अजूनकाही
‘सविता दामोदर परांजपे’ हे १९८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर एक अतिशय गाजलेलं नाटक येऊन गेलं. एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या नाटकानं त्यावेळी प्रेक्षकांचा श्वास रोखून धरला होता. अभिनेत्री रिमा लागू यांची त्यामध्ये प्रमुख भूमिका होती. असं म्हणतात की, हे नाटक संपल्यानंतर नाट्यगृहात कमालीची शांतता पसरायची आणि नि:शब्द झालेले प्रेक्षक अजिबात टाळ्या न वाजवता हळूहळू नाट्यगृह सोडायचे. कारण त्या नाटकाचा जबरदस्त प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर पडलेला असायचा.
हे नाटक मोठ्या पडद्यावर आणणं हे खरं तर मोठं आव्हान होतं. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि सध्याच्या मराठी चित्रपटांच्या मांदियाळीत आणखी एका चांगल्या चित्रपटाची भर घातली. नाटकाचं चित्रपटात रूपांतर करताना अर्थातच त्यांनी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असली तरी कथेचा मूळ गाभा कायम ठेवल्यामुळे हा चित्रपट उत्कंठावर्धक थरारपट करण्यात त्यांना चांगलं यश मिळालं आहे. अभिनेता जॉन अब्राहम निर्माता असलेला हा चित्रपट म्हणजे मनोव्यापाराचा उत्तम रंगलेला खेळ असून तो शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा ठरला आहे.
नाटकाचं चित्रपटात रूपांतर करताना कथेत (विशेषतः पात्रं) काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असले तरी कथेचा नाटकातील काळच (१९८० चं दशक) कायम ठेवण्यात आला आहे. शरद अभ्यंकर (सुबोध भावे) या लेखकाच्या संसारात अचानक निर्माण झालेल्या वादळाची ही कथा आहे. शरद आणि त्याची पत्नी कुसुम (तृप्ती तोरडमल) यांचं परस्परांवर जीवापाड प्रेम असतं.
आणि लग्नानंतर त्यांचा संसार सुखानं चालू असतानाच अचानक कुसुमला पोटदुखीचा विकार बळावतो. एवढंच नव्हे तर त्यावेळी तिची असंबद्ध बडबडही सुरू होते. शरदचे फॅमिली डॉक्टर डॉ. अग्निहोत्री (अंगद म्हसकर) तिच्यावर उपचार सुरू करतात, मात्र फारसा फरक पडत नाही. त्यामुळे शरद त्याचा समाजशास्त्रज्ञ असलेला मित्र अशोक (राकेश बापट) याला कुसुमवर उपचारासाठी विचारतो. या अशोकला हस्तरेषा पाहून रोगनिदान करण्याचंही ज्ञान असतं. अशोक कुसुमचा हात पाहून तिला ‘बाहेरची बाधा’ झाल्याचं सांगतो. मात्र सुरुवातीला त्यावर स्वतः शरद आणि डॉ. अग्निहोत्री दोघंही विश्वास ठेवत नाहीत.
मात्र शरदच्या पूर्वायुष्यात सविता दामोदर परांजपे नावाची एक मैत्रीण येऊन गेलेली असते, हे अशोकला कळतं आणि तीच अधूनमधून कुसुमच्या अंगात येऊन तिला त्रास देते असं अशोक शरदला सांगतो. शरद आपल्या पूर्वायुष्याकडे वळून पाहत असताना त्याला एकेक घटना आठवत राहतात आणि शेवटी त्याचा अशोकच्या म्हणण्यावर विश्वास बसतो. सविताच्या मनातील अतृप्त इच्छा हे कुसुमच्या रोगाचं मूळ कारण आहे, हे शेवटी सर्वांनाच कळतं. आता ही सविता दामोदर परांजपे नेमकी कोण असते आणि ती कुसुमला आणि पर्यायानं शरदला अशा प्रकारे का छळत असते, ते पडद्यावर पाहणं केव्हाही चांगलं.
कथेचा विषय प्रेतात्म्याशी निगडीत असला तरी विज्ञान, ज्योतिष यांच्याशी त्याची योग्य ती सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे पडद्यावर तो केवळ ‘भुलभुलैय्या’ वाटत नाही. सविताच्या मनातील अतृप्त इच्छा हे कुसुमच्या रोगाचं मूळ कारण आहे, हे ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं आहे ते काहींना नक्कीच पटू शकतं. त्यादृष्टीनं लिहिलेले संवाद समर्पक ठरले आहेत. कथेमध्ये शरदची बहीण नीलू (पल्लवी पाटील) हिचीही एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. चित्रपटाचा शेवट लक्षात घेता या व्यक्तिरेखेचं महत्त्व कळून येतं. विशेष म्हणजे कथेचा काळ चित्रपटात चांगल्या प्रकारे उभा करण्यात आला आहे. शिवाय संगीतकार अमित राज आणि निलेश मोहरीर यांनी स्वरबद्ध केलेली गाणी, ही या चित्रपटाची जमेची बाजू असून ती कथेला पूरक ठरली आहेत.
सर्वच कलाकारांनी केला उत्तम अभिनय हा चित्रपट यशस्वी होण्याचं एक गमक आहे. तृप्ती तोरडमल हिनं पदार्पणातच कुसुम आणि तिच्या अंगात संचारणारी सविता अशा दोन्ही भूमिका खूप छान पद्धतीनं वठवल्या आहेत. सुबोध भावेनंही कुसुमला होणाऱ्या त्रासामुळे अगतिक झालेल्या पतीची भूमिका अतिशय चोखपणे पार पडली आहे. विशेषतः अशोकनं कुसुमला वाचवण्यासाठी सुरुवातीला सांगितलेला एकमेव अंतिम उपाय नाकारताना मात्र कुसुमला वाचवण्यासाठी त्याला दुसरा पर्याय नाही, हे कळताच तो उपाय करण्यास जड अंत:करणानं परवानगी देणारा शरद सुबोध भावेनं सुरेख रंगवला आहे. राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, हेमांगी कवी (सविता) आदी कलाकारांनीही आपापल्या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sanjay Pawar
Sun , 02 September 2018
समिक्षणात...कथा,पटकथा,संवाद लेखकांची नावे लिहून त्यांचा उचित सन्मान राखावा.तेच छायाचित्रकार,संकलक,कला दिग्दर्शक यांच्या बाबतही.