अजूनकाही
दुसऱ्या महायुद्धानंतरचं व्हिएन्ना... युरोपातलं हे एकेकाळचं सुंदर शहर बॉम्बवर्षावाने छिन्नविच्छिन्न झालंय. देखणेपणाच्या उद्ध्वस्त खाणाखुणा आपल्या अंगावर वागवत पुन्हा सामान्य परिस्थितीकडे परतण्याची त्याची धडपड सुरू आहे. शहराचे चार विभाग पडलेत आणि ब्रिटन, अमेरिका, रशिया व फ्रान्स या चार देशांनी हे चार विभाग वाटून घेतलेत. या चार विभागांच्या मधोमध आहे इंटरनॅशनल झोन. अर्धवट ढासळलेल्या इमारती, निर्मनुष्य रस्ते, जी काही वर्दळ आहे ती मित्र राष्ट्रांच्या लष्करी अधिकाऱ्यांची. माणसांची जगण्याची उमेदच एकीकडे हरवून गेली असताना दुसरीकडे काळाबाजार, नफेखोरी, स्वार्थ यांचा बुजबुजाट आहे.
कॅरॉल रीड दिग्दर्शित ‘द थर्ड मॅन’मधून हे युद्धोत्तर ऱ्हासपर्व झगझगीतपणे समोर येतं. ‘द थर्ड मॅन’ अनेक कारणांनी गाजला. कॅरॉल रीडचं दिग्दर्शन, ग्रॅहम ग्रीनची पटकथा, ऑस्ट्रियन संगीतकार अँटॉन कॅरासने झिथर या एकमेव वाद्याचा वापर करून चित्रपटाला दिलेलं अफलातून पार्श्वसंगीत, व्हिएन्नाचं ऱ्हासपर्व अधिक गडद करणारं छायालेखन, ज्यावरून निर्माता, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते तो चित्रपटाचा अजरामर क्लायमॅक्स, क्लायमॅक्स पूर्वीचा भुयारी गटारातला तितकाच अविस्मरणीय प्री क्लायमॅक्स आणि अर्थातच ऑर्सन वेल्सचा प्रेक्षकांना अक्षरश: ताब्यात घेणारा हॅरी लाइम.
चित्रपटाची गोष्ट तशी साधी आहे. सवंग गुन्हेगारी कादंबऱ्या लिहिणारा अपयशी आणि कफल्लक अमेरिकन लेखक हॉली मार्टिन्स (जोसेफ कॉटन) हा हॅरी लाइम (ऑर्सन वेल्स) या आपल्या मित्राच्या बोलावण्यावरून व्हिएन्नात दाखल होतो. तिथं आल्यावर त्याला कळतं की, तो येण्याआधी काही तासांपूर्वीच राहत्या इमारतीसमोरच हॅरीचा एका अपघातात मृत्यू झालाय. खिशात दमडी नाही, राहायला जागा नाही, अशा विवंचनेत असतानाच ब्रिटिश लष्करी अधिकारी कॅलोवे त्याला मिळेल त्या पहिल्या विमानाने अमेरिकेला परत जाण्यास सांगतो, त्याच्यासाठी तिकिटाची व्यवस्थाही करतो. तुझा मित्र हॅरी लाइम भेसळयुक्त औषधांच्या रॅकेटचा सूत्रधार होता, तो मेला हेच बरं झालं, असं कॅलोवे मार्टिन्सला सांगतो. मार्टिन्सचा विश्वास बसत नाही. पोलिसांच्या नोंदीनुसार हॅरी लाइमचा अपघात झाल्यानंतर त्याला दोघांनी उचलून रस्त्याच्या पलिकडे नेलं होतं, पण लाइम ज्या इमारतीत राहातो, त्या इमारतीची देखभाल करणारा पोर्टर मार्टिन्सला तिघेजण असल्याचं सांगतो. हा एक धागा पकडून मार्टिन्स तो ‘तिसरा’ कोण? याचा छडा लावायचा निश्चय करतो. लाइमच्या फ्युनरलला दिसलेली त्याची प्रेयसी ऍनालाही तो भेटतो आणि तिच्यात गुंतत जातो.
