अजूनकाही
कालची सकाळ गुरुदास कामत तर, आजची सकाळ कुलदीप नय्यर यांच्या निधनाची बातमी घेऊनच उगवली.
कुलदीप नय्यर खासदार, राजदूत, लेखक होतेच, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे आमच्या पिढीचे आयडॉल पत्रकार, स्तंभलेखक, लढवय्या संपादक होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर ही जवळीक जास्त विषन्न करणारी आहे.
घटना १९८२ म्हणजे ३६ वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. आमचे कार्यकारी संचालक नरेश गद्रे हे एक उमदा माणूस आणि जबरी वाचक होते.
आमच्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक व्हाव्यात यासाठी नरेश गद्रे यांनी जी नियोजनबद्ध मोहीम राबवली, त्यात कुलदीप नय्यर यांची दोन व्याख्यानं झाली.
बातमी ‘बिटविन द लाईन्स’ कशी ओळखावी आणि वाचावी, हा ‘बिटविन द लाईन्स’सेन्स पत्रकारांना कसा असावा आणि तो विकसित कसा करावा, याबद्दल कुलदीप नय्यर खूप वेळ सोदाहरण अशा तळमळीनं बोलले. त्यांचं बोलणं थेट काळजालाच भिडलं.
तेव्हा त्यांचा ‘बिटविन द लाईन्स’ नावाचा स्तंभही लोकप्रिय होता. साधं-सोपं आणि रसाळ इंग्रजी हे त्यांचं वैशिष्ट्य भुरळ पाडणारं होतं.
छायाचित्राखालच्या ओळींत ‘अमुक तमुक छायाचित्रात दिसत आहेत’ असं लिहिण्याची गरज काय, कारण ते दिसत असतातच. म्हणून वाचकांना कळावं यासाठी त्यांची केवळ नावं ओळीत द्यावीत, असं त्यांनी सांगितलेलं मी कधीही विसरलो नाही. अजूनही माझ्याकडून ते पाळलं जातं आणि तोच संस्कार टीममधल्या सर्वांवर मी केला.
नंतरही अनेकदा त्यांच्या भाषणांचं वृत्तसंकलन करण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळाली. कोणताही ज्ञानताठा न बाळगता ते भेटत आणि बोलत.
त्याचं व्यक्तिमत्त्व, बोलणं आणि वागणं आश्वासक होतं.
क्रिकेट, पाकिस्तान, भारतीय राजकारण हे त्यांच्या आवडीचे आणि भारतीय लोकशाही हा चिंतेचा विषय असायचा. आणीबाणीचे ते कट्टर विरोधक होते.
एकूण माणूस बहुपेडी विद्वान होता आणि पत्रकार, लेखक म्हणून या समाजाला जितकं काही देता येईल तेवढं देऊन गेला. त्याबद्दल नय्यर याचं माझ्या पिढीला कायम स्मरण राहील.
कुलदीप नय्यर नावाचं पान पिकलं होतं, आज ते गळून पडलं...
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment