अजूनकाही
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते, शोकाकूल लालकृष्ण अडवाणी यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं छायाचित्र इंटरनेटवर बघितलं आणि जरा गलबलूनच आलं. एकेकाळी पक्षाचे सर्वेसर्वा ते भावी पंतप्रधान ते अडगळीत गेलेले आणि आता पूर्णपणे एकाकी पडलेले लालकृष्ण अडवाणी, हा प्रवास डोळ्यासमोर झळकला. जाणीव-नेणीवेच्या पल्याड गेलेले असले तरी, वाजपेयी यांचा असलेला आधार तुटल्याचं दु:ख व्यक्त करणारे ते अडवाणी यांचे अश्रू आहेत. वाजपेयी राजकारणाच्या पडद्यावरून गायब होऊन जवळ जवळ दशक उलटलं. अडवाणीही तसे अडगळीत होते. नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर भाजपातला ‘वाजपेयी-अडवाणी युगाचा अस्त’ झालेलाच होता. वाजपेयी यांच्या निधनानं अडवाणी यांच्या वाट्याला आलेलं एकाकीपण टिपणार्या त्या छायाचित्राला दादच दयायला हवी. दहा हजार शब्द जे सांगू शकत नाहीत, ते एक छायाचित्र जास्त प्रभावीपणे व्यक्त करू शकतं, असं जे म्हणतात, त्याचा साक्षात प्रत्यय देणारं हे छायाचित्र आहे.
एकदा मागे लिहिलं होतं, सर्वोच्च पदाची सत्ताकांक्षा फलद्रूप न झाल्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन समकालीन राजकारणावर वास्तववादी कादंबरी लिहिली गेली, तर ती एक अत्यंत कसदार शोकात्म ललितकृती होईल. शरद पवार, नारायण राणे, मायावती, मुलायमसिंह असे काही त्या कादंबऱ्यांचे नायक असू शकतील. लालकृष्ण अडवाणी यांच्यावरची कादंबरी मात्र महाशोकांतिका असेल आणि लालकृष्ण अडवाणी महानायक ठरतील!
लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या भाजप या राजकीय पक्षाचा एकांगी हिंदुत्ववाद, राजकारणाची (अनेकदा हिंसक झालेली व त्याची देशाला फार मोठी किंमत मोजावी लागलेली) शैली आणि धर्मांधता प्रस्तुत भाष्यकाराला पूर्णपणे अमान्य असली तरी त्यांचं राजकीय कर्तृत्व उंच, व्यापक, राष्ट्रीय पातळीवरचं, महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक तसंच सार्वजनिक पातळीवर स्वच्छ चारित्र्याचं आहे. (हवाला प्रकरणात त्यांचं नाव आलं, पण पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जात त्यांनी निर्दोषत्व सिद्ध केलं). त्यांची अव्यभिचारी पक्षनिष्ठा आणि अविश्रांत राजकीय तपस्या तब्बल साडेसातपेक्षा जास्त दशकांची आहे.
आता पाकिस्तानात असलेल्या कराचीत ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले लालकृष्ण अडवाणी त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर झालेल्या फाळणीच्या भळभळत्या जखमा घेऊन भारतात आले आणि इथल्या समाज जीवनाचं एक कट्टर व अभिन्न अंग झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले ते १९४२ पासून. तेव्हापासून ते राजकीय आणि सार्वजनिक जीवनात आजवर सक्रीय आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पूर्ण वेळ प्रचारक होते. नंतर त्यांना जनसंघात पाठवण्यात आलं. जनसंघ ते जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे आणि तो प्रचंड खाचखळग्यांचा, तसंच अनेक नैराश्यपूर्ण घटनांचाही असला तरी कधी खचल्याची जी पुसटशीही रेषा त्यांच्या करड्या चेहऱ्यावर उमटलेली दिसली नाही आणि आता दिसले ते अश्रू...
.............................................................................................................................................
‘समकालीन सामाजिक चळवळी - संकल्पना - स्वरूप - व्याप्ती’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
भारतीय राजकारणातली वाजपेयी-अडवाणी ही जोडी आजवरची सर्वांत यशस्वी आणि त्यांच्यातली दोस्ती सुमारे ६५ वर्षांची. इतकं वय असणारी जोडी भारतीय राजकारणात आजवर झालेली नाही. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हा पक्ष शून्यातून राष्ट्रीय पातळीवर उभा केला, देशभर पक्षाची पाळंमुळं रुजवली. पक्षाचा चेहरा व वाणी उदारमतवादी अटलबिहारी वाजपेयी तर कठोर श्रम व कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा लालकृष्ण अडवाणी यांचा, अशी कायम विभागणी राहिली. कामाची ती जबाबदारी लालकृष्ण अडवाणी यांनी नेहमीच कोणतीही कुरकुर न करता स्वीकारली. विचारी पण ठाम, जहाल पण संयमी, शांत व धोरणी आक्रमकता असं गुणवैशिष्ट्य असणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे.
राजकीय लाभासाठी राम जन्मभूमी आंदोलनाचा भडका अडवाणी यांनीच उडवला (आणि समाज दुभंग करणाऱ्या धर्मांध राजकारणाला देशात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. म्हणूनच जातीय आणि धार्मिक समीकरणांचा ‘सांगोपांग’ विचार करून राजकारण करणाऱ्या देशातील मायावती, मुलायमसिंह, ओवेसी अशा अनेकांचे अडवाणी हे ‘गुरू’ शोभतात.) त्यासाठी अडवाणी देशात वणवण फिरले. प्रमोद महाजन यांचं सारथ्य आणि लालकृष्ण अडवाणी यांची यात्रा हे समीकरणच एकेकाळी देशाच्या राजकारणात रूढ झालं होतं.
देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत लालकृष्ण अडवाणी पोहोचले. ते जेव्हा उपपंतप्रधान झाले, तेव्हा पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी थकलेले होते. स्वाभाविकच लालकृष्ण अडवाणी हेच केंद्रीय सरकारचे सर्वेसर्वा होते. माझं म्हणणं अनेकांना रुचणार नाही, पण नमूद करतोच. ‘प्रथम देश आणि मग पक्ष’ अशी भूमिका घेत म्हणजे, काही वेळा रा. स्व. संघाचा अजेंडा बाजूला ठेवून पंतप्रधान वाजपेयी आणि उपपंतप्रधान अडवाणी यांनी केंद्र सरकार चालवताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आखून ठेवलेली परराष्ट्र धोरणांची चाकोरी बदलली नाही, देशाच्या ‘सेक्युलर’ भूमिकेला तडा न जाऊ देण्याचा प्रयत्न केला आणि संघ धुरिणांची इच्छा डावलून पाकिस्तानशी असलेले संबध अधिक सुरळीत व सौहार्दाचे होण्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच त्या दोघांची जनमानसातली प्रतिमा उजळली. २००४ पाठोपाठ २००९च्या लोकसभा निवडणुका भाजपने अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या, पण भाजपचं स्वबळावरचं किंवा एनडीएचं सरकार स्थापन होण्याइतकं बहुमत मिळालं नाही. उलट काँग्रेस सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. केंद्रात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार सलग दोन वेळा सत्तारूढ झालं. तेव्हाच संघाच्या दृष्टीकोनातून लालकृष्ण अडवाणी यांची किंमत शंभर टक्के उतरलेली होती!
इथं एक बाब ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ‘परिवारा’त जसजसे सर्वशक्तिमान होत गेले, तसतसं लालकृष्ण अडवाणी यांचं पक्षातलं स्थान डळमळीत होत गेलं. आधी लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद काढून सुषमा स्वराज यांच्याकडे दिलं गेलं. मग (अडवाणी यांची इच्छा नसताना) रा. स्व. संघाचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ नितीन गडकरी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं.नंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना समोर आणलं गेलं. अशी ही लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान न होऊ देण्याची ‘परिवारा’कडून खेळली गेलेली एक नियोजनबद्ध प्रदीर्घ खेळी होती. राष्ट्रपतीपद त्यांना मिळणारच नव्हतं.
भारतीय राजकारणाच्या पटावर सध्या तरी लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखा इतकी मोठी इनिंग्ज खेळलेला, अविश्रांत कठोर श्रम घेतलेला, अनुभवी नेता दुसरा कोणीही नाही.मात्र त्यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा फलद्रूप झालीच नाही. ज्या राम मंदिरासाठी त्यांनी इतका हिंसक संघर्ष केला, तो ‘राम’ लालकृष्ण अडवाणी यांना पावलाच नाही.
तब्बल ९१ उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला या खेळी समजल्या कशा नाहीत; कुठे थांबावं हे त्यांना कळलं कसं नाही? खरं तर, या खेळी समजूनही जर महत्त्वाकांक्षा जाणीवपूर्वक तेवतच ठेवली गेली असेल तर, ही महाशोकांतिका ओढवून घेण्यास लालकृष्ण अडवाणी हेही तितकेच जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढला तर तो अवाजवी ठरणार नाही.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर अडगळीच्या खोलीत ढकलले गेलेले अडवाणी आता वाजपेयी यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले आहेत. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगलेली एक प्रदीर्घ राजकीय लढाई ते हरलेले आहेत. हाच त्या अश्रूंचा आणखी एक अर्थ आहे.
...ओंगळवाणं प्रदर्शन!
अटलबिहारी वाजपेयी यांच्या मरणाचं राजकीय भांडवल करण्याच्या प्रयत्नातून भारतीय जनता पक्षात ‘डिफरंट’ काहीच नाही आणि भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सिद्ध झालंय. अटलजींच्या अस्थीचं विसर्जन करताना जे ‘प्रदर्शन’ भाजपकडून झालं, ते ओंगळवाणं होतं आणि त्यावेळी सेल्फी घेणारे किंवा छायाचित्रांसाठी पोझ दिलेले भाजप नेत्यांचे हंसरे चेहरे निलाजरेपणाचा कळस होता. या निमित्तानं समाजमाध्यमांवर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया वाचताना आठवलं की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्याही अस्थी कलशांचं असंच प्रदर्शन १९९१ साली देशभर काँग्रेसकडून केलं गेलेलं होतं; पण त्या आणि या अस्थी प्रदर्शनात फरक आहे.
तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची एक फेरी पार पडलेली होती. दुसर्या फेरीचा प्रचार वेग पकडत असतानाच राजीव गांधी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. नंतर राजीवजींच्या अस्थीचे कलश असेच गावोगाव फिरवले गेले होते. अशा काही अस्थिकलश मिरवणुकांचा एक पत्रकार म्हणून मी साक्षीदार आहे. त्यानंतर दुसर्या फेरीचं मतदान झालं. निकालानंतर पहिल्या फेरीतील माघारलेला काँग्रेस पक्ष दुसर्या फेरीत मात्र मोठ्या फरकानं विजयी झाला. सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष ठरला आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली सत्तेतही आला. राजीव गांधी यांच्या लोकप्रियतेचा, त्यांच्या हत्त्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा तो विजय होता.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली, तशी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर निर्माण होईल का, हा मुद्दा आहे. अटलजी नि:संशय, निर्विवाद मोठे नेते होते, पण त्यांचा मृत्यू दीर्घ आजार आणि वार्धक्यानं नैसर्गिकपणे झालेला आहे, तर एका दहशतवादी संघटनेकडून राजीव गांधी यांची अकाली नृशंस हत्या झाली. त्यांचा देह अक्षरशा: छिन्न-विछिन्न झाला. या देशासाठी राजीवजी यांनी रक्त सांडत प्राणाहुती दिली. त्यांनी हौतात्म्य पत्करलं. राजीवजींचे अस्थिकलश नक्कीच मतांसाठी देशभर फिरवले गेले, पण त्यात सस्मित चेहरे नव्हते, सेल्फीचा उन्माद नव्हता तर एक शोकात्म गांभीर्य होतं... हळहळ होती. हा या दोन नेत्यांच्या अस्थी कलशांच्या मिरवणुकातील मूलभूत फरक आहे.
भविष्याच्या पोटात आणि जनतेच्या मनात काय दडलंय याचा अंदाज करणं, हा कोणताही भेसळ नसलेला अतिशुद्ध भाबडेपणा असतो हे ठाऊक असूनही सांगतो. एखाद्या बड्या नेत्याच्या मृत्यूचं राजकीय भांडवल करताना उन्माद, ओंगाळवाणेपणा दाखवायचा नसतो, हे भान सुटल्यानं मृत्यूनंतर अटलजी भाजपला पावतील, अशी आज तरी कोणतीही शक्यता दिसत नाहीये!
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
subodh kshetre
Sat , 01 September 2018
Khupach chhan lekh.