अजूनकाही
‘मुस्लिम ब्रदरहूड’ संघटनेची सध्याची वेबसाईट (http://www.ikhwanweb.com) ही संघटना लष्करी हुकुमशाहीच्या विरोधात आणि लोकशाही व मानवी हक्कांच्या बाजूने असल्याचा संदेश देते. तसेच पश्चिम आशियातील देशांमध्ये बाह्य शक्तींच्या (पाश्चिमात्य देश) हस्तक्षेपाविरुद्धच्या भूमिका मुस्लिम ब्रदरहूडच्या वेबसाईटवर बघायला मिळतात. म्हणजेच स्वातंत्र्य व सार्वभौमत्व या मूल्यांच्या बाजूने मुस्लिम ब्रदरहूड उभी असल्याचे दिसते.
अशा या लोकशाही, मानवी हक्क, स्वातंत्र्य व सार्वभौमित्वसारख्या गांधी-नेहरू-आंबेडकरांना जवळच्या असलेल्या मूल्यांनाच आपली विचारधारा असल्याचे दाखवणाऱ्या संघटनेची तुलना राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली. ही बाब आरएसएसला चांगलीच झोंबली आहे. आरएसएस जर या मूल्यांशी कटिबद्ध असेल तर राहुल गांधींनी केलेल्या तुलनेने एवढा जळफळाट होण्याचे कारण नव्हते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, मुस्लिम ब्रदरहूडची निष्ठा जर या मूल्यांशी असेल तर राहुल गांधींनी आरएसएसची या संघटनेशी तुलना केली तरी का?
मुस्लिम ब्रदरहूडचा इतिहास आरएसएस एवढाच क्लिष्ट आहे. कारण एकंदरीत पश्चिम आशियाचा आधुनिक इतिहास भारताएवढा -किंबहुना अधिकच- गुंगागुंतीचा आहे. १९२५ मध्ये भारतात आरएसएस आणि १९२८ मध्ये इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूड स्थापन झाली. त्यावेळी दोन्ही देशांवर ब्रिटिशांचे राज्य होते. आरएसएसच्या स्थापनेच्या वेळी त्याचे मुख्य व एकमात्र उद्दिष्ट हे हिंदूंच्या भल्यासाठी हिंदूंना संघटित करणे हे होते. मुस्लिम ब्रदरहूडच्या स्थापनेचे उद्दिष्ट ब्रिटिशांचे राज्य उलथवून लावत इस्लामवर आधारित राज्य प्रस्थापित करण्यासाठी मुस्लिमांना शिक्षित व प्रेरित करणे हे होते.
पहिल्या महायुद्धानंतर ओटोमन साम्राज्य कोसळत खालिफत नष्ट होण्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम ब्रदरहूडला इस्लामच्या शिकवणुकीवर आधारीत राज्य आणायचे होते, तेसुद्धा फक्त इजिप्तपुरते नाही तर संपूर्ण अरब प्रांतांमध्ये ते पसरवायचे होते. ओटोमन साम्राज्यात जवळपास संपूर्ण अरब प्रदेशांतील मुस्लिम एकाच राज्याखाली होते, मात्र ब्रिटिशांनी अरबस्थानचे तुकडे-तुकडे करत तिथे अनेक राष्ट्रांना जन्म दिला आणि त्यांच्या वाढीला खतपाणी घातले, अशी मुस्लिम ब्रदरहूडची धारणा होती व आहे. म्हणजे जसे आरएसएसला वाटते की, ‘ब्रिटिश भारत’ (British India) जसा त्यांनी १९२५ पासून बघितला, तसा तो पूर्वापार अस्तित्वात होता आणि ब्रिटिश व काँग्रेस यांच्या संगनमताने या राष्ट्राचे काही तुकड्यांमध्ये विभाजन झाले. या समजुतीतून आरएसएसला पडलेले अखंड भारताचे स्वप्न आणि मुस्लिम ब्रदरहूडची अखंड अरब राष्ट्राची परिकल्पना यांत कमालीचे साम्य आहे.
एक तर, या दोन्ही संघटनांचा असा ठाम (अंध)विश्वास आहे की, जगातील जेवढे काही महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लागलेत, ते त्यांच्याच भूमीत झालेत आणि यामागे तिथल्या धर्माने दिलेल्या ज्ञानाची प्रेरणा आहे. जगाच्या इतिहासात सुजलाम सुफलाम सुवर्णकाळ जर कुठे अस्तित्वात होता, तर तो आपल्याच अखंड भूमीत गतकाळात अस्तित्वात होता, यावर आरएसएस व मुस्लिम ब्रदरहूड या दोन्ही संघटनांचा पूर्ण विश्वास आहे.
दुसरे म्हणजे, हिंदू हा धर्म नसून एक जीवनपद्धती असल्याचा जो गर्वाभिमान आरएसएसला आहे, तसाच इस्लाम हा फक्त धर्म नसून एक जीवन पद्धती असल्याचा गर्वाभिमान मुस्लिम ब्रदरहूडला आहे. म्हणजे, धर्म ही खाजगी विश्वासाची बाब नसून प्रत्येकाने सार्वजनिकदृष्ट्या पाळायची प्रक्रिया आहे. अगदी देशांच्या सरकारांनीसुद्धा! धर्म हा सर्वोच्च असून त्यानुसार राज्यघटना, सरकारांची निवड व कार्यप्रणाली या बाबी ठरल्या पाहिजेत, असे या दोन्ही संघटनांना वाटते.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
ब्रिटिशांच्या राज्यात असे काही धर्माचे राज्य येणे तर शक्य नव्हतेच, पण ब्रिटिश गेल्यानंतर ज्या मंडळींच्या हाती देशाची सत्ता आली त्यांनीसुद्धा ‘धर्माला’ सर्वोच्च प्राथमिकता दिली नाही. त्यामुळे ब्रिटिशांचे राज्य गेल्यानंतर जसे भारतात आरएसएसला अधिक सक्रिय होणे भाग पडले, तसेच इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूडच्या कारवायांना हुरूप आला. मात्र इजिप्तमध्ये लोकशाही मूल्यांना फारसा थारा जसा आज नाही, तसा तेव्हाही नव्हता आणि मुस्लिम ब्रदरहूडवर तिथल्या सरकारने १९४८ मध्ये बंदी आणली. इजिप्तचे सार्वभौम सरकार उलथवून लावत इस्लामिक राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप मुस्लिम ब्रदरहूडवर ठेवण्यात आला. यांनतर लगेच इजिप्तच्या पंतप्रधानाची हत्या झाली. याच सुमारास भारतात गांधीजींची हत्या झाल्यांनतर साखर वाटणाऱ्या आरएसएसवर बंदी आली.
आरएसएस व मुस्लिम ब्रदरहूडच्या धारणा, (अंध)विश्वास व स्वप्ने यांच्यात जशी समानता आहे, तशीच कार्यप्रणालीतसुद्धा आहे. समाजातील घृणा, द्वेष, गैरसमज कमी करण्यासाठी काम करण्याऐवजी त्यांना अधिकाधिक पसरवणे यात दोन्ही संघटनांचा हातखंडा आहे. एकदा समाजात खोलवर द्वेष व घृणा पसरली की, जे वातावरण तयार होते त्यातून बुद्धिप्रामाण्य व सदसदविवेकबुद्धी लयास जाते. एकदा असे घडले की, मग धर्माच्या संकल्पनेवर कुणी प्रश्न उभे करत नाही. उलट प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्या चष्म्यातूनच बघितले जाते. एकदा हा धर्म डोक्यात शिरला की, राज्यघटनेला जाहीरपणे पेटवून देण्याचे धारिष्ट्य काही लोकांमध्ये येते आणि इतरांना त्याचा संताप येत नाही. धर्माच्या नावाखाली जनावरांचे रक्षण करण्यासाठी माणसांना ठेचून मारले जाते आणि संपूर्ण व्यवस्था त्याकडे कानाडोळा करण्यास शिकते. यासाठी या संघटनांना जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करावे लागत नाही की, स्वत:ची यंत्रणा वापरावी लागत नाही. समाजातच असे अनेक छोटे-मोठे गट, संघटना तसेच व्यक्ती तयार होतात, ज्या स्वत:हून हिंसक कारवाया करण्यास प्रेरित होतात. मुस्लिम ब्रदरहूडच्या या प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे पश्चिम आशियातील जवळपास सर्वच देशांमध्ये या संघटनेवर बंदी आणण्यात आली आहे.
भारतात लोकशाही असल्यामुळे आरएसएसचे म्हणणे त्यांच्या दृष्टीने तद्दन विकाऊ व बुद्धीने भ्रष्ट असलेल्या नेहरूंच्या सरकारलासुद्धा ऐकणे भाग होते. या लोकशाही प्रक्रियेचा फायदा घेत आरएसएसने आपण राजकीय संघटना नसल्याचे आणि भविष्यात केवळ सामाजिक व सांस्कृतिक मुद्यांवर काम करण्याचे आश्वासन खुद्द सरदार पटेलांना लेखी स्वरूपात दिले होते. परिणामी आरएसएसवरील बंदी उठवण्यात आली. यानंतर आरएसएसने लगेच जनसंघ नावाची स्वत:ची राजकीय शाखा काढली. मात्र कागदोपत्री कुठेही पुरावा ठेवला नाही.
तिकडे पश्चिम आशियात इजिप्त, सिरिया, तुर्कस्थान इत्यादी देशांतील हुकुमशहांनी मुस्लिम ब्रदरहूडला मुळीच भीक घातली नाही. परिणामी मुस्लिम ब्रदरहूडने वेगवेगळ्या संघटनांच्या नावाने शिक्षण, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मात्र जिथे जिथे राजकारणात, निवडणुकांमध्ये सहभागाची थोडीशीही शक्यता तयार झाली, तिथे तिथे मुस्लिम ब्रदरहूडने तत्काळ उडी घेतली. ज्याप्रमाणे आरएसएसने वेगवेगळ्या नावांनी संघटनांचे जाळे तयार केले आहे, तसेच मुस्लिम ब्रदरहूडने स्वत:ला निरनिराळ्या संघटनांच्या माध्यमातून कार्यरत ठेवले आहे.
आरएसएसप्रमाणे मुस्लिम ब्रदरहूडचा साम, दाम, दंड, भेद या उक्तीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जे जे आपल्या फायद्याचे ठरू शकते, त्या सर्व मार्गांचा अवलंब करायचा असे त्यांचे धोरण आहे. अगदी त्यासाठी मानवी हक्क, लोकशाहीवव्यक्तिगत स्वातंत्र्य या पश्चिमेकडून आलेल्या मूल्यांची पायमल्ली होत असल्याबद्दल सरकारविरुद्ध टीकेची झोड उठवणे गरजेचे असेल तरी हरकत नाही. अखेर, साम-दम-दंड-भेदाच्या शिकवणीनुसार सत्ताप्राप्ती फक्त (धर्माच्या) सर्वोच्च उद्दिष्टांसाठी करायची असते. त्यासाठी कोणत्याही मार्गांचा अवलंब निषिद्ध नाही.
शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक व शक्य असेल तेव्हा राजकीय क्षेत्रात काम करताना मुस्लिम ब्रदरहूडने सातत्याने दोन मुद्द्यांवर समाज मन कलुषित केले आणि एका मुद्द्यावर त्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले. पश्चिम आशियातील सर्वच देशांतील राज्यकर्ते भ्रष्ट व नाकर्ते असल्याचे त्यांनी सतत समाजमनावर बिंबवले आणि पाश्चिमात्य खाद्य पदार्थ, करमणुकीची साधने व कपडे यामुळे मुस्लिम मने भरकटत असल्याची प्रवचने दिवस-रात्र दिली. यांवर इस्लामिक जीवनपद्धती हेच उत्तर असून त्यातूनच सच्चे ‘अच्छे दिन’ येतील असे सांगत अक्षरश: हजारो युवकांना भ्रमित केले.
मागील ७० वर्षांपासून भारतात आरएसएस आणि त्यांच्याप्रमाणे विचार करणाऱ्या संघटनांनी असेच समाजमन कलुषित केले आहे आणि हिंदुत्वाचा जागर करत युवकांना भ्रमित केले आहे. खरा मुद्दा यानंतरचा आहे! आज पश्चिम आशियासह अनेक मुस्लिम बहुमताच्या देशांमध्ये कट्टर व हिंसक धार्मिकतेचा जो प्रवाह तयार झाला आहे, त्याच्या मुळाशी मुस्लिम ब्रदरहूड आहे. या संघटनेने आधुनिकतेच्या विरुद्ध आणि इस्लामच्या बाजूने वातावरणनिर्मिती तर केली, पण जिहादसाठी आतुर झालेल्या शेकडो मुस्लिम युवकांवरील नियंत्रण गमावले. मुस्लिम ब्रदरहूड कृती ऐवजी प्रवचनावर जास्त भर देत असल्याची टिका करत जे युवक या संघटनेपासून दूर गेले त्यांनी जिहादला प्रत्यक्षात आणण्यासाठी अल-कायदा आणि आयसीसची निर्मिती केली. पश्चिम आशियातील हिंसाचार व अनागोंदीवर कुणीही नियंत्रण मिळवू शकत नाही आहे, यामागचे महत्त्वाचे कारण मुस्लिम ब्रदरहूडने सेवाभावी व सांस्कृतिक कामाआडून आधुनिक विचारांच्या विरुद्ध खोलवर निर्माण केलेला द्वेष हे आहे.
मुस्लिम ब्रदरहूड व आरएसएस यांच्या विचारप्रणालीतील व कार्य पद्धतीतील समानस्थळे बघतामागील १० वर्षांपासून पश्चिम आशियात जे घडते आहे, तसे पुढील १० वर्षांमध्ये भारतात घडू लागल्यास आश्चर्य वाटू नये.
.............................................................................................................................................
लेखक परिमल माया सुधाकर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे इथं अध्यापन करतात.
parimalmayasudhakar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment