अजूनकाही
ज्युनियर ब्रह्मे यांचं 'ब्रह्मेघोटाळा' हे धम्माल पुस्तक लवकर वॉटरमार्क पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध विनोदी लेखक मुुकुंद टाकसाळे यांनी लिहिलेली प्रस्तावना...
.............................................................................................................................................
ज्युनियर ब्रह्मे यांचं 'ब्रह्मेघोटाळा' हे पुस्तक वाचताना मला 'कट्टा' आठवला.
१९८०च्या दरम्यान आम्ही ‘कट्टा’ नावाचं बाष्कळपणाला वाहिलेलं एक अनियतकालिक काढायचो. ‘कधी ना कधी तरी हमखास प्रकाशित होणारे पडीक लोकांचे मुखपत्र - कट्टा' अशी त्याची घोषणा होती. कट्टाचा संस्थापक, संपादक, प्रकाशक, त्रासदायक पी. यशवंत (हे विवेक परांजपे याचं जन्मनाव) उर्फ विवक्यानोव्ह कोरोकोटोस्की (Gupthair K.G.B.) होता. 'कट्ट्या'साठी लेखन करणाऱ्यांत विवेकच्याबरोबर गोडबोल्यांचा श्रीरंग, मांजरेकरांचा मेघन अशी काही प्रमुख मंडळी होती. यांचा विनोद कमालीचा चक्रम, विक्षिप्त, क्रेझी, मॅड, बाष्कळ होता. उदाहरणार्थ – एका 'किंकाळीय'मध्ये (म्हणजे ‘संपादकीया’त) संपादक म्हणतो, ‘आजकाल कॅम्प भागात इराणी विद्यार्थ्यांचं प्रस्थ इतकं वाढलं आहे की, काही दिवसांनी तिकडे खणलं तर तेलाचे खूप साठे आढळून येतील.’ आणखी एक ‘कट्टा’ विनोद उद्धृत करतो -
हिंदुत्ववादी विनोद
"अलीकडे फार उकडते बुवा!”
"तुम्ही हिंदुत्ववादी दिसता.”
"ते कसे?”
“मग तुम्हाला अलीकडेच का उकडते? गणेशकडे का उकडत नाही?”
कट्ट्यातील विनोद, आरोग्य‘ह’ल्ला कविता, नाट्यछटा अशा साऱ्याच गोष्टी कमालीच्या हास्यस्फोटक होत्या. ‘कट्ट्या’च्या दर अंकात ‘नग्न सर्पाचा डोळा’ ही कादंबरी ‘क्रमश’ प्रसिद्ध व्हायची. ती येणेप्रमाणे -
‘झुंबरलाल कुलकर्णी हा हाँगकाँगचा हिऱ्याचा व्यापारी विठ्ठलवाडी विमानतळावर उतरला तेव्हा घड्याळात तीन पस्तीसचे टोल पडले. दूर अंतरावरच्या एका व्यावसायिक इमारतीतून एक चवीष्ट पदार्थ हातात घेतलेली तरुणी बाहेर पडली. तिने काळी साडी आणि चट्ट्यापट्ट्यांची बेलबॉटम घातली असल्यानं आणि तिच्या निळ्या डोळ्यांवर तिनं समुद्री रंगाचा गॉगल घातला असल्यानं तिच्या नैसर्गिक सौंदर्यात भर प़डली होती. जरी तिचे वय साठ असले तरी ती झपझप पायऱ्या उतरून आली व तिने आपल्या पर्समधून एक टाचणीच्या आकाराची उखळी तोफ काढली. त्यात मुगाएवढा गोळा घालून ती म्हणाली, ‘मला हे करताना दुःख होतय झुंबरलाल.’ पुढल्या क्षणी झुंबरलाल खाली कोसळला आणि त्याच्या खिशातले हिरे एका क्षणात नाहीसे झाले... त्याच वेळी साहित्य परिषदेसमोरून येणाऱ्या चार क्रमांकाच्या बसमधून स्टेनगन धडाडली आणि मरियम ‘थड्’ असा आवाज करून खाली कोसळण्याऐवजी चहावाला भैया ‘लड्’ असा आवाज करून खाली कोसळला...नंतर साहित्य परिषदेसमोर लै शाळा झाली राव! कशी ते मी हॉलंडहून आल्यावर सांगीन.’
‘कट्ट्या'तली अशी खूपच उदाहरणं देता येतील. पण आजचा तो विषय नाही, याची प्रस्तुत लेखकाला नम्र जाणीव आहे. (जिज्ञासूंनी मूळ ‘कट्टा’ आता उपलब्ध नसल्यानं ‘कट्टा : एक बाष्कळ अनियतकालिक’ हा माझ्या ‘नाही मनोहर तरी...’ या पुस्तकातील परिचयात्मक लेख वाचावा.) आजूबाजूच्या मराठी विनोदी लेखनात ‘कट्टा’तलं विनोदी लेखन हे त्याच्या वेगळेपणानं नक्कीच उठून दिसत होतं, हे खरंच आहे. त्यामुळे ‘कट्टा’ पद्धतीचा विनोद हा मराठीत आम्ही प्रथमच आणतो आहोत, असं आम्हाला (नम्रपणेच) वाटत होतं. पण चिं.वि. जोशी वाचल्यावर लक्षात आलं की, त्यांचंही डोकं या पद्धतीनं बऱ्यापैकी तिरकं तिरकं धावायचं. त्यांचं लेखन वाचताना अशा ‘बाष्कळ’ विनोदाच्या जागा ठायी ठायी भेटतात.
‘चिमणरावाचे चऱ्हाट'मध्ये चिमीचं लग्न जमवण्याच्या ज्या कथा आहेत, त्यांतील एक म्हणजे 'यू. किडवे., आय.सी.एस.’ ही कथा. त्यात अगदी सहजपणे चिमणराव म्हणतो, ‘वैशाख लागला की पुण्यात ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त लग्नाचाच विषय असतो. पुण्याच्या चौकात उभं राहिलं आणि जाणाऱ्या येणाऱ्यांच्या तोंडचे शब्द ऐकण्याचा प्रयत्न केला तर असे उद्गार कानी पडतात, “काय हो, गेल्या वर्षी पुष्कळ लग्न लागली, पण त्यात गंमत अशी झाली, की मुलांपेक्षा मुलीकडली लग्नं जवळजवळ दुप्पट झाली. यंदाचं प्रमाण काय बसतं ते पाहू.”
‘अखेर लग्न जमले’ या कथेत ते आपल्या आजी-आजोबांच्या लग्नाचा एक मजेशीर किस्सा सांगतात, ‘...माझ्या आजोबांच्या लग्नाच्या वेळी त्यांचे वय फक्त नऊ वर्षांचे आणि माझ्या आजीचे सात वर्षांचे होते. त्या वेळी माझा जन्म झालेला नव्हता, परंतु ही आख्यायिका मी बाबांकडून ऐकलेली सांगत आहे. खुद्द बाबादेखील तेव्हा झाले नव्हते हे चतुर वाचकांच्या ध्यानात आलेच असेल. आमचे घराणे त्यावेळी आंजर्ल्यास राहात होते; आजीचे घर मुर्डीस होते. मुर्डीस लग्न व्हावयाचे होते. लग्नाची पार्टी दुपारी आंजर्ल्याहून निघाली त्या वेळी आजोबा विटीदांडू खेळत होते. त्यांची आठवण कोणाला झाली नाही. पाळण्यात खेळत असलेल्यापासून अर्धी लाकडं मसणात गेलेल्यांपर्यंत सगळ्या करवल्या आणि विहिणींचा मस्टर तीन वेळा झाला; पण नवऱ्या मुलाची आठवण कोणासही झाली नाही. वरपक्ष मुर्डीस पोचला, तेथे देवळात सीमान्तपूजन योजले होते. वरपक्षाच्या शेंबड्यालेंबड्या पोरींचेही पाय धुवून घ्यावयाचे असा आमच्या पणजीचा पण होता. सगळी तयारी झाली. मग नवऱ्या मुलाची आठवण झाली. तो बरोबर नाही अशी जेव्हा सर्वांची खात्री झाली, तेव्हा धावपळ सुरू झाली. पुनः काही जण परत आंजर्ल्यास मुलाला आणायला गेले.
आमची पणजी व इतर वरपक्षीय मानकरणी म्हणू लागल्या, ‘बंड्या नसला मेला म्हणून काय झालं? आमचे तर मानपान कराल दिवस मावळायच्या आत? तो येईल मेला सावकाश!’ परंतु वधूपक्षीयांना हे पटेना. ‘नवरामुलगा आल्याशिवाय आम्ही काही खास तुम्हाला विचारत नाही,’ असं त्या म्हणू लागल्या. ‘नाही तर आम्ही दुसरी मुलगी करू. जगात काय आमच्या बंड्याला पन्नास मुली पाय पडत सांगून येतील, समजलात?’ पणजीबाई म्हणाल्या. ‘आणखी आमच्या पण भिकीला बंड्याशिवाय कुठं नवरा मिळणार नाही असं का वाटतं तुम्हास? आपलं जवळचं पंचक्रोशीतलं गाव आहे म्हणून तुमच्यासाऱख्या कातळफुंक्या भिक्षुकाच्या घराण्यात मुलगी द्यायला तयार झालो. समजलात? नाही तर वाईचे अभ्यंकर मुलगी करून द्यायला तयार आहेत दोन्हीकडचा खर्च देऊन.’
‘मुलगाय, असा तसा वर आलेला नाही. चोथीचा अभ्यास करतो आहे. शिवाय चांगलं गृहस्थाचं घराणं आहे' असे जेव्हा का आमच्या आजीची आई म्हणाली आहे; तेव्हा आमच्या पणजीचा नुसता भडका झाला.
“आमची द्वारकी का नाही करून घेत बंड्याला याच मुहूर्तावर यांच्या नाकावर टिच्चून?” मुर्डीची एक नडलेली बाई म्हणाली.
काही वेळानं आजोबा आले, परंतु आधीच रागावलेल्या आजीच्या मंडळींनी सीमांतपूजनात शेंबड्यालेंबड्या पोरींचे पाय धुण्याचे नाकारले. आमच्या आजीचे लग्न आजोबांशी झाले नाही. ‘द्वारकी‘चे लग्न आजोबांशी लागले.
(आजीचे लग्न काही दिवसांनी वाईच्या अभ्यंकरांच्या मुलाशी लागले.)’
हा सारा खटाटोप अशासाठी की ज्युनियर ब्र्ह्म्यांच्या ‘बाष्कळ’ विनोदाचं घराणं कुठलं, याचा अभ्यासपूर्ण आणि सोदाहरण शोध घेतला तर आपण मागे पार चिं.वी.जोशी यांच्यापर्यंत जातो. (फक्त चिं. वि. जोशींनी विनोदाचे इतर प्रकारही तेवढ्याच ताकदीनं हाताळले आहेत, हे आपल्याला विसरता येत नाही.) त्याचप्रमाणे ज्युनियर ब्रह्म्यांच्या विनोदाचं ‘कट्ट्या’शी नातं सांगता येईल, यात शंका नाही. फरक एवढाच आहे, की ‘कट्टा’तला मजकूर एकाहून अधिक लेखकांनी लिहिलेला आहे आणि तो तसाही गमतीगमतीत लिहिलेला आहे. त्यामुळे तो छोट्या तुकड्या तुकड्यांत आहे. ज्युनियर ब्रह्म्यांनी मात्र आपल्या ‘ब्रह्मेघोटाळा’ या पुस्तकात या प्रकारच्या बाष्कळ, मॅड विनोदाचा ‘बडा ख्याल’ आळवलेला आहे. हे त्याचं कर्तृत्व ‘अजब’ म्हणता येईल, असंच आहे.
या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे यात भरपूर फालतूपणा केलेला असतो. शब्दांचे खेळ केलेले असतात. गद्य-पद्य विडंबनं असतात. उगाचच कोट्या केलेल्या असतात. काही वेळा तर त्या ‘करायच्या म्हणून’ ओढूनताणून केलेल्या असतात. परंतु हे सारं करत असताना ‘चतुर’ लेखक आपल्याकडे पाहून डोळा मारून जणू आपल्याला म्हणत असतो, ‘बघा मी कसा फालतूपणा केलेला आहे.’ तो हा सारा फालतूपणा ‘बावळटपणाचा आव’ आणून करतो, तो खरा बावळटपणा नसतो. हे लक्षात येण्यासाठी वाचकही तसाच ‘चतुर’ हवा. तसा तो नसेल तर तर त्याची चिडचिड होईल. तो स्वतःशीच दात ओठ खात स्वतःच्या डोक्यावरचे केस उपटून घेईल. ‘हा काय अचरटपणा आहे’ असं जोरात ओरडून विचारील. अशा विनोदी लेखनाच्या वाट्याला हा वाचक आला तर त्याच्या लेखकानं काशीत जाऊन प्रायश्चित्त घ्यावं. या विनोदाबाबत हे असले वाचक किंवा या विनोदाच्या तुडुंब प्रेमात पडणारे ‘असली’ वाचक अशा दोनच शक्यता संभवतात. तेव्हा एक सावधगिरीची सूचना अर्थात वैधनिक इशाराः तुम्ही दुसऱ्या प्रकारातले म्हणजे ‘असली’ वाचक असाल तर आणि तरच या ‘ब्रह्मेघोटाळा’ पुस्तकाच्या वाट्याला जा. पहिल्या प्रकारचे वाचक असाल तर त्यांना टोकाचे आत्मक्लेश सोसावे लागतील. त्या क्लेशांतून अनुषंगिक मेंदूविषयक आजार उद्भवले तर त्यांना लेखक-प्रकाशक-मुद्रक जबाबदार असणार नाहीत.
कोणतंही विनोदी लेखन वाचताना फार सहजपणे वाचलं जातं, पण प्रत्यक्षात मात्र विनोदी लिहिणं ही फार अवघड गोष्ट आहे. ‘विनोदी लेखन करताना मी अनेकदा डोळळ्यांतून टिपं गाळलेली आहेत’ असं बहुधा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर किंवा राम गणेश गडकरी यांनी म्हटलेलं आहे. ते खोटं नाही. ज्युनियर ब्रह्मे यांचंही तसंच म्हणणं आहे - ‘...ब्रह्मे कुटुंबातला बावळटपणा कदाचित वाचकांना लुभावून जात असेल, पण दर वेळी हे लिहिताना त्या भूमिकेत शिरून लिहिणं म्हणजे धाप लागायची. हे ऑन-ऑफ मोडमध्ये जाणं तसं त्रासाचं होतं...’ वेगळ्या प्रकारच्या विनोदाचं हे शिवधनुष्य पेलण्याचं हे ‘धाप लागणारं’ आव्हान ज्यूनियर ब्रह्म्यांनी लीलया पेललेलं आहे.
ब्रह्मे कुटुंबातील एकाहून एक बावळट पात्रं - म्हणजे सम्राट, खडकू, व्लादिमिर, एलिझाबेथ (एलिआत्या) (मसाई तरुण) जंबो, (बंगाली) चारू अशा चमत्कारिक नावाच्या ब्रह्मे कुटुंबातील एकेका पात्राच्या तेवढ्याच चमत्कारिक गोष्टी वाचताना आपण अगदी रमून जातो. या पात्रांना हाताशी धरून ज्युनियर ब्रह्यम्यांनी अक्षरशः पुस्तकभर दंगा केलेला आहे. पुस्तक वाचत असताना आपण या कुटुंबविश्वाचेच एक भाग बनून जातो. ज्युनियर ब्रह्म्यांना भाषा प्रसन्न आहे. त्यामुळे ‘कट्टा’ ष्टाइलच्या कोट्या जाता जाता जाता करून जातात.
यातला केनयाच्या मसाई लोकांचा भाग वाचताना तर मला बेदम हसू फुटत होतं. ‘हे मसाई लोक इतके भोळे, सहनशील मनाचे आहेत, की काही वर्षांपूर्वी साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’चं स्वाहिली भाषेत भाषांतर झालं तेव्हा “आई गं! असली कसली निर्दय आई!” अशा प्रतिक्रिया मसाई लोकांच्यात उमटल्या होत्या. त्यांच्या या मऊपणामुळे केनयन सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी वाटू लागली. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात असली तर घातकच! या मसाईंच्या मऊपणामुळे केनयन सरकारला लोकांची मृदू वृत्ती घालवण्याची गरज वाटू लागली.
ज्युनियर ब्रह्मे लिहितात, ‘मग शेवटी सरकारी पातळीवरून यासाठी जनजागृती केली गेली. आपल्याकडच्या ‘गरिबी हटाव’सारखा ‘प्रेमळपणा हटाव’ असा सरकारी नारा दिला गेला. खेड्या-खेड्यामध्ये उर्मटपणाचे फायदे सांगून ही मवाळपणाची कीड घालवण्याचे काम दिले गेले. शाळेतल्या गुरुजींना पोरांच्या मनावर सदाचाराऐवजी दुर्गुणांचे फायदे बिंबवायची ऑर्डर गेली. दुकानदार गिऱ्हाइकाशी हसून बोलला तर त्याला लाफ्टर सरचार्ज लागू झाला. ‘कपाळावर आठी असणारी माणसं सुंदर दिसतात’ अशी टॅगलाइन ‘डार्कर अॅन्ड लव्हली’ क्रीमच्या जाहिरातीत वापरली गेली. ‘तुमचा अपमान हेच आमचे समाधान’ असं छापलेले बिल्ले गावोगावांत फुकट वाटले गेले. एकूणच, सरकारकडून समाजाच्या सर्व स्तरांतून ही मवाळपणाची कीड हटवायचे आक्रमक प्रयत्न झाले.
या कामी केनयन सरकारला ‘युयुयु’ उर्फ ‘युंगबुक युनिव्हर्सिटी ऑफ उर्मटपणा’ या विद्यापीठाची फार मदत झाली. या युयुयुतील ‘युंगबुक’ हे मसाई लोककथेतील एक नाव आहे. (पाहा : परिशिष्ट य - युंगबुकची कथा) ‘युनिव्हर्सिटी’ हा शब्द इंग्रजी भाषेतून आणि ‘उर्मटपणा’ हा शब्द मात्र दूर पूर्वेकडच्या भारत नावाच्या देशातल्या महाराष्ट्रात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेतून घेतलेला आहे. पूर्वी युरपमध्ये कायदा किंवा तत्त्वज्ञान शिकण्यासाठी ग्रीक किंवा लॅटिन भाषेतून शिक्षण घ्यावं लागायचं तसं उर्मटपणा शिकवण्यासाठी युयुयुमध्ये हे शिक्षण मराठीतून दिलं जायचं. मासा जसा आपोआप पाण्यात पोहायला शिकतो, तसा मराठी बोलणारा माणूस उत्स्फूर्तपणे उद्धट बोलतो अशी मसाई लोकांची समजूत आहे.
ज्युडो-कराटेत पॅंट घसरू नये म्हणून जसं ब्लॅकबेल्ट देतात त्याच धर्तीवर युयुयुमध्ये उर्मटपणाची लेव्हल घसरू नये म्हणून स्कॉलरशिप देतात. युयुयुची स्कॉलरशिप म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीच्या खर्चानं महाराष्ट्रातल्या पुणे नावाच्या शहरात राहून आपल्या उद्धटपणाचे गुण पाजळवता येतात....’
जंबो लुमुंबा हा याच युयुयुचा स्कॉलर विद्यार्थी स्कॉलरशिप पटकावून पुण्यात येतो आणि ज्युनियर ब्रह्मे याच्या एलीआत्याच्या प्रेमात पडतो. तो सगळा (आणि पुस्तकातील इतरही बराच) धमाल भाग ‘ब्रह्मेघोटाळा’ या पुस्तकातच वाचा. मी या पुस्तकातील आणखी उदाहरणं मुळीच देणार नाही. त्यानं पुस्तक न वाचणाऱ्या आळशी ‘वाचकां’ची ‘वाचलं’ अशी सांगायची सोय होत असली तरी अशी भारंभार उदाहरणं देणं पुस्तक-वाचनाबाबत ‘स्पॉइलर’ ठरू शकतं. आणि ते पातक माझ्या शिरावर घेण्याची माझी इच्छा नाही. हा साहित्यप्रकार कोणता, ही व्यक्तिचित्रणं आहेत की चित्रण केलेल्या व्यक्तींच्या विनोदी कथा आहेत की आणखी काही आहे... ती चर्चा आपण इथे करू या नको. हे जे काही आहे ते अफलातून आहे, डोक्याला ताप न देता बेदम हसवणारं आहे.
मी या पुस्तकाचा आनंद लुटला. तुम्हीही तो मनापासून लुटा.
.............................................................................................................................................
‘ब्रह्मेघोटाळा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पुढील लिंक क्लिक करा -
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment