अजूनकाही
हिंदू समाजात सामाजिक सुधारणाबाबत जे स्थान महात्मा फुले यांचे, तेच स्थान मुस्लीम समाजात हमीद दलवाई यांचे आहे. दलवाई यांच्या कामाचे मोल इतके की, आधुनिक भारताचे इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकात ज्या निवडक १९ व्यक्ती घेतल्या आहेत, त्यात दलवाई यांचा समावेश केलेला आहे. दलवाई यांचे विचार जितके क्रांतिकारक आणि आधुनिक होते तितकेच त्यांचे मराठी लेखन प्रभावी होते. दलवाई जवळपास पंचवीस वर्षे (१९५२ ते १९७७) कथालेखक, पत्रकार आणि सामाजिक-राजकीय विचारवंत अशा विविध भूमिकांत वावरले. त्यांनी या देशातील मुस्लीम प्रश्न आणि त्याचे राष्ट्रीय एकात्मतेशी असलेले संबंध समजून घेण्यासाठी देशभर भ्रमंती केली होती. त्यातही मुख्यतः काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम अशा सीमावर्ती प्रदेशांत वावरून तेथील अनुभवांवर आधारित लेखन दलवाई यांनी केले आहे. त्यातले बरेचसे लेखन आता वाचायला उपलब्ध नाही. मात्र साधना प्रकाशनाने नुकतेच दलवाई यांचे ‘इस्लामचे भारतीय चित्र’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
पुस्तकात दलवाई यांनी आचार्य अत्रे यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या ‘मराठा’ दैनिकात लिहिलेले एकूण दहा लेख असून त्याला माजी पोलीस अधिकारी वसंत नगरकर यांची प्रस्तावना आहे. चाळीस वर्षे सामाजिक जीवनात वावरलेल्या नगरकर यांच्या मते त्यांना भेटलेल्या असंख्य व्यक्तींपैकी फार कमी व्यक्ती या अस्सल भारतीय होत्या. दलवाई हे अशा मोजक्या लोकांपैकी एक होते. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी या पुस्तकातील दलवाई यांच्या लिखाणातील साहित्यिक गुणांचा विशेष उल्लेख केला आहे. हे पुस्तक दलवाई यांचा मृत्यू झाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे १९८२ मध्ये श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केले होते. ती पुस्तकाची पहिली आवृत्ती संपल्यानंतर पुस्तक गेली पंचवीस वर्षे उपलब्ध नव्हते. म्हणजे १९९० च्या दशकात जेव्हा देशातील हिंदू-मुस्लीम प्रश्न राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी होता नेमक्या त्याच काळात हे पुस्तक उपलब्ध नव्हते.
पुस्तकातील दहा लेखांपैकी एक लेख हा काश्मीर भेटीवरील असून बाकीचे नऊ लेख हे दलवाई यांच्या पश्चिम बंगाल आणि आसाम येथील भेटींवर आधारित आहेत. दलवाई हे १९६५ च्या युद्धाच्या काळात काश्मिरात होते. तसेच ते पश्चिम पाकिस्तानात सुद्धा जाऊन आलेले होते. पुस्तकातील पहिल्याच लेखात त्यांनी मुस्लीम समाजाच्या वर्तनातील विसंगती स्पष्ट करणारी काही उदाहरणे दिली आहेत. गावातील गणेश मूर्तीला नारळ अर्पण करून मग गावात मुस्लीम लीगची स्थापना करणे असो की, हिंदू जातीव्यवस्थेचे समर्थन करणारा पाकिस्तानातील मुस्लीम असो, भारतीय सैन्याचा विजय होत आहे हे कळताच निराश होणारा श्रीनगरच्या हॉटेलातील नोकर असो की, भारतीय सैन्याला समान वाहून न्यायला मदत करणारे, विलक्षण भावनाशुन्य मुस्लीम मजूर असोत, दलवाई मुस्लीम मानस कसे गोंधळात टाकणारे आहे याचे चित्र निवडक प्रसंगांतून उभे करतात आणि कसे हे मानस समजून घ्यायचा प्रयत्न झालेला नाही हे सांगतात.
दलवाई यांना १९६८ मध्ये कोरगावकर ट्रस्टने फेलोशिप दिली होती. तिच्या आधारे दलवाई पूर्व पाकिस्तानच्या सीमारेषेवरील पश्चिम बंगाल आणि आसाम इथे जाऊन आले होते. दलवाई गेले तो असा काल आहे की, तेव्हा देशातील सामाजिक राजकीय जीवनात प्रचंड खळबळ माजलेली होती, बंगालमध्ये नक्षलवाद्यांचा उदय झालेला होता आणि नेहरूंच्या काळात शांत असलेला हिंदू मुस्लीम संबंधांचा प्रश्न पुन्हा तीव्र रूप धारण करायला लागला होता. या काळात भारताची पाकिस्तानशी दोन युद्धे झाली होती आणी त्यापैकी १९७१ च्या युद्धात तर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश हा नवा देश उदयास आला. अशा या अस्वस्थ कालखंडाच्या पार्श्वभूमीवर दलवाई यांचा हा दौरा झालेला आहे. १९६८ तील आपल्या या भेटीत त्यांनी तेथील विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य माणसे अशा विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला होता. कलकत्त्यातील पंचतारांकित हॉटेल ते थेट पूर्व पाकिस्तानी सीमेवरील भारतीय हद्दीतील गावे अशी त्यांच्या भ्रमंतीची रेंज होती.
दलवाई यांच्या या लेखांमधून त्यांनी आपल्या भ्रमंतीतील निवडक असे अनुभव मांडले आहेत. संपादकीय पानावरील हजार शब्दांच्या मर्यादेत लिहिले गेलेले हे लेख आहेत. मात्र अशा लेखांमधूनही दलवाई यांची चमकदार निरीक्षणे आणि विषयाची गुंतागुंत समजून देण्याची हातोटी सातत्याने जाणवत राहते. उदाहरणार्थ ते लिहितात की, बंगाली हिंदू बुद्धिजीवी वर्गाला रोमँटिक कल्पनांत गुंग होणे फार आवडते. किंवा पाकिस्तानच्या कल्पनेमागील महत्त्वाचे असलेले मोहम्मद इक्बाल हे जातीयवादी नसावेत असे मत व्यक्त करणारे कलकत्ता विद्यापीठातील प्राध्यापक हे कवी इक्बाल आणि राजकारणी इक्बाल यांच्यात गल्लत करत असावेत असे ते नोंदवतात. एका बैठकीतील जमाते इस्लामीच्या लोकांशी चर्चेच्या दरम्यान आलेल्या अनुभवाविषयी ते लिहितात की, प्रत्येक आरोप नाकारायचा आणि प्रतिपक्षावर उलट आरोप करायचे हे जमातचे तंत्र त्यांनी चांगलेच आत्मसात केलेले दिसते. अशी निरीक्षणे पुस्तकात पानोपानी आहेत.
दलवाई यांच्या या लेखांत ते बंगालच्या सीमाभागातील दारिद्र्य, तेथील आदरातिथ्याचा अभाव, शिक्षण न घेण्याची प्रवृत्ती, सीमाभागातील लोकांची सीमेच्या दोन्ही बाजूला चालू असलेली ये-जा याविषयी लिहितात. सीमाभागातील या भेटीतील त्यांची वर्णने सुद्धा बंगालमधील त्या सीमेचे स्वरूप, तेथील जनजीवन याविषयी आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पडतात. कलकत्त्यात भेटलेल्या समंजस मुस्लीम स्त्रियांविषयी सुद्धा ते लिहितात. स्त्री पुरुष समानतेवर आधारित कायदा व्हायला हवा आणि त्यासाठी सनातनी मंडळी विरोधात बंड झाले पाहिजे अशी दलवाई यांची भूमिका होती. त्यासाठी हजारो मुस्लीम स्त्रियांच्या सह्या घेऊन तो देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांना सदर करायचा अशी दलवाई यांची योजना होती. त्याला या मुस्लीम स्त्रिया सहकार्य देण्याचे आश्वासन देतात.
दलवाई यांच्या आसाम भेटीत त्यांना जाणवते की, आसामच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात मूळचे आसामी मुसलमान आणि स्थलांतरित बंगाली मुसलमान असा भेद होता. बंगाली स्थलांतरित मुसलमानांची सांख्य मूळ आसामी मुसलमानांपेक्षा जास्त असून सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचे वर्चस्व होते. हा प्रश्न तेव्हाच किती तीव्र होता याचे दाखले दलवाई यांच्या लेखनात सापडतात. या प्रश्नाने १९८० च्या दशकात फारच उग्र स्वरूप धारण केले. १९७१ च्या युद्धाच्या काळात हे स्थलांतर वाढतच गेले आणि त्याची परिणती पुढे स्थलांतरित विरोधी आसाम आंदोलनात झाली. दलवाई यांचे १९६८ सालातील लेखन वाचताना असे जाणवत राहते की, हे १९८० च्या दशकातील आंदोलन कधी ना कधी होणारच होते.
पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा दलवाई हयात नव्हते. परंतु वाचताना असे वाटत राहते की, दलवाई यांच्याकडे अजून खूपच मजकूर शिल्लक असावा. हे लेख या केवळ एका चांगल्या, दीर्घ पुस्तकासाठी आवश्यक असलेल्या नोट्स असाव्यात इतके कदाचित दलवाई या अनुभवावर लिहू शकले असते. पण दलवाई हयात नसल्याने या सगळ्याची आता चर्चा करण्यात अर्थ नाही. मराठी विचारविश्वात देशाच्या वेगवेगळ्या भागात भ्रमंती करून आपल्या अनुभवावर आधारित करण्याची एक परंपरा १९७० आणि १९८० च्या दशकात उभी राहिली होती. त्या परंपरेतील असे हे लिखाण आहे. पत्रकारिता, राजकीय विश्लेषण आणि साहित्य यांच्या सीमारेषेवरील हे लिखाण कोणालाही वाचायला आवडेल असेच आहे.
हे लिखाण केले गेले तेव्हाचा समाज आणि आताचा समाज यात खूपच बदल झालेला आहे. मात्र समान नागरी कायद्याचा अभाव, शिक्षण आणि आधुनिकीकरण यांचे मुस्लीम समाजात तुलनेने कमी असलेले प्रमाण, हिंदू मुस्लीम संबंधांची सीमावर्ती भागात लागणारी कसोटी इत्यादी प्रश्न अजूनही तसेच राहिले आहेत. तसेच देशातील हिंदू मुस्लीम संबंधांचा प्रश्न हा एका अर्थाने भारताच्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या बरोबरील परराष्ट्र संबंधातला देखील प्रश्न बनतो. या कारणांमुळे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारतात हिंदू जातीयवादी विचारधारा असलेल्या भाजपचे आणि त्यातही नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले असताना तर या लिखाणाचे आणि एकूण हिंदू-मुस्लीम संबंधाच्या प्रश्नाचे मोल आणखीनच वाढते. अतिशय वाचनीय आणि रोचक असलेले हे पुस्तक या देशातील सामाजिक राजकीय वास्तव विशेषतः मुस्लीम प्रश्न आणि त्याची गुंतागुंत समजून घेण्यात रस असलेल्या कोणीही आवर्जून वाचावे असे आहे. कदाचित पूर्वीपेक्षा त्याचा आता रेलेव्हन्स अधिकच वाढलेला आहे!
इस्लामचे भारतीय चित्र - हमीद दलवाई, साधना प्रकाशन, पुणे, पाने- ६६, मूल्य – ५० रुपये.
लेखक दिल्लीस्थित साउथ एशियन विद्यापीठामध्ये पीएच.डी. करत आहेत.
sankalp.gurjar@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment