री म्हणून हिणवणाऱ्यांची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

भारतीय संविधानानं ‘एक व्यक्ती, एक मत’ हे तत्त्व स्वीकारलंय आणि त्यात जात, धर्म, वर्ग, वर्ण, लिंग असा कुठलाच भेद केलेला नाही. जगात अनेक राष्ट्रात नव्हता तेव्हापासून भारतात स्त्रियांना मताधिकार आहे. हा मताधिकार म्हणजे केवळ निवडणुकीच्या वेळी जाऊन मतदान करणं एवढ्यापुरताच मर्यादित नसून तो आजूबाजूला घडणाऱ्या सर्व प्रकारच्या घटनांवर भाष्य करण्याचा, समर्थन अथवा विरोध करण्याचा अधिकार आहे, याची अभ्यासू जाणीव स्वराला आहे.

सवंग प्रसिद्धीसाठी जी राजकीय बडबड स्वरानं केली, तीच बडबड काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही केली असून (गांधीहत्येत संघाचा सहभाग) त्याबद्दल त्यांच्यावर भिवंडी न्यायालयात खटला चालू आहे.

गांधीहत्येत संघाचा सहभाग असावा यातून सरदार पटेल गृहमंत्री असतानाच संघावर बंदी घालण्यात आली होती. मात्र न्यायालयात सरकार संघाचा सहभाग सिद्ध करू शकलं नाही. पुढे संघावरची बंदी उठली. पण आज नेहरू-गांधींचा द्वेष करत पटेलांचे गोडवे गाणाऱ्या संघ, भाजपनं हे लक्षात ठेवावं की, या घडामोडींवर सरदारांनी म्हटलं होतं - संघाचा सहभाग सिद्ध झाला नसला तरी गांधीहत्येसाठी वातावरण निर्मिती मात्र संघामुळे झाली. (पटेलांच्या वक्तव्याचा हा सारांश आहे. शब्द हेच होते असे नाही.)

हा इतिहास अजिबात माहीत नसताना स्वरा भास्कर ‘बालिश बहु बडबडली’ असं वाटत असेल तर त्यांनी ती वापरत असलेली सर्व समाजमाध्यमं अभ्यासावीत, त्यावरची तिची भाष्यं, प्रतिक्रिया पहाव्यात. ‘वीर दी वेडिंग’च्या निमित्तानं स्त्रीच्या लैंगिक भावनांविषयी हिंदी चित्रपटात धिटाईनं बोलणं दाखवलं गेलं. त्यावरूनही तिला खूप ट्रोल करण्यात आलं. पण ट्रोलर्सना तिनं दिलेली उत्तरं वाचली तर तिचा संयम, धिटाई आणि वक्रोतीही दिसते.

यापुढचा मुद्दा असा की, अमूक एक कारकीर्द केली की, मगच राजकीय भाष्य करायचं असा नियम आहे? मतदानाचा अधिकार जर २१व्या वर्षी मिळतो, तर तिशीतल्या स्वरा भास्करनं मत मांडू नये?

स्त्रियांना राजकारणातलं काय कळतं अशा पुरुषी वर्चस्ववादानं पछाडलेले तथाकथित राजकीय विश्लेषक, राजकारणी, भक्त मग स्वरा भास्कर, अरुंधती रॉय, खुशबू, नंदिता दास, शबाना आझमी यांच्यावर तुटून पडतात.

या पंडितांना विचारावंसं वाटतं, मराठी नाट्य-चित्र-मालिका सृष्टीतील कुणा तरुण, बुजुर्ग अभिनेत्रीनं आजूबाजूला घडणाऱ्या घटनेवर अशी थेट प्रतिक्रिया दिलेली आठवतेय? स्त्रिया (वयानं कमी असल्या तरी) राजकीयदृष्ट्या जागरूक होत असतील तर त्याचं स्वागत करायचं की, शेलक्या विशेषणांनी त्यांची हेटाळणी करायची? आमच्या मते तरी स्वरानं विचारलेला प्रश्न किंवा जोडलेला संबंध बालिश राजकीय बडबड तर नाहीच, उलट सध्याच्या मुसक्या बांधण्याच्या काळात पुढे येऊन मत मांडण्याचं धैर्य दाखवलं आहे. पण स्वराच्या दखलअंदाजीनं तथाकथित राजकीय पंडितांचे अहम दुखावले आणि सोबत पुरुषी प्रवृत्तीही.

भाजप\संघाच्या वतीनं जेव्हा अनुपम खेर, स्मृती इराणी, मनोज तिवारी, परेश रावळ, हेमामालिनी, प्रसून जोशी ही फिल्मी मंडळी राजकीय विधानं करतात, तेव्हा त्यावर किती जण आसूड ओढतात?

अनुपम खेरना काश्मिरी पंडित हा जगातला एकमेव पीडित वाटतो. स्मृती इराणींचा थयथयाट संसदेपासून इतरत्र आपण पाहतो. मागे काश्मीर खोऱ्यात जमावाला पांगवण्यासाठी सैन्यानं जीपला एका नागरिकाला पुढे बांधून गस्त घातली. त्यावर अरुंधती रॉयनं स्वत:चं मत मांडलं. त्यावर परेश रावळ यांची प्रतिक्रिया होती- जीपला अरुंधती रॉयला बांधायला हवं होतं! प्रसून जोशीसारखी दरबारी भाटगिरी केली की, ती परिपक्व राजकीय विधानं होतात?

कलाजगत आणि सरकार यांच्यातलं प्रणयाराधन नवं नाही. वाकायला सांगितलं की सरपटणारे प्रत्येक राजवटीत असतात. गेल्या चार वर्षांत ‘टॉयलेट - एक प्रेमकथा’, ‘परमाणू’, ‘सत्यमेव जयते’, ‘गोल्ड’ असे अनेक देशभक्तिपर चित्रपट एकामागोमाग प्रदर्शित होणं हा योगायोग नव्हे. आश्चर्य याचं वाटतं की, पोखरणची अणुचाचणी ही दुसरी. पहिली इंदिरा गांधींनी केलेली. पण चित्रपट दुसरीवर! तोही ‘त्यांच्या’च राजवटीत!

आमीर खान-किरण राव नावाचं बुद्धिवादी जोडपं आहे. तीन-चार वर्षांपूर्वी या किरण राव यांना हा देश सोडून जावंसं वाटत होतं. आपल्या पत्नीची व्यथा, पती आमीर खान यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. त्यावर टोळी वर्षावही झाला होता. पण पुढे या देशात असं काही वातावरण बदललं की, हे दोघं पती-पत्नी कुदळ-फावडं घेऊन जलसंधारणाच्या कामालाच लागले. सरकारनंही आपली सर्व यंत्रणा त्यांच्या फाउंडेशनासाठी उपलब्ध करून दिली.

स्वरा भास्कर, अरुंधती रॉय, नंदिता दास, शबाना आझमी आणि त्यांच्यासारख्या अनेक जणी केवळ राजकीय शेरेबाजी करत नाहीत. त्या व्यवस्था, मानवाधिकार, विषमता, भेदभाव यावर प्रामाणिक व अभ्यासूपणे बोलतात. त्या प्रागतिक विचारांच्या सहप्रवासी आहेत. त्यांच्या जाणीवा किरण रावसारख्या रात्रीत जागृत होऊन फाउंडेशन निर्मिती करत नाहीत. म्हणजे त्या बाष्कळ बडबड करतात? अशी बडबड करून सवंग प्रसिद्धी मिळवतात? बुद्धिवादी स्त्रियांना, कलावंतांना राखी सावतंच्या जोडीला बसवून काय साधताहेत सवंग टीकाकार?

आज सगळा देश अघोषित आणीबाणी अनुभवत असताना, माध्यमं अंकित झालेली असताना, सरकारी जाहिरातींनी सगळ्यांना गुडघे टेकायला लावलेले असताना, सर्व्हिलियन्सच्या फौजा आक्रमक झालेल्या असताना, मेंदू शाबित ठेवलेली अभिनेत्री पुढे येऊन थेट राजकीय भाष्य करते, हे ‘राजा नागवा आहे’ असं निरागसतेनं नव्हे तर निर्भयतेनं सांगण्याचं सुलक्षण आहे.

या विचारांचा सन्मान करता येत नसेल तर उपमर्द करण्यात मर्दानगी वाया घालवू नका.

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Avadhut Raja

Tue , 04 September 2018

रोखठोक. अगदी हेच मनात होतं. स्वरावर टिका करणारा लेख आला तेव्हा कुणीतरी ही बाजू मांडावी असं राहून राहून वाटत होतं. लगेचच तुमचा लेख आलाच. पण तुमची लेखणी फारच धारधार आहे. समाजात अगदी खालच्या दर्जाची आगलावी ट्विटस करणारे कलाकार असताना (उदा. गायक अभिजित, परेश रावल, अनुपम खेर, शेफाली वैद्य - नुकतंच नागा साधूं प्रकरणावच्या ट्विटवरून त्यांची खोटी द्वेशमूलक भूमिका उचलून धरण्याची वृत्ती पुन्हा एकदा दिसून आली). याउलट स्वरा, तापसी पन्नू (पहा मुल्कची प्रेस कॉन्फरंस) सारख्या शिक्षणातही एक पाउल पुढे असलेल्या अभिनेत्री आपल्या भूमिका ठामपणे मांडत आहेत. ट्रोलर्सला न जुमानता. हे खूप सुखद आहे. शेवटचा मुद्दा हाच की अभिनेत्रींनी राजकारणात येणं, आपल्याला योग्य वाटतील त्या राजकीय भूमिका घेणं यात काय चुकीचं? तस नसतं, तर शबाना, हेमामालिनी, जयाप्रदा, ते अगदी स्मृती इराणी पर्यंत लोक यात आलेच नसते.


Babasaheb kamble

Tue , 04 September 2018

खूप छान लेख..


Sourabh suryawanshi

Tue , 04 September 2018

खूप छान लेख, कोणी कोणावर बोलावे हा जो तो ठरेल जर फॅक्ट किंवा तर्क चुकीचे असतील तर त्यावर चर्चा होऊ शकते. पण बोलणाऱ्याला मूर्खांत काढायची पध्दत रूढ होत चालली आहे. 'त्या' विशेष लेखाची खर तर गरजच नव्हती पण कोणाला कधी काय सुचेल सांगता येत नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......