जात, धर्म आणि मर्दानगीची अभद्र युती तोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
पडघम - सांस्कृतिक
अलका गाडगीळ
  • संजय दत्तनं केलेली हेवर्डस् व्हिस्कीची जाहिरात
  • Thu , 23 August 2018
  • पडघम सांस्कृतिक संजय दत्त Sanjay Dutt हेवर्डस् व्हिस्की Haywards whisky मर्दानगी Manhood Muscularity पुरुषत्व

संजय दत्तचा यू ट्युबवर एक व्हिडिओ आहे- ‘मर्दानगी’. “देअर इज अ न्यू काइंड ऑफ दुश्मन इन अवर लाइव्ज. प्रॉब्लेम ये है की देअर आर टू मेनी ऑफ दीज गाइज वॉकिंग अराउंड विथ... लांब केस, फुलाफुलांचे शर्ट, घरी मुलांना सांभाळणारे, पर्पल गुलाबी- बायकी रंग पसंत करणारे चटोर. ये मॅनली नहीं हैं यार. गर्ली है. भारत के मर्दो, वी आर इन डेंजर. शपथ घेऊया, शॅम्पूच्या जाहिरातीतल्या मुलींप्रमाणे केस वाढवणार नाही, सिल्क पॅन्टस् वापरणार नाही, त्याऐवजी दणकट जीन्स वापरू. लेट्स नॉट ड्रिंक फेमिनार्इन पिंक ड्रिंकस्, लेटस ओन्ली ड्रिंक व्हिस्की. धिस इज द न्यू क्रांती आय वॉन्ट टू ब्रिंग. इट्स कॉल्ड ‘मर्दानगिरी’.”

हेवर्डस् व्हिस्कीची संजय दत्त जाहिरात करतोय. व्हिस्की मर्दानी पेय समजलं जातं. क्रिएटिव्ह टीमनं मर्दानगीला साद घातलीय आणि मर्दानगीच्या साऱ्या रूपकांना आळवलंय... रंग, कपडे, कपड्यांचा पोत, अंगावरची लव... घर आणि घराबाहेरची श्रमविभागणी इतकंच काय, पाळीव कुत्र्यांची जातही या विभागणीतून वगळलेली नाही.

पण विभागणी करणारी ही भिंत ढासळू लागली तर? पण तसं काही होऊ नये म्हणून संजय दत्तनं क्रांतीची सादही घातलीय... त्याला तो म्हणतोय – ‘मर्दानगिरी’.

या विभागणीच्या भिंती जागोजागी दिसतात.

‘मुलींच्या हाती मोबार्इल पडता कामा नये’. नंदुरबारपासून ३५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कोकराळे गावातील आदिवासी तरुण सांगत होते. साल होतं २०१३. मुलींना मोबार्इल का नाही द्यायचा? ‘त्या वार्इट व्हिडिओ बघतील, बाहेरच्या मुलांशी बोलत राहतील’.

आदल्या दिवशी दुपारी पाड्यावरच्या एका तरुणीच्या काडीमोडासाठी पंचायत बसली होती. तरुणीचं मन नवऱ्याकडे रमत नव्हतं. गेले काही दिवस ती आपल्या मित्राकडेच राहत होती. लग्नामध्ये दिलेली रक्कम तिनं परत करावी आणि खुशाल पाट लावावा असं नवऱ्याचं म्हणणं होतं. पंचायतीनं नवरा-बायकोचं म्हणणं ऐकून घेतलं. दिलेली रक्कम बायकोनं परत करावी असा निर्णय दिला आणि काडीमोडावर शिक्कामोर्तब केलं.

एका बाजूला आदिवासी स्त्रीला काडीमोड हवा होता आणि जातीच्या नीतीनुसार तिला तो मिळालाही. दुसऱ्या बाजूला आदिवासी तरुण आपल्या बहिणींना नियंत्रित करू पाहत होते.

गैर आदिवासी समाजातील लिंगभाव संवेदनांचं आणि मर्दानगीच्या संकल्पनांचं सावट आदिवासी समाजावर सतत पडतं आहे याचा प्रत्यय आला. आदिवासी समाजात मर्दानगीच्या संकल्पना नाहीत, असं इथं सुचवायचं नाही. तशा त्या असतीलही, पण त्यांचा मागोवा घेणं, हे अभ्यासाचं उद्दिष्ट्य नव्हतं.

लिंगभावासंबंधीची चर्चा अनेकदा स्त्रियांच्या मुद्यांभोवती फिरत राहते. सार्वजनिक चर्चेचा रोख स्त्रियांवर होणाऱ्या हिंसा, लैंगिक हिंसा आणि अन्यायांवर असतो. तसा तो असायलाही हरकत नाही. पण पितृसत्ता आणि त्यातून निघालेल्या मर्दानगी आणि स्त्रीत्वाच्या संकल्पनांना आपण आव्हान करत नाही, त्यासंबंधीची सार्वजनिक चर्चा होत नाही, तोपर्यंत बलात्काराची निर्भत्सना केवळ ‘लिप सर्व्हिस’ किंवा पोकळ ठरू शकते.

२०१३ साली निर्भया प्रकरणाविरोधातील आंदोलन अनेक दिवस सुरू राहिलं ही गोष्ट प्रशंसनीय. परंतु पितृसत्तेमुळे पुरुषांना विशेषाधिकार मिळतात. या ‘अधिकारांना आव्हान न मिळाल्यामुळे त्यांचं सातत्य सुरू राहतं.

२.

सेंट झेवियर्स कॉलेजच्या कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसोबत मर्दानगीच्या मुद्यांचा मागोवा घेण्यासाठी एक कृतीसंशोधन अभ्यास २०१४ साली हाती घेतला होता. महापालिकेच्या दोन उच्च माध्यमिक शाळा यासाठी निवडल्या होत्या. या अभ्यासातून समाजात खोलवर रुजलेले पूर्वग्रह लहान मुलंही कशी आत्मसात करतात, हे समोर येत गेलं. समाजाच्या या पूर्वग्रहदूषित मानसिकतेनं शोषण करणाऱ्या व्यवस्थेला जन्म दिला आहे.

उच्च माध्यमिक शाळांतील १३\१४ वयोगटातील मुला-मुलींसोबत काम करायचं असल्यामुळे प्रश्नावली आणि गटचर्चा ही पारंपरिक संशोधन साधनं बाजूला ठेवून चित्रं/फोटो दाखवून चर्चा घडवून आणणं, चित्रं निवडायला सांगणं आणि त्यावर चर्चा करणं, प्रश्नमंजुषा, या आणि इतर खेळांच्या माध्यमांतून डाटा गोळा करण्यात आला.

मूलभूत मानवी स्वभाववैशिष्ट्यांचं मुलांनी वर्गीकरण केलं, ते प्रचलित मांडणीशी सुसंगत होतं.

पुरुषत्व- आक्रमक, निर्भय, खंबीर, धीट, संरक्षणकर्ता, उग्र.

स्त्रीत्व - दयाळू, मृदू बोलणारी, बुजरी, भावनात्मक, पोषणकर्ती, सौम्य, आज्ञाधारक.

‘खरा’ पुरुष होण्यासाठी मर्दानी गुणविशेष असलेच पाहिजेत, यासंबंधी मुली आणि मुलग्यांचं एकमत झालं. मर्दानी गुण अंगी बाणवण्यासाठी मुलग्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत असं काही मुलींचंही म्हणणं होतं. ‘मुलांनी बॉडी कमावली पाहिजे’. मुलगे आणि मुलींना सलमान खानची मर्दानी शरीरयष्टी भावते. सलमान मर्दानगीचं प्रतीक असल्याचंही त्यांना वाटत होतं.

अभ्यासात सहभागी झालेले विद्यार्थी चाळ आणि झोपड वस्त्यांमध्ये राहणारे. घरात जागाच नसल्यामुळे मुलगे सार्वजनिक अवकाशांचा आसरा घेतात. त्यांच्यावर संस्कार करण्याचं कार्य हे भोवतालच करतं. मुलं आसपासच्या हिंसक वातावरणात वाढतात. कौटुंबिक आणि परिसरातील हिंसेचे ते प्रत्यक्षदर्शी असतात. जगभरात २७५ दशलक्ष मुलं हिंसामय घरांत राहतात. भारतातील त्यांची संख्या ६९ दशलक्ष आहे. २०१५-१६ मध्ये देशभरात पार पडलेल्या चौथ्या फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार २८.८ टक्के महिलांना कौटुंबिक हिंसेला तोंड द्यावं लागतं. मानसिक छळांचं प्रमाण यापेक्षा खूपच अधिक असल्याचं या अभ्यासात आढळून आलं आहे.

हिंसा सतत समोर घडत असल्याचा मुलांवर काय परिणाम होतो, या विषयीचे काही शोध अभ्यास सांगतात की, सुरुवातीस मुलं आर्इला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि मारही खातात. कौटुंबिक हिंसेचे दुय्यम बळी ठरतात. पण नंतर त्यांना त्याचं काहीच वाटेनासं होतं आणि कौटुंबिक हिंसेचं सातत्य सुरू राहतं.

३.

हरीहर साहू आणि मानस रंजन प्रधान या संशोधकांनी लग्न झालेल्या ९०,३०३ स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. यापैकी २१ टक्के महिलांवर कौटुंबिक अत्याचार होत असल्याचं आढळून आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील ५७ टक्के महिलांना नवऱ्यानं मारण्याचं एक तरी कारण पटलेलं होतं.

हिंसामय वातावरणात राहणाऱ्या ४० टक्के मुलांवरही अत्याचार होतात. कौटुंबिक हिंसा आणि लहान मुलांवरील अत्याचार एकत्र नांदतात. अत्याचारित मुलांच्या मनावर ओरखडे उमटतात आणि त्यामुळे अस्वस्थ झोप, कुटुंबापासून तुटण्याची भीती, अंथरूण ओलं करणं, भाषा शिकण्यात आणि आकलनात अडथळे आणि ज्ञानेद्रियांवरील नियंत्रण नसणं अशी लक्षणं दिसू लागतात.

बाल अत्याचार करणाऱ्यांपैकी ३० टक्के गुन्हेगार स्वत: अत्याचार पीडित असतात. कौटुंबिक हिंसा करणारे बहुसंख्य पुरुषही बाल अत्याचार पीडित असतात. हिंसेचं हे दुष्टचक्र निरंतर सुरू राहतं. सतत हिंसा पाहणाऱ्या व भोगणाऱ्या मुलांना हिंसा हाच तोडगा वाटू लागतो.

सेंट झेवियर्सच्या अभ्यासात सहभागी असलेल्या अनेक मुलांचे वडील शिवीगाळ आणि मारहाण करणारे होते. कौटुंबिक हिंसा फौजदारी गुन्हा असल्याची मुलांना जाणीव असली तरी स्त्रीला ‘वळण’ लावण्यासाठी हिंसा वापरली तर हरकत का घ्यावी असं मत अनेक मुला-मुलींनी व्यक्त केलं. थोडक्यात आर्इला नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा तिला ताकीद देण्यासाठी केलेली हिंसा ‘ठीक’ असते, असं त्यांना वाटत होतं.

पुरुष जर गैर वागू लागला किंवा चुका करू लागला तर त्याला मारावं का? ‘अजिबात नाही’, सर्व मुलांनी ठामपणे सांगितलं. याविषयी मुलांनी चर्चा केली. पुरुषांना बाहेरच्या सर्व संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे घरी आल्यावर त्याचा पारा चढणारच. यानंतर मुला-मुलींनी आर्इ-वडील दिवसभर काय कामं करतात याची यादी तयार केली. आर्इ घरासोबत बाहेरची किती कामं करते, हे समोर आलं. आपण दिलेलं कारण न्यायाला धरून नाही याची त्यांना लवकरच जाणीव झाली.

स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसेला एवढं गृहित धरलं आहे की, त्याचं अनेक प्रकारांनी समर्थन केलं जातं. मुलांनीही या चर्चा ऐकल्या असणार, कौटुंबिक हिंसा जवळून पाहिली असणार. भूमिकांची अदलाबदल आणि नंतर श्रमविभागणीची यादी तयार केल्यानंतर त्यांना वाटू लागलं- ‘खरंच वडिलांना मारणं योग्य नाही, मग आर्इला का मार पडतो?’

झोपडवस्त्यांमध्ये काही ठिकाणी भाषा, धर्म किंवा जातीनिहाय विभागणी झालेली असते. लिंगभावाच्या जटील विचारांना जात, धर्म आणि भाषेचाही छेद जातो. अभ्यासात सामील झालेल्या मुलग्यांनाही मुलींनी मोबार्इल वापरू नये असं वाटत होतं. मोबार्इलमुळे समाजाबाहेरच्या मुलांशी त्यांची मैत्री होर्इल असं ते म्हणत होते. तीन वर्षांपूर्वी नंदूरबारमधील आदिवासी तरुणांनीही तंतोतंत हेच मत व्यक्त केलं होतं.

मुलींचा समाजाबाहेरच्या मुलांशी संपर्क प्रस्थापित होणं ही धोक्याची सूचना असल्याचं काही मुलांना वाटत होतं. त्यातील एक मुलगा बोललाही, ‘ये हमारे जात का सवाल है’. यातील सूप्त धागा काय होता? जात आणि धार्मिक अस्मितांचं ‘रक्षण’ करण्याची जबाबदारी मुलांची असते असं समजलं जातं. या जातीय/धार्मिक आणि मर्दानगीयुक्त भावना भडकावण्याचं काम राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करतात आणि दंगलीही घडवून आणतात. या दंगलींमध्ये भाग घेणाऱ्या तरुणांना धर्म रक्षणाची झिंग चढते.

वीरश्री, संताप आणि झिंग ही काही पुरुषत्वाची जन्मजात लक्षणं नव्हेत. त्यांचा उगम पितृसत्तेमध्ये होतो. पितृसत्ता म्हणजे पुरुषांची/वडिलांची सत्ता. पितृसत्ता पुरुषांच्या स्त्रियांवरील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वर्चस्वाला खतपाणी घालते. मर्दानगी संकल्पनांचा जन्मदाता पितृसत्ता आहे.

समाजरचनेची ही संकल्पना स्त्रिया आणि स्त्रीत्वाच्या रूपांवर आक्रमण करते. भावूक होणं, दु:ख वाटणं, रडावंसं वाटणं या स्त्रीत्वाच्या भावना मानल्यामुळे पुरुष आणि मुलगे आपल्या भावना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या भावनांना आधार शोधण्यासाठी अनेक पुरुष नशेच्या आहारी जातात.

पालक आपल्या मुलींवर खूप लक्ष ठेवतात, पण मुलांकडे मात्र त्यांचं लक्ष नसतं. वाढत्या वयातील मुलगा आणि वडिलांचा संवाद असतोच असं नाही. त्यामुळे मुलगे बाहेरचा अवकाश शोधतात. तिथंही इतर मुलगे तुटलेल्या पतंगासारखेच असतात आतून. मग मर्दानगी, जात आणि धर्म यांचं विखारी मिश्रण त्यांच्यात भिनत जातं. अभ्यासात सामील झालेल्या मुलांकडून या संबंधांतील अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. नाक्यावर असणारी मुलं ट्रेनमध्ये स्टंट करण्याचा प्लॅन करतात. रेल्वे गाडीच्या टपावरून प्रवास करतात, टपावरून उडी मारतात, मध्यरात्री हायवेवर मोटरसायकलच्या रेस लावतात. अशा मर्दानी खेळात वाढत्या वयातील मुलांना सामील करून घेतलं जातं. पंथामध्ये त्यांची एंट्री होते. नंतर दादालोक मुलांना मटन खायला घालतात, दारू पाजतात आणि स्थानिक हाराकिरी, धडा शिकवणं अशी कामं या नवख्यांना दिली जातात.

अभ्यासातून हे निष्कर्ष पुढे आल्यानंतर काही कृती कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं. निवडलेल्या महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांनी यालाही मोकळ्या मनानं परवानगी दिली. रोज घडणाऱ्या घटना मुलांनी कथित केल्या. भूमिकांची अदलाबदल, भूमिका नाट्य आणि इतर कृती कार्यक्रमांतून मुलं आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण करायला लागली. पूर्वग्रहांचं समीक्षण करायला लागली. किशोर वय हे दृष्टिकोन घडवण्यासाठी योग्य वय असल्याचंही निदर्शनास आलं. ‘मुलीसारखा रडू नको’ किंवा ‘फतकल मारून बाहेरच्या खोलीत बसू नकोस, आत हो’ असं समाजानं मुलामुलींना सांगायला सुरुवात झालेल्या वयातच कृती कार्यक्रम हाती घेणं महत्त्वाचं ठरतं.

हा कृती अभ्यास महापालिका शाळांतून आणि चाळ/झोपडवस्त्यांत राहणाऱ्या कुटुंबांतील मुलामुलींसोबत राबवण्यात आला असला तरी मध्यम आणि अभिजन वर्गातील वास्तव यापेक्षा फार वेगळं नसतं. ते फक्त चार भिंतींनाच दिसतं आणि ऐकू येतं.

समारोपाच्या कार्यक्रमात मुलांनी विविध प्रकारांनी आपलं म्हणणं मांडलं. मुलामुलींनी मर्दानगी विषयावरची चित्रं काढली होती. त्यातील एका चित्रात दगडी भिंत आणि तिला एकही खिडकी नसल्याचं एका मुलानं दाखवलं होतं. ‘आमचं कोणी ऐकूनच घेत नाही’, हा मुलगा आपलं चित्र इतर मुलांना समजावून सांगत होता.

मुलांनी भूमिका नाट्याचे दोन भाग केले होते. पहिल्या पाच मिनिटाच्या अंकात नेहमी घडणारी घटना - आर्इ भात वाढताना सांडते, बाबा तिला थप्पड मारतात. दुसऱ्या भागात आर्इ वडिलांचा हात धरते आणि मुलंही तिच्या बाजूनं बोलतात, पण बाबा मात्र मुलांनाही मारतो आणि सर्वांवर डाफरत राहतो. प्रश्न विचारले, पण पुढचा रस्ता सोपा नाही याचीही जाणीव मुलांनी भूमिका नाट्यातून दाखवली होती. नेहमी हिंसा पाहणाऱ्या मुलांना एवढं शहाणपण असणारच. मुद्दा पुढल्या लढार्इचा आहे, हे मुलांनी अधोरेखित केलं हे विशेष.

बदल घडवून आणायचा असेल तर बलात्काऱ्यांना फाशी द्या या कंठशोषापेक्षा, कृतिशील कार्यक्रम हाती घेणे महत्चाचे ठरतं. अनेक शाळांमधून लैंगिक शिक्षण दिलं जातं. परंतु हे सत्र बहुत करून केवळ शरीरशास्त्रासंबंधीचं असतं. लिंग आणि लिंगभावातील फरक येथून सुरू होतो.

मुलींसोबत मुलग्यांसाठीही कार्यक्रम आखण्याची नितांत जरुरी आहे. आपल्या समाजानं मुलग्यांना जवळ जवळ वाऱ्यावर सोडून दिलं आहे. त्यांची उलघाल ऐकून घ्यायला कोणी नाही. मग समाजकंटक, राजकीय पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते अशा मुलांचा ताबा घेतात. धर्म, जात, राजकारण आणि मर्दानगी एकवटतात आणि अतीव हिंसेचा जन्म होतो.

अखेरीस गेल्या चार वर्षांपासून अती चर्चिलेल्या मर्दानगीच्या सार्वजनिक रूपाबद्दल बोलल्याशिवाय यासंबधीची मांडणी पूर्ण होणार नाही.

गोरक्षकांनी केलेल्या नवनवीन हल्ल्यांच्या सचित्र बातम्या रोज इथंतिथं पाहायला मिळतात. लाठ्या काठ्या आणि तलवारी घेऊन रस्त्यावर उतरलेले हे पुरुष ब्राह्मणांनी ‘शूद्र’ ठरवलेल्या जातींपैकीच असतात. ते सहसा गरीब वस्त्यांमध्येच राहतात. बाबरी मशीद पाडण्यासाठी, दंगलींसाठी आणि गोरक्षणासाठी या पुरुषांचा उपयोग केला जातो.

४.

सरंजामी व्यवस्थेमध्ये ‘खालच्या’ समजल्या गेलेल्या जातीतील महिलांवर उच्चवर्णीय जमीनदार अत्याचार करत. एखाद्या समाजाची प्रतिष्ठा स्त्रियांच्या सन्मानाशी जोडला जाण्याचा तो काळ होता. जे पुरुष आपल्या स्त्रियांचं ‘रक्षण’ करू शकत नाहीत, ते पुरेसे मर्दानी नाहीत, अशी मांडणी अजूनही केली जाते. त्यामुळे ‘शूद्र ठरवलेल्या’ जातीतील तरुणांना टोळीच्या माध्यमातून ‘मर्दानगी’ दाखवण्याची संधी आकर्षक वाटू लागते.

जागतिक अर्थव्यवस्थेची पुर्नरचना आणि स्त्रीहक्कांच्या धोरणात्मक पातळीवरील स्वीकारामुळे पितृसत्तेच्या पारंपरिक सरंजामी संकल्पनांना सुरूंग लागत आहेत. पुरुषत्वाच्या सतत बदलत जाणाऱ्या व्याख्येशी अनेकांना जुळवून घेणं कठीण जातं. आपल्या आधीच्या पिढीतील मर्दानगीच्या आदर्शांची आणि कुटुंब व्यवस्थेची पुनर्स्थापना करणं शक्य नसल्यामुळे पुरुषांतील काही गटस्त्री-तिरस्कार आणि लुटमारीच्या संस्कृतीचा पुरस्कार करताना दिसतात.

जातीच्या उतरंडीतील खालच्या स्तरावरील आर्थिक/सामाजिक प्रगती कुंठित झालेली आहे. शेतीमध्ये सतत नुकसान होतं, शिवाय महानगरापलिकडील निमशहरांत नोकरी-धंद्याच्या संधी आक्रसत जातात. आपल्या कोलमडलेल्या शिक्षण आणि विषम आर्थिक व्यवस्थांचा हा परिपाक आहे.

मध्यमवर्गीय तसेच अभिजन वर्गातील पुरुषांची मानसिकता इतर पुरुषांपेक्षा वेगळी नाही. झुंडींनी घडवून आणलेल्या अनेक हत्यांचे ते मास्टरमाइंड असतात. परंतु त्यांचे संघर्ष आणि त्यांनी केलेली हिंसा गुलदस्त्यांत राहते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकातील पूर्वार्धात ब्राह्मण समाजाने स्त्रियांवर केलेली अन्वनित हिंसा मात्र चव्हाट्यावर आली होती. सतीप्रथा, केशवपन, जरठ-कुमारी विवाह, विधवेचं लैंगिक शोषण, गर्भपात, बाळंतपणं या स्थितीसंबंधी आवाज उठवण्याचं कार्य महात्मा फुल्यांनी केलं. आपल्या राहत्या घरात नडलेल्या स्त्रियांना आसरा देण्याचे कार्यही सवित्रीबार्इ आणि महात्मा फुल्यांनी केलं. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी सुपारी दिली गेली होती. हा इतिहास फार जुना नाही.

धर्म आणि गोरक्षणासाठी रस्त्यावरची सारी सूत्रं पायदळातील सैनिकांकडे देण्याचे अनेक फायदे असतात. समाजानं काय खावं, काय परिधान करावं यासंबंधीचं कार्य असंविधानिक असल्यामुळे तसे कायदे करता येत नाहीत. त्यामुळे टोळ्यांनी हे काम केलं तर सरकारला हवंच असतं आणि ‘आमचा संबंध नाही’ असं म्हणत हात वर करण्याची सोयही होते. नाडल्या गेलेल्या वर्गातील पुरुषांना मर्दुमकी गाजवण्याची संधी चालून येते.

आकांक्षा जबरदस्त आहेत मात्र मंद आणि असंतुलित आर्थिक प्रगती, जीवघेणी स्पर्धा यामुळे नोकरी धंद्याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे जात आणि धर्माच्या अस्मिता जागवल्या जातात. या अस्मितेमध्ये आदर, स्वाभिमान आणि भावनिक सुरक्षितता मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो.

५.

स्त्रिया आणि दलित जातींच्या हक्क रक्षणासाठी सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या सकारात्मक कार्यक्रमांमुळे अनेकांना घोर चिंता आणि मत्सर वाटू लागला आहे. सवर्ण हिंदू पुरुष या विशेषाधिकारांमुळे भरडला जातोय, हिंदू बहुसंख्य असूनही आम्ही ‘खतरे में’ आहोत अशी भावना निर्माण होते. ‘अच्छे दिन’ आणि सुबत्ता आणण्याचे वचन हा केवळ आभास आहे, हे वास्तव लक्षात येऊ लागलं आहे. परिणामी स्त्रिया, दलित आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले वाढले आहेत. ही हिंसा पुरुषी वर्चस्वाला मिळणारी आव्हानं आणि ‘अच्छे दिन’ नसल्याच्या संतापापोटीही होतेय. जात आणि धर्माच्या  अस्मितांना राजकीय पक्ष आव्हान करताहेत.

मोघल साम्राज्य म्हणजे मुस्लिम-अहिंदू तसंच परकी राज्यकर्ते. मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतावर सातशे वर्षं राज्य केलं. लगोलग ब्रिटिश साम्राज्य आलं. स्वातंत्र्यानंतर निधर्मी लोकशाहीचा स्वीकार केला गेला. त्यामुळे हिंदू हा स्वत:च्या भूमीतच पोरका झाल्याचा सल लोकसंख्येच्या एका मोठ्या गटाला आणि हिंदुत्ववादी पक्षांना आहे. अनेक शतकांच्या अहिंदू राजवटींमुळे हिंदू पुरुष पुरेसे ‘मर्दानी’ नाहीत असा न्यूनगंड सावरकर आदींनी जागवला. ‘हिंदू साम्राज्या’ची पुनर्स्थापना, अयोध्या-बाबरी मशीद-राम मंदिर हे मुद्दे राष्ट्रीय प्रश्न असल्याची मांडणी गेली अनेक वर्षं होत आहे.

विकास आणि हिंदुत्व यासंबंधी एका दमात बोलणारे नेते सवर्ण हिंदू पुरुषांना संबोधत असतात. इतिहासातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी केलेल्या तथाकथित ‘अन्यायांना’ उजाळा दिला जातोय. दलित, मुस्लिम आणि न जुमानणाऱ्या स्त्रियांमुळे आपली प्रगती खुंटली आहे, असा प्रचार केला जातो.

गोरक्षेच्या मांडणीमुळे वीरश्रीयुक्त हिंदू गतकाळाला उजाळा मिळतो. चेतवलेली राष्ट्रीय भावना, तसंच सत्ताधारी पक्षाच्या समर्थनामुळे हिंदू पुरुषांच्या हाती नियंत्रण असल्याचं चित्र निर्माण होतं. या मांडणीतून सरकार आपलं अंग काढून घेण्याचा प्रयत्न करतं.

गोरक्षकांच्या नावानं नुसती बोंब मारण्यात काय हशील आहे? अशा झुंडी तयार होऊ नयेत म्हणून समाज काय करतो?

खरं तर जात, धर्म आणि मर्दानगीची ही अभद्र युती तोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तुटलेल्या पतंगासारख्या स्थितीतल्या तरुणांसोबत संवाद साधायला हवा.

(‘पुरुषस्पंदनं’च्या २०१७च्या दिवाळी अंकातून’)

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......