‘इस्लामची शिकवण आणि वेदान्ताचा आत्मा’ यावर आधारित ऐक्य करावे, हा स्वामी विवेकानंदांचा संदेश होता!
पडघम - सांस्कृतिक
देवयानी देशपांडे
  • स्वामी विवेकानंद आणि अमलेंदू मिश्र यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 29 August 2018
  • पडघम सांस्कृतिक स्वामी विवेकानंद Swami Vivekananda अमलेंदू मिश्र Amalendu Misra अस्मिता आणि धर्म Identity and Religion

अमलेंदू मिश्र लिखित ‘Identity and Religion : Foundations of anti-islamism in India’ हे पुस्तक नुकतेच हाती पडले आहे. हा लेख या पुस्तकातील ‘विवेकानंदांचा हिंदू पुनरुत्थानाचा संकल्प’ या प्रकरणाची एक झलक आहे. विवेकानंद खचितच वैश्विकता अन् बंधुतेचा संदेश देऊ पाहत होते. परंतु, त्यामागील पार्श्वभूमी, त्यांचे नेमके हेतू, त्यांचा काळ या सर्वांची तार्किक मांडणी करणारे हे प्रकरण मुळातून वाचावे असे आहे.

यासोबतच माझे समज-गैरसमज तपासून बघण्याचा माझा प्रवास मी येथे शब्दबद्ध केला आहे. पुढील लेखांमध्येही असाच प्रयत्न असणार आहे. यातील ‘हिंदू’, ‘धर्म’, ‘वेदान्त’ हे आणि तत्सम सर्वच शब्द, ‘हिंदुवाद’, ‘हिंदूधर्म’ आणि ‘हिंदुत्व’ यातील फरक या सर्वच बाबी आपण जाणीवपूर्वक आणि सजगपणे पाहाव्यात.

.............................................................................................................................................

विवेकानंदांनी शिकागो इथे केलेल्या भाषणाला नुकतीच १२५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी विवेकानंदांची दखल घेतली. वर्तमान पंतप्रधानांनी त्यांच्या वक्तव्यात, विवेकानंदांच्या आत्मविश्वास आणि बेधडक वक्तृत्वाची प्रशंसा केली. त्याच वेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘वर्तमानातील असहिष्णू वातावरणात विवेकानंदांचा सहिष्णुता अन् वैश्विकतेचा संदेश उपयुक्त आहे’ असे वक्तव्य केले. सीपीएमच्या कॉ. ए. बी. बर्धन यांनीही यावेळी त्यांचे मत नोंदवले. ते म्हणाले, ‘आम्ही विवेकानंदांचे अनुयायी नाही, आम्ही वेदान्तवादी नाही; परंतु, हिंदूंचा खरा लोकबंध आणि संघ परिवाराचे हिंदुत्व यातील तफावत दाखवून देण्यासाठी आम्ही विवेकानंदांचा संदर्भ देतो.’

उपरोक्त विधानांतून एका विशिष्ट पद्धतीने विवेकानंदांचे चित्रण करण्याचा प्रयत्न दृश्य आहे. दुर्दैवाने, आपणही हे खरे मानून बसतो. वरील विधानांचा नीट विचार केल्यास लक्षात येते की, अशी विधाने करण्यामागे राजकीय हेतू आणि सुप्त पक्षीय राजकारण आहे. वर्तमानातील वातावरणात विवेकानंदांवरील कुठल्याही मताने आपण भारावून जाऊ नये किंवा त्यांचा द्वेषही करू नये. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनापासून ढळू नये असा अर्थपूर्ण संदेश अधिकारवाणीने देणारी सामान्य माणसे ही खरी आजच्या काळाची गरज आहे. असे मात्र होताना दिसत नाही. परंतु, असा संदेश देणारे कुणी नसेल तर आपणच शहाणे व्हायला हवे; सुप्त अर्थ समजून घेण्याचे काम आपणच करायला हवे. ते कसे करता येईल?

औपचारिक शिक्षणपद्धतीतून बाहेर पडल्यानंतर आपल्या हाती जी शिदोरी असते, तिला आईनस्टाईनने ‘शिक्षण’ म्हटले आहे. हाच आईनस्टाईन धर्मावरही फार छान भाष्य करतो. त्याच्या मते, ‘स्व-धर्माच्या सत्यतेबाबत ठाम असणारी व्यक्ती कधीच सहिष्णू असू शकत नाही....’ म्हणजे असे की, माझा धर्म सांगतो ते सर्वश्रेष्ठ, मग त्यातील सत्यता पडताळून न पाहणे आणि प्रसंगी इतर धर्मांचा अनादर करणे या दोन्हीही बाबी ओघानेच येतात. धर्मच आपले आचारविचार ठरवत जातो.

उपरोक्त दोन्ही व्याख्या वाचून त्याकडे दुर्लक्ष करणे कुठल्याही विचारी व्यक्तीला सहजी शक्य नाही. ‘शिक्षण’ आणि ‘धर्म’ म्हणजे नेमके काय असते, हे समजून घेण्यासाठी तुम्हा-आम्हा सर्वांकडे एक दैवी देणगी आहे, तिचे नाव ‘माणूसपण’. शिक्षण आणि धर्म दोहोंकडे पाहताना आपणा सर्वांनाच आधी एक माणूस असावे लागते. आजूबाजूलादेखील अगदी स्वच्छ नजरेने अन् ‘संतुलित दृष्टिकोनातून’ पाहावे लागते. असे करताना आपल्या बुद्धी आणि विचारांचा जो कस लागतो, त्यासाठी आपल्याकडे असलेली शिक्षणाची शिदोरी उपयुक्त ठरते. साधा विचार करूया, कुठल्याही व्यक्ती अथवा घटनाप्रसंगाकडे पाहताना आपण आपल्या नजरेने पाहतो का इतर कुणाच्या तरी? खरे तर, आपले मन आणि माणूसपण पुनश्च निरभ्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच आपला मनुष्यधर्म नव्हे का?

वाचन ही एक अशी साधना आहे ज्यातून आपली ‘शिक्षण’ आणि ‘धर्मा’ची जाण निरभ्र होत जाते. ती व्यापकदेखील होते. एखादा वाचक काहीतरी वाचतो, तेव्हा ते त्याच्या मनात झिरपून त्याच्यात अनेक बदल घडवून आणत असते. मग तो वाचक धर्माकडे केवळ ‘religion’ म्हणून न बघता ‘आपण धारण करतो तो धर्म’ अशा स्वच्छ नजरेने बघू शकतो अन् मग त्याला त्याचा ‘स्त्रीधर्म’, ‘पुरुषधर्म’, ‘विद्यार्थिधर्म’, ‘शिक्षकधर्म’, ‘पतिधर्म’, ‘पत्निधर्म’ इत्यादी स्वच्छपणे दिसून येतो. खरे तर, आपण जे काही करतो ते मन लावून करणे, हा साधा सोपा धर्माचा अर्थ नव्हे का? ही परिपक्वता प्रदान करते ती ‘शिक्षणा’ची शिदोरी म्हणजे नेमके काय हे आता आपल्याला उलगडू लागते. ती सर्वांकडेच आहे याचीही जाणीव होते.

विवेकानंद, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वि. दा. सावरकर; या तुम्हाआम्हा सर्वांना ज्ञात असलेल्या व्यक्ती आहेत. या व्यक्तींच्या आपल्या मनावर काही ठळक प्रतिमाही उमटलेल्या आहेत. त्या प्रतिमा कुणी उमटवल्या आमच्या मनावर? ठाऊक नाही. आपल्याही नकळत या प्रतिमा आपल्या मनावर कोरल्या जातात. यातील प्रत्येक व्यक्ती प्रथमतः एक ‘सामान्य माणूस’ आहे, तिच्याही काही मर्यादा आहेत हे जाणून न घेता त्या व्यक्तीला आपण आपल्याही नकळत कधी ‘देवपण’ देतो, ते आपल्याला उमजतही नाही. बरे, गंमत अशी आहे की, आपल्याकडे एकाच व्यक्तीबद्दल टोकाची मते असणाऱ्या व्यक्तीही तितक्याच ठामपणे आपापली बाजू लावून धरत असतात. म्हणजे असे की, काही लोक गांधींना देवपण देतात, तर काही त्यांच्यावर कडाडून टीका करतात. अधलेमधले काही सापडतच नाही. त्यांना ‘देवपण’ देण्याच्या नादात अनेकदा आपण आपले ‘माणूसपण’ हरवून बसतो. ते एकदा हरवले की, मग जी परिस्थिती समोर असते तिला अभिजात समाजशास्त्रज्ञ एमिल डरखाईम याने ‘अनागोंदी’ ही समर्पक संज्ञा वापरली आहे. नीट विचार केला तर लक्षात येते की, सध्या आपण अशाच अनागोंदीत जगत आहोत. विचारांच्या या अनागोंदीची अभिव्यक्ती कृतीतून होते त्याचे आपण सर्वच साक्षीदार आहोत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
 

.............................................................................................................................................

ही अनागोंदी म्हणजे नेमके काय?

विवेकानंदांच्याच संदर्भाने बोलायचे तर विवेकानंद म्हणजे नेमके काय करू पाहत होते, त्यांचे हेतू काय होते, कशासाठी ते ‘धर्माचा’ अभ्यास करत होते, हे आपल्याला आजही ठाऊक नाही. मग समोर येईल त्या परिस्थितीत जे क्रमप्राप्त आहे ते आपण करत जातो; त्याला विचारांची जोड असेलच असे नाही. आपल्या राष्ट्रवादी नेत्यांनी व्यक्त केलेली मते, त्यांनी दिलेले संदेश आणि वर्तमानातील परिस्थिती यांची सांगड घालणे अनेकदा आपल्याला जमत नाही आणि म्हणूनच विचारांना योग्य दिशाही मिळत नाही. परिणामी, त्यांचे संदेश कालसुसंगत असो किंवा नसो ते जसेच्या तसे पाळणे म्हणजे आपण आपले कौशल्य मानून बसतो.

उपरोक्त व्यक्तींना आपण खरेच सामान्य माणूस म्हणून समजून घेतले का? म्हणजे, ही माणसे विशिष्ट पार्श्वभूमी असलेल्या काळाची निर्मिती आहेत, त्यांच्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात कराव्यात आणि वाईट गोष्टींसाठी त्यांना दूषणे देत बसू नये असा साधा अन् वस्तुनिष्ठ विचार आपण केला का? त्यांच्या विचारसरणीत मुळातच काही योग्य आणि काही अयोग्य असे दोन्हीही आहे, याची आपल्याला जाणीव तरी आहे का? आणि त्यांचे काही विचार अपूर्ण असतील तर ते मान्य करायला आपण का घाबरतो? सामान्य माणूस म्हटला की, पूर्ण-अपूर्णत्व आलेच नाही का?

तूर्तास, हिंदू-मुस्लीम संबंधांचा प्रश्न येथे विचारार्ह घेतला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण उपरोक्त व्यक्तींच्या मनाचा अन् विचारांचा वेध घेणार आहोत. म्हणजे विवेकानंदांचा हिंदुवाद, गांधींचा हिंदुधर्म, सावरकरांचे हिंदुत्व असा एक एक पदर या प्रश्नाच्या संदर्भाने उलगडत जाणार आहोत.

तुम्हाआम्हा सर्वांच्याच मनात इस्लाम धर्म आणि मुस्लिमांबाबत एक अढी आहे, ती का? भारतावर केवळ मुस्लिमांनी राज्य केले का? ब्रिटिशांनीदेखील केले; मग इस्लामबाबत अशी अढी बाळगण्याचे नेमके कारण काय? याचा शोध घेणारे विवेकानंद, गांधी, नेहरू आणि सावरकर या चार सर्वज्ञात विचारकांच्या मनाचा वेध घेता येईल. शिवाय, या विचारकांची मते ब्रिटिशांनी केलेल्या ऐतिहासिक नोंदी आणि मौखिक परंपरांवर आधारित असल्याने ती समजून घेताना आपण सतत सजग असावे लागते असाही सुप्त संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे. आपले समज आणि गैरसमज तपासून घेतले पाहिजेत. या चारही व्यक्ती आणि आपण स्वतःदेखील आपल्यालाच उलगडत गेले पाहिजे. स्व-घडणीचा हा प्रवास खचितच प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे.

पैकी, विवेकानंदांच्या काही बाबी येथे उलगडत जाणार आहोत. इतिहासाच्या पुस्तकातील माहितीच्या आधारे आजवर विवेकानंद एक समाजसुधारक म्हणून आपल्याला ज्ञात होते. शिवाय, ‘युवा दिना’च्या संदर्भाने ते आपणा सर्वांना ठाऊक आहेतच. परंतु, त्यांनी केलेला ‘धर्म’ या संकल्पनेचा अभ्यास नेमक्या कुठल्या हेतूने केला, त्यांना नेमके काय सुचवायचे होते अन् त्यांनी हिंदूंना ‘उठा, जागे व्हा’ असे आवाहन कशासाठी केले होते, या प्रश्नांची उत्तरे शोधणे रोचक ठरेल. विवेकानंदांचा काळ डोळ्यापुढे उभा करून ते हिंदुधर्माचा अभ्यास कुठल्या हेतूने आणि दृष्टिकोनातून करत होते, याची टप्प्याटप्प्याने उकल करत ती शब्दांत मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे.

‘धर्म’ या संकल्पनेचा अभ्यास

विवेकानंद म्हटले की, भगवे वस्त्र धारण केलेले, तेजःपुंज चेहरा असलेले एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. ‘हिंदू धर्माचे प्रणेते’ विवेकानंद उभेच ठाकतात डोळ्यांसमोर.

विवेकानंदांना खरे तर ‘धर्म’ म्हणजे एक वृत्ती वाटत होती असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे असे की, आपण जे करतो आणि जे करायला हवे याची उकल करण्याचे एक माध्यम म्हणजे धर्म. मग हिंदूंमध्ये शैथिल्य आहे, इस्लाम एक आक्रमक धर्म आहे ही आणि अशी अनेक तथ्ये ते बेधडकपणे आपल्यासमोर मांडतात. त्याचा कालसुसंगत अर्थ लावणे हे आपले काम आहे. दुर्दैवाने, आपण विवेकानंदांना ‘हिंदू धर्माचे प्रणेते’ म्हणून पुढे आपल्या विचारांना विराम देतो. परंतु, विवेकानंदांनी वापरला तो शब्द ‘हिंदू धर्म’ हा नाही. ते खरे तर ‘हिंदुवाद’ असा उल्लेख वारंवार करत होते. वेदांतावर आधारित हिंदुवाद. हे आपण निरभ्र मनाने समजून घेतले पाहिजे. ‘हिंदू धर्म’ ही संज्ञा पुढे गांधींच्या लेखात तपशीलवार पाहूया.

भारतातील संघर्षाला धर्म कारणीभूत असून धार्मिक समुदायांमध्ये एकजूट प्रस्थापित करायची असेल तर ‘धर्मशास्त्र’ समजून घेणे आवश्यक आहे असे राष्ट्र्वाद्यांचा एक गट मानत असे. विवेकानंद यातीलच एक होते. त्यांनी हिंदू आणि इस्लाम धर्माचा तौलनिक अभ्यास केला. मग इस्लाम धर्म आणि मुस्लीम राजवट यात कशी घट्ट गुंफण आहे त्याची उकल केली. विवेकानंदांचे धार्मिक विचार व्यापक होते. मात्र, ते केवळ धार्मिक अनुषंगानेच समजून घेतले गेले. त्यांची विचारधारा एक धार्मिक-राजकीय प्रभावी समुदाय प्रस्थापित करू पाहत होती, हे आपण समजून घेतले नाही.

‘हिंदूवाद’ ही संज्ञा प्रथमच मांडणाऱ्या विवेकानंदांनी वेदान्तावर आधारित हिंदुवाद प्रमाण मानणाऱ्या राज्यव्यवस्थेची कल्पना केली होती. आणि म्हणून हिंदूंना ‘उठा. जागे व्हा’ असे आवाहन करणारे ते पहिलेच सुधारक होते हेही तथ्य पुढे येते. म्हणजे त्यांनी हिंदूंना असे आवाहन करण्यामागे एक पार्श्वभूमी होती, हे लक्षात न घेता विवेकानंद समजून घ्यायला गेलो तर आपणही अनागोंदीचाच एक भाग होऊन बसू.

हिंदू कोण आहेत?

या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे नाही का? म्हणजे जे हिंदू धर्माचे पालन करतात ते हिंदू. परंतु, आता उपरोक्त धर्माच्या संकल्पनेच्या संदर्भाने विचार करायला हवा. म्हणजे विवेकानंदांना मुळात हिंदूंची व्याख्या कशासाठी करायची आहे? त्यांना हिंदू इस्लामपेक्षा कसे वरचढ आहेत हे दाखवून द्यायचे आहे. आणि म्हणून ‘हिंदू’ या संज्ञेची उकल करताना ‘जे वेदान्त प्रमाण मानतात’ ते हिंदू असे विवेकानंद म्हणतात. एखाद्या धार्मिक समुदायाचे, धर्माधारित समाजाचे किंवा वंशाचे धार्मिक अधःपतन झाल्यास परिणामी त्यांचा राजकीय क्षेत्रातील प्रभावदेखील ओसरतो असे सर्वसाधारण निरीक्षण आहे. हाच तर्क विवेकानंदांनी लागू केला. ते म्हणतात, भारतातील अल्पसंख्याकांची मुस्लिम राजवट आणि हिंदूंचे दमन या बाबी परस्पर संबंधित आहेत. यामुळेच हिंदूंचा आध्यात्मिक दर्जादेखील ढासळला आहे.

सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे ऐतिहासिक प्रक्रिया उलगडत जाताना असे राजकीय किंवा धार्मिक अधःपतन व्हावेच लागते असे विवेकानंद कुठेही म्हणत नाहीत. म्हणजेच आपला राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील कमी होत जाणारा प्रभाव हा इतिहासाचा नियम आहे असे हिंदूंनी मानू नये. खेरीज, पुनरुत्थानाकडे लक्ष द्यावे. एकदा का हे आध्यात्मिक पुनरुत्थान साध्य झाले की, मग हिंदूंना राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणेदेखील सहज शक्य होईल.

येथे विवेकानंदांचेदेखील काहीतरी राजकीय हेतू होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्यांना ती काळाची गरज वाटली हेदेखील लक्षात घ्यायला हवे.

धर्मांचा ‘तौलनिक’ अभ्यास

विवेकानंद ‘हिंदू धर्माचे प्रणेते’ होते, मग त्यांना दोन धर्मांचा तौलनिक अभ्यास का करावासा वाटला असेल, यामागे देखील एक कारण आहे. हिंदू हा मुळात एक धर्म नाही; ती एक वेदान्तआधारित जीवनपद्धती आहे. परंतु, आता हिंदूंचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा संकल्प तर विवेकानंदांनी केला होता. मग ते कसे करता येईल? तर इस्लाम धर्माशी त्यांची तुलना करून. मग इस्लाम कसा आहे, तो कसा एक संघटित धर्म आहे, त्यांचा एक प्रेषित, एक धर्मग्रंथ आहे, लोकांना कळायला आणि आचरायला तो सुलभ आहे. म्हणून विवेकानंद धर्माचा आधार घेतात. संस्कृतीच्या माध्यमातून ते एक एक गोष्ट सुलभ करू पाहत होते.

उपरोक्त हिंदूराष्ट्र स्थापन करायचे असेल तर इस्लाम धर्माचा आणि भविष्यातील मुस्लिमांच्या स्थानाचा अभ्यास करणे विवेकानंदांनी संयुक्तिक मानले. या तौलनिक अभ्यासामुळे वेदान्तआधारित हिंदूवादाचे इस्लामवर, पर्यायाने, हिंदूंचे मुस्लिमांवर वर्चस्व प्रस्थापित करणारी विचारधारा उदयाला आली. इस्लाममध्ये जशी राजकीय-आध्यात्मिक घट्ट वीण आहे, तशी राष्ट्रवादी वृत्ती हिंदू का प्रकट करत नाहीत, असा विचार विवेकानंद करतात. हिंदू मुस्लिमांपेक्षा श्रेष्ठ असतील तर ते नेमके कसे असा विचारही करतात. विवेकानंद विशिष्ट काळाची निर्मिती होती, हे येथे पुनश्च अधोरेखित होते.

नवी धार्मिक-राजकीय संरचना

इस्लामचा धांडोळा घेतल्यानंतर विवेकानंद वेदान्त आणि इस्लाम यांची सांगड घालून एक नवी धार्मिक-राजकीय राज्यव्यवस्था निर्माण करण्याची कल्पना मांडतात. का? कारण त्यांना एकीकडे हिंदूंचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, परंतु दुसरीकडे इस्लामला आक्रमकतेपासून प्रतिबंध करायचा होता. कारण हिंदूंची मूळ वृत्ती आक्रमक नाही. मग हिंदूंना त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर ते कसे, याचा विचार विवेकानंद करतात.

विवेकानंदांना भविष्याची चिंता सतावत होती. हिंदुवादाचे अस्तित्व कायम राखायचे असेल तर त्याने इस्लाममधील काही आचारपद्धती स्वीकृत कराव्या असे विवेकानंद सुचवू पाहत होते. हे वरकरणी आश्चर्यजनक वाटते, परंतु, हेच तथ्य आपल्याला वस्तुनिष्ठपणे पाहवे लागते. आपल्या धर्माचे अस्तित्व कायम राखण्यासाठी इतर धर्मांतील काही पद्धती अथवा आचार आत्मसात करावे लागले तर ती वेदान्ताशी फारकत घेणे नाही, असे मत विवेकानंद मांडत होते. सामुदायिक अस्मिता असणारा इस्लाम हा एकमेव धर्म आहे असे विवेकानंदांना वाटे. अशी अस्मिता हिंदूंमध्ये रुजावी अशी साहजिक अपेक्षा ते व्यक्त करतात. म्हणजे त्यांना खरेच सहिष्णुता रुजवायची होती का?

वेदान्त सर्वश्रेष्ठ

हिंदूंना मुस्लिमांपेक्षा वरचढ ठरवणे, हिंदुराष्ट्राची बांधणी करणे हा विवेकानंदांचा हेतू होता. मात्र, कुठल्याही संकुचित सांप्रदायिकतेपेक्षा वेदान्त श्रेष्ठ आहे आणि वेदान्ताच्या नेमक्या याच पैलूमुळे अनेक समुदायांची मोट बांधणे शक्य आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणून, ‘इस्लामची शिकवण आणि वेदान्ताचा आत्मा’ यावर आधारित ऐक्य प्रस्थापित करावे असा संदेश विवेकानंद देऊ पाहत होते. हा त्यांच्या स्वप्नातील भारत होता. त्या अनुषंगाने ते तार्किक युक्तिवाद मांडत होते, हे आपण लक्षात ठेवावे असे तथ्य आहे.

.............................................................................................................................................

लेखिका देवयानी देशपांडे  टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये समाजशास्त्र व लोकप्रशासन या विषयांच्या व्याख्यात्या आहेत.

ddevyani31090@gmail.com    

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......