नालासोपारा ते चिपळूण असा ‘सामाजिक स्वास्थ्य’ बिघडण्याचा प्रवास सुरू झालाय. तो महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • डावीकडे नालासोपऱ्यातील मोर्चा, उजवीकडे चिपळूणमधील मोर्चा
  • Wed , 29 August 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar संभाजी भिडे Sambhaji Bhide शिव प्रतिष्ठान Shiv pratishthan वैभव राऊत Vaibhav Raut

‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ ही घोषणा नालासोपाऱ्यातल्या (जि. पालघर) मोर्च्यात ज्या इसमानं दिली, तो भलताच चतुर असला पाहिजे. ही घोषणा ज्या मोर्च्यात घुमली, तो वैभव राऊत (वय ४०) या आरोपीच्या समर्थनार्थ काढला गेला होता. गेल्या १० ऑगस्टला वैभव राऊतला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकानं (एटीएस) कर्नाटक एटीएसच्या माहितीवरून अटक केली. वैभव राऊतच्या नालासोपाऱ्यातल्या भंडार आळीतल्या राहत्या घरातून ही अटक झाली. त्याच्या घरात काही बॉम्ब, बंदुका आणि बॉम्ब बनवण्यासाठीच्या स्फोटक पदार्थांचा कच्चा माल सापडला. वैभव राऊत इस्टेट एजंट म्हणून काम करत असे. शिवाय तो गोरक्षणाचं काम करायचा असं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय.

वैभव राऊतला अटक झाली आणि त्याच्या समर्थनासाठी भंडारी समाजानं सरकारविरोधात पोलीस स्टेशनवर मोर्च्या काढला. या मोर्च्याची छायाचित्रं प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालीत. त्यातल्या घोषणाही ऐकायला मिळाल्या. या मोर्च्यातले किती नागरिक वरील घोषणेशी सहमत होते हे माहीत नाही, पण ही घोषणा सुजाण भारतीय नागरिकांना अस्वस्थ करणारी आहे. वैभव राऊतच्या अटकेनंतर त्याच्याजवळ मिळालेल्या माहितीवरून शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, सचिन अंदुरे आणि श्रीकांत पांगारकर यांनाही एटीएसनं अटक केलीय. या सगळ्यांकडे चौकशीत खूप गंभीर माहिती पोलिसांना मिळाली. या आरोपींचा डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असावा असा पोलिसांचा संशय बळावलाय. त्या दिशेनं तपास चालू आहे. शिवाय हे सर्व बॉम्ब, बंदुका कशासाठी बाळगत होते.

हे ऐकल्यावर तर शांतताप्रेमी नागरिकांचा थरकाप उडावा. कारण हे आरोपी एकत्रित मोठा घातपात घडवण्याचा कट रचत होते. मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांत मराठा मोर्च्यात आणि इतर धार्मिक सण, उत्सवात हे बॉम्ब फुटणार होते. त्यांच्या जवळच्या बंदुका राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करणार होत्या. बंदुकांनी ज्यांना टिपायचं होतं त्यांची यादी या गटाकडे सापडली आहे. अटक झालेला शिवसेनेचा माजी नगरसेवक, जालन्याचा श्रीकांत पांगारकर यानं हत्यारं खरेदी करायला पैसे पुरवल्याचं एटीएसचं म्हणणं आहे. या आरोपींकडून काही मोबाईल, हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह मिळालेत. त्यात तर महाराष्ट्राला हादरवून टाकणारी माहिती मिळू शकते, असं एटीएस म्हणतंय.

एवढ्या गंभीर प्रकरणात आरोपी असणाऱ्या वैभव राऊतच्या समर्थनासाठी भंडारी समाजानं मोर्च्या काढावा, ही अचंबित करणारी घटना आहे. हे आरोपी देशविरोधी, समाजात तेढ निर्माण करणारी कृत्यं करण्याच्या तयारीत होते, असं पोलीस सांगत असताना त्यांचं समर्थन करायला एक समाज पुढे कसा येतो? यापूर्वी महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. महाराष्ट्र नेहमी घातपात आणि समाजद्रोह्यांच्या विरोधी उभा राहत आल्याचा इतिहास आहे. पण त्या वैभवशाली परंपरेला छेद देणारी घटना नालासोपाऱ्यात घडली.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
 

.............................................................................................................................................

नालासोपारा हे सुसंस्कृत आणि प्राचीन गाव आहे. आता तो भाग वसई-विरार महानगरपालिकेत येतो. पण प्राचीन काळात हे प्रसिद्ध बंदर होतं. अपरांत म्हणजे कोकणची राजधानी म्हणून हे बंदर प्रसिद्ध होतं. बुद्ध काळात या बंदरातून इजिप्त, पूर्व आफ्रिकेतल्या देशांशी जहाजातून व्यापार उद्दीम चाले. एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र म्हणून या शहराचा लौकिक आहे. इथं बौद्ध स्तूप आहेत. बौद्ध भिख्खू या बंदरातून श्रीलंकेला जात असत, अशी इतिहासात नोंद आहे. जैनधर्मीय साधूही इथं राहत असत. बौद्ध आणि जैन हे अहिंसा आणि शांततेचा पुरस्कार करणारे धर्म आहेत. त्या विचारांचा या शहरावर प्रभाव आहे. त्या शहरात हिंसक घटनांत सामील असल्याचा आरोप असणाऱ्या आरोपीची बाजू घेणारे नागरिक निघावेत, त्यांनी संघटीत मोर्चे काढावेत आणि विपरीत घोषणा द्याव्यात या साऱ्याच घटना बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत.

ऑगस्ट महिना भारताच्या जीवनात क्रांती घेऊन आलेला महिना आहे. ९ ऑगस्टला भारतात क्रांती आली. जुलमी इंग्रजांना मुंबईतून महात्मा गांधींनी ‘चले जाव’ म्हटलं आणि ऑगस्ट क्रांती आंदोलन पेटलं. त्याची परिणीती पुढे १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळण्यात झाली. पण १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना त्याच्या आगेमागे नालासोपाऱ्याच्या घटना घडल्या, विपरीत घोषणा ऐकाव्या लागल्या. ही चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे.

नालासोपाऱ्यात हे विपरीत घडल्यानंतर चिपळूण (जि. रत्नागिरी) इथं एक आक्रित घडलं. चिपळूणमध्ये चितळे मंगल कार्यालयात गेल्या आठवड्यात शिव प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांची बैठक होती. या बैठकीला चिपळूणच्या १४ सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन विरोध केला. या सामाजिक संघटनांचं असं म्हणणं होतं की, कुटील घातपात घडवण्याचा आरोप असलेल्या आरोपीपैकी सुधन्वा गोंधळेकर हा संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठानशी संबधित आहे. त्यानं मराठा मोर्च्याच्या हालचालीवर वॉच ठेवला होता. मराठा मोर्च्यात घातपाताच्या योजनेत त्याचा हात होता, हे पोलिसांनी स्पष्ट केलंय. या पार्श्वभूमीवर मराठा व इतर समाजाच्या भावना तीव्र आहेत. शिवाय या गटाच्या टार्गेटवर असणारे सामाजिक कार्यकर्ते मराठा समाजातले आहेत. त्यामुळे लोक संतप्त आहेत. संभाजी भिडे यांच्या भाषणानं समाजात तेढ वाढते. त्यामुळे चिपळूण शहरात काही वेगळं घडू शकतं. १४ संघटनांच्या या तक्रारीनंतर चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई आणि अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्यापुढे धर्मसंकट उभं राहिलं. संभाजी भिडे यांची बैठक रद्द करावी, तिला परवानगी नाकारावी तरी अडचण आणि या १४ संघटनांच्या मागणीकडे दुर्लक्ष करावं तरी संकट. या कात्रीत चिपळूणचं प्रशासन सापडणं स्वाभाविक होतं.

चिपळूण ही परशुरामाची भूमी. परशुरामाचं इथलं मंदिर प्रसिद्ध आहे. शिवाय या गावाला कोकणस्थांचं पहिलं घर म्हणतात. अशा या ऐतिहासिक गावात संभाजी भिडे यांना अडवायचं कसं? पोलीस आणि प्रशासन हतबल ठरलं. भिडे आणि त्यांची बैठक झाली. पण त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती मात्र गंभीर रूप घेती झाली.

चितळे मंगल कार्यालयाला हजारो तरुणांनी वेढा घातला. ‘संभाजी भिडे चले जाव’च्या घोषणांनी चिपळून दणाणून गेलं. तरुण कार्यकर्ते ऐकेनात. आंदोलकांच्या हातात आंबे होते. मुखात ‘चले जाव’चे नारे होते. एक तरुण आंदोलक भिडेंच्या निषेधार्थ उंच इमारतीवर चढला. भिडेंच्या निषेधार्थ जीव देतो म्हणाला. आता खरी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. तोपर्यंत भिडे विरोधकांची गर्दी आणखीच वाढली. इमारतीवर चढलेल्या आंदोलकाला ताब्यात घेऊन परावृत्त केलं गेलं. पण इतर आंदोलकांनी आक्रमक रूप घेत भिडेंना चितळे मंगल कार्यालयात कोंडलं. साडेतीन तास हा संघर्ष सुरू होता. आंदोलक भिडेंना कोंडून ठेवू पाहत होते, तर भिडेंना सुखरूप चिपळूणातून बाहेर कसं हलवायचं याच्या युक्त्या पोलीस, प्रशासन आखत होतं. आंदोलकांनी भिडेंची गाडी अडवून धरली होती. भिडे मंगल कार्यालयात अडकले होते. जमाव आक्रमक होत चालला होता. हा संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हं होती. प्रशासनानं एसआरपीच्या तुकड्या तैनात केल्या. लाठीचार्ज करू अशा सूचना दिल्या तरी आंदोलक हटत नव्हते. शेवटी एका गुप्त गल्लीतून भिडे यांना गुपचूप शहराबाहेर नेण्यात आलं. आंदोलकांना बेसावध ठेवण्यात पोलीस यशस्वी झाले. पोलिसांची चतुराई कामी आली. साडेतीन तास कोंडून ठेवलेल्या भिडे यांची सुटका झाली. ते सांगलीच्या दिशेनं रवाना झाले आणि चिपळूणच्या पोलीस-प्रशासनानं सुटकेचा श्वास घेतला.

ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या पत्रकारांच्या मते पोलिसांनी ही घटना चतुराईनं हाताळली नसती तर चिपळूणात रक्तपात झाला असता. संभाजी भिडे यांना चोप देऊ, त्यांच्या सभा उधळून लावू असे इशारे संभाजी ब्रिगेड या संघटनेनं याआधीच जाहीरपणे दिलेले आहेत. चिपळूणमध्ये संभाजी भिडे यांची झालेली कोंडी आता इतर शहरांतही सामाजिक संघटना एकी करून करू शकतात, हे स्पष्ट झालंय. चिपळूणच्या घटना इतरत्र घडणार हे स्पष्ट आहे. त्या हाताळणं हे पोलीस आणि प्रशासनापुढचं आता नवं आव्हान आहे.

नालासोपारा ते चिपळूण असा आपल्या शहरांचं सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा प्रवास सुरू झालाय. हा प्रवास महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार, हा खरा प्रश्न आहे.

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......