वाचताना गोष्ट साधीसरळ वाटत असली तरी ‘द थर्ड मॅन’ एकाच वेळी अनेक स्तरांवर काम करतो. म्हटलं तर तो रहस्यपट आहे, ४० आणि ५०च्या दशकात प्रसिद्ध असलेल्या फिल्म न्वारचा तो प्रतिनिधी आहे. पण त्याच वेळी तो सामाजिक, आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचाराचा, मूल्यांच्या ऱ्हासाचा व्यापक पट मांडतो. सिनेमात अनेक विरोधाभासही आहेत. ज्यांनी बॉम्बवर्षाव करून व्हिएन्ना उद्ध्वस्त केलं, इथल्या घरांची राखरांगोळी केली, कित्येक लाख निरपराध लोक मारली, तेच आज नैतिकतेचा ठेका घेऊन लाइमला गुन्हेगार ठरवत त्याच्या मागावर आहेत.
पटकथेची मांडणी आणि सादरीकरण यातून ग्रीन आणि रीड जोडीने ‘द थर्ड मॅन’ अजरामर करून सोडलाय. पहिले छूट समोर येतं ते छायाप्रकाशाचा विलक्षण अद्भुत खेळ असलेलं छायालेखन. गुंतागुंतीच्या, संदिग्ध व्यक्तिरेखांइतकाच छायाप्रकाशाचा खेळ हे न्वारचं ठळक वैशिष्ट्य. युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या व्हिएन्ना शहरातील खऱ्या लोकेशन्सवर रीडने ‘द थर्ड मॅन’ चित्रीत केला आहे. युद्धाच्या जखमा अद्याप ताज्या होत्या. अर्धवट ढासळलेल्या इमारती तशाच होत्या. माणसांचं जेमतेम अस्तित्व होतं. या सगळ्या अवशेषांमधून फिरून ग्रीनने ढासळत्या शहराबरोबरच माणसाच्या होत जाणाऱ्या अवमूल्यनाच्या कहाण्या वेचल्या होत्या. त्यावरच त्याने ‘द थर्ड मॅन’ची कथा लिहिली. हे युद्धोत्तर व्हिएन्ना टिपणारं रॉबर्ट क्रॅस्करचं अप्रतिम छायालेखन आणि झिथरच्या माध्यमातून कॅरासने तयार केलेली ‘द थर्ड मॅन थीम’ आशयघनतेला विलक्षण गहिरी डुब देतात. रीड आणि क्रॅस्कर जोडीने छायालेखनातून आशय अधिक गहिरा करण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. छायालेखनातल्या डिटेलिंगवर त्यांच्या भरपूर चर्चा झडायच्या. चित्रपटाच्या अनेक फ्रेम्स, विशेषत: व्हिएन्नाचं उद्ध्वस्तपण टिपतानाची दृष्ये काहीशा तिरक्या अँगलने चित्रीत केली आहेत. भव्य पण ढासळलेल्या इमारती, कोमेजलेली मनं आणि दुभंगलेलं शहर टिपतानाच आपल्या अवतीभवतीचं सर्व विश्व कोलमडून पडतंय, हे छायालेखनातून ठसवण्याचं काम या तिरक्या अँगल्सनी केलं. चित्रपटाला मिळालेल्या तीन ऑस्कर नामांकनांपैकी एकट्या क्रॅस्करने ऑस्करवर आपलं नाव कोरलं.
अनेकदा दिसतं की, चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंना प्राधान्य देण्याच्या नादात पटकथेकडे दुर्लक्ष होतं आणि चित्रपट आत्मा हरवून बसतो. ‘द थर्ड मॅन’च्या बाबतीत मात्र छायालेखन आणि पार्श्वसंगीत दोन प्रमुख व्यक्तिरेखा बनून समोर येतात. कारण पटकथेला पूरक म्हणून रीड या दोन गोष्टींकडे पाहात होता. चित्रपटाचा अमेरिकन निर्माता डेव्हिड सेल्झनिकशी त्याचे चित्रिकरणासह अनेक बाबतीत मतभेद झाले. सेल्झनिक म्हणजे अमेरिकन चित्रपटसृष्टीतलं बडं प्रस्थ. ‘गॉन विथ द विंड’ आणि ‘रेबेका’सारख्या ऑल टाइम क्लासिक्सचा निर्माता. त्याच्या शब्दाला वजन होतं. पण रीड त्याच्याशीही भांडला. सेल्झनिकला रीडने सेटवर चित्रिकरण करावं, असं वाटत होतं. हॅरी लाइमच्या भूमिकेत त्याला ब्रिटिश स्टार नोएल कॉवर्ड्स हवा होता आणि पार्श्वसंगीत मनाला उभारी देणारं हवं होतं. रीडने त्याच्या या तिन्ही बाबी खोडून काढल्या. उद्ध्वस्त व्हिएन्नाच्या पार्श्वभूमीवर, खऱ्या लोकेशनवर त्याने चित्रिकरण केलं. लाइमच्या भूमिकेत हट्टाने ऑर्सन वेल्सला घेतलं आणि चित्रपटाचा निराशावादी मूड गडद करण्यासाठी अँटॉन कॅरास या व्हिएन्नातल्याच एका गुत्त्यात झिथर वाजवत वेळ काढणाऱ्या संगीतकाराला शोधून काढला. ‘द थर्ड मॅन’ने कॅरासला रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. ‘द थर्ड मॅन थीम’ने आयुष्यभर कॅरासचा पिच्छा पुरवला. इतका की तो अक्षरश: वन फिल्म वंडर ठरला, पण या थीमची पुण्याई त्याला आयुष्यभर पुरली.
एका बाबतीत मात्र रीड आणि सेल्झनिकचं एकमत होतं, ते म्हणजे ही सुखांतिका असणार नाही. ग्रीनने आपल्या कथेचा शेवट ‘ऍना मार्टिन्सच्या कवेत शिरते’ असा केला होता. रीडला असा सुखी शेवट नको होता आणि सेल्झनिकचा त्याला पाठिंबा होता. ग्रीन आणि रीडमध्ये शेवटावरून टोकाचे मतभेद झाले. बट आफ्टर ऑल, चित्रपटाच्या बाबतीत दिग्दर्शकाचा निर्णय अंतिम असतो, हे ग्रीन जाणून होता. रीडने कथेचा शेवट पुन्हा स्मशानभूमीत नेला. स्मशानभूमीतून बाहेर पडल्यानंतर कॅलोवे आणि मार्टिन्स गाडीतून एअरपोर्टकडे निघालेत. थोड्या अंतरावर गेल्यानंतर मार्टिन्सला ऍना चालत निघालेली दिसते. थोडं पुढे गेल्यावर मार्टिन्स गाडीतून उतरतो आणि रस्त्याच्या कडेलाच असलेल्या एका गाडीला टेकून तिची वाट बघत उभा राहतो. लाँग शॉटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या पानगळीच्या पार्श्वभूमीवर ऍना दूरवरून चालत येताना दिसते. बराच वेळ चालून ती मार्टिन्सच्या शेजारून, त्याच्याकडे ढुंकूनही न बघता पुढे निघून फ्रेमच्या बाहेर जाते. मार्टिन्स खिशातून सिगरेटचं पाकिट काढून एक सिगरेट तोंडात टाकतो, शिलगावतो आणि द एंडची पाटी झळकते. रीडचा हा शेवट आणि क्रॅस्करचा हा शॉट विलक्षण गाजला. पुढे बऱ्याच वर्षांनी खुद्द ग्रीननेही ‘शेवटाबाबत आपला अंदाज जरासा चुकलाच, रीडचा शेवटच योग्य होता’, अशी कबुली दिली.
या क्लायमॅक्सप्रमाणेच प्रदीर्घ असा प्री क्लायमॅक्सही चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेणारा ठरला. संपूर्ण व्हिएन्ना शहराचं सांडपाणी ज्या ठिकाणी येतं, त्या भुयारी गटारात अखेरीस लाइमची नाकाबंदी होते. शहराचा होत असलेला ऱ्हास, माणसांचं अवमूल्यन, समाजाचं अध:पतन, ढासळणारी नैतिक मूल्य या सर्वांचा अपरिहार्य शेवट अखेरीस गटारगंगेतच व्हायचा, हेच जणू यातून रीड आणि ग्रीनला दाखवायचं होतं. समांतर चित्रपटांत शोभणारा हा सिंबॉलिझम ‘द थर्ड मॅन’च्या ट्रीटमेंटमध्ये मात्र बेमालूम मिसळून जातो. इथंही रीड आणि क्रॅस्कर जोडी प्रकाश आणि सावल्यांचा अदभुत खेळ दाखवतात. या लेखाच्या सुरुवातीला जे छायाचित्र आहे, ते याच भुयारी गटारातल्या दृष्यातलं आहे.
‘द थर्ड मॅन’ला चार चांद लावणारा आणखी एक घटक म्हणजे ऑर्सन वेल्स. वेल्सचं चुंबकीय अस्तित्व प्रेक्षकाला खेचून घेतं. रीड आणि ग्रीनने पावणे दोन तासांच्या या चित्रपटात पहिले तासभर वेल्सला पडद्यावर आणलेलंच नाही. केवळ तो रंगवत असलेल्या हॅरी लाइमचा विविध पात्रांच्या करवी उल्लेख करून त्याच्या विषयीचा एक दबदबा लेखक-दिग्दर्शकाची जोडी तयार करते आणि मग अत्यंत नाट्यमय पद्धतीने लाइमची पडद्यावर एंट्री होते. छायाप्रकाशाचा मनोहारी खेळ मांडणाऱ्या या चित्रपटात लाइमची एंट्री देखील अशाच पद्धतीने होते. रीड आणि क्रॅस्करच्या डिटेलिंगचा हा आणखी एक पुरावा. एकदा प्रेक्षकांना दर्शन दिल्यावर वेल्स अक्षरश: अवघा पडदा व्यापून टाकतो. चेहऱ्यावर एक प्रकारची खोडकर बेफिकिरी, बेदरकारी, परिस्थितीने आलेला थोडासा बनेलपणा आणि त्याच वेळी हृदयात कालवाकालव करणारी व्हल्नरेबिलिटी... वेल्सचा हॅरी लाइम निव्वळ असामान्य आहे. अजूनही चांगुलपणा आणि आदर्शवादाच्या भाबड्या कल्पनांना कवटाळून बसलेल्या मार्टिन्सला तो म्हणतो, ‘You know what the fellow said – in Italy, for thirty years under the Borgias, they had warfare, terror, murder and bloodshed, but they produced Michelangelo, Leonardo da Vinci and the Renaissance. In Switzerland, they had brotherly love, they had five hundred years of democracy and peace – and what did that produce? The cuckoo clock.’ चित्रपटातील सर्वाधिक गाजलेला हा संवाद वेल्सच्या पदरचा होता. तो मूळ पटकथेत नव्हता. केवळ तांत्रिकदृष्ट्या त्या प्रसंगातील संवादांमध्ये आणखी एका अतिरिक्त वाक्याची आवश्यकता होती, म्हणून वेल्सने तिथल्या तिथे तो संवाद लिहून म्हटला होता. पण या एका संवादाने हॅरी लाइमच्या व्यक्तिरेखेला तात्त्विक बैठक दिली आणि ही व्यक्तिरेखा एका उंचीला नेऊन ठेवली.
व्यावसायिक हिंदी चित्रपटांवर पोसलेल्या भारतीय प्रेक्षकांसाठी या चित्रपटात एक ओळखीची खूण आहे. भल्याबुऱ्याच्या संघर्षात आणि मैत्रीच्या कचाट्यात सापडलेला मार्टिन्स अखेर कॅलोवेला मदत करायला असमर्थता दर्शवतो आणि परत जाण्याची इच्छा व्यक्त करतो. कॅलोवे त्याला विमानतळावर सोडायला जात असताना ‘वाटेत एके ठिकाणी माझं पाच मिनिटांचं काम आहे, तू ही चल, लेखक आहेस, कदाचित तुला उपयोग होईल,’ असं म्हणून त्याला एका हॉस्पिटलमध्ये नेतो. तिथं हॅरी लाइमच्या भेसळयुक्त औषधांनी विकलांग झालेली मुलं पाहून मार्टिन्स सैरभैर होतो आणि कॅलोवेला मदत करायला पुन्हा तयार होतो.
लागतोय काही संदर्भ? कुठे पाहिलाय असा प्रसंग? अमिताभ बच्चनला सुपरस्टार बनवणाऱ्या ‘जंजीर’मध्ये. याचा अर्थ इतकाच की, सलीम-जावेदने देखील ‘द थर्ड मॅन’ पाहिला होता.
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment