अजूनकाही
माणूस स्वप्नांवर जगतो. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. शिवाय मुंबईसारखी मायानगरी माणसांना स्वप्नं दाखवायला कुठेही कमी पडत नाही. या ‘मोहनगरी’त आल्यानंतर कोणालाही स्वप्नांचा मोह पडतो. त्यामुळे मुंबईत आलेला प्रत्येक जण एक विशिष्ट स्वप्न घेऊन आलेला असतो आणि त्याच्या पूर्ततेसाठी त्याचा अहोरात्र संघर्ष चालू असतो. ‘ट्रकभर स्वप्न’ या नवीन मराठी चित्रपटात अशीच स्वप्नं उराशी बाळगून मुंबईत आलेल्या एका टॅक्सीचालकाची कथा आहे. अर्थात कोणाच्याही स्वप्नपूर्तीत ढीगभर अडथळे कसे येतात, हे या कथेमार्फत सांगण्यात आलं आहे. आणि चित्रपट म्हणून तेवढंच त्याचं वैशिष्ट्य लक्षात राहतं.
‘ट्रकभर स्वप्न’मध्ये ‘राजा’ नावाच्या टॅक्सीचालकाची कथा पाहायला मिळते. कोकणात चांगली शेतीवाडी, आई-बाप आणि भाऊ असलेल्या कुटुंबातील राजा ‘मी शेतकरी आहे, पण मला शेतकरी म्हणून इथंच मरायचं नाही’ असं सांगून पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईत येतो. मुलाला बॅरिस्टर करण्याचं त्याचं स्वप्न असतं. अर्थात मुंबईत आल्यानंतर त्याला एका बेकायदा झोपडपट्टीत राहावं लागतं. टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या राजाला त्याची पत्नी इतरांकडे घरकाम करून साथ देते.
एकदा सणानिमित्त राजा आपल्या कुटुंबासह कोकणात आपल्या गावी गेला असताना त्याचा भाऊ आणि भावजय त्याच्या मुंबईतील खुराडेवजा घरावरून हिणवतात. अपमानित झालेला राजा झोपडपट्टीतील तेच घर मोठं करण्याचा म्हणजे त्यावर पोटमाळा बांधण्याचा निर्णय घेऊन मुंबईला परततो. मात्र त्यासाठी किमान चार-पाच लाख रुपये खर्च येणार असतो. त्यानिमित्त त्या झोपडपट्टीचा ‘दादा’ असलेल्या ‘आरके’शी त्याचा संबध येतो. राजाचं आपलं घर मोठं करण्याचं आणि मुलाला बॅरिस्टर करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होतं का? त्यासाठी त्याला काय संघर्ष करावा लागतो, ते पडद्यावर पाहिलेलं चांगलं.
या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेते प्रमोद पवार यांनी केलं आहे. दिग्दर्शनाचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. मात्र मुळात चित्रपटाच्या कथेत फारसं नावीन्य नाही. अशा कथेचं साधर्म्य असणारे अनेक चित्रपट यापूर्वी येऊन गेले आहेत. त्यामुळे केवळ आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राजाला कशा प्रकारचा संघर्ष करावा लागतो, एवढंच चित्रपटात पाहणं बाकी राहतं. आणि हा संघर्षही पडद्यावर अपेक्षित वळण घेणाराचा ठरतो.
शिवाय वास्तवतेच्या नावाखाली झालेली मांडणीही उथळ स्वरूपाची आहे. चित्रपटाचे संवाद चांगले असले तरी पटकथा आणखी बांधेसूद असायला हवी होती. कारण काही त्रुटी ठळकपणे जाणवतात. झोपडपट्टीचा दादा आरके, तसंच पत्नीसुखापासून वंचित असलेला मखिजा हा धनाढ्य व्यापारी यांच्या व्यक्तिरेखा आणखी विकसित करण्याची गरज होती. तसंच राजा मुंबईत राहूनही रोज टक्केटोणपे खाऊन एवढा ‘सज्जन’ कसा, असाही प्रश्न पडतो.
एकूणच चित्रपटाची कथा अधिकाधिक मेलोड्रॅमॅटिक कशी होईल यावरच भर देण्यात आला आहे. ‘देवा तुझ्या....’ हे गाणं त्याची प्रचिती देणारं आहे. झोपडपट्टी आणि मुंबई शहराचं यथायोग्य दर्शन घडवणारं राजीव जैन यांचं छायांकन मात्र ही या चित्रपटाची फार मोठी जमेची बाजू आहे.
चित्रपटात मुकेश ऋषी (झोपडपट्टीचा ‘दादा’), मनोज जोशी (मखिजा) यासारखे दिग्ग्ज कलाकार असूनही त्यांचा फारसा प्रभाव पडत नाही. कारण त्यांच्या व्यक्तिरेखा आणखी विकसित करण्याची गरज होती. तसंच ‘राजा’ झालेले मकरंद देशपांडे हे ‘राजा’पेक्षा ‘मकरंद देशपांडे’ म्हणूनच जास्त लक्षात राहतात. राणीच्या भूमिकेत मात्र क्रांती रेडकरनं जीव तोडून काम केलं आहे. स्मिता तांबेनंही ज्योतीच्या भूमिकेत तिला चांगली साथ दिली आहे. आदिती पोहनकरनंही मुलीची भूमिका चांगली निभावली आहे. विजय कदम, आशा शेलार (राजाचे आई-वडील) यांच्याही छोटेखानी भूमिका उत्तम आहेत. थोडक्यात ‘ट्रकभर स्वप्न’मध्ये फक्त ढीगभर अडथळ्यांची शर्यत आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment