अजूनकाही
हा लेख ‘स्वामी अग्निवेश की बार-बार पिटाई’ या विजय कपूर यांच्या मूळ हिंदी लेखाचा स्वैर अनुवाद असून त्यात इतर काही तपशीलांची व माहितीची भर घातली आहे.
.............................................................................................................................................
१७ जुलै रोजी आर्यसमाजी, माजी खासदार आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्यावर झारखंडमधील पाकुड इथं जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागे भारतीय जनता युवा मोर्चा आणि अभाविपचे कार्यकर्ते असल्याचं नंतर उघड झालं.
स्वामी अग्निवेश पाकुडला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्या हॉटेलच्या बाहेर त्यांच्यावर काहीजणांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली. त्यांचे कपडे फाडले.
हल्ल्यानंतर स्वामी अग्निवेश म्हणाले, “मी कार्यक्रमस्थळाहून बाहेर येताच युवा मोर्चा आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण माझ्यावर हल्ला केला. मी हिंदूविरोधी बोलतो, असा त्यांचा आरोप होता.” काही दिवसांपूर्वी स्वामी अग्निवेश सनातन धर्माविषयी वादग्रस्त बोलले होते, त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा आणि अभाविप या संघटनांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला या कार्यकर्त्यांनी विरोधही केला होता. पण तरीही स्वामी अग्निवेश आले. परिणामी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
अग्निवेश आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण होत असतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. पोलीस अधीक्षक शैलेंद्र प्रसाद बर्नवाल यांनी सांगितलं की, अग्निवेश यांच्या कार्यक्रमाबाबत त्यांना आधी माहिती नव्हती. दोषींवर कारवाई केली जाईल असं पाकुडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी सांगितलं. स्वामी अग्निवेश यांना आठ व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली गेली. पण अजून त्यापैकी एकालाही अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेच्या बरोबर एक महिन्यानं म्हणजे कालच्या १७ ऑगस्टला स्वामी अग्निवेश यांच्यावर पुन्हा तसाच जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी फक्त स्थळ बदललं होतं. हे स्थळ होतं, दिल्लीतील भाजपचं मुख्यालय. तिथं ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते.
८० वर्षीय स्वामी अग्निवेश आर्यसमाजी आहेत. ते वैदिक धर्माचे पुरस्कर्ते आहेत. जातिव्यवस्था, गरिबी, शोषण, अन्याय यांच्याविरोधात लढतात. वंचित, उपेक्षित समाजाच्या बाजू घेतात. मग त्यांना पुन्हा पुन्हा मारहाण का केली जाते आहे? एका समाजहितैषी साधूवर जीवघेणा हल्ला का केला जातोय?
स्वामी अग्निवेश म्हणतात – “माझं आयुष्य सामाजिक न्यायासाठी समर्पित आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोळ्यात मी सलतो. जातीयवादी संघ धर्माच्या विरुद्ध आहे. तो खालच्या जातींना आणि आदिवासींना दुय्यम दर्जाच्या नागरिकांच्या रूपातच पाहणं पसंत करतो. न्यायाच्या संकल्पनेत समतेचा समावेश आहे. संघाची विचारधारा कुठलीही असली तरी ती समतावादी मात्र नक्कीच नाही. जर्मनीच्या हिटलरची सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारधारेची उसनवारी करत संघ सुरुवातीपासून हाच प्रयत्न करत आहे की, भारत आपल्या संरजामी व्यवस्थेतच राहावा. ज्यात सवर्ण जातींना अन्यायपूर्ण आणि अयोग्य फायदे मिळत राहावेत. आणि तेही उर्वरित समाजाचं अहित आणि अपमानाच्या बदल्यात. वैदिक परंपरा आणि भारतीय अध्यात्माची मूळ भावना संघासाठी दुर्भाग्यजनक धोका आहे. संघाशी माझा आध्यात्मिक मतभेद आहे.”
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
भारतीय समाजाला अंधविश्वासापासून मुक्त करणं, जातीय शोषण व अत्याचाराला पायबंध घालणं, गरिब व दुर्बलांचं शोषणं थांबवणं, दलित व आदिवासींच्या अधिकारांसाठी संघर्ष करणं आणि समाजाला वेदांचा मार्ग दाखवणं, हे काम स्वामी अग्निवेश करतात. पण त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मार्क्सवादी, माओवादी समर्थक, अल्पसंख्याकधार्जिणे, फ्रॉड स्वामी, परकीयांचे हस्तक अशी विविध विशेषणं लावली जातात. यातून जणू हेच सूचित केलं जातं की, एखादी व्यक्ती आध्यात्मिक दृष्टीकोन सांगत असेल तर तिनं जंगलात जाऊन राहिलं पाहिजे. राजकीय व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडणं हे त्याचं काम नाही. झारखंडच्या भाजप सरकारचे मंत्री सी.पी. सिंग यांनी स्वामी अग्निवेश हे ‘फ्रॉड स्वामी’ असून ते परकीय पैशावर जगत असल्यानं त्यांच्यावरील हल्ला समर्थनीय असल्याचं म्हटलं होतं.
या प्रकारातून हेच स्पष्ट होतं की, राजकीय पाठबळावर एका व्यक्तिविरोधात दिवसाढवळ्या सुनियोजितपणे कटकारस्थान केलं जातं. तिला ठरवून लक्ष्य केलं जातं. स्वामी अग्विवेश म्हणतात, “जोवर भारतात अन्याय, हिंसा, अमानवता, जातीय भेदभाव राहील, तोवर आपण आपल्या मूळ क्षमतांना न्याय देऊ शकणार नाही. पण हा दृष्टिकोन संघासाठी घृणास्पद आहे. संघ भारतात तेच करू पाहत आहे, जे हिटलरनं जर्मनीमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. माझा यावर विश्वास नाही की, संघाच्या अजेंडाचा हिंदू धर्माशी कुठला संबंध आहे. आणि संघही निश्चितपणे यावर विश्वास ठेवणार नाही की, माझ्यावरील हल्ला हा माझ्या चुकांसाठी झाला आहे. ही दु:खद गोष्ट आहे की, मला दोन वेळा मारहाण करण्यात आली. माझ्या जखमा व अपमान जर भारतीयांना आज आपल्यासमोरील धोक्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असतील, तर मी माझ्या जखमांची फिकीर करणार नाही.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
स्वामी अग्निवेश यांनी थेटपणे हिटलर आणि हुकूमशाहीकडे बोट दाखवलं आहे. येल विद्यापीठातले तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक जेसन स्टॅन्ले त्यांच्या ‘How Propaganda Works’ या पुस्तकात म्हणतात – “जेव्हा विरुद्ध मतांच्या लोकांना लक्ष्य केलं जातं आणि नेत्यांचं पदांवर केंद्रीकरण केलं जातं, तेव्हा ती चिंतेची वेळ असते.’’ त्यांचं ‘How Fascism Works’ हेही पुस्तक प्रसिद्ध आहे.
एखाद्या सरकारच्या हुकूमशाहीची लक्षणं काय असतात? स्टॅन्ले म्हणतात – ‘‘लोकशाहीची दोन मुख्य मूल्यं असतात – स्वातंत्र्य आणि समता. या मूल्यांना हुकूमशाही देशप्रेम, धार्मिक व लिंगआधारित सत्ता आणि सरंजामशाही या जोरावर हरताळ फासते.”
लोकशाहीमध्ये सत्य हेच मुख्य असतं. ज्या व्यक्तींचा प्रोपोगंडा आणि असत्याच्या जोरावर बुद्धिभेद केला जातो, त्या स्वतंत्रपणे विचार वा काम करू शकत नाहीत. समतेसाठी सत्याची गरज असते. कारण समतेसाठी सत्तेसमोर सत्य बोलण्याची हिंमत असणं गरजेचं असतं. हुकूमशाहीला आपली पकड घट्ट करण्यासाठी सत्याला मूल्य म्हणून नष्ट करण्याची गरज असते. त्याजागी राजभक्ती आणि भीती आणली जाते. हुकूमशाहीचा आरोप तेव्हाच खरा असतो, जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा अनुभव घेऊ लागतो किंवा त्याचं प्राबल्य वाढताना पाहतो. हुकूमशाहीचा धोका तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा सरकार हे सांगायला लागतं की, बहुसंख्याक समाज शक्तिहीन अल्पसंख्याक समाजापासून पीडित आहे. समाजवाद आणि साम्यवादाच्या वाढत्या प्रभावावरून रान उठवलं जातं. आणि मूळ समाजाला धोका असल्याचं सांगितलं जातं. जेव्हा सरकारची धोरणं बहुसंख्याक समाजाच्या बाजूची असतात, देशाचे नेते आणि सैन्याचं एककेंद्रीकरण केलं जातं, पक्षाचे नेते विरोधी मत असणाऱ्यांचा हिंसक पद्धतीनं विरोध करतात, ती वेळ काळजीची असते.
स्वामी अग्निवेश यांना त्यांच्या मारहाणीतून हुकूमशाहीची हीच लक्षणं दिसतात. त्यांना झालेली मारहाण हा अपघात नसून तो हवा बदलत असल्याचा परिणाम आहे, असं त्यांना वाटतं. एका शायरनं म्हटलं आहे की, ‘एक तिनका हकीर ही सही, लेकिन वो हवाओं का रुख बताता है.’
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment