अजूनकाही
धर्मेंद्र, सनी आणि बॉबी हे तीन पाजी (पंजाबी अर्थानं मराठी नाही) लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा पडद्यावर धमाल असते. खासकरून धर्मेंद्र त्यांच्या ‘चुपके चुपके’ काळाची आठवण करून देतात. जणू ‘घासफूस का डॉक्टर’ या भूमिकेतच आहेत अजून. तरीही यात कोण बाजी मारून जातो, तो म्हणजे बॉबी देओल. पहिल्या भागातली त्याची भूमिका जास्त वेळ घेणारी आहे. त्यानं त्याचा मस्त फायदा उठवलाय. तर शेवटच्या अर्ध्या तासात धर्मेंद्रनी धमाल उडवून दिली आहे. पटकथेत बर्याच फुलवता येण्यासारख्या शक्यता असणारा हा सिनेमा फक्त एकदाच पाहण्यासारखा होतो, तो पटकथेकडे पुरेसं लक्ष न दिल्यामुळे.
पुरण (सनी देओल) अमृतसरमध्ये खजांची दवाखाना चालवत असतो. अकबराच्या काळापासून त्याच्या पूर्वजांनी पारंपरिक आयुर्वेदिक औषधं देण्याचं काम केलेलं असतं. पुरण तीच परंपरा प्रामाणिकपणे, निष्ठेनं चालवत असतो. काला (बॉबी देओल) हा थोराड वयाचा लहान भाऊ त्याची मोठी काळजी असते. परमार (धर्मेंद्र) हा भाडेकरू गेली तीस वर्षं फक्त ११५ रुपये भाडे देऊन त्याच्याकडे राहतोय. तो वकील असतो. तर दुसरीकडे गुजरातमध्ये मारफाटीया हा एका बलाढ्य औषध कंपनीचा मालक त्याला भेटायला येतो. त्याच्या ‘वज्रकवच’ या औषधाचा फॉम्युला घेऊन काही रक्कम त्याला देऊन त्यावर औषध बनवून करोडो रुपियों का मुनाफा कमावणार असतो. पण पुरण त्याला त्याच्या खास शैलीत उत्तर देऊन घरचा रस्ता दाखवतो. त्यानंतर एकदम एक डॉक्टर चिकू (क्रिती खरबंदा) गुजरातहून आयुर्वेद शिकण्यासाठी त्याच्याकडे येते. काला मात्र पहले ही नजर में दिल दे बैठता है...
कथानकाची ओळख निवेदनातून अन्नू कपूर करून देतात. तिन्ही पात्रांचा थोडक्यात इतिहास सांगून पुढे काय घडणार हे सांगतात. त्यांच्या तोंडी असणारे संवाद एकाच वेळी खुसखुशीत व पात्रांबद्दल बारीक चिमटे काढणारे आहेत. यासाठी कथा-पटकथा-संवाद लेखक धीरज रतन यांना मानायला हवं. प्रत्येकाचं गुण वैशिष्ट्य हे अवगुण वैशिष्ट्य कसं आहे, हे कसलाही आडपडदा न ठेवता सांगून टाकतात. त्यामुळे पात्रांबद्दल उगाच शंका राहत नाही. तसंच तिन्ही अभिनेत्यांचं वय बघता ते योग्यच ठरतं. त्यातही कालाची भूमिकेची लांबी इतरांच्या मानानं जास्त आहे. त्याला हिरोईन दिली असल्यामुळे आणि बॉबी देओल तिघात तरुण दिसत असल्यामुळे तेच पात्र लक्षात राहणारं ठरलंय. मध्यंतरापर्यंत कथानक अमृतसरमध्ये घडत असल्यामुळे धीरज रतन तपशिलात पात्रांचा अवकाश उभा करतात. पंजाबी माणसं, मोहल्ल्यात राहणारी इतर पात्रं थोडक्या संवादात उभी करतात. दिग्दर्शक नवनीत सिंगसुद्धा फूल फॉर्मात असल्यासारखे मोकळेपणानं मोहल्ल्यात फिरतात. छोट्या-छोट्या प्रसंगातून एका बाजूला चिकूचं आयुर्वेद शिक्षण चालू राहतं, तर दुसरीकडे कालासोबत रोमान्स वाढायला लागतो. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्या गमतीजमती काला-परमारचे प्रसंग, गाणी मस्त एन्जॉय करतात.
सिनेमाची पटकथा सुटायला लागते, जेव्हा हे तिघं सूरतला येतात. इतका वेळ विविध रंग भरलेल्या कथानकाला फिकेपणा यायला लागतो, कारण कथा गुजरातमध्ये घडते. मला वाटतं दिग्दर्शक नवनीत सिंग व लेखक धीरज रतन ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ सिरीयल मन लावून पाहत असावेत. कारण त्यांनी उभा केलेला गुजरात त्या सिरीयलमधल्या गुजराती लोकांपेक्षा वेगळा नाही. खाकरा, फाफरा व ढोकळा याच्या पलीकडे ते जात नाहीत. बाकी गोष्टींकरता ठोकळेबाज पात्रांची जंत्री तयार करतात. यात एक अतिशय बाळबोध मुद्दा मांडलाय, जो लहानपणापासून चष्मा असणार्या लोकांना आवडणार नाही. एका छोट्या मुलीला कसला तरी दुर्धर रोग झालेला असतो. ज्यामुळे तिला चष्म्या शिवाय पाहता, वाचता येत नसतं. पुरण तिला भेटतो व त्याच्यातला आयुर्वेदाचार्य जागा होतो. तो तिला पारंपरिक औषधांनी बरं करतो. ती लगेच एका भावुक प्रसंगात वाचायला लागते. मग तिचे वडील त्याची माफी वगैरे मागतात.
हे वास्तवाला धरून नाही. विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ म्हणून सोडून दिलं तरी ते विश्वसनीय वाटत नाही. डोळ्यांचा दुर्मीळ कॅन्सर झालेल्या नातवाची दृष्टी जाण्याआधी त्याला जग दाखवण्याचा आटपिटा करणार्या आजोबाला आपण श्वासमध्ये बघितलेलं असतं. त्यामुळे हे खास फिल्मी पद्धतीचं चित्रण लेखक-दिग्दर्शकाच्या मर्यादा दाखवतं. भारतीय कायद्यातली कलमं धडाधडा एका वकील पात्राच्या तोंडून सांगणारे धीरज रतन इतकं अवास्तव, अतिरंजित कसं लिहितात याचं आश्चर्य वाटतं. दृष्टिहीन लोकांनी जसे साईबाबाची आराधना केली की, त्यांना दृष्टी येते हे सत्तरच्या दशकापासून चालत आलेला चमत्कार अजूनही त्याच पद्धतीनं नव्या रूपात येतोय, हे हिंदी व्यावसायिक सिनेमावाल्यांच्या काल्पनिकतेचं दारिद्रयच दाखवतं किंवा स्वतःच्या कोशातून बाहेर येऊन जगाकडे डोळसपणे न बघण्याची वृत्ती.
काला या पात्राचं वागणं नंतरच्या भागात त्यांनी का वापरलं नाही याचं उत्तर मिळत नाही. त्याला दररोज रात्री दारू प्यायची सवय असते. दहा वाजताचे टोल पडले की, तो त्याच्या मूळ अवतारात येतो. पोटात पोचणारी दारूची ऊब जीभेवाटे बाहेर पडते. दिवसभरात त्याच्यासोबत घडलेल्या घटनांवर तो त्याच्या भाषेत भाष्य करतो. त्याचा परिणाम शेजार्यांच्या झोपेचं खोबरं होतं. ते पण मग त्याला बोलण्यातून चोप देतात. चिकू तिथं आल्यावर ही यात खंड पडत नाही. दुर्दैवानं पटकथाकार-दिग्दर्शक कालाच्या या स्वभावाचा फायदा उठवत नाहीत. तो गुजरातमध्ये आल्यावर एकदाही दारू पिल्यावर तसा वागत नाही. त्यामुळे गुजरात्यांसमोर त्याची ही बाजू उघडी पडतच नाही. पटकथेतल्या या बाजूकडे दिग्दर्शक दुर्लक्ष करतात. त्यामुळे कालावर नंतरच्या भागात अन्याय होतो. हिंदी व्यावसायिक सिनेमात पटकथेतल्या चांगल्या व फुलवता येणार्या भागाकडे लक्ष द्यायचंच नाही असा जणू चंगच बांधलेला असतो. त्यामुळे पात्रं वरवरची व एक नाही तर द्विमिती आकाराचीच राहतात. त्यांना जिवंतपणा येत नाही. ती ठोकळेबाज होतात. हीच गोष्ट परमारला पर्या दिसण्याची. ती गोष्टही पुरेशी फुलवली नाही. निव्वळ संकल्पना म्हणून वापरून सोडून दिलेली.
‘नजरबट्टू’ हे सचेत-परंपरानी संगीतबद्ध केलेलं सचेत टंडननी गायलेलं गाणं आणि ‘टुनू टुनू’ हे संजीव-दर्शननी संगीतबद्ध केलेलं आलमगीर खान व ज्योतिका तांग्रीनी गायलेलं युगुलगीत चांगली झाली आहेत. ‘राफ्ता राफ्ता’चं रीमिक्स हे जुन्या गाण्यांचं रीमिक्स करायचं जे फॅड सध्या चालूय त्याचाच एक भाग आहे.
असरानी व शत्रुघ्न ‘शॉटगन’ सिन्हा धर्मेंद्रच्या मैत्रीखातर सिनेमात असावेत बहुदा. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. सनी पाजी जी गोष्ट करण्यात निपुण आहेत, ती गोष्ट ते प्रामाणिकपणे करतात. गुंडांना धूळ चारणं व वेळप्रसंगी बेंबीच्या देठापासून ओरडणं ते हयातभर करत आलेत. इथंही ते त्याच जोशात काम करतात. ज्या जोशात ते ‘दामिनी’मध्ये इंदरजित चढासमोर बोलायचे. क्रीती खरबंदा जेवढ्यास तेवढं काम करते. तीन नायक असताना मुख्य नायिकेला असं कितीसं काम असतं हिंदी सिनेमात! तिचा रिझुमेतला वर्क एक्स्पिरियन्सचा कॉलममध्ये भर पडेल. ब्याऐंशी वर्षांचे धर्मेंद्र जबरदस्त स्टॅमिना दाखवतात. सुस्पष्ट नसणारे उच्चार हे वयोमानाप्रमाणे व सततच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे आहे हे सांगायची गरज नाही. पण डोळ्यातील व चेहर्यावरील मिश्किल भाव हीमॅन प्रतिमेच्या आधीच्या धर्मेंद्रची आठवण करून देणारे. पण याचा खरा हीरो आहे बॉबी देओल. ‘रेस ३’ पासून त्याची सेकंड इंनिंग चालू झालीय बहुदा. कारण येऊ घातलेल्या ‘हाऊसफूल ४’ मध्येही तो आहे. अशाच हलक्याफुलक्या सिनेमात तो काम करत राहिला तर त्याला ब्लॉकबस्टर किंवा शंभर कोटींच्या सिनेमांची गरज राहणार नाही. इथं मात्र त्यानं जीव ओतून काम केलंय.
पहिल्या भागात तिघांनी धमाल केली होती. दुसर्यात भट्टी जमली नव्हती. प्रेक्षकांनी पण पाठ फिरवली होती. यात परत एकदा ते बर्यापैकी जमून आलाय. त्यामुळे तिघांचे चाहते असाल तर एकदा बघायला काही हरकत नाही.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment