अजूनकाही
९ ऑगस्टला सकाळी प्रज्ञा पवारचा मॅसेज आला ‘षांताराम पवार सर गेले’. मी लगेच अशोक (राणे)ला फोन करून बातमी दिली आणि गोरेगावला निघायची तयारी केली. दरम्यान अशोकनं रघुवीर (कुल)ला फोन करून तपशील विचारून घेतला. अलीकडच्या काळात कुणाच्या निधनाची बातमी ऐकताच इतक्या प्रतिक्षिप्त क्रियेनं क्वचितच निघालो असेन. नेमकी काय होती ही असोशी?
पवार सरांचा कालखंड पाहता, मी त्यांचा खूपच ज्युनिअर विद्यार्थी. जे.जे.त असताना वर्गशिक्षक आणि नंतर ‘या मंडळी सादर करू या’ या हौशी रंगमंच संस्थेची स्थापना व सुरुवातीच्या सर्व उपक्रमात सक्रिय सहभागादरम्यान सरांशी संपर्क होता. पण समूहातून! पुढे मी पुण्याला स्थलांतरित झाल्यावर ‘या मंडळी…’सह सगळ्यातच खंड पडला. तसाही मी सरांच्या नियमित संपर्कातला नसल्यानं, इकडूनतिकडून काही कानावर पडे तेवढंच.
मी पुण्यात इलस्ट्रेशन व बुक कव्हरचं काम केलं, तेव्हा त्या क्षेत्रात सुभाष अवचट यांच्या अनभिषिक्त सम्राटपदाची सकारात्मक सावली होती. त्यावेळच्या माझ्या पिढीतले जवळपास सर्वच जण ‘अवचट अनुकरणग्रस्त’ होते. अगदी त्यांच्या शीर्षकाची काय, पण सहीचीही अनेकांनी संथा घेतली होती. वेगळं उदाहरण द्यायचं तर ‘अवचट म्हणजे त्या क्षेत्रातले लता मंगेशकरच’ होते! (आजही आहेत! मात्र अलीकडच्या काही वर्षांत चंद्रमोहन कलुकर्णींनी आशा भोसलेंची जागा घेतलीय निर्विवाद. जाणकारांना या तुलनेतील खोच व मर्म कळावं.)
माझ्यावर अवचटांचा प्रभाव होता, पण तो लवकरच पुसला गेला तो षांताराम पवार सरांमुळे. कॉलेजात असताना म.टा. दिवाळी अंक व पुढे निखिल वागळे संपादित ‘दिनांक’ या दिवाळी अंकातील सरांची चित्रं पाहून मला मनोमन वाटलं, आपल्याला हे असं करता आलं पाहिजे. मग अवचटांची कॅलिग्राफी सोडून मी पवार सरांची कॅलिग्राफी अनुकरली ती आजतागायत!
माझ्या कला आयुष्यात (चित्र\नाटक\सिनेमा\जाहिराती इ.) मी कधीच कुणाचं डिट्टो अनुकरण अथवा पायलागू शिष्यत्व पत्करलं नाही. पण सरांची कॅलिग्राफी मी एकलव्य पद्धतीनं डिट्टो स्वीकारली. त्याबद्दल सरांनी कुणाही जवळ काही तक्रार केली, ना खिल्ली उडवली, की मी भेटलो असता कधी दम दिला.
षांताराम पवार हे ‘गुरु-शिष्य’ यापेक्षा ‘सर आणि विद्यार्थी’ या संबोधनातच पहावे लागतील. कारण त्यांचे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात त्यांचे क्लोन न होता, त्या त्या क्षेत्रात वेगळे ठरले. (उदा. पुरुषोत्तम बेर्डे, रघुवीर कुल, नलेश पाटील, रंजन जोशी, अरुण काळे, गोडबोले, गायतोंडे, दिलीप वारंग, हेमंत शिंदे, अशोक वंजारी असे अनेक.)
काही योगायोग कसे असतात बघा. सर व्ही. एस. नायपॉल आणि षांताराम पवार दोघांचा जन्म १७ ऑगस्टचा! पैकी षांताराम ९ ऑगस्ट, तर नायपॉल ११ ऑगस्टला गेले. नायपॉल ब्रिटिश ‘सर’ होते, तर षांताराम ब्रिटिश बांधणीतील, जे.जे.च्या वास्तुतील एका अष्टकोनी केबिनमधले ‘सर’ होते! बाकी नायपॉल आणि षांताराम पवार अशी भेट झालीच असती कधी, तर सरांच्या लाडक्या कावळ्याला एक वेगळं परिमाण निश्चित लाभलं असतं!
पवार सरांनी मला जे.जे.त अधिकृतपणे एकाच वर्षी शिकवलं. ते होतं फाउंडेशननंतरचं उपयोजित कलेचं पहिलं वर्ष. एलिमेंट्रीचं वर्ष. तोवर पवार सर कायम डिप्लोमा म्हणजे शेवटच्या वर्षाच्या वर्गावर शिकवत. एलिमेंट्री क्लासवर त्यांची रवानगी म्हणजे अर्थ व गृहखातं सांभाळणाऱ्या मंत्र्यास कृषी व दुग्ध, मत्स्यपालन खातं देण्यासारखं होतं. त्यानंतर सर पुन्हा मूळ जागी गेले, पण पुढे काही वर्षांत त्यांनी जे.जे.च सोडलं. सरांनी जे.जे. सोडलं म्हणजे एक पर्व संपलं. नेमाडेंची फर्ग्युसन हॉस्टेलची रूम जशी अजरामर झाली (किंवा केली!), तशी सरांची केबिनही व्हायला हरकत नव्हती.
पवार सरांचं प्रथमदर्शन प्राध्यापकांचं नव्हतंच. ते दिसत त्यावेळच्या स्पेशल ब्रँचच्या इन्स्पेक्टरसारखे. पांढरा, लाईट ब्ल्यू किंवा क्रिम कलरचा हाफ बुशशर्ट, पोलिसासारखीच यलो ऑकर पँट किंवा मग काळी पँट, सहा फुटी धिप्पाड देह, क्रु कट टाईप केस, मिशीची स्पेशल स्टाईल. दोन्ही हात शरीरापासून विलग राखत आणि दमदार पावलं टाकत ते निघत, तेव्हा हा माणूस प्राध्यापक आहे आणि चित्रकला शिकवतो, यावर सांगूनही कुणचा विश्वास बसला नव्हता. त्या काळात सर सिनेमाला गेले तर त्यांना बघून ब्लॅकवाले पळून जात. या धक्क्यापेक्षा मला पुढे बसलेला आणखी एक मोठा धक्का होता, तो म्हणजे कधीतरी कळलं की, पवार सर ‘कविता’ करतात! नक्की आठवत नाही, पण नलेश किंवा रघुवीर कुलनं त्यांच्या दोन ओळी ऐकवल्या होत्या. त्या आजही स्मरणात आहेत- ‘निवडुंगावर दवबिंदू पडला आणि आभाळ फाटलं!’ (सुरुवातीचे) नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, मन्या ओक आणि नेमाडे हे कवी म्हणून मला जितके भावलेत, त्यात एक नाव पवार सरांचंही आहे. पण रूढार्थानं त्यांना त्या अर्थानं कसलीच मान्यता मिळाली नाही.ना प्राध्यापक, ना चित्रकार, जाहिरातकार, नेपथ्यकार नि कवी!
पवार सरांनी अनेक प्रयोग केले. त्याची गिनती ‘चक्रमपणा’तच केली गेली. पण सरांनी एकदा मनात घेतलं की, ते पूर्ण करण्यासाठी ते जी मेहनत घेत, ती आजच्या काळातल्या ‘चालसे’ संस्कृतीला जशी कळत नसे, तशीच अत्यंत प्रयोगशील समजणाऱ्या भल्या भल्या मुखंडांनाही सोसत नसे. पण याच तर्कट पवार सरांनी जे.जे.मध्ये आर्टजत्रा नामक एक उपक्रम राबवला. त्यात विद्यार्थ्यांनी कचऱ्यातून कला ते पूर्ण स्वतंत्र अशा विक्रीयोग्य वस्तू बनवल्या व विकल्याही! आमच्या एका मित्रानं नखाएवढ्या क्लेवर बोटानं दाब देऊन गणपती (!) साकारला व एकाच रंगात बुचकळून हजारो रुपये कमवले त्यावेळी. आर्टजत्रा ‘टॉक टु द टाऊन’ ठरली, पण ना त्याची नोंद राहिली, ना पर्यायानं सरांची.
पवार सरांच्या बाबतीत हे कायम झालं. म्हणजे प्राध्यापक म्हणून ते श्रीपुसारखे विद्यापीठ बनले नाहीत, जाहिरात क्षेत्रात ना ते वाल्टर सालधाना, ब्रॅडेन परेरा की अलेक्स पदमजी झाले. नाटकात दोन पिढ्या घडवून ना ते रंगायन, आविष्कारसारखे नाट्यइतिहासात जागा करून राहिले. अरुण कोलटकर, किरण नगरकर, सुभाष अवचटसारख्या त्यांच्या दंतकथांना मोठं वर्तुळ लाभलं नाही की, र.कृ. जोशी किंवा सध्याच्या अच्युत पालवसारखी ‘सुलेखनकार’ म्हणून प्रसिद्धी लाभली नाही. बरं या सगळ्याचा सल मनात ठेवून ‘मुझको मेरे बाद जमाना ढुढेंगा’ अशी करुणाही ते कधी भाकत नसत. या धिप्पाड देहाला विसंगत असे दोन भाग त्यांच्यात होते. अत्यंत मृदु आवाज आणि निष्कपट मन! वयानं मोठ्या झालेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना वयानं वाढणारे सर म्हणजे ‘लहान मूल’च वाटे. सर मोठ्यानं ओरडले असते तरी त्यांचा आवाज दोन-तीन डेसिबलच्या वर गेला नसता. त्यांचा जो काही दरारा, ऑरा किंवा विस्मयता होती, ती त्यांच्या कामात. सर ‘च्यायला’ किंवा ‘वेडझवा’ हेसुद्धा इतक्या मृदू म्हणत की, काही वावगं वाटत नसे. (सरांचं ‘च्यायला’ किंवा ‘फँटॅस्टिक’ तितक्याच मृदुतेनं ऐकायला मिळतं ते दिनकर गांगलांच्या तोंडून!)
षांताराम पवार या माणसातलं तिकडम वेगळेपण दोन संपादकांनी भरभक्कमपणे ओळखलं. त्यापैकी एक दिनकर गांगल, दुसरे निखिल वागळे. दिनकर गांगलांकडे तर ‘षांतारामा’ नावाचा ग्रंथ होईल इतके किस्से, अनुभव जमा असणार. निखिल वागळेंनी षांताराम पवार पुढच्या पिढीत आणले.
यापैकी ‘बलुतं’च्या मुखपृष्ठासाठी गोधडीचा फोटो काढण्यासाठी हवी तशी गोधडी मिळवण्यासाठी सरांनी नायगाव पालथा घातला. वास्तविक मुखपृष्ठ ब्लॅक अँड व्हाइट असणार होतं. तरी हा हट्ट. कारण सरांना ग्रे स्केल माहीत होता! ‘बलुतं’च्या पुढच्या आवृत्तीत सरांचा लाडका कावळा अवतरला. मधल्या वीस-पंचवीस वर्षांत एकाच लेखनावरचा चित्रकाराचा नवा दृष्टिकोन - फोटो ते चित्र हा - अभ्यासावा असा प्रकार आहे.
अशीच आठवण गांगलांनी सांगितलेली. मुरलीधर जाधव यांच्या ‘कार्यकर्ता’ या आत्मकथनाची. चळवळीतल्या कार्यकर्त्याची दशदिशा मांडणारं हे छोटेखानी आत्मचरित्र. जाधव दलित चळवळीत कार्यरत होते. त्यामुळे प्रामुख्यानं ते आंबेडकरी चळवळीवर भाष्य करणारे, त्या कार्यकर्त्याची व्यथा मांडणारे. प्रकाशक ग्रंथाली. आणि पुण्यात मोठं अधिवेशन होणार होतं. त्यात प्रकाशन! मुखपृष्ठ सरांचं! सरांनी प्रतीकात्मक म्हणून एक विरलेला, चिंध्या होऊ घातलेला ध्वज चितारला होता. कुठलंही निशाण म्हणता येईल असा. सरांची झेंड्याच्या पार्श्वभागी निळा रंग घ्यावा ही सूचना! गांगलांना निळ्या पार्श्वभूमीवरची लक्तरं या मागचा सामाजिक धोका लक्षात आला. त्यात आरपीआयच्या अधिवेशनात प्रकाशन. त्यामुळे गांगलांनी ठाम नकार दिला. नंतर गांगल म्हणाले, ‘आम्ही दोघं आपआपल्या मतांवरून माघार घ्यायला तयार नाही. प्रेसमध्ये आता दोघांत हाणामारीची स्थिती आली होती. सर शेवटी रागानं निघून गेले.’ पिवळ्या पार्श्वभूमीचं ते मुखपृष्ठ आजही बघायला मिळतं. त्या झेंड्यात पवार सर आहेत, तर पिवळ्या रंगात गांगलांची समयसूचकता आणि आपत्ती व्यवस्थापन!
‘आदिमाया’ या विंदांच्या कवितासंग्रहासाठी सरांनी रक्ताचं पाणी केलं, पण नंतरच्या आवृत्तीत विंदांनी आकारासह चित्रंही बदलली तीही न सांगता, ही दुखरी आठवण सरांनी स्वत:च लिहून ठेवलीय. त्यातही सूर पुन्हा ना आक्रस्ताळा ना विद्वेष ना अतिदु:खाचा.
आजवर मी माझ्या नाटकांची मुखपृष्ठं मीच केलीत. पण माझं स्तंभलेखन एकत्रित स्वरूपात प्रकाशित करायचं ठरवल्यावर त्यात पुढाकार घेणारे आमचे मित्र आनंद भंडारेंना म्हटलं मुखपृष्ठ पवार सर करतील का विचारा. सरांचा नंतर फोन आला- ‘तू लिहितोस हे माहीत होतं. एकत्रित वाचताना मजा आला.’ नंतर सर प्रकाशनालाही आले. ते भाषण संग्रहित आहे. नंतर आनंद व प्रकाश कीर्तीकुमार शिंदे (नवता प्रकाशन) यांनी सरांना मानधन विचारलं. सुरुवातीला ते नकोच म्हणाले, खूपच आग्रह केल्यावर सरांनी जो आकडा सांगितला तो ऐकून भंडारे (वेगळ्या अर्थानं) ‘गार’ पडले. मला म्हणाले, ‘एवढा मोठा माणूस, एवढं वेगळं काम आणि इतकी विनम्रता! आपलीच लाज वाटावी.’ मला वाटतं पवार सरांचे जे खरे विद्यार्थी आहेत, त्यांनीही आयुष्यात मानधनापेक्षा कामाचा आवाज मोठा मानलाय.
परवा सर गेले नसते तर कालच्या त्यांच्या वाढदिवसाला निवडक चमू जमला असता. काही आदानप्रदान झालं असतं. गेले काही महिने सर आजारीच होते. पत्नी गेल्यापासून ते जरा तसे खचलेच होते. एकदा फोनवर म्हणाले, “वैताग येतो रे साला. हे काही खरं नाही. पोरी करतात प्रेमानं, पण त्यांनाही अडकल्यासारखंच होत असणार. बोलत नाही कोण, पण आपल्याला कळतं ना. आता बास झालं वाटतं. बरं ये एकदा. तू साला नुस्तं येतो म्हणतोस. बघ जमलं तर.”
ते आडदांड पर्व आता तोळामासा झालेलं, सहज एका चादरीत सामावलेलं. चार तरुणांनी अंतिम यात्रेसाठी ताटीवर ठेवलं, तेव्हा पोटफोड्या ‘ष’ रेषेसह पोरका झाला!
.............................................................................................................................................
षांताराम पवार यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
.............................................................................................................................................
षांताराम पवार यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment