अजूनकाही
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी उद्या नाशिकचा सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरणार आहे. मुंढेंच्या निमित्ताने जाग्या झालेल्या नाशिककरांनी या जागृतीचे ‘वॉक फॉर कमिशनर’ असे नामाभिधान केले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील मुंढेंना त्यांची विहित कर्तव्ये पार पाडायची आहेत. त्यांचे हे प्रयत्न आपल्या विहित कर्तव्यांपासून ढळलेल्या लोकप्रतिनिधींच्या हितसंबंधांच्या आड येत आहेत, एवढाच खरा तर या घटनेचा सारांश आहे. नागरिकांना कधीतरी आपल्या विहित कर्तव्याची आठवण होते, ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘अपहरन’ या चित्रपटातील एक प्रसंग व संवाद कानावर ऐकू येतो आहे. आमदाराच्या भूमिकेतील नाना पाटेकर यांनी त्यांची गाडी अडवलेल्या पोलिस अधीक्षकाचा अवमान करताना, ‘आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि तुम्ही जनतेचे नोकर आहात’ अशी दमबाजी केलेली आहे.
खरे तर जनतेचे नोकर काय अथवा सेवक काय हे केवळ लोककल्याणाचे माध्यम असतात. जनसामान्यांच्या विकासासाठी त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत. दुर्दैवाने मालक असलेल्या जनतेकडून या दोघांच्या कारभाराकडे प्रचंड दुर्लक्ष झालेले आहे.
एक प्रामाणिक सनदी अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे राज्यभरात परिचित आहेत. यापूर्वी अनेक वेळा करण्यात आलेल्या बदल्यांमुळे ते चर्चेत आलेले आहेत. केवळ मुंढेच कशाला ७० वेळा बदली झालेले प्रदीप कासनी, ५१ वेळा बदली झालेले अशोक खेमका, विनीत चौधरी, कुसुमजित सिंधू अशा अनेकांची नावे घेता येतील.
सनदी अधिकारी हा सरकारी असला तरी नोकरच असतो. धोरणनिर्धारकांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे हे त्याचे कर्तव्य असते. तो थेट जनतेला उत्तरदायी नसतो. नोकरीची शाश्वती असते, फारतर बदल्या होतात. योजनांची अंमलबजावणी करताना आयुष्यभराची कमाई करून घेणे हाही त्यांच्या नोकरीचाच भाग असतो का? आपल्या राजकीय व्यवस्थेच्या आणि आपल्या अनास्थेच्या दुर्दैवाने सनदी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल, स्वच्छ चारित्र्याबद्दल चार शब्द कौतुकाने काढावेत, असे चित्र निश्चितच नाही. अर्थात त्याला काही सन्माननीय अपवाद आहेत. प्रशासकीय क्षेत्रातील लॉबीने केलेल्या करामती आपल्या राजकारणी मंडळींच्या पराक्रमाच्या कथांइतपत सुरस, अद्भूतरम्य आहेत.
.............................................................................................................................................
‘संत जनाबाई - चरित्र व काव्य’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
नेत्यांच्या चवचालपणाकडे पाठ फिरवून बसलेले आपण मतदार या आपल्या नोकरांना तरी कधी त्यांच्या गैरकृत्यांचा जाब विचारतो? कारण आपण मुर्दाड झालेलो आहोत. पण मग आपण आपल्याच व्यवस्थेतील या राजरोस चालणाऱ्या अनाचाराकडे एवढ्या अलिप्तपणे का पाहतो आहोत? जनतेला जात, धर्म, आर्थिक प्रलोभने देऊन एकदा निवडून आलो की आपण मोकळे झालो अशी भावना आपल्या सेवकांत का निर्माण झाली आहे? एकदा निवडून आले की, पाच वर्षांत गुंतवलेला पैसा दामदुपटीने ओढण्याखेरीज काहीच न करणारे लोकप्रतिनिधी हे आपल्या कोडगेपणाची देणगी आहेत. ग्रामपंचायत सदस्य असोत वा नगरसेवक, आमदार असोत वा खासदार यांच्यात आपण कोणीतरी वेगळे आहोत. आपल्यासाठी कायदा वेगळा, नीतिनियम वेगळे हा उन्माद, सत्तेची मस्ती कोणाच्या जोरावर आली आहे?, याचा जाब आपण कधी विचारत नाही.
मग ही मंडळी जनहित, लोककल्याण, उत्तरदायित्व अशा गोष्टींना तिलांजली देऊन आपल्याच उरावर थैमान घालत असतात. हे आपल्याच निष्काळजीपणाचे भोग भोगतोय आपण. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत कितीही जीव गेले तरी कधी त्याबद्दल एखाद्या नगरसेवकाला जाब विचारण्याची हिंमत होत नाही आपली. विचारलाच जाब तर निवडणुकीत खर्चलेल्या पैची आकडेवारी ऐकावी लागते. ‘ऑल ॲनिमल्स आर इक्वल, बट सम ॲनिमल्स आर मोअर इक्वल दॅन ऑदर्स’ या जॉर्ज ऑर्वेलच्या विधानाचा विकृत असा आविष्कार आपण सहन करतो आहोत, हा आपल्या संवेदनशून्यतेचा परिपाक आहे.
एवढे कुठल्या आत्मकोषात रममाण झालेलो आहोत आपण? त्यामुळे जाब विचारण्याचे विहित कर्तव्यही आपल्याकडून पार पाडले जात नाही. गळ्याला शोष पडतील या शक्यतेने आपल्याला कुठलाच आक्रोश ऐकायचा नाही का? ज्या व्यवस्थेत आपण राहतो, जिचा आपण अविभाज्य घटक आहोत तिचे दुखणे आपल्याला आपलेसे वाटत नाही, म्हणून हे सगळे सहन करण्याची वेळ आपण थेट ओढवून घेतलेली आहे. आपल्या प्रतिनिधींच्या उन्मत्तपणास मतदार म्हणून आपण जबाबदार आहोत. स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्याची गरज कुठल्याच राजकीय पक्षास वाटत नाही, कारण राजकीय पक्ष हे आपल्याच व्यवस्थेचे आज्ञाधारक घटक आहेत. जाब न विचारण्याच्या सवयीला आपली कर्तव्यच्युती कारणीभूत आहे,ज्यांच्याबद्दल उत्तरदायित्व असते ते मतदार नीतीभ्रष्ट करता आले, याच्या जल्लोषात आपला राजकीय प्रवाह निर्ढावून गेला आहे.
एखाद्या-दुसऱ्या अधिकाऱ्याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आपल्यावर येते, कारण आपण आजवर अधिकार, कर्तव्याकडे केवळ दुर्लक्ष केलेले आहे. व्यवस्थेचा भाग असणाऱ्यांनी तिच्या चालचलनाकडे पाठ फिरवली की, व्यवस्थाभ्रष्टांच्या आत्मकेंद्रिततेचे कळस अंगावर यायला लागतात. अशा वेळी केवळ रस्त्यावर उतरून चालत नाही. निव्वळ वरवरची धूळ झटकून सफाई होत नसते, व्यवस्थेच्या आतमध्ये खोलवर रुतून बसलेली जाळीजळमटं झटकून टाकावी लागतात. मतदार म्हणून आपल्या कोडगेपणाची अपत्ये आज केवळ निर्ढावलेपणाची पायरी गाठत आहेत, उद्या याच व्यवस्थेतील बांडगुळे तिचे घटक असणाऱ्यांना ‘उचल किंमत, आत्मा वीक’ असे सांगायलाही कचरणार नाहीत.
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment