खरंच सापडला का हो दाभोलकरांचा मारेकरी?
सदर - सडेतोड
निखिल वागळे
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर
  • Mon , 20 August 2018
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar सनातन संस्था Sanatan Sanstha

आज डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला ५ वर्षं पूर्ण होत आहेत. काही तास आधीच दाभोलकरांचा मारेकरी सापडल्याचा दावा महाराष्ट्र एटीएस आणि सीबीआयनं केला आहे. सचिन अंधुरे नावाच्या हिंदुत्ववादी तरुणाला त्यांनी औरंगाबादहून अटक केली आहे.

गेल्या आठवड्यात एटीएसनं नालासोपारा इथं धाड टाकून वैभव राऊत या हिंदू जनजागृती आणि सनातनशी संबंधीत व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या घरून बॉम्ब्स, दारूगोळा, पिस्तुलं सापडली. वैभवसोबत आणखी दोघांना अटक झाली हे आपण जाणतोच. या तिघांनी दिलेल्या माहितीतून सचिन अंधुरेला जेरबंद करण्यात आलं, असं पत्रक एटीएसनं काढलं आहे.

सचिन अंधुरेच्या अटकेनं दाभोलकरांचे कुटुंबीय, चाहते आणि देशभरातले संवेदनशील नागरिक यांना आनंद होणं स्वाभाविक आहे. तब्बल ५ वर्षानंतर या गुन्ह्याचा छडा लावण्यात एटीएस आणि सीबीआयला खरोखरच यश आलं असेल तर त्यांचं अभिनंदन करायला हवं. समीर गायकवाड आणि विरेंद्र तावडे यांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अटकेनंतर या प्रकरणात विशेष काही होत नसल्यानं उच्च न्यायालयानं संबंधित तपास यंत्रणांचे कान उपटले होते. त्यामुळे या ताज्या कारवाईनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हायसं वाटलं असेल. अखेर, दाभोलकरांना २० ऑगस्ट २०१३ रोजी भल्या सकाळी गोळ्या घालणारे सापडले म्हणून सरकारलाही आनंद झाला असेल.

पण सचिन अंधुरेच्या अटकेमुळे हा प्रश्न सुटण्यापेक्षा अधिकच गुंतागंतीचा झालेला दिसतो आहे. या आधी या खटल्यात, २०१६ साली, सीबीआयनं सारंग अकोलकर आणि विनय पवार हे हल्लेखोर असल्याचं म्हटलं होतं. तसे साक्षीदारही नोंदवले होते. मग आता सचिन जर हल्लेखोर असेल तर या दोघांची भूमिका काय? हे खरं की ते खरं? काल सचिनच्या वकिलांनी न्यायालयात हाच प्रश्न केला आहे.

सीबीआयला पुरवणी आरोपपत्र दाखल करता येईल हे खरं, पण हा नवा झटका किंवा ट्विस्ट आहे. तो नीट हाताळावा लागेल. फौजदारी खटल्यात पुरावा किती महत्त्वाचा असतो, हे सीबीआय किंवा एटीएसच्या अनुभवी अधिकाऱ्यांना कुणी सांगायची गरज नाही. शिवाय, २०१६ मध्येच सीबीआयनं विरेंद्र तावडे हा या कटाचा सूत्रधार आहे असा दावा केला आहे. या नव्या अटकांचा धागा त्याच्यापर्यंत जाणार आहे. यापुढे सीबीआय-एटीएस अधिकाऱ्यांचं आणि सरकारी वकिलांचं कौशल्य या खटल्यात पणाला लागणार आहे.

दिल्लीत गाजलेल्या आरुषी खून खटल्यासारखा घोळ या प्रकरणात होऊ नये, अशी अपेक्षा आहे. २०१४ साली पुणे पोलिसांनी असा घोळ मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना अटक करून केला होता. त्यांच्याकडे सापडलेल्या रिव्हॉल्वरमधून सुटलेल्या गोळीनं दाभोलकरांचा जीव घेतला असावा, असं संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. पण त्या अटकांमधून काहीच साधलं नाही. पोलीस किंवा सीबीआयच्या अशा गफलतींचा फायदा घ्यायला आरोपींचे वकील टपलेले आहेतच.

मला असं अजिबात सुचित करायचं नाही की, एटीएस आणि सीबीआयनं केलेल्या ताज्या अटका संशयास्पद आहेत. पण सीबीआय आणि पोलिसांचा इतिहास पाहता लोकांच्या मनात शंका आहेत. अजूनही खरा मारेकरी सापडला यावर त्यांचा पूर्ण विश्वास नाही. ‘खरंच सापडला का हो दाभोलकरांचा हल्लेखोर?,’ असं विचारणाऱ्या अनेक जणांचा सामना मी काल केला. या सर्वांचा हेतू चांगला आहे. पण हल्ली वातावरण असं आहे की, एकमेकांवरचा विश्वास तुटत चालला आहे. माणसं असुरक्षिततेच्या भावनेनं ग्रासलेली आहेत. अशा वेळी सरकार किंवा पोलीस यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल, तेव्हाच जनतेची खात्री पटेल. म्हणून म्हणतो, सीबीआय किंवा एटीएसला मोठा पल्ला गाठायचा आहे.

या प्रकरणात गेल्या सहा महिन्यांत कर्नाटक पोलिसांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. गौरी लंकेशच्या खुनाचा छडा लावताना त्यांनी १२ जणांना अटक केली आहे. यापैकी अनेक जण सनातन, राम सेने किंवा हिंदू जनजागृतीच्या परिवारातले आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळेच या कटावर मोठा प्रकाश पडला आहे. नालासोपाऱ्यात एटीएसनं टाकलेल्या धाडीची माहितीही कर्नाटक एसआयटीनं दिली होती. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या सर्वांचे खून हा एकाच कटाचा भाग असल्याची माहिती यातून पुढे येत आहे. योग्य तपास झाल्यास आणि राजकीय हस्तक्षेप न झाल्यास, हा फास कटाच्या मास्टर माईंडपर्यत पोहोचू शकतो. हे धागेदोरे २०१५ पूर्वी हाती आले असते, तर पुढच्या सर्वांचे जीव वाचले असते. पण आता निदान या मारेकऱ्यांच्या यादीवर असलेल्या इतर २६ जणांचे जीव तरी वाचू शकतील. यात कर्नाटकचे विचारवंत भगवान यांचं नाव पहिलं होतं, असं कर्नाटक पोलीस सांगतात.

दुसरीकडे, सनातन आणि हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या समर्थकांनी नेहमीप्रमाणे कांगावा सुरू केला आहे. प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्या अटकेच्या वेळेला असाच प्रकार झाला होता. परवा वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात निघालेल्या मोर्चात, ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो!’ अशा घोषणा देण्यात आल्या.

हिंदू धर्माच्या नावाखाली दिशाभूल करण्यात आलेला हा जमाव आहे. स्वत:च्या घरात बॉम्ब आणि हत्यारं ठेवणारा नेता कसा होऊ शकतो, हा विचार करण्याचं भानही या मंडळीना नाही. असे अतिरेकी केवळ धर्मालाच नाही, तर माणुसकीला कलंक आहेत, हे देशाचे खरे दुश्मन आहेत, हे यांना कुणी तरी समजावायला हवं. वास्तविक हा दहशतवाद पोसणाऱ्या म्होरक्यांनाच जेरबंद करायला हवं. अन्यथा हे सगळ्या देशाची राखरांगोळी करतील.

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......