अजूनकाही
कोणे एकेकाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला एकच हमखास सुवर्णपदक मिळायचे, ते म्हणजे हॉकीचे. कारण हॉकी स्पर्धेत अनेकदा भारत नेहमीच अजिंक्य राहायचा. जेव्हा ब्रिटिशांची भारतावर सत्ता होती आणि भारत देश एक गुलाम होता, तेव्हापासून भारताने ऑलिम्पिक स्पर्धांमधून हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवण्यास सुरुवात केली होती. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताने हॉकीच्या अंतिम स्पर्धेत जर्मनीचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले होते. भारताच्या हॉकीमधील या देदीप्यमान यशाच्या इतिहासाची ‘गोल्ड’ या नवीन हिंदी चित्रपटात केवळ उजळणी करण्यात आली असून या चित्रपटाद्वारे भारतीय हॉकीच्या इतिहासातील आतापर्यंत फार कोणाला माहीत नसलेल्या एका महत्त्वपूर्ण घटनेवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. एका संघ व्यवस्थापकाच्या स्वप्नपूर्तीची कहाणी सांगणाऱ्या या घटनेचं पडद्यावरील नाट्य खूपच रोमांचक आणि प्रेरणादायी ठरलं आहे. भारतीय हॉकीच्या इतिहासातील रंगलेला हा ‘सुवर्ण’ क्षण प्रत्येक भारतीयाने अनुभवावा असाच आहे.
प्रामुख्याने भारतीय हॉकीचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या या चित्रपटाच्या कथेला भारतीय पारतंत्र्याची, भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या फाळणीची म्हणजेच अखंड भारताच्या विभाजनाची पार्श्वभूमी आहे. त्यादृष्टीने पाहता हा चित्रपट तसा ऐतिहासिकही आहे. आणि तो अधिक मनोरंजक होण्यासाठी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’चाही मोठ्या प्रमाणावर फायदा घेण्यात आला आहे. त्यामुळे कथेत ‘सत्य’ कमी आणि कल्पनाविष्कार जास्त असल्याची जाणीव होत राहते.
चित्रपटाची सुरुवातच १९३६ साली बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेने होते. या ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेत ब्रिटिशांच्या ताब्यातील भारत अंतिम स्पर्धेत जर्मनीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावतो. (त्यामुळे चिडलेल्या हिटलरचेही स्टेडियमवर अल्पसे दर्शन दाखवले आहे.) अंतिम स्पर्धेत भारतीय संघाचा विजय होतो, खरा मात्र विजयानंतर राष्ट्रगीत वाजवले जाते ते इंग्लंडचे. भारतीय हॉकी संघाचा व्यवस्थापक असलेला तपन दास (अक्षय कुमार) या बंगाली बाबूला आणि खेळाडूंना साहजिकच ते आवडत नाही. त्याच वेळी हा बंगाली बाबू स्वतंत्र भारताबरोबरच पूर्णपणे ‘भारतीय’ असलेल्या हॉकी संघाच्या ऑलिम्पिक विजयाचे स्वप्न पाहतो. कालांतराने दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागतात आणि त्यानंतरच्या काही ऑलिंपिक स्पर्धा रद्द करण्यात येतात. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे दुसरे महायुद्ध होतेही आणि त्यामध्ये हिटलरचा पराभव आणि दोस्तराष्ट्रांचा जरी विजय झाला असला तरी ब्रिटिशांच्या जोखडाखालील भारताला अखेर स्वातंत्र्य मिळते आणि भारताची गुलामगिरी संपते. त्यानंतर १९४८ साली लंडन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्याची जबाबदारी तपन दास स्वतःकडे घेतो.
मात्र स्वातंत्र्य मिळताना भारताचे फाळणीमुळे विभाजन झाल्यामुळे त्याने निवडलेला संघही विभागला जातो. त्याने निवड केलेले काही चांगले हॉकी खेळाडू पाकिस्तानात जातात आणि तपन दासचे स्वप्न भंग पावते. मात्र तरीही आशा न सोडता तो नव्या उमेदीने पुन्हा नव्या संघाची उभारणी करतो. या नव्या संघाची निवड करताना त्याला कोणकोणत्या अडचणी येतात आणि हा नवा भारतीय संघ लंडन ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेत कसे यश संपादन करतो, तसेच तपन दासची कशा प्रकारे स्वप्नपूर्ती होते हे पडद्यावर पाहणेच अधिक रंगतदार ठरणार आहे.
कथेचा काळ लक्षात घेता त्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यात दिगदर्शकाला खूपच चांगले यश मिळाले आहे. शिवाय जुन्या काळातील ऑलिम्पिकमधील हॉकीच्या सामन्यांचे चित्रिकरणही अतिशय उत्तम झाले आहे. फाळणी झाल्यामुळे इम्तियाज या हॉकी खेळाडूला जिवंत जाळण्याचा झालेला प्रयत्न आणि त्यामधून त्याची करण्यात आलेली सुटका आदी प्रसंग फाळणीची दाहकता निर्माण करून जातात. चित्रपटाची कथा हॉकी खेळाशी निगडित असल्यामुळे खेळातील राजकारण, हॉकी फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनाकलनीय वागणूक आदी प्रकारांवर चांगला प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. शिवाय प्रमुख भूमिकेत अक्षय कुमार असल्याने चित्रपट मनोरंजक होण्यासाठी गाणी आणि इतर फिल्मी मसाल्याचा तडकाही देण्यात आला आहे.
अक्षय कुमारने तपन दास या बंगाली बाबूच्या भूमिकेत आपल्या नेहमीच्या स्टाईलने काम केले आहे. मौनी रॉय (तपन दासची पत्नी), कुणाल कपूर (सम्राट), अमित साढ (कुवर रघुवीर प्रतापसिंह), विनीतकुमार सिंग (इम्तियाज), सन्नी कौशल (हिम्मत सिंग) निकिता दत्त (हिम्मत सिंगची प्रेयसी) यांनीही आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. खेळांमधून राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवणारा गोल्ड हा चित्रपट निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment