अजूनकाही
भारतीय क्रिकेटचे परदेशातील कसोटी विजयाचे कर्णधार अजित वाडेकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन दोन दिवस उलटले आहेत, पण ते अजूनही आपल्यात आहेत असंच वाटतं. वाडेकर मुंबईचे असले तरी पुण्याचा पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पूना क्लब आणि व्हिजन क्रिकेट अकादमीच्या सामन्यांना नेहमी हजेरी लावत असत.
माझी आणि त्यांची ओळख ही २००० साली १० वर्षांखालील गटाची मॅच असताना झाली होती. मी त्यावेळी आठ वर्षांचा होतो. पण वाडेकर माझ्या शेजारी आले आणि लहान मुलांना जे प्रश्न विचारतात तसे प्रश्न विचारू लागले, पण अर्ध्याहून जास्त उत्तरं माझ्या बाबांनी दिली. त्या भेटीत फारसा काही त्यांचा स्वभाव कळाला नाही, पण वाडेकर बाबांच्या पिढीतील असल्यानं ते नेहमी सांगत की, ते खूप शांत, सुसंस्कृत, कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश नसणारे आणि दुसऱ्याविषयी स्वःताच्या मनात आदरभाव राखणारे होते. कुठल्याही प्रकारचा गर्व त्यांच्या वागणुकीतून नव्हता, त्यांचे पाय सदैव जमिनीवर होते.
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलेला आहे. तिथं इंग्लिश गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडालेली आहे. मुळात अजूनही इंग्लंडमध्ये भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत १९६४ ते १९७३ या काळात साहेबांच्या भूमीत पहिल्यांदा कसोटी सामन्यात वाडेकरांनी विजय मिळवून दिला. त्यांनीच परदेशी भूमीवर भारताला विजय मिळवून देण्याची सुरुवात केली. म्हणूनच त्यांना ‘विजयाचा वाटाड्या’ असं म्हणतात.
१९६० च्या दशकात वाडेकर एक क्रिकेटपटू म्हणून उदयाला आले. १९६७च्या न्यूझीलंड दौऱ्यात मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृवाखाली भारतीय संघानं परदेशी पहिला विजय मिळवला, त्या वेळी त्या सामन्यात वाडेकरांनी शतक ठोकलं होतं. पुढे ते भारतीय संघाचे कर्णधार झाल्यावर त्यांच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिल्यांदा वेस्ट इंडीजला वेस्ट इंडीजमध्ये आणि नंतर इंग्लंडमध्ये इंग्लंडला हरवलं. हे दोन्ही संघ त्या वेळी बलाढ्य होते आणि मायदेशी खेळत होते. त्यांच्या तुलनेत भारतीय खेळाडू पूर्णपणे नवखे होते. त्या काळात भारतीय क्रिकेटची प्रतिमा ही अतिशय साधी-सरळ गोंडस, लिंबू-टिंबू अशा प्रकारची होती. तिला तडे देण्याची जबाबदारी भारतीय खेळाडूंची होती. काही प्रमाणात लाल अमरनाथ, पतौडी यांच्या संघांनी केली होती. पण इतर संघांपेक्षा इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ खूप ताकदवान होते. त्यामुळे वाडेकरांच्या संघानं इंग्लंडला आणि वेस्ट इंडीज या दोन संघाविरुद्ध सामने जिंकल्यानंतरच भारतीय क्रिकेटला जगात गांभीर्यानं घेतलं जाऊ लागलं.
जेव्हा तत्कालीन निवड समितीप्रमुख विजय मर्चंट यांनी वाडेकरांची भारतीय संघाचे कर्णधार म्हणून निवड केली, तेव्हा ते उत्तम फलंदाज होते. पण सर्वोकृष्ट नव्हते. रणजीमध्ये मुंबई संघाचं नेतृत्व केलं होतं. संघात पतौडी, दिलीप सरदेसाई असतानाही त्यांना मर्चंट यांनी कर्णधारपद दिलं, कारण ते फार महत्त्वाकांशी नव्हते.
वाडेकरांच्या रणजी-दुलीप करंडकाच्या कामगिरीबद्दल वासू परांजपे सर म्हणतात की, “तसा पराक्रम सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकरलाही जमला नाही.” संझगिरी सरांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास “वाडेकर हे तिथे धावांच्या नायगाराचं नाव होतं”. त्यांच्या म्हैसूर संघाविरुद्धच्या ३२३ धावा कोणीही विसरू शकत नाही. त्यांचा मुंबई विद्यापीठाचा पराक्रम मी माझ्या बाबांकडून ऐकला आहे. त्यांच्या त्या पराक्रमाच्या आसपास आजपर्यंत कोणीही पोहचू शकलेलं नाही.
भारतीय संघाचे ते व्यवस्थापक असताना त्या संघानं १९९६ च्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, तसंच शारजा कपमध्येही भारतानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. त्या मालिकेचं वैशिष्ट्यं म्हणजे सचिननं सलग दोन सामन्यांत शतक झळकावलं होतं. १९९० ते १९९९ या दरम्यान त्यांच्या संघ व्यवस्थापनाच्या नेतृत्वाखाली अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यातून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विनोद कांबळी, अनिल कुंबळे, सदगोपन रमेश आणि वेंकटेश प्रसाद हे खेळाडून उदयास आले.
तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची परिस्थिती आजच्यासारखी श्रीमंती नव्हती. त्यामुळे त्या काळात राज्य सरकार खेळाडू, कलाकार आणि पत्रकार यांच्यासाठी घरं, जागा राखीव ठेवत होते. आताही काही प्रमाणात कोटा असतोच, पण त्याकाळी BCCI फारसं मानधन देत नसे. म्हणून वाडेकरांनी यासाठी प्रयत्न केले. सुनील गावस्कर सांगतात की, “दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभागाच्या संघातून अचानकपणे वगळण्यात आल्यानंतर वाडेकरांना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली होती. हा निर्णय आणखी एक दिग्गज पॅाली उम्रीगर यांच्या निवड समितीनं एकत्रितपणे घेतला होता. तरी देखील वाडेकरांनी सर्वांना बरोबर घेऊन राज्य सरकारकडे प्लॉटची मागणी केली आणि त्यात ते आघाडीवर होते. एवढंच नव्हे तर त्यांच्या प्रयत्नांमुळे ती इमारत उभी राहिली आणि त्यात उम्रीगर यांनादेखील स्थान दिलं. या कृतीतून त्यांनी आपल्या सिनीअरबाबत आदर दाखवून दिला. संघात स्थान न दिल्याचं दुःख त्यांनी मनात ठेवलं नाही.”
अजित वाडेकरांचं व्यवस्थापन अतिशय उत्तम होतं. ते कधी-कधी विनोदानं, तर कधी ‘लेकी बोले सुने लागे’ या पद्धतीनं कान उपटत असे. पण खेळाडूंवर तेवढंच प्रेमही करत. म्हणूनच सुनील, अझर, चेतन, आझाद यांना ते मोठा भाऊ वाटत, तर सचिन-विनोद यांना त्यांनी मुलासारखे जपलं होतं. शरद पवार ज्यावेळी मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी वाडेकरांना शिवाजी पार्क जिमखाना, दादर युनियन क्लबसहित मुंबईमधील अनेक क्लब्समधून नवीन चेहरे शोधण्याची जबाबदारी दिली होती.
वाडेकर मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी ऑयकॅान होते. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द सुरू झाल्यावरही ते सरकारी बँकेत नोकरी करत होते. कारण त्यांचा मूल्यांवर विश्वास होता. म्हणूनच अजित वाडेकरांसारख्या खेळाडूची जागा भरू इतर कुणी भरू शकत नाही. त्यांनी भारतीय क्रिकेटला ‘सुगीचे दिवस’ दाखवले!
.............................................................................................................................................
लेखक अनिकेत वाणी यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन ही पदवी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे.
anumyself01@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Mangesh Gaherwar
Mon , 20 August 2018
nice arricle one correction we had won the series in england in 2007