प्रा. फकरूद्दीन बेन्नूर  : इन्ना इलैही राजेऊन!
संकीर्ण - श्रद्धांजली
कलीम अजीम
  • प्रा. फकरुद्दीन बेन्नूर (२५ नोव्हेंबर १९३८ - १७ आॅगस्ट २०१८) आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Mon , 20 August 2018
  • संकीर्ण. श्रद्धांजली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर Fakruddin Bennur

उथळ व सवंग भाष्यकारांच्या कंपूत राहण्यापेक्षा उपेक्षित व एकटं राहिलेलं बरं, वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहण्यापेक्षा विस्मृतीत असणं चांगलं, या विचारांना साजेसं प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांचं जगणं होतं. १७ ऑगस्ट २०१८ ला (शुक्रवारी) या जगण्याला अचानक ब्रेक लागला. वयाच्या ८०व्या वर्षी प्रा. बेन्नूर महाराष्ट्राचा भूतकाळ झाले. रात्री नऊ वाजता त्यांनी जगाला अंतिम अलविदा केला. ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक म्हणून महाराष्ट्रात व देशात ख्यातकीर्त असलेले प्रा. बेन्नूर एकाएकी काळाच्या पडद्याआड गेले. युसूफ सरांनी दिलेली ‘बुरी खबर’ कानावर पडताच माझं मन संवेदनाहीन झालं. एकाएकी मनी भावनांचा कल्लोळ दाटून आला, यात मी ‘इन्ना इलैही राजेऊन’ म्हणायचंदेखील विसरलो.

आज, २० ऑगस्ट रोजी सोलापूरला त्यांच्या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होता. कार्यक्रमाची तयारी व जुळवाजुळव करत असताना मन सुन्न करणारी बातमी येऊन धडकली. प्रा. बेन्नूर गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकारानं आजारी होते. दुर्धर झालेल्या आजारासमोर अखेर त्यांनी हात टेकले.

प्रा. बेन्नूर गेल्या सहा दशकांपासून राजकारण, समाजवाद, राष्ट्रवाद, गांधी विचारांवर सातत्यानं लिहीत आले होते. ते गांधीवाद, समाजवाद व साम्यवादाचे वाहक होते, या विचारांची अंधभक्ती करण्याऐवजी त्यांनी वेळेप्रसंगी कठोर चिकित्सादेखील केली. इस्लाम आणि अरब जगत हा त्यांचा आवडता विषय. त्यांना साम्राज्यवादी अरब इतिहास तोंडपाठ होता. धर्मवाद्यांनी लादलेल्या रूढी परंपरा झुगारून दिल्याशिवाय कुठल्याही समाजाचा विकास शक्य नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. धर्मवादी व हिदुत्ववाद्यांनी उभा केलेला मुस्लीम एकजिनसीपणाचा भ्रम त्यांनी आपल्या लेखनातून खोडून काढला होता. कुठल्याही धार्मिक दहशतवादामागे साम्राज्यवाद आणि त्याचं अर्थकारण दडलेलं असतं, त्याला जाणून घेतल्याशिवाय ती समस्या समजून घेणं शक्य नाही असा विचार त्यांनी लेखनातून सातत्यानं मांडला.

१९७०पासून त्यांनी सुधारणावादी लेखनाला सुरुवात केली. लष्करात क्लार्क, न्यायालयात कारकून अशा छोट्या-छोट्या नोकऱ्या केल्यानंतर ते १९६६ मध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून लातूरला रुजू झाले. काहीच अवधीत ते दयानंद महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. वर्षभरानंतर ते सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात गेले. कौटुंबिक जबाबदारीच्या कारणांमुळे त्यांनी जड अंतकरणानं लातूर सोडलं. प्रा. बेन्नूर सुरुवातीपासून विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते, त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यापीठात अध्यापन कार्य करतात.

१९७० पासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. मोईन शाकीर, असगरअली इंजिनिअर, ए.ए. फैजी यांच्यासोबत त्यांनी प्रबोधन चळवळीत काम सुरू केलं. याच काळी ते हमीद दलवाईंच्या संपर्कात आले. दलवाईभेटीबद्दल त्यांनी फ. म. शहाजिंदे संपादित ‘मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा व स्वरूप’ या पुस्तकात लिहिलंय. बेन्नूर म्हणतात, “१९६७ साली दंगलीच्या काळात एका व्याख्यानासाठी दलवाई सोलापूरला आले होते. दंगलीची एकतर्फी माहिती त्यांना देण्यात आली होती. चर्चेत दलवाई मुसलमानांचे ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते सतत मुस्लीम लीगी वृत्तीबद्दल बोलत होते. मी दोन्ही ठिकाणी हस्तक्षेप केला. त्यांनी चर्चेसाठी डॉ. अंत्रोळीकरांच्या घरी मला बोलावले. चर्चेतही ते वस्तुस्थितीला सोडूनच बोलत राहिले. त्यानंतर सर्व मोहल्ल्यांतील काही मुसलमान व्यक्ती मला भेटायला आल्या. त्यांना दलवाईंचे एकांगी मत व प्रतिपादन मान्य नव्हते. दलवाईंना कोणीतरी वस्तुस्थिती समजावून सांगणे गरजेचे होते. तसा प्रयत्न करायचा विचार मी केला. शहरांतील सार्वजनिक सभांतून गोंधळ घातला. अपमानास्पद भाषेत दलवाई मुसलमानांबद्दल बरळत राहिले. त्यांच्या सभांना हिंदूंची गर्दी होऊ लागली. मुसलमानांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला.”

मुस्लीम सत्यशोधक चळवळीबद्दल त्यांना अनेक तक्रारी होत्या. फ. म. शहाजिंदे यांनी ‘मुस्लिम मराठी साहित्य - एक दृष्टिक्षेप’ या बेन्नूर लिखित पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय, “इस्लाम धर्म, ईश्वर, धर्मग्रंथ आणि मुस्लीम प्रश्नांचा प्राधान्यक्रम याविषयी संभ्रमात टाकणाऱ्या दलवाईंच्या भूमिकेमुळे बेन्नूर सत्यशोधक मंडळात रममाण होऊ शकले नाहीत. यातून जे प्रश्न बेन्नूरांच्या पुढे उभे राहिले त्यांच्या सोडवणुकीतून त्यांनी धर्माचा, इतिहासाचा आणि मुस्लिम विचारवंतांचा अभ्यास केला.” इस्लामच्या अभ्यासामुळे ते दलवाई विचारांपासून फार लांब गेले. नंतरच्या काळात  म्हणजे १९७८ पासून त्यांनी सत्यशोधक चळवळीच्या एकांगी आणि नकारात्मक भूमिकेचा लेखनातून जाहीर प्रतिवाद केला. सत्यशोधक चळवळीचे नकारात्मक स्वरूप, इस्लामविरोधी भूमिका आणि मंडळातील प्रमुख कार्यकर्त्यांचे हिंदुत्ववादी मंडळींशी असणारे विशिष्ट प्रकारचे संबंध त्यावर त्यांनी जाहीरपणे टीका केली.

१९७७ साली दलवाई गेले तशी प्रा. बेन्नूर यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळापासून कायमची फारकत घेतली. काही काळ प्रा. बेन्नूर दलवाई समर्थक होते, त्याचं मोठं नुकसान त्यांना सहन करावं लागलं. सोलापुरातील मुस्लीम समाजानं त्यांना बहिष्कृत केलं. बराच काळ समाज त्यांच्याशी अबोला धरून होता. दलवाईंच्या सोबतीबद्दल प्रा. बेन्नूर यांनी सोलापुरकरांशी अनेक वेळा जाहीर माफीही मागितली होती. पण सोलापूरकरांचा राग कमी झाला नाही, माझ्याच समाजानं मला नाकारलं ही सल अखेरपर्यंत तशीच राहिली.

दलवाईंशी फारकत घेतल्यानंतर ते मोईन शाकीर व असगरअली इंजिनिअर यांच्यासोबत एकता चळवळीत सक्रीय झाले. ऐंशीच्या दशकात त्यांनी पँथर चळवळीत काम केलं, दलित चळवळीच्या प्रसारासाठी त्यांनी सोलापूर व परिसरात कार्य केलं. डॉ. कुमार सप्तर्षींच्या युवक क्रांती दलातही ते सक्रिय झाले. वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांनी लावून धरला. मुस्लिम प्रबोधनाच्या चळवळीत त्यांना स्वत:ला झोकून दिलं. दंगलग्रस्त भागांना भेटी देणं, पीडित कुटुंबाला आधार देणं, असगरअलींसोबत राज्यातील अनेक हिंदु-मुस्लीम दंगलींचे सत्यशोधन अहवाल तयार करण्याचं काम त्यांनी केलं.

१९८९ साली त्यांनी अजीज नदाफ, लतिफ नल्लामंदू व मुबारक शेख या सहकारी मित्रांसोबत ‘मुस्लीम मराठी साहित्य परिषदे’ची स्थापना केली. या साहित्य चळवळीतून त्यांनी प्रथमच ‘मराठी मुस्लीम’ची व्याख्या केली. शाहबानो व बाबरी प्रकरणानंतर मुस्लीम समाज अस्थिर व अस्वस्थ झालेला होता, मुंबई दंगलीनंतर महाराष्ट्रात मराठी मुसलमानांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला, अशा काळात मुस्लीम मराठी साहित्य परिषदेनं मराठी मुसलमानांना सावरण्याचं काम केलं.

या साहित्य चळवळीतून अनेक मुस्लीम लेखक लिहिते झाले. फ. म. शहाजिंदे, अजीज नदाफ, जावेद कुरेशी, अब्दुल कादर मुकादम, बाबा मोहम्मद आत्तार, बशीर मुजावर, मुबारक शेख, एहतेशाम देशमुख, नसीम देशमुख इथपासून ते आजच्या काळात लिहीत असलेले माझ्यासह अनेक जण या साहित्य चळवळीचं फलित आहे. आज हयात पठाण, सरफराज अहमद, साहिल शेख सारखी तरुण मंडळी सकस व दर्जेदार लेखन करत आहे. या मंडळींनी वेगवेगळ्या पातळीवर आपल्या लेखनाचा ठसा उमटवला आहे. एका अर्थानं मराठी मुसलमानांना ताठ मानेनं जगण्याचं बळ या चळवळीनं दिलं. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेतून सुफी व संतकवींचा इस्लाम व हिंदू-मुस्लीम समन्वयाचा विचार नव्यानं मांडण्यात आला. ५० पेक्षा जास्त मुस्लीम मराठी संतकवींच्या रचना या साहित्य परिषदेनं प्रकाशात आणल्या. इतर संघटनांप्रमाणे धार्मिक विचार मांडण्याऐवजी मराठी मुसलमानांचा जगण्यातला इस्लाम या साहित्य चळवळीतून मांडला.

मुसलमानातील जातिप्रथेवर प्रहार या साहित्य चळवळीनं केला. याच साहित्य परिषदेतून प्रेरणा घेऊन १९९२ साली ‘मुस्लीम ओबीसी’ चळवळीची स्थापना झाली. १९९५-९६ पर्यंत राज्यभर या चळवळीचं काम पसरत गेलं. उत्तर भारतात पसमांदा चळवळ याच प्रेरणेतून पुढे आली. पसमांदा आंदोलनानं दोन खासदार दिले तर मुस्लीम ओबीसी चळवळीनं महाराष्ट्रातील मागास मुसलमानांची नव्यानं गणना करून त्यांना शासकीय सवलती देऊ केल्या. सच्चर समितीनं मुस्लीम ओबीसी चळवळीचे प्रश्न व समस्या लक्षात घेऊन मुस्लिमांना आरक्षणाची तरतूद केली.

२०१५ साली महाराष्ट्रीयन मुस्लीम आरक्षण अधिकार आंदोलन नावाची चळवळ प्रा. बेन्नूर यांच्याच प्रयत्नानं उभी राहिली. या चळवळीनं राज्यभर मुस्लीम आरक्षण, स्कॉलरशिप, आर्थिक विकास महामंडळे, शिक्षणातील सवतलींची मागणी लावून धरली आहे.

प्रा. बेन्नूर यांनी राजकीय विश्लेषक व विचारवंत म्हणून केलेली कामगिरी अतुलनीय आहे. मुस्लीम मराठी मानसिकतेची चिकित्सा करत राजकारणाची होणारी कोंडी त्यांनी मांडली. मुस्लीम राजकारणाची नव्यानं व्याखा करत नेतृत्व निर्मितीवर त्यांनी भर दिला. यासह बालभारती, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, राज्यशास्त्र परिषद, महाराष्ट्र गॅझेटिअर आदी संस्था\समित्यांवर त्यांनी आपल्या अनुभवांचा ठसा उमटवला.

स्वातंत्र्य आंदोलन, फाळणी, साम्राज्यवाद, जागतिकीकरण, इतिहासशास्त्र, वसाहतवाद, दहशतवादाची सडेतोड चिकित्सा प्रा. बेन्नूर यांनी केली आहे. इतिहासशास्त्रावर त्यांनी केलेलं काम वादातीत आहे. नुकतंच त्यांनी इतिहासशास्त्रावर आधारित सरफराज अहमद यांच्या ‘मध्ययुगीन मुस्लिम विद्वान’ या पुस्तकाला दीर्घ प्रस्तावना लिहिली. यात त्यांनी वसाहतवादी इतिहासाला मुस्लिमांनी अॅकेडेमिक पद्धतीनं उत्तर देण्याची गरज बोलून दाखवली आहे. त्यांनी अनेक मासिकं, साप्ताहिकं, दैनिकं व पाक्षिकात एक हजारपेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. ते मासिकांच्या लिखाणात इतके रमले की, कदाचित यामुळेच त्यांचं स्वत:च्या पुस्तकनिर्मिती प्रक्रियेकडे दुर्लक्ष झालं असावं.

१९९८ साली त्यांनी ‘भारतीय मुसलमानांची मानसिकता व समाजरचना’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी गैरमुस्लिमांना इस्लामच्या दृष्टिकोनातून नव्हे तर एक समाज म्हणून मुस्लिमांना समजून घेण्याची विनंती केली. भारतीय मुस्लीम अरबांसारखा एकजिनसी नसून पूर्णत: वेगळा आहे, त्याचं जगणं, खाणं, वेशभूषा, आचरण पद्धती पूर्णत: अरबांपेक्षा भिन्न आहे. भारतीय मुसलमानांत हिंदूंप्रमाणे जातिव्यवस्था आहे, तसेत ते भारताच्या प्रादेशिक अस्मितांशी घट्ट बांधलेले आहेत, हा महत्त्वाचा विचार प्रा. बेन्नूर यांनी पुस्तकातून मांडला. हे पुस्तक हिंदी आणि उर्दू भाषेतही अनुवाद झालेलं आहे. ‘आधुनिक भारतातील मुस्लीम विचारवंत’, ‘हिंदुत्व, मुस्लिम आणि वास्तव’, ‘गुलमोहर’, ‘हिंद स्वराज्य - एक अन्वयार्थ’, ‘मुस्लीम राजकीय विचारवंत’, ‘सुफी संप्रदाय आणि वाङमय’ इत्यादी सात पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. नुकतीच त्याची तीन पुस्तकं नव्यानं प्रकाशित झाली आहेत, त्यात एका हिंदी पुस्तकाचा समावेशही आहे. याव्यतिरिक्त ‘राष्ट्रवाद, साम्राज्यवाद आणि इस्लाम’, ‘मुस्लीम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप’, ‘मुस्लीम राजकारण’, ‘मुस्लीम समाज : वास्तव आणि अपेक्षा’, ही चार पुस्तकं प्रकाशनार्थ आहेत.

२०१४ नंतर भारतात अल्पसंख्य व मुस्लिम सामाजाच्या अस्मिता व धार्मिक प्रतीकांवर हल्ले होत आहेत. गोरक्षेच्या नावानं दलित, मुस्लीम आणि मागास समुदायातील लोकांची मॉब लिचिंग केली जात आहे, अल्पसंख्य समुदायात असुरक्षितेची भावना बळकट होत आहे, अशा परिस्थितीत प्रा. बेन्नूर यांचं जाणे महाष्ट्राच्या प्रबोधनवादी चळवळीची फार मोठी हानी आहे. भारतीय समाजात हिंदू-मुस्लिम सौहार्दची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारा कर्ता कार्यकर्ता महाराष्ट्रानं गमावला आहे. हिंदू-मुस्लूम समन्वय व सौहार्दचं त्यांचं काम अर्धवट राहणार नाही, याचा प्रयत्न तुम्हा आम्हा सर्वांना करण्याची गरज आहे.

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......