अजूनकाही
कोणतीही निवडणूक ही जशी प्रचारमोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीवर लढवली जाते, त्यापेक्षा ती बुथपातळीवरील काटेकोर नियोजनावर अधिक लढवली जाते. दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार, हे निश्चित होण्यासाठी अवघे आठ महिने बाकी आहेत. सगळ्यांचीच पूर्वतयारी सुरू आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी प्रचारमोहिमेची रणनीती ठरवण्यात गुंतले आहेत. अद्याप शाब्दिक चकमकींना धार चढली नसली तरी ती चढण्यासाठी सराव सुरू आहे.
सत्ताधारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा ‘२०१९ साली भाजपसमोर आव्हान आहेच कुठे?’ अशा शब्दांत विधान करून मोकळे झाले असले तरी परत सत्ता मिळवण्यासमोरील आव्हानांची त्यांना जाण नाही, असे मानता येत नाही. ‘पायाला भिंगरी, डोक्यात देशभरातले बुथ’ असा अध्यक्ष अशी शहांची ओळख आहे.
भाजपला पर्याय देण्याची क्षमता असलेल्या काँग्रेसमध्येही पूर्वतयारीला वेग आला आहे. सशक्त विरोधी पक्षाकडून ज्या अपेक्षा असतात, त्यांची पूर्तता किमान लोकसभेच्या पूर्वतयारीच्या वेळी काँग्रेसकडून दाखवली जात आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पंतप्रधानपदाचा दावेदार कोण, हा मूळ प्रश्न बाजूला ठेवत रणनीती साकारली जात आहे.
२०१४ साली उन्माद नडल्याची राहुल गांधी यांची उघड कबुली आणि आता निवडणूक तयारीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन समित्या हे या बदलाचे द्योतक मानावे लागेल. आगामी लोकसभेत भाजपची वाटचाल रोखण्यासाठी पक्षांतर्गत तयारीसह समविचारी, धर्मनिरपेक्ष मित्रांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपसमोर आव्हान नसल्याचा शहांचा दावा पोकळ ठरवताना राहुल यांनी आपण हे आव्हान निर्माण करू शकत असल्याचा संदेश दिला आहे. देशभरात सर्वत्र दहशत निर्माण केली जात असून या दहशतीला तोंड देण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. त्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे. ही महाआघाडी आता राज्यकेंद्रित असेल, असे सांगत काँग्रेसने देशभरातील विविध प्रादेशिक पक्षांमध्ये विश्वास निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसने आपल्या धोरणात केलेला हा बदल ममता बॅनर्जी यांच्या प्रादेशिक पक्षांच्या फेडरल फ्रंट उभारणीतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न आहे. तो कितपत यशस्वी होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल. संभाव्य आघाडीत सहभागी सर्व प्रादेशिक पक्षांना सन्मान देण्याची तयारी काँग्रेसकडून दाखवली जात आहे. पण प्रादेशिक पक्षाचा, त्या-त्या राज्यांतील प्रभावी नेतृत्वाचा या आवाहनावर कितपत विश्वास बसेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एकपक्षप्रभुत्वपद्धतीच्या काळात काँग्रेसने प्रादेशिक नेतृत्वासोबत ज्या प्रकारचे वर्तन केलेले आहे, तो काळ अद्याप विस्मरणात गेलेला नाही. केंद्रीय नेतृत्वाचा प्रादेशिक नेतृत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच प्रतिकूल राहिलेला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून आपापल्या राज्यात सवतासुभा निर्माण करणारे शरद पवार, ममता बॅनर्जी अशी काही उदाहरणे आहेतच.
याशिवाय काँग्रेसच्या आणखी काही दिग्गज नेत्यांना या धोरणाचा त्रास झालेला आहे. सक्षम प्रादेशिक नेत्याचे पंख कापण्याची पक्षातील रीत फार जुनी आहे. कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना काँग्रेसने किती निर्णयस्वातंत्र्य दिले आहे? त्यामुळे प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जाण्यास सहजासहजी तयार होणार नाहीत.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
सत्ताधारी भाजपकडूनही त्यात अडसर आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न होत राहतील. याची प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनात राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना केलेल्या भाषणातून आलेली आहे. ज्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसला येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना सामोरे जायचे आहे, त्यांची स्वत:च्या राज्यात विश्वासार्हता किती आहे, याचाही विचार करावा लागेल. कारण आज ज्यांच्याकडे लोकसभेतील तगडी आकडेवारी व राज्यात सत्ता आहे असे महत्त्वाचे शिलेदार फेडरल फ्रंट सोडून काँग्रेससोबत हातमिळवणी करणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे.
ज्यांना राज्यात सत्तेची चव चाखायची आहे आणि ज्यांच्याकडे स्वबळ नाही अशांना या समविचारी संकल्पनेचे आकर्षण वाटत आहे. कारण त्यांची विश्वासार्हता संपल्याचे महाराष्ट्रातील विविध आंदोलनांतून उघड झाले आहे. समविचारी मित्रांना गोळा करतानाच स्वत:चीही विश्वासार्हता वाढवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. व्यक्तिश: विनम्र स्वभाव असणाऱ्या राहुल गांधींसमोर स्वत:च्या कृतीमधील विसंगती दूर करण्याचेही आव्हान आहे.
राजधानीतील १९८४ च्या दंगलीत झालेले शीखधर्मियांचे शिरकाण, त्याबाबतचा नानावटी अहवाल आणि या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची दिलगिरी हा इतिहास आहे. अशा वेळी राहुल गांधी यांच्या विधानामुळे गोंधळात आणखी भर पडते आहे. ज्यांच्या अनुभवी खांद्यावर राहुल यांनी आगामी लोकसभेची रणनीती सोपवली आहे, त्यांना काही जनाधार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न असून केवळ दरबारी राजकारणात पटाईत मोहऱ्यांवर विसंबून यशासाठी वातावरणनिर्मिती करता येते. प्रत्यक्ष निवडणुका जिंकण्यासाठी स्थानिक राजकारण, संघटनकौशल्य अंगी असणाऱ्या उमद्या नेत्यांची व कार्यकत्र्यांची फळी असावी लागते. त्यामुळे राहुल यांनी जनाधार असलेल्या दुसऱ्या फळीतील तरुण रक्ताला विश्वासार्हता निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागेल.
२०१४ ला भक्कम बहुमताने सत्ता मिळालेल्या भाजपने त्यांच्या कार्यकाळात सर्व काही कुशलमंगल केले आहे, असे खुद्द भाजप नेत्यांनाही वाटत नाही. अर्थात तसा आभास भाजपकडून निर्माण केला जात असला तरी मतदार नाराज आहेत, याची कल्पना त्यांनाही आहे. त्यामुळे येत्या लोकसभेत तिरंगी लढती पहावयास मिळाव्यात यासाठी भाजप प्रयत्नशील असणारच.
प्रत्यक्ष प्रचारमोहीम आणि ग्राऊंड लेव्हलवरचे नियोजन हाताळण्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडे स्वतंत्र यंत्रणा असल्या तरी सर्वसामान्य मतदारांसमोर मात्र लोकसभा निवडणुकीत ‘नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी’ असेच चित्र असणार आहे. त्यांच्यासमोर स्वत:ची ‘पप्पू प्रतिमा’ पुसण्याचे आव्हान आहे. प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यामुळे उन्माद हाच स्वभाव बनलेल्या नेतेमंडळींची सत्तेपासून दूर झाल्यानंतरची तडफड गत चार वर्षांत जनतेने अनुभवली आहे. ही अस्वस्थता दिग्गज नेत्यांना कुठल्या पातळीवर उतरण्यास प्रवृत्त करते, हे महाराष्ट्रातील जनता अनुभवत आहे. त्यामुळे काँग्रेसने सध्या सुरू केलेल्या लोकशाही धोक्यात आली, दमनशाही सुरू झाली, सामाजिक सौहार्द गोत्यात आले या आरोळ्या या प्रत्यक्ष तसे घडते आहे, म्हणून नव्हे तर असा डांगोरा पिटणारे आता सत्तेशिवाय अस्तित्वात राहू शकत नाहीत म्हणून काढल्या जात आहेत, हे मतदारांना पुरते ज्ञात आहे.
काँग्रेस जर असा आभास रणनीतीचा भाग म्हणून निर्माण करत असेल तर सत्ताधारी भाजपकडून करण्यात येणारी राहुल गांधी यांची ‘पप्पू प्रतिमा’ अवैध कशी मानता येईल? तीसुद्धा भाजपच्या रणनीतीचाच भाग असणार. त्यात राहुल गांधी यांचे वर्तन ‘पप्पू’ या प्रतिमेला छेद देण्यापेक्षा ती प्रतिमा दृढमूल करणारेच ठरते आहे. ज्या चुकीची कबुली माजी पंतप्रधान देऊन बसलेत, अशा चुका नाकारून राहुल नव्याने चूक कशासाठी करत आहेत? भाजप सरकारच्या उणीवा शोधून त्यांना अडचणीत आणण्यापेक्षा राहुल स्वत:च चुका करत राहिले तर भाजपला ते हवेच आहे. कारण अशा प्रतिमेचा प्रतिस्पर्धी समोर असणे, हे अर्धी लढाई जिंकण्यासारखेच आहे.
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment