अजूनकाही
इतिहासात घडलेली घटना, तिला दिलेला समकालीन देशभक्तीचा साज, भारतीय स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी, दुसर्या महायुद्धाचा माहौल, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येकाची आपापल्या पद्धतीनं चाललेली धडपड, फाळणी झालेली, त्यात पूर्वीच्या ब्रिटिश इंडियासाठी खेळणार्या खेळाडूंची झालेली वाटणी, त्यामुळे स्वतःला नवीन देशात सिद्ध करण्याची चाललेली धडपड, ब्रिटिशांनी दोनशे वर्षं गुलाम म्हणून राबवलं त्याचा वचपा काढायची नामी संधी म्हणजे फील्ड हॉकीमध्ये त्यांचं नाक ठेचून सुवर्ण पदक जिंकण्याची मनिषा असा माहौल असणारा सिनेमा म्हणजे रीमा कागतीचा ‘गोल्ड’. भारतानं ब्रिटिशांपासून निघून स्वतंत्र झाल्यावर ऑलिंपिक्समध्ये पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकलं. त्याची कल्पित कहाणी म्हणजे हा सिनेमा.
तपनदास (अक्षय कुमार) हा ब्रिटिश इंडियाच्या हॉकीचा टीम मॅनेजर. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक्समध्ये जेव्हा ते जर्मनीकडून मॅच जिंकतात, तेव्हा भारतीय स्वातंत्र्य चळवळ टिपेला पोचलेली असते. जर्मनीत भारताचा झेंडा बसवर फडकवणार्या स्वातंत्र्यसैनिकांकडून घेऊन तो त्याच्या टीमला दाखवतो. ‘जर्मनांना हरवायचं असेल तर याला मनी बाळगा’, असं म्हणून तो भारताचा झेंडा दाखवतो. ब्रिटिश इंडिया मॅच जिंकते. पण तपनदासला नाराज करून, कारण जर्मनीच्या गोलकीपरनं स्वतःच्या टीम विरुद्ध गोल केलेला असतो. तांत्रिकदृष्ट्या ब्रिटिश इंडिया नशीबवान ठरलेली असते. तपनदास हे बोलूनही दाखवतो. त्यानंतर भारतात ब्रिटिश विरुद्ध चळवळीला जोर चढतो, तर तिकडे युरोपात हिटलरनं दुसरं महायुद्ध छेडलेलं असतं. या वातावरणात १९४६ पर्यंत ऑलिंपिक्स होत नाहीत. तसंच तपनदासच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा चालू होतो. तो दारू-सिगरेटमध्ये पुरता गुंगून जातो. तेवढ्यात एके दिवशी १९४८ मध्ये ऑलिंपिक्स परत एकदा होणार, तेही इंग्लंडमध्ये ही बातमी येते आणि तपनदासच्या जीवात जीव येतो. तो लवकरच स्वतंत्र होणार्या भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी टीम बांधायला लागतो.
रीमा कागती या तब्येतीनं काम करणार्या दिग्दर्शक. त्यांची पहिली फिल्म आली होती २००७ साल ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, तर शेवटची फिल्म आली होती २०१२ साली, ‘तलाश’. गेल्या अकरा वर्षांत दिग्दर्शक म्हणून फक्त तीनच सिनेमे. याचा अर्थ खूपच दर्जेदार काम असावं असं वाटेल. तर तसं म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ सोडला तर ‘तलाश’ बरा होता. त्यावरचा इतर सिनेमांचा प्रभाव पुसता येत नव्हता. ‘गोल्ड’ मात्र एका टप्प्यानंतर पकड घेत नाही, तर सुटत जातो. का सुटतो? त्याचं एकमेव कारण आहे तपनदास याच पात्रावर ठेवलेला फोकस. संपूर्ण कथा त्याच्याभोवतीच फिरते. जणू इतरांना भारताला सुवर्ण पदक जिंकून द्यायचंच नाही. ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणामुळे फक्त तपनदासलाच त्यांचा राग आलाय. जर ब्रिटिशांना हॉकीत नाही हरवलं तर आपली, पर्यायानं देशाची नाचक्की होईल असं त्याला वाटतं. तरीही त्याच्या व्यसनाधीनतेमुळे टीमला बर्याचदा नामुष्की सहन करावी लागते. त्याचं त्याला काही वाटत नाही, उलट देशाला सुवर्णपदक मिळवून देऊन मैदानावर राष्ट्रगीत ऐकण्याची त्याची इच्छा असते. उद्देश चांगला आहे.
ब्रिटिशांचं नाक ठेचण्यासाठी खेळाचा केलेला वापर आणि त्याला दिलेली देशभक्तीची जोड एकवेळ समजून घेता येते. पण एकदा तपनदासचा उद्देश प्रेक्षकांना समजला की, तो सावरून बसतो की हा कसं देशाचं नाव उंचावेल. पण रीमा कागती व पटकथाकार राजेश देवराज जणू ही गोष्ट विसरतात. त्यामुळे एकदा कथेचा प्रवास सुरू झाला की, वरील गोष्टी परत परत पात्रांच्या तोंडून ऐकवल्या जातात. त्याचा वीट यायला लागतो. त्यामुळे ‘आता पुरे करा’ अशी म्हणण्याची वेळ येते. याशिवाय कथेला दुसरा मुद्दाच उरलेला नाही, असं वाटायला लागतं.
तपनदास हे पात्र मजेशीर आहे. तो स्वतःला टीम मॅनेजर कम कुली समजतो. पण त्याचं हे कुली असणं ब्रिटिश इंडियानं जर्मनीत मॅच जिंकली की हवेत विरून जातं. त्याच्यातला देशभक्त जागा होतो. तरीही तो स्वभावानं प्रामाणिक आहे असं मात्र नाही. टीम तयार करताना प्रत्येकाचे रूसवेफुगवे, स्वभाव यांना हेरून एकत्र आणण्याचं काम मात्र चोखपणे करतो. ज्यावेळी काम नसतं, तेव्हा मुंबईत भरणार्या कुस्तीच्या खेळात सट्टा लावायचं काम करतो. तिथं मार खातो, पण त्याच्यातला खेळासाठी जीव ओवाळून टाकणारा मॅनेजर मेलेला नसतो. इंग्लंडमधल्या ऑलिंपिक्ससाठी संघ बांधणी करायची असते, तेव्हा फेडरेशनकडून पैसे येत नसतात, तेव्हा बायकोचे दागिने गहाण ठेवतो. ती त्याच्या संसार उधळायला लावणार्या वृत्तीला कंटाळलेली असते. तिच्याकडून दागिने परत मिळवण्यासाठी तो जी शक्कल लढवतो, ती सिनेमातच बघायला हवी. त्याला समोरील माणसाची मानसिकता बरोब्बर ओळखता येत असते. वेळप्रसंगी कठोर होऊन बोलायलाही तो मागेपुढे पाहत नाही. तसंच जमवलेल्या खेळाडूंना कसं आपलंसं करायचं याचे त्याचे आडाखे पक्के व योग्य असतात. त्यामुळे हे पात्र मजेशीर ठरतं. तरीही रीमा कागती त्याला द्विमिती आकारच देतात. तो त्रिमिती होऊन जिवंत होतच नाही.
त्याला जितका दिग्दर्शक दोषी आहे, तितकाच अभिनेतासुद्धा. अभिनय न करता फक्त पात्राचे हावभाव, सतत हातात धोतर धरणं, न जमणारे बंगाली उच्चार करणं अशा कायिक गोष्टींनाच महत्त्व दिल्यामुळे अक्षय कुमारचा अभिनय एकदम सपक पातळीवर राहतो. तपनदासच्या स्वभावामधला धूर्तपणा डोळ्यात दिसतच नाही कुठे. त्याला जिवंतपणाच येत नाही. तसंच देशभक्तीचे डोहाळे लागलेले असल्यामुळे एकामागून एक एकसुरी अभिनयानं भरलेले सिनेमे करणं इतकंच आता त्याच्या हातात उरलंय का असं वाटायला लागलंय. त्यानं लवकरात लवकर यातनं बाहेर पडून विविधांगी भूमिका कराव्यात नाही, तर विद्यमान सरकार पुढील पाच वर्षांसाठी परत निवडून आलं तर अक्षयला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी मनोज कुमार देशभक्तीनं भारलेले सिनेमे करायचे, त्यांचा नंतर उबग यायला लागला होता. अक्षयची वाटचाल त्याच दिशेनं होतेय.
सबकुछ अक्षय असणार्या या सिनेमात विनीत कुमार सिंगपासून ते सनी कौशलपर्यंत सर्वजण थोडक्या भूमिकेत छाप पाडून जातात. मौनी रॉयची बंगाली मिश्रीत हिंदीत बकबक करणारी कर्णकट्टू बायको मात्र का लिहिली गेली याचा प्रश्न पडतो. भन्साळीच्या ‘देवदास’मधली हिंदी मिश्रीत बंगालीत ‘सोंदेश’ म्हणणारी पारो जशी वात आणते, तसंच हे पात्र आहे. हिंदी सिनेमात ठोकळेबाज प्रादेशिक पात्रं लिहिली जातात. त्याचाच एक अलीकडचा नमुना म्हणजे मोनोबिना दास हे पात्र. तिच्या आवाजाची व रागाची पातळी थोडी कमी केली असती तर बरं झालं असतं असं वाटतं.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजीत लिहिणारे तीन अध्वर्यू राजा राव, मुल्क राज आनंद व आर. के. नारायण यांच्या लेखनावर गांधीजींच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव होता. हे तिघेच नव्हे तर त्या काळी इतर भाषेत लिहिणारे त्यांच्या विचारांना दूर सारू शकलेले नाहीत. याचा अर्थ सदासर्वकाळ त्यांनी त्यांचीच री ओढली असं नाही. परखड चिकित्सा केली नसली तरी काही प्रमाणात फारकत घेतली असं दिसतं. तसंच अक्षय कुमारच्या गेल्या चार वर्षातले सिनेमे बघितले तर त्याच्यावर विद्यमान सरकारच्या धोरणांचा खूप प्रभाव आहे. त्यामुळे निवडलेल्या पटकथा या नवीन ‘मेक इन इंडिया’शी साधर्म्य साधणाऱ्या निवडणं आणि त्यांना स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित करणं हा ग्रँड स्ट्रॅटेजीचा भाग वाटतो. काळाचा प्रभाव हा साहित्यकृती व कलाकृतींवर असतोच, पण त्याचा वापर किती व कसा करायचा याचं तारतम्य निर्मात्यानं बाळगणं नितांत गरजेचं आहे. त्यामुळे ऐतिहासिक घटनेला ‘मेक इन इंडिया’ची दिलेली सुवर्ण झळाळी व्हॉट्सअॅप विद्यापीठात ज्ञानी झालेल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडणार.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment