अजूनकाही
विचार हे कालसापेक्ष असतात. कालानुरूप होणारे बदल पचवत, योग्य-अयोग्याची तपासणी करत निरंतर चालणारा असा तो विचारप्रवाह असतो. त्यामुळे कुंठित होईल असा विचार कधी असू शकत नाही आणि ज्या प्रवाहात असे साचलेपण निर्माण झालेले आहे, तो विचार व्यवस्थेच्या कुठल्या कामाचा नसतो. हे पाहता प्रत्येक विचार, कल्पना तर्काच्या चौकटीवर पारखून, सद्सद्विवेकाला स्मरून अंगीकारावा लागत असतो. कोणत्याही विचाराला तर्कसंगतीची कसोटी लावून त्यातील काय ग्राह्य आणि काय त्याज्य याची निर्भीड चिकित्सा अनिवार्य ठरते.
नवा विचार सांगणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्या व्यक्तिमत्त्वाचे दडपण न घेता तिच्या विचारांची निष्पक्ष चिकित्सा करता यायला हवी. कारण नेत्यांच्या विचारांमधील विसंगती त्यांच्या तत्वप्रणालीत उतरते. त्याद्वारे ती राज्यकर्त्यांच्या धोरणात आणि यथावकाश सामाजिक व्यवस्थेत प्रतिबिंबित होत असते. म्हणूनच राजकीय पक्ष, समाजधुरीण व राष्ट्रप्रमुख काय प्रतिपादन करतात, याची विवेकनिष्ठ चिकित्सा अनिवार्य ठरते.
अनेक वर्षांपासून आपण एक व्यवस्था म्हणून धार्मिक उन्माद, अंधश्रद्धांचा बाजार, केवळ राजकीय पक्षांमध्येच नाही तर साध्यासुध्या माणसांमध्येही दिसणारा स्वमत-आग्रह, प्रादेशिक, धार्मिक, जातीय, भाषिक अस्मितांचा उद्रेक वारंवार अनुभवतो आहोत. एक राष्ट्र आणि समाजव्यवस्था म्हणून याची प्रचीती जगातल्या इतर व्यवस्थांप्रमाणेच आपल्यालाही पदोपदी येत असते.
भारतात प्रभावी ठरत असलेल्या परस्परविरोधी विचारसरणीचे अनुयायी सातत्याने परस्परांवर कुरघोडी करत असले तरी व्यवस्था विकासाच्या दृष्टीने एकाच माळेचे मणी समजले जातात. आपला विचार या व्यवस्थेच्या कल्याणासाठी किती उपयुक्त आहे?, मुळात आपला विचार हा विचार आहे का? तो किती पोषक, लवचीक व कालसापेक्ष आहे, याचा कसलाही विचार न करता त्या विचाराचा पुरस्कार करणे हाच मुळात विकार असतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
लोकशाही, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, व्यापक कल्याणाच्या संकल्पनांना आपल्या विचारात किती स्थान आहे? याचा तर्कसंगत आढावा न घेता ‘आपण म्हणतो तेच सत्य’ हा दुराग्रह बाळगणाऱ्यांच्या झुंडी भारतातही प्रभावी आहेत. आपापल्या विचारांतील विसंगतीचे विश्लेषण न करता आपल्यामुळे आपला विचार प्रवाही होऊ शकत नाही, ही मर्यादाच इथे कोणी लक्षात घेत नाही. केवळ आपल्याच विचारांच्या अंमलबजावणीमुळे इथल्या व्यवस्थेसमोरील प्रश्न सुटणार आहेत, या गैरसमजापोटी या विचारांचे चाहते विवेकाला सोडचिठ्ठी देतात आणि प्रवाही होण्यापेक्षा प्रभावी होण्यास प्राधान्य दिले जाते.
आपल्याकडील डाव्या-उजव्यांच्या गत काही वर्षांतल्या वाटचाली हेच कटुसत्य वारंवार निदर्शनास आणून देत आहेत. प्रदीर्घ काळ राज्यसंस्था हातात असतानाही स्थानिक जनतेला किमान पायाभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येणे अथवा किमान गरजांची पूर्तताही होऊ न शकणे, अशी उदाहरणे केवळ जागतिक पटलावरच नव्हे तर आपल्या देशातल्या काही राज्यांची गत पाहिल्यावर लक्षात येतात. याचे मूळ आपलाच विचार कसा सर्वसमावेशक आहे या दुराग्रहात असते.
अशी मंडळी आपला विचार अपूर्ण असून त्यात समावेशाला, चर्चेला, सुधारणेला प्रचंड वाव आहे, हेच मान्य करायला तयार होत नाहीत. जागतिक इतिहासात अशी दुराग्रही मंडळी व्यवस्थेसाठी कुचकामी ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिटलरने हेगेलची तत्त्वे हवी तशी वाकवून नाझी तत्त्वज्ञानाच्या समर्थनासाठी वापरली. स्टॅलिनने अनुवंशशास्त्राची अशास्त्रीय मांडणी रशियात राबवून कृषिक्षेत्राचे वाटोळे करून ठेवले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अशा प्रकारचे उन्माद भोंगळ तत्त्वज्ञानातून उद्भवतात आणि भोंगळ तत्त्वज्ञान विवेकशून्यतेतून उद्भवते. विवेकशून्यता विचारांच्या आंधळ्या अनुकरणातून येते. म्हणून व्यवस्थेत तर्कशुद्धता आणि उदारमतवाद अगदी तळागाळापर्यंत रुजण्याची गरज असते. ज्या विचारांची आपण कास धरत आहोत तो कितपत कालसापेक्ष आहे, त्या विचारात आपल्या आजच्या व्यवस्थेसमोरील आव्हाने पेलण्याची क्षमता आहे का? याचा सारासार विचार न करता त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणाऱ्या शक्ती या जल्पकाच्या झुंडी असतात.
अशा अविचारी झुंडी मग केवळ हिंसाचाराच्या जोरावर प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत राहतात. ज्याच्यासाठी हा हिंसाचार सुरू असतो तो विचार विकार बनतो आणि पुढे त्याचाच विखार बनतो. सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे म्हणजे विवेक.
असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते, दुसऱ्याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हा झाला उदारमतवाद. जगाला या दोन्ही विचारांची नितांत गरज आहे. आज जगात, भारतात प्रभावी ठरत असलेल्या शक्तींकडे या दोन्हींची वानवा आहे. लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक व्यवस्थापरिवर्तनाचे त्यांचे प्रारूप हिंसाचाराच्या जोरावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. असे बंदुकीच्या जोरावर लादलेले विचार व्यवस्थेचे हित तर कधी साधूच शकत नाहीत, पण प्रवाही झालेल्या विवेकवादाचेही मारेकरीच ठरत असतात. मग ते उजवे असोत की डावे, त्यांचा चेहरा कधीच ‘मानवतावादी’ ठरू शकत नाही.
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment