अजूनकाही
जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला प्रसिद्धीचा हव्यास असतो. जनसमूहात वावरणाऱ्या मानवप्राण्याला तर तो हमखास असणारच. समूहाच्या कोलाहलात, अगदी चारचौघांत उठून दिसण्याची धडपड प्रत्येकजण करत असतो. असे उठून दिसण्यासाठी बरेच मार्ग उपलब्ध असतात. आपले व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व आपल्याला अशी स्वतंत्र ओळख मिळवून देत असते. पण त्यासाठीचा मार्ग मात्र भलताच खडतर असतो. अविश्रांत परिश्रम, कष्ट करावे लागतात. आपापल्या क्षेत्रात तशी देदीप्यमान कामगिरी पार पाडावी लागते. ही कामगिरी उल्लेखनीय बनते, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्र झळाळी मिळते.
पळण्याच्या शर्यतीत जसे धावणारे शंभर जण असतात पण चर्चा मात्र पहिल्या तिघांचीच असते, ज्यांनी या शर्यतीत जान आणलेली असते. स्पर्धा कोणतीही असो त्यात प्रकाशझोत त्यांच्यावरच असतो जे खेळाचे सर्व निकष पाळून विजयाप्रत जातात. शास्त्रीय संगीताची आवड बऱ्याच जणांना असते, पण एखादेच भीमसेन स्वरभास्कर म्हणून मान्यता पावत असतात. संगीतसंसाधनांवर खूपजणांचे प्रेम असते, पण एखादेच बिस्मिल्ला खान सनईच्या अविट सुरावटींनी रसिकांना मंत्रमुग्ध करत असतात. याचे कारण या दिग्गजांनी आपले आयुष्य त्या कलेसाठी समर्पित केलेले असते. हे मान्यवर त्यांच्या केवळ कलेसाठीच नव्हे तर कलेपोटीच्या समर्पणभावनेसाठीही ओळखले जातात. राजाश्रय, मानमरातब, प्रसिद्धी त्यांच्या चरणी लोटांगण घालत असते.
अशा समर्पणवृत्तीच्या लोकांना प्रदीर्घ साधनेनंतर मिळालेली लोकप्रियता, प्रसिद्धीचा मोह विविध क्षेत्रातील सुमारांनाही पडणे साहजिक आहे. स्वकर्तृत्व सिद्ध करण्यापेक्षा ही मंडळी मग वाटेल तशी विसंगत विधाने करण्याचा शॉर्टकट अंगिकारतात. प्रसिद्धीचा हव्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ‘पु.लं.’नी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही विषयावर मत ठोकून द्यायची सवय त्यांना जडते. आपण म्युनिसिपाल्टीत उंदीर मारायच्या विभागात कारकून असलो तरी अमेरिकेची आर्थिक मंदी, देशासमोरील ज्वलंत प्रश्न कसे सोडवावेत आदी गहन विषयांवर बिनधास्त मत ठोकून दिले जाते. अशी असंबद्ध विधाने करण्यात अनेक लाभ असतात. असे बाष्कळ मत व्यक्त करायला कवडीचीही अक्कल लागत नाही, अभ्यास तर अजिबातच नाही. फुकटची प्रसिद्धी मिळते. आपला अनाठायी आत्मविश्वास वाढतो. जनसामान्यांमध्ये आजवर कसलीच ओळख नसलेल्या, कर्तृत्वाचा कसलाच पत्ता नसलेल्या नवख्या अभिनेत्रीला राजकीय विषयावर बडबड करण्याचा मोह होतो, त्यामागे हा अनाठायी आत्मविश्वास कारणीभूत असतो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
आता कोणी काय विधाने करावीत, याला काही बंधने नाहीत. राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मूलभूत अधिकार म्हणून बहाल केलेले आहे. पण तरीही कोणी काय बोलावे याची काही नैतिक मर्यादा आजवर सार्वजनिक आयुष्यात पाळली जात होती. आपली व्यक्तिगत पात्रता काय?, आपण कोण आहोत, त्या क्षेत्रात आपले योगदान काय? अनुभव, बौद्धिक अर्हता काय? समाजव्यवस्थेला दिलेले योगदान किती? हे प्रश्न तर सोडाच पण किमान ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत तिथे तरी आपली काय ओळख आहे? याचा किमान विचार न करता अज्ञानाचा हा स्वर का आळवला जातो आहे? ही अशी बौद्धिक दिवाळखोरी दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे काय. फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा सोस असणाऱ्यांकडून असे अतिउत्साही प्रकार केले जातात. टीआरपीसाठी हपापलेल्या माध्यमांत झळकण्याची महत्त्वाकांक्षा ही अज्ञानभास्करे पूर्ण करून घेतील. पण मग असे वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करणाऱ्यांना कलाकार म्हणायचे का? असा प्रश्न नव्या पिढीतल्या रसिकांसमोर पडतो आहे त्याचे काय?
“तुम्ही जन्माला येण्यापूर्वी काय घडले?, याबद्दल अनभिज्ञ राहिलात तर तुम्ही कायमस्वरूपी बालकच राहता” असे म्हटले जाते. आपल्याला ज्या क्षेत्राबद्दल ज्ञान नाही त्याबद्दल आपण जीभ उचलू नये, असा अलिखित संकेत मान्यवरांकडूनही पाळला जात असताना स्वराने केलेला हा प्रकार अगोचरपणा नाही काय? सार्वजनिक जीवनात कुठे काय बोलावे? यापेक्षा कुठे काय बोलू नये याचे भान असणे अधिक महत्त्वाचे असते. हा नैतिक संकेत राजकीय क्षेत्रातील मंडळी आजही पाळत आलेली आहेत. त्याला अपवादही आहेत. पण राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या वादग्रस्त विधानांमागे काही समीकरणे असतात. पण कलेच्या क्षेत्रात कारकीर्द घडवू पाहणाऱ्यांना या फंदात पडण्याचे कारण नाही. जिच्या अभिनयाची अद्याप चर्चा झालेली नाही अशा नवख्या कलाकाराने प्रसिद्धीचा हा मार्ग निवडावा का?
प्रश्न स्वराने व्यक्त केलेल्या राजकीय विषयाबद्दलच्या मताचा नाही, प्रत्येकाचे व्यक्तिगत मत काहीही असते. पण म्हणून ते असे निलाजरेपणाने जगजाहीर करायचे नसते. आपले अज्ञान अभ्यासाने दूर करायचे असते, ते उघड्यावर मांडून प्रसिद्धी तर मिळते पण वैचारिक दारिद्र्याचे उघड प्रदर्शन कशासाठी?
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sourabh suryawanshi
Tue , 04 September 2018
स्वरा ने असं काय मोठं पाप केलंय की फक्त तिच्यावर एक टीकात्मक लेख लिहावा लागतो.