अजूनकाही
या समाजात क्षणोक्षणी सहिष्णुतेची कसोटी लागते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या निमित्तानंही ती लागली.
एखाद्या बड्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव होणं यात अनपेक्षित असं काही नाही. ‘मरणांति वैराणी’ असं म्हणतात. किंबहुना ही भारतीय परंपरा आहे. किमान मृत्यूच्या दिवशी तरी या व्यक्तीवर चिखलफेक करू नये हा संकेत सर्वसाधारणपणे पाळला जातो. अगदी सामान्य माणसाच्या बाबतीतही. याचा अर्थ या व्यक्तीचं किंवा तिच्या कामाचं विश्लेषण करू नये असा अजिबात नाही. पण मृत्यूनंतर लगेच असा शाब्दिक हल्ला करू नये असा संकेत आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव हे माजी पंतप्रधान किंवा लोहिया, ज्योती बसू, मधू लिमये वगैरे विरोधी पक्षाचे नेते या सर्वांच्या बाबतीत हा अलिखित नियम पाळला गेला होता.
पण अटल बिहारी वाजपेयी याला अपवाद ठरले. त्यांचे चाहते आणि बहुसंख्य माध्यमं त्यांना ‘जननायक’ ठरवत असताना एका छोट्या गटानं त्यांना निधनाच्या दिवशी ‘खलनायक’ ठरवण्याचा प्रयत्न केला. आपणच क्रांतीचे एकमेव वाहक आहोत असा समज असणाऱ्या या अतिडाव्या गटात काही पत्रकारही सामील होते. वाजपेयी उदारमतवादी नसून फॅसिस्ट अशा संघ परिवाराचे भाग होते, त्यांनी तयार केलेल्या भूमीमुळेच आज नरेंद्र मोदी सत्तेवर आले, अशी या विद्वानांची सर्वसाधारण भूमिका होती. यातल्या एका पत्रकाराची तर वाजपेयी ‘बाईलवेडे’ होते, असा आरोप करण्यापर्यंत मजल गेली!
मला या क्रांतिकारकांची कीव येते. विरोधी विचारांच्या व्यक्तीचा आदर, सहिष्णुता हा लोकशाहीचा पाया आहे. त्या विचाराचा प्रखर विरोध करताना सभ्यता न सोडणं ही खऱ्या लोकशाहीवाद्याची संस्कृती आहे. इथं मृत्यूच्या दिवशीच या सभ्यतेला सुरुंग लावण्यात आला. ही मंडळी दोन दिवस थांबली असती तर काही बिघडणार होतं अशातला प्रकार नाही. मग इतका उथळपणा कशासाठी? वैचारिक असुरक्षितच्या भावनेतून हे घडत असावं.
असो. मूळ प्रश्न हा आहे की, अटलजी नेमके कोण होते? नायक की खलनायक? संघ स्वयंसेवक की संघातले उदारमतवादी? लोकप्रिय पंतप्रधान की कारसेवकांना चिथावणी देणारे धर्मांध नेते? मानवतावादी की गुजरात दंगलीच्या वेळी मोदींना पाठीशी घालणारे लबाड पुढारी? पाकिस्तान किंवा काश्मीरविषयी त्यांनी घेतलेली भूमिका खरी की, त्यांच्या परिवाराची खरी? त्यांच्यातला वक्ता, कवी, रसिक संघाच्या संस्कृतीत कसा बसतो? असे असंख्य प्रश्न वाजपेयींचा ठाव घेताना समोर येतात आणि ते योग्यच आहेत. माणूस हा गुंतागुंतीचा प्राणी आहे. तो काळ्या-पांढऱ्यात रंगवता येत नाही किंवा मुशीतून काढता येत नाही. त्यासाठी मोकळेपणानं त्याचा आयुष्यातल्या छटा उलगडाव्या लागतात. वाजपेयीही याला अपवाद नाहीत.
वाजपेयी संघ स्वयंसेवक होते, हे त्यांनी कधीही नाकारलेलं नाही. तरीही संघाच्या चौकटीतून बाहेर पडून त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश आलं. पण संघातून बाहेर पडण्याची त्यांची हिंमत नव्हती. संघ परिवार ही त्यांची मानसिक आणि राजकीय गरज होती. ‘जाये तो जाये कहाँ?’ हा त्यांनी जाहीरपणे विचारलेला प्रश्न खराच होता. संघ परिवाराला वाजपेयी यांच्यासारखा लोकप्रिय नेता मिळाला नसता आणि वाजपेयींना आपल्या राजकारणासाठी एवढी मजबूत संघटना! ‘वाजपेयी हा संघाचा मुखवटा होता’ हे गोविंदाचार्य यांचं विधान एका अर्थानं खरंच आहे. पण या मुखवट्यानंसुद्धा मूळ शरीराचा आपल्या सोयीनुसार वापर करून घेतला.
वाजपेयी मूळचे आर्यसमाजी. तिथून ते संघात आले आणि मग जनसंघात. त्यांच्या उदारमतवादीची पहिली मुळं या आर्य समाजात शोधली पाहिजेत. त्यांच्यावर सगळ्यात मोठा प्रभाव होता नेहरूंचा. ते पक्षात होते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दिनदयाळ उपाध्याय यांच्या. संसदेत त्यांनी नेहरूंवर कठोर टीकाही केली, पण व्यक्तिगत प्रभाव वाढतच गेला. नेहरूंनाही या तरुणाच्या वक्तृत्वाचं मोठं कौतुक होतं. म्हणूनच त्यांची भाषणं ऐकायला नेहरू आवर्जून सभागृहात थांबत.
नेहरू वारले तेव्हा वाजपेयींनी केलेलं भाषण अविस्मरणीय म्हणावं लागेल. ते म्हणाले, “महर्षी वाल्मिकीनी रामाचं वर्णन ‘अशक्य गोष्टी साध्य करणारा’ असं केलं आहे. पंडितजींच्या आयुष्यात याचीच झलक दिसते. ते शांततेचे उपासक तर आहेतच, पण क्रांतीचे उदगातेही आहेत. ते अहिंसेचे समर्थक आहेतच, पण स्वातंत्र्य आणि सन्मानाच्या रक्षणासाठी कोणतंही अस्त्र वापरायची त्यांची तयारी असते.’’
वाजपेयींचं हे वर्णन आजच्या मोदी भक्तांना तर सोडाच, पण संघालाही आवडणारं नाही. पुढे १९७७ साली जनता सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले, तेव्हा आपल्याला नेहरूनीती पुढे चालवायची आहे, याचं नेमकं भान त्यांना होता. संघाचा अखंड भारताचा अजेंडा त्यांनी कधीच पुढे रेटला नाही. त्यांनी सांगितलेला नेहरूंच्या तसबिरीचा किस्सा तर आता इतिहासात नोंदला गेला आहे.
वाजपेयींवर सगळ्यात मोठा आक्षेप आहे, तो बाबरी मशिद विध्वंसाच्या वेळी त्यांनी काहीच केलं नाही हा. तो योग्यच आहे. त्यांनी कारसेवकांपुढे केलेलं भाषण आक्षेपार्ह होतं. सुरुवातीला अडवाणींच्या रथयात्रेत सामील व्हायला त्यांनी नकार दिला. त्यांना हा धार्मिक उन्माद मान्य नव्हता, असं त्यांनी सांगितलं आहे. पण रामजन्मभूमी आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात ते परिवाराच्या दबावाला बळी पडले. मात्र, बाबरीच्या विध्वंसानंतर त्यांनी चूक कबूल करून देशाची माफी मागितली. काही जण त्यांच्या हेतूविषयी शंका घेतात. पण मला ती घ्यावीशी वाटत नाही. वाजपेयींचा इतिहास काही अशा लबाडीचा नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीबद्दल आणि मनमोहन सिंग यांनी १९८४ च्या दंग्याबद्दल अशी माफी मागितली आहे. काही संकुचित मंडळी सोडून सगळ्या देशानं ती स्वीकारली आहे. मग वाजपेयींचा अपवाद का करायचा?
वाजपेयींच्या राजकीय कारकिर्दीतला आणखी एक कलंक गुजरात दंगल हा आहे. ते मुख्यमंत्री मोदींवर नाराज होते. त्यांचा राजीनामा घ्यावा असं पंतप्रधान म्हणून त्यांचं मत होतं. पण इथं ते अडवाणींच्या दबावाखाली आले आणि मोदींना फक्त ‘राजधर्मा’चा सल्ला देऊन गप्प बसले. कसोटीच्या वेळी ‘हार नही मानूंगा’ असं म्हणणारा हा कवी कच खाताना दिसला.
तरीही वाजपेयी हे देशातले सगळ्यात लोकप्रिय विरोधी नेते होते, ही गोष्ट नाकारता येणार नाही. त्यांच्या अमोघ वक्तृत्वानं त्यांनी लोकांना जिंकून घेतलं. रसाळ भाषा, नर्म विनोद, उसळी मारून येणारी आक्रमकता ही त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्यं अनोखी होती. त्यांच्या भाषणातल्या पॉजलाही वेगळा अर्थ असायचा. प्रमोद महाजन यांच्यापासून राजनाथ सिंग यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांनी त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. पण वाजपेयींच्या भाषणाची खुमारी वेगळीच.
भारतीय राजकारणातला ‘कन्सेन्सस मॅन’ असं वाजपेयींचं वर्णन जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे त्यांचे सहकारी करत. त्यांच्या सर्वसमावेशक वृत्तीमुळेच ते आपली कारकीर्द पूर्ण करणारे विरोधी पक्षातले पहिले पंतप्रधान ठरले. १९९६ साली त्यांचं पहिलं सरकार १३ दिवसांत आणि १९९८ साली दुसरं सरकार १३ महिन्यांत पडलं. पण त्यापासून धडा घेऊन त्यांनी एनडीएची मोट बांधली आणि टिकवली. त्यांच्या मित्र पक्षांना त्यांची भीती नव्हती, उलट एक प्रेम आणि संवादाचं नातं होतं.
पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी घेतलेले काही निर्णय ऐतिहासिक महत्त्वाचे आहेत. १९९८ चा पोखरणचा अणुस्फोट, कारगीलनंतरही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा निर्णय, काश्मीरबाबत स्वीकारलेलं ‘इन्सानियत’चं धोरण त्यांच्यातल्या मुत्सद्याचा पुरावा होता. त्याबद्दल त्यांना संघ परिवारातून विरोध सहन करावा लागला, पण ते हटले नाहीत. सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पामुळे त्यांच्या सरकारच्या काळात देशातल्या महामार्गांचं स्वरूप बदलून गेलं. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनाही याच काळात प्रभावीपणे राबवली गेली.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या काळात मिडियाची आजच्यासारखी गळचेपी झाली नाही. अपवाद फक्त तहलका प्रकरणाचा. पत्रकारांचा त्यांनी द्वेष केला नाही. स्वत: कवी असल्यामुळे लिहिणाऱ्या माणसांबद्दल त्यांना आस्था होती. मोदींच्या तुलनेत तर त्यांचं हे वैशिष्ट्य विशेष उजळून निघतं.
वाजपेयींच्या निधनानं भारतीय राजकारणाचं तर नुकसान झालंच आहे, पण भाजपला त्यांची उणीव अधिकच जाणवेल.२०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यात मोदींना अपयश आलं तर त्यांना निश्चितपणे अटलजींची आठवण येईल. शेवटी भारतीय राजकारणात ‘मध्यममार्ग’च यशस्वी ठरतो. तोच अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्याचा ‘राजमार्ग’ होता.
............................................................................................................................................
लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.
nikhil.wagle23@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment