अजूनकाही
सुरुवातीची अनेक वर्षं भारतातील इंग्रजी भाषिक रंगभूमीला शेक्सपिअर, बर्नार्ड शॉ, इब्सेन वगैरे पाश्चात्य नाटककारांचीच नाटकं मंचित करावी लागायची. आज मात्र या स्थितीत लक्षणीय बदल झाला असून आता अनेक भारतीय नाटककार भारतीय इंग्रजीत नाटकं लिहितात आणि ती सातत्यानं सादर केली जातात. अशा नावांपैकी एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे बंगलोरनिवासी महेश दत्तानी. त्यांना १९९८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी सुरुवातीची अनेक वर्षं जाहिरात क्षेत्रात काढली. त्यांनी १९८८ साली ‘व्हेअर देअर इज अ विल’ हे भारतीय इंग्रजीतील नाटक लिहिलं. त्यानंतर त्यांनी १९८९ साली ‘डान्स लाईक अ मॅन’ हे नाटक लिहिलं. या नाटकाचा नुकताच मुंबईत ६००वा प्रयोग झाला. भारतीय इंग्रजीत लिहिलेल्या एका नाटकाचे सहाशे प्रयोग होणं हे फारच दुर्मीळ आहे. म्हणून हे नाटक महत्त्वाचं ठरतं.
दत्तानी यांचं हे नाटक मुंबईच्या ‘द प्राईम टाईम थिएटर कंपनी’नं मंचित केलं आहे. ही नाट्यसंस्था शक्यतो भारतीय इंग्रजीत लिहिलेली किंवा भारतीय भाषांत लिहिलेली नाटकं मंचित करते. काही महिन्यांपूर्वी या कंपनीनं मंचित केलेल्या विजय तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’ या नाटकाचं परीक्षण केलं होतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
नाटकाचं कथानक थोडक्यात समजून घेतलं म्हणजे नाटककार दत्तानी व दिग्दर्शक लिलेट दुबे यांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं असेल याचा अंदाज येतो. या नाटकात वृद्धत्वाकडे जात असलेले जयराज पारेख व रत्ना हे पती-पत्नी आहेत. जयराजचे वडील अमृतलाल पारेख एक स्वातंत्र्यसैनिक होते. जयराजची आई खूप वर्षापूर्वी निवर्तली. जयराज-रत्ना यांना एकच अपत्य आहे. त्यांची मुलगी लता. ती विश्वास या सिंधी मुलाच्या प्रेमात पडली आहे. जयराज-रत्ना यांच्या प्रेमविवाहाची कहाणीसुद्धा जवळपास अशीच आहे. जयराज गुजराथी तर रत्ना दाक्षिणात्य. जयराज-रत्ना-लता या तिघांना पकडून ठेवणारी कडी म्हणजे त्यांचं नृत्याबद्दलचं प्रेम आणि या प्रेमापोटी त्यांना सहन केलेले मानापमान व कष्ट.
नाटक सुरू होतं तेव्हा विश्वास लताच्या घरी आलेला असतो. आज प्रथमच ती विश्वासला तिच्या आई-वडिलांना भेटवणार असतं. तिचं घर जुन्या पद्धतीचं प्रशस्त असतं. त्यातील फर्निचर अँटिक म्हणावं असं आहे. लताला या सर्वांचा रास्त अभिमान असतो. नाटक सुरू होतं, त्या काळात लताच्या आजोबांचं म्हणजे जयराजच्या वडिलांचं निधन झालेलं असतं.
नाटकाची चर्चा आणखी पुढे नेण्याअगोदर काही गोष्टी नमूद करणं गरजेचं आहे. एक म्हणजे भारतात पिढ्यानपिढ्या चालत आलेली पितृसत्ताक पद्धत. दुसरं म्हणजे याच भारतीय समाजात कोणते कलाप्रकार पुरुषाने स्वीकारायचे व कोणते कलाप्रकार स्त्रीने स्वीकारायचे याचे पक्के नियम आहेत. तिसरं म्हणजे आज एकविसाव्या शतकातही भारतीय पुरुषाची मानसिकता फारशी बदललेली नाही. उदाहरणार्थ ‘नृत्य’ हा कलाप्रकार फक्त स्त्रियांसाठी आहे. तिथं पुरुषांना स्थान नाही. जयराज या मूल्यव्यवस्थेला आव्हान देत रत्नाच्या बरोबरीने ‘भरतनाट्यम्’ शिकतो. हे त्याच्या वडिलांना अर्थात मान्य नसतं. पुरुषांनी नृत्य करायचं की नाही, हा जयराज व त्याचे पारंपरिक विचारांचे वडील यांच्यात नेहमी वादाचा मुद्दा असतो. त्याचे वडील जयराजला डोक्यावरचे केस वाढवू देत नाहीत, तर जयराजला लांब केस हवे असतात. त्यांच्या मते लांब केस असले तर नर्तकाला भावना चांगल्या व्यक्त करता येतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
वडिलांची दादागिरी असह्य होऊन शेवटी जयराज रत्नासह घर सोडून दक्षिण भारतात जातो. पण तिथं नृत्यातून हवं तेवढं उत्पन्न न झाल्यामुळे नाईलाजास्तव आपल्या धनाढ्य वडिलांकडे परत येतो. वडील त्यांना परत घरात घेतात, पण काही अटींवर. यातील एक महत्त्वाची अट नाटकाचा गाभा आहे. ती म्हणजे जयराजनं यापुढे नृत्य बंद करावं. एवढंच नव्हे तर जयराजनं इतर पुरुषांप्रमाणे काही तरी पुरुषी काम करावं. जयराजचे वडील चाणाक्ष असतात. त्यांच्या लक्षात आलेलं असतं की, आपला मुलगा नृत्यापायी खुळावला आहे. म्हणून ते रत्नाकरवी असे प्रयत्न करतात की, जेणे करून जयराजला नृत्याच्या जाहीर कार्यक्रमांची निमंत्रणं मिळणार नाहीत.
अशा स्थितीत काळ पुढे सरकतो. यथावकाश वडील वारतात. त्यांची मुलगी मोठी होते. आता तीच तिच्या प्रियकराला म्हणजे विश्वासला आई-वडिलांच्या भेटीला घेऊन आलेली असते. या मुद्दावर नाटकाची सुरुवात होते. कथानक तपशीलात आधीच सांगितलं, कारण या नाटकात दत्तानी यांनी ‘फ्लॅशबक’चं तंत्र फार सफाईनं वापरलं आहे.
नाटकात नंतर समोर येतं ते जयराजचं वैफल्य. कसं त्याला नृत्य करता आलं नाही, कशा सर्व संधी रत्नालाच मिळत गेल्या वगैरे वगैरे. दुसऱ्या बाजूनं समोर येतो तो रत्नाचा स्वार्थी स्वभाव. सासऱ्यानं तिला दिलेल्या ऑफरमध्ये तिला फायदेच फायदे दिसतात. एक म्हणजे डोक्यावर कायमस्वरूपी छताची झालेली सोय, दुसरं म्हणजे सर्व आर्थिक विवंचना संपल्या. यासाठी तिला जयराजला नृत्यापासून थांबवावं लागतं, जे ती आनंदानं करते. पुढे रत्नाची महत्त्वाकांक्षा एवढी वाढते की, ती तिच्या लहान बाळाला, शंकरला अफू देऊन झोपवते व नृत्यांचे कार्यक्रम करत राहते. अशाच एका कार्यक्रमासाठी जातांना ती शंकरला अफु देते. रत्नाच्या दुर्दैवानं त्याच दिवशी शंकरची देखभाल करणारी आयासुद्धा शंकर रडून त्रास देऊ नये म्हणून अफू देते. त्यात शंकरचा मृत्यू होतो.
वर उल्लेख केल्याप्रमाणे आधी या नाटकात कोणी कोणती भूमिका केली हे जोपर्यंत लक्षात घेत नाही, तोपर्यंत यातील आव्हान समजणार नाही. विश्वास व तरुण जयराज यांच्या भूमिका जॉय सेनगुप्तानं सादर केल्या आहेत. लता व तरुण रत्नाच्या भूमिका सुचित्रा पिल्ले यांनी सादर केल्या आहेत. वृद्ध जयराज व विश्वासच्या वडिलांची भूमिका विजय कृष्ण यांनी सादर केली आहे, तर वृद्ध रत्नाच्या भूमिकेत स्वतः लिलेट दुबे आहेत. हे एकदा व्यवस्थित समजून घेतलं की, मग नाटककारानं किती सफाईनं पात्रांचा विकास घडवून आणला आहे हे लक्षात येतं. इथं काही पात्रं कधीच एकमेकांसमोर येणार नाहीत. उदाहरणार्थ लताचे वडील व विश्वासचे वडील. तरीही कथानकाचा विकास थांबत नाही.
.............................................................................................................................................
‘संत जनाबाई - चरित्र व काव्य’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4518/Sant-janabai---charitra-va-kavya
.............................................................................................................................................
असं गुंतागुंतीचं व अनेक पदर असलेलं नाटक दिग्दर्शित करणं हे अवघड आव्हान आहे. लिलेट दुबे यांनी हे आव्हान लिलया पेललं आहे. या नाटकात पुरुषप्रधान संस्कृतीची चर्चा आहे, कलाप्रकारांच्या आविष्कारात कलाकाराचं लिंग महत्त्वाचं असतं का, हा आणखी एक मुद्दा आहे. शिवाय स्त्रीची पुरुषाकडून असलेल्या पारंपरिक अपेक्षा व्यक्त केल्या आहेतच. रत्नाला जयराज एक अपयशी पुरुष वाटत राहतो. याची दोन कारणं समोर येतात. एक म्हणजे तो स्वतःच्या कुटुंबाचं भरणपोषण करू शकत नाही. त्यासाठी त्याला त्याच्या वडिलांना शरण जावं लागतं. दुसरं म्हणजे जयराजला स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची धमक नाही असं रत्नाला वाटतं.
अशा अनेक पातळ्यांवर वावरणाऱ्या नाटकाचं दिर्ग्दशन करणं व त्यात प्रौढ रत्नाची महत्त्वाची भूमिका करणं, या दोन्ही गोष्टी स्वतंत्रपणेसुद्धा अवघड आहेत. लिलेट दुबेंनी या दोन्ही गोष्टी सहजतेनं साकारल्या आहेत. त्यांना चांगल्या टीमची साथ आहे. जयराज व विश्वासच्या भूमिकेतल्या जॉय सेनगुप्तानं नेहमीच्या सफाईनं दोन्ही भूमिका साकार केल्या आहेत. लता व तरुण रत्नाच्या भूमिकेत सुचित्रा पिल्लेनं बहार आणली आहे. फटकळ लता व चाणाक्ष, कावेबाज रत्ना या दोन्ही वेगळया शेडस असलेल्या भूमिका त्यांनी आत्मविश्वासानं सादर केल्या आहेत. विजय कृष्णा भारतातील इंग्रजी रंगभूमीवरील एक ज्येष्ठ व आदरणीय नाव. त्यांचा रंगमंचावर सफार्इनं होत असलेला वावर व स्पष्ट संवादाची फेक प्रेक्षकांना पकडून ठेवते.
या नाटकाचं नेपथ्य लिलेट दुबेंचं आहे. रंगमंचाच्या उजवीकडे जुन्या पद्धतीची खोली दाखवली आहे जिथं तबला, पेटी व घुंगरू दिसतात. मागे भिंतींवर जुन्या काळातील फोटो दिसतात, तर कोपऱ्यात जुन्या पद्धतीचा, न चालणार फोन आहे. रंगमंचाच्या डावीकडे मागे एक मोठं कपाट आहे. ज्यात जुन्या वस्तू ठेवलेल्या असतात व प्रसंगपरत्वे बाहेर काढल्या जातात. नाटकाची प्रकाशयोजना लिन फर्नांडिस यांची आहे, तर पार्श्वसंगीत ओ.एस. अरुण यांचं आहे.
एक विचारगर्भ व आजच्या समस्येला भिडणारं नाटक असा या नाटकाचा उल्लेख करावा लागेल.
.................................................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment