अजूनकाही
‘तोतया’ या शब्दाचा मराठी शब्दकोशात अर्थ आहे- ‘उपटसुंभ, खोटा वारस, फसवणूक करणारा, बतावणी करणारा. पण हा झाला शब्दशः अर्थ. ‘तोतया’ या शब्दाला अनेक पापुद्रे आहेत. राजकारणात, सत्ताकारणात या तोतयांनी बऱ्याच उलथापालथी घडवून आणल्याचे दाखले आहेत. शब्दकोशातले तोतयाचा अर्थ सांगणारे शब्द त्या तुलनेने बरेच निरुपद्रवी वाटतात. आपल्या इतिहासात पण तोतयांनी धुमाकूळ घातल्याची उदाहरणं आहेत. पेशवाई अनेक आघाड्यांवर त्रस्त असताना सदाशिवराव भाऊ आणि जनकोजी शिंदे यांच्या तोतयानं बंड पुकारून नाना फडणीसांच्या नाकी नऊ आणले होते.
आणि एका माणसासारखा हुबेहूब दिसणारा माणूस ही कल्पनाच किती फॅसिनेटिंग आहे! आपल्यासारखाच हुबेहूब दिसणारा माणूस आपल्यासमोर उभा राहिला तर तो एकाच वेळेस थ्रिल देणारा अनुभव असू शकतो आणि तितकाच भीतीदायक असू शकतो. आणि हुबेहूब आपल्यासारख्या दिसणाऱ्या माणसानं आपल्याला हटवून आपली जागा घेतल्यानं (किंवा vice versa) जे नैतिक तिढे निर्माण होऊ शकतात, ते आपल्या कल्पनाशक्तीपुढचे असू शकतात.
यात जो एक जबरदस्त सिनेमॅटिक जर्म आहे, तो आपल्याकडच्या आणि इतर देशातल्या लेखक दिग्दर्शकांना भुरळ पाडत आलेला आहे. नुकताच माझ्या बघण्यात ‘द डेव्हिल्स डबल’ नावाचा अप्रतिम चित्रपट बघण्यात आला आणि हा तोतयांचा घोळ एखाद्या देशाच्या उलथापालथीत किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतो याचा अनुभव आला.
आखाती युद्धाच्या अगोदर आणि नंतरही सद्दाम हुसेन आणि त्यांचा इराक हा सर्वसामान्य भारतीयांच्या औत्सुक्याचा विषय ठरला आहे. सद्दाम तसे भारतमित्र म्हणून ओळखले जायचे. भारताशी सद्दामकालीन इराकचे मैत्रीपूर्ण संबंध होते. सद्दाम असेपर्यंत इराक हा कधीच इस्लामिक कट्टरवाद्यांच्या कह्यात गेलेला नव्हता. सद्दाम हे तसे पुरोगामी विचारांचे होते. पण असं असलं तरी सद्दाम यांच्या राजवटीची एक काळी बाजूही होती. सद्दाम आणि त्यांची दोन मुलं उदय आणि कुसय ही जुलमाचं दुसरं नाव म्हणून प्रसिद्ध होती. सद्दाम राजवटीविरुद्ध उठवणारा कुठलाही आवाज निर्दयपणे चिरडून टाकण्यासाठी सद्दाम आणि त्यांची मुलं प्रसिद्ध होती.
त्यात उदय हा तर अन्याय आणि क्रौर्य यांचा समानार्थी शब्द होता. सतत दारू किंवा ड्रग्जच्या तारेत असणारा उदय हा आपली आलिशान गाडी घेऊन बगदादच्या रस्त्यांवरून फिरायचा आणि त्याला आवडेल ती मुलगी उचलून आपल्या प्रासादात घेऊन यायचा. नंतर अनेकदा त्या मुलीचं प्रेतच बगदादपासून थोड्या अंतरावर सापडायचं. हा उदयच इराकी ऑलम्पिक कमिटीचा अध्यक्ष होता. इराकला पदक मिळवून देण्यास अपयशी ठरलेल्या कोचला आणि खेळाडूंना उदय अक्षरशः शारीरिक आणि मानसिक नरकयातना द्यायचा.
सद्दाम उदयच्या अत्याचारांकडे अर्थातच डोळेझाक करायचा. पण इराकमध्ये अर्थातच सद्दाम राजवटीविरुद्ध असंतोष होता. त्यातून सद्दाम आणि त्यांच्या मुलांच्या जीविताला धोका होता. आपल्या जीवाला असणारा धोका कमी करण्यासाठी सद्दाम आणि त्यांच्या मुलांचे ‘बॉडी डबल्स’ तयार ठेवण्यात आले होते. ते हुबेहूब सद्दाम आणि त्यांच्या मुलांसारखे दिसायचे.
राज्यशास्त्रात ‘Political Decoy’ नावाची संकल्पना आहे. A political decoy is a person employed to impersonate a politician, to draw attention away from the real person or to take risks on that person's behalf.
जगभरातल्या हुकूमशहांनी आपल्या सुरक्षिततेसाठी ‘बॉडी डबल्स’ तयार ठेवल्याचे दाखले आहेत. वरकरणी अतिशय खंबीर, आक्रमक प्रतिमा जोपासणारे हुकूमशहा आतून सतत धास्तावलेले असतात असा जागतिक अनुभव आहे. आपला जीव वाचवण्यासाठी ते मग निरपराध लोकांची ढाल बनवतात, हेही तसं ऐतिहासिक सत्यच. अगदी हिटलर, स्टॅलिनपासून ते सध्याच्या किम जोंगपर्यंत प्रत्येक हुकूमशहानं बॉडी डबल्स ठेवल्याची नोंद आहे.
या हुकूमशहांसारखं दिसणं हे त्यांच्या डुप्लिकेटसाठी एकाच वेळेस वरदान असतं आणि शापही. कारण जगातला प्रत्येक ऐषोआराम यांच्यासमोर हात जोडून उभा असतो. पण त्याचवेळेस ते सतत मृत्यूच्या छायेत वापरत असतात. आणि एखाद्या तोतयाचा आपल्या जुलमी मालकाविरुद्ध conscious जागा झाला तर, या प्रश्नांचं उत्तर ली तामोहरी या दिग्दर्शकाचा ‘द डेव्हिल्स डबल’ देण्याचा प्रयत्न करतो.
हा सिनेमा उदय हुसेनचा बॉडी डबल म्हणून काम केलेल्या लतिफ याह्या या माजी इराकी लष्करी जवानाच्या आयुष्यावर आधारित आहे. लतिफ याह्या (डॉमिनिक कूपर) इराणविरुद्धच्या लढाईमध्ये जखमी होऊन बगदादमध्ये वापस येतो, तेव्हा एक विचित्र ऑफर त्याची वाट बघत असते. सद्दामचा वारसदार आणि लतिफचा जुना वर्गमित्र उदय हुसेन हुबेहूब आपल्यासारखा दिसणाऱ्या लतीफला आपला ‘बॉडी डबल’ म्हणून काम करण्याची ऑफर देतो. त्याबदल्यात लतिफला अनेक आमिषं दाखवली जातात. पण लतिफ बधत नाही. शेवटी तुझ्या परिवाराला ठार मारण्यात येईल, या धमकीचा परिणाम होऊन लतिफ उदयचा ‘बॉडी डबल’ म्हणून काम करायला तयार होतो. पण लतीफला आपलं खरंखुरं आयुष्य कागदोपत्री संपवावं लागणारं असतं. लतिफच्या जिवंत असण्याची प्रत्येक खूण पुसली जाते. त्याच्या परिवाराला लतिफ इराण आघाडीवर मारला गेला असं सांगण्यात येतं.
लतिफ आणि उदयची समांतर चालणारी आयुष्यं एकत्र येतात. उदय आणि लतिफ दिसायला हुबेहूबसारखे असले तरी त्यांच्या स्वभावात प्रचंड फरक असतो. उदय हा एककल्ली, व्यसनाधीन, क्रूर, लहरी असतो. याउलट लतिफची सद्सद्विवेकबुद्धी सतत जागी असते. त्याला बऱ्या-वाईटाची चाड असते. त्याला अत्याचारी उदयबद्दल प्रचंड चीड पण मनातून असते. उदयचे अत्याचार जवळून बघितल्यामुळे त्याच्या मनात उदयबद्दल घृणा तयार होते. शेवटी जेव्हा त्याच्या सहनशक्तीचा स्फोट होतो, तेव्हा लतीफ उदयविरुद्ध बंड पुकारतो. लतीफ याह्या हा रक्तामांसाचा खराखुरा माणूस असतो. उदयची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न करून तो इराकमधून पळतो आणि ब्रिटनच्या आश्रयाला जातो. त्याच्या अनुभवावर आधारीत हा सिनेमा आहे.
हा एका ‘बॉडी डबल’च्या दृष्टिकोनातून हुकूमशाही आणि अन्यायी जुलमी राजवटीविरुद्ध बघणारा सिनेमा असल्याने तो युनिक आहे. चित्रपटात एक फार मार्मिक प्रसंग आहे. सद्दाम हुसेन उदयला भेटायला बोलावतात. उदयला जायचा कंटाळा येतो म्हणून तो आपल्या जागेवर लतीफला पाठवून देतो. आपला जन्मदाता बाप पण लतीफला ओळखणार नाही याची त्याला खात्री असते. लतीफ जेव्हा सद्दामच्या केबिनमध्ये शिरतो, तेव्हा सद्दामकडे निरखून बघतो. सद्दाम पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतो. आणि लतीफला लक्षात येतं की, आपल्या समोर बसलाय तोपण सद्दामचा बॉडी डबल आहे. दोन्ही बॉडी डबल एकमेकांकडे एकटक बघत राहतात.
एकदा लतीफ सद्दाम आणि त्याच्या बॉडी डबलला एकत्र टेनिस खेळताना पाहतो, तो प्रसंगही असाच मार्मिक आहे. हुकूमशहाची जागा हुबेहूब त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या माणसानं घेणं या विषयावरच चार्ली चॅप्लिनचा ‘डिक्टेटर’ आणि साशा बेरोन कोहेनचा ‘द डिक्टेटर’ हे तुफान विनोदी आणि त्याचवेळेस विचार करायला लावणारे अप्रतिम सिनेमे आहेत.
पण ‘द डेव्हील्स डबल्स’चं एक वेगळं महत्त्व आहे. कारण तो सत्य घटनेवर आधारित आहे. अर्थातच लतीफ याह्याच्या अनुभवांवर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी उपस्थित केला आहे. याशिवाय अमेरीकेच्या शत्रुपक्षात असलेल्या हुकूमशहांचं हॉलिवूड एक अजेंडा डोक्यात ठेवून चित्रण करतं हेही लक्षात ठेवावं लागेल.
भारतातही ‘Political Decoy’ ही संकल्पना घेऊन तुरळक सिनेमे बनले आहेत. ‘ओ माय डार्लिंग ये है इंडिया’ सिनेमात अनुपम खेरचा डुप्लिकेट आपल्यासारख्याच दिसणाऱ्या पंतप्रधानाला हटवून त्याची जागा स्वतः घेतो. डेव्हिड धवनच्या ‘आँखे’मध्ये मुख्यमंत्र्यांची (राज बब्बर) जागा त्याचा डुप्लिकेट घेतो आणि खऱ्या मुख्यमंत्र्याला डांबून ठेवतो. दोन्ही सिनेमांची जातकुळी एकमेकांपासून प्रचंड वेगळी आहे. ‘ओ माय डार्लिंग ये है इंडिया’ ही फँटसी आहे, तर ‘आँखे’ ही टिपिकल डेव्हिड धवन मसाला फिल्म आहे. दोन्ही सिनेमे कथानकात अनेक शक्यता असूनही ‘Political Decoy’ या विषयावर गंभीर भाष्य करण्याचं टाळतात. कदाचित भारतीय प्रेक्षक या विषयाला कसा प्रतिसाद देतील याची त्यांना खात्री नसावी.
पण माफिया टोळ्या आणि त्यांच्यातला वर्चस्वाचा आणि सत्तेचा संघर्ष हा तुम्ही राजकीय मानत असाल (कारण तसा तो असतोच, कारण आपल्या देशात गुन्हेगारी आणि राजकारण हे अद्वैत आहे) तर, दोन अतिशय अप्रतिम सिनेमे आपल्याकडे बनलेले आहेत. नाही मी अमिताभ आणि शाहरुखच्या ‘डॉन’ या प्रेक्षकप्रिय चित्रपटांबद्दल बोलत नाहीये. मला ज्याबद्दल बोलायचं आहे त्यातला पहिला सिनेमा आहे रजत कपूरचा ‘मिथ्या’. एक कायमस्वरूपी अपयशी बॉलिवूड स्ट्रगलर एकदम त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉनची जागा घेतो अशी वन लाइनर या चित्रपटाची सांगता येईल. पण अशा काही घटना घडत जातात की, एका अपघातामध्ये स्मरणशक्ती गमावलेला तो अभिनेता खरोखरच स्वतःला त्याने ज्याची जागा घेतली आहे, तो डॉन समजायला लागतो. तो डॉनच्या बायका मुलांमध्ये प्रचंड गुंततो. शेक्सपियरचे लंबे चौडे डॉयलॉग मारून धंद्यातल्या ‘डील’ करायला लागतो. पण हे सगळं प्रतिस्पर्धी टोळीला परवडण्यासारखं नसतं. एका अटळ शोकांतिकेकडे वाटचाल चालू होते. पुढं काय होतं ते स्क्रीनवर बघण्यात आणि अनुभवण्यात मजा आहे. रजत कपूरच्या सिनेमात नेहमी येणारं सत्य काय असत, ‘स्वओळख’ काय असतं हे प्रश्न इथंही ऐरणीवर येतात.
‘ट्रॅजी कॉमेडी’ हा जॉनर आपल्याकडे फारसा हाताळला गेलेला नाही. चटकन आठवणारं एक उदाहरण म्हणजे ‘जाने भी दो यारो’. त्यानंतर मला आठवतो ‘मिथ्या’च. हा फक्त अंडरवर्ल्ड टोळ्या आणि त्यांच्यातल्या स्पर्धा यावर आधारित सिनेमा आहे, असा समज अनेकांचा होऊ शकतो. तो तसा अर्थातच नाहीये. माझं मत विचाराल ती स्वप्नांचा अपयशी पाठलाग करणाऱ्या एकाकी माणसाच्या अपरिहार्य माणसाची शोकांतिका आहे.
दुसरा असाच चांगला सिनेमा म्हणजे अतुल सभरवालचा ‘औरंगझेब’. गुरगांवच्या लँड माफिया आणि भ्रष्ट पोलीस व्यवस्थेच्या लढ्यात सापडलेला विशाल, अजय (दोन्ही रोलमध्ये अर्जुन कपूर) या आपल्या भावाची (ज्यांनी अनेक वर्षांत एकमेकांना पाहिलेलं पण नाही) जागा घेतो, तेव्हा अनेक ठिणग्या पडतात आणि अनेकांची आहुती पडते. ‘औरंगझेब’ हा एकाच वेळेस अतिशय गुंतागुंतीचा आणि या विषयावर गंभीर भाष्य करणारा सिनेमा आहे.
इथला तोतया हा तो ज्याची जागा घेत आहे, त्याचा सख्खा भाऊ आहे. हे रक्ताचं नातं बरीच गुंतागुंत तयार करतं. नायकाच्या डबल रोलबद्दल प्रचंड आकर्षण असणाऱ्या इंडस्ट्रीनं डबल रोल असणारे भारंभार सिनेमे तयार केले आहेत. पण ‘Political Decoy’ या विषयाचं आपल्या इंडस्ट्रीला वावडंच आहे. ते तसं का आहे याचं उत्तर बहुतेक आपल्या प्रेक्षकशरण मानसिकतेमध्ये दडलं असावं.
खरं तर सामाजिक-राजकीय क्षेत्रात उंचीवर असणाऱ्या माणसासारखे दिसणारे लोक ही एक फॅसिनेटिंग कल्पना आहे. त्याचे अनेक फायदे संबंधित माणसाला मिळत असतात. पण एखाद्यासारखं दिसणं आणि वागणं यात अनेकदा माणसाची खरी ओळख पुसली जाण्याचा धोका असतो. लोकांनी आपल्या खऱ्या ओळखीनं आपल्याला न ओळखता दुसऱ्याच्या नावानं ओळखणं यासारखी शोकांतिका अजून दुसरी कुठली नसेल! थोडा अर्थ बदलून असं पण म्हणता येईल की, प्रति तेंडुलकर, प्रति बच्चन, प्रति मंगेशकर, प्रति गांधी होण्यातच अनेकांची शोकांतिका असते. शिवाय मोठ्या माणसाचा डुप्लिकेट असणं म्हणजे अनेकदा तुम्ही सत्तास्पर्धेतलं प्यादं बनता. तुम्ही कधीही वजीर बनू शकत नाही. वेगवेगळ्या नेत्यांचे ‘क्लोन’ बनण्यात धन्यता मानणाऱ्या तरुण पिढीच्या हे जितक्या लवकर लक्षात येईल तितकं चांगलं!
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment