एका भयावह दुष्कर्माच्या युगात देशाला लोटण्यापासून वाचवले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे.
ग्रंथनामा - आगामी
मुग्धा कर्णिक
  • ‘द फ्री व्हाईस’च्या इंग्रजी आवृत्तीचं मुखपृष्ठ आणि रविश कुमार
  • Wed , 15 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी रविश कुमार Ravish Kumar द फ्री व्हाइस The Free Voice सुनील तांबे Sunil Tambe

निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकार रविश कुमार यांच्या ‘द फ्री व्हॉइस’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा पत्रकार सुनील तांबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. मधुश्री प्रकाशनातर्फे हा अनुवाद आज, १५ ऑगस्ट रोजी प्रकाशित होत आहे. या अनुवादाला जोडलेली प्रस्तावना…

.............................................................................................................................................

निरंकुश अधिकारशाहीचे राजकीय विश्लेषण करणाऱ्या विचारवंत हॅना आरेन्ट म्हणतात- ‘जगात जी काही भयावह दुष्कर्मे घडतात, त्याला जबाबदार असतात सामान्यच लोक- जे चांगलं काय वाईट काय याबद्दल ठाम विचार करण्यास नकार देतात- दुर्दैवाने हे सत्य आहे.’ आज भारतात लोकांनीच चांगले काय, वाईट काय याचा सारासार विचार करून एका भयावह दुष्कर्माच्या युगात देशाला लोटण्यापासून वाचवले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे.

त्या असंही सांगतात की, अधिकारशाहीचे आकर्षण फक्त पाळलेल्या झुंडींना आणि अभिजनांतील एका वर्गाला असते. जनसामान्यांना तिथे वळवण्यासाठी प्रचार हे एकमेव साधन असते. आज भारतात याचा अनुभव सहजच येत राहतो. प्रचाराच्या धुरळ्यात सत्याचा श्वास कोंडण्याचे हे दिवस आहेत. आणि त्यातून सत्य आणि सत् दोहोंना शाबूत ठेवण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे.

निर्भय सत्यवादी पत्रकार रविशकुमार यांच्या ‘द फ्री व्हॉइस- डेमॉक्रसी, कल्चर अँड द नेशन’ या पुस्तकाचा अनुवाद सुनील तांबे यांनी केल्यामुळे या दिशेने मार्गदर्शन करणारे एक मोठेच काम झाले आहे.

आज देशात जे अगदी मोजके पत्रकार लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाचे भान ठेवून पत्रकारिता करत आहेत, त्यात रविशकुमार अग्रणी आहेत. प्रचंड प्रमाणावर ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या, शिव्या, नोकरीवर गदा येण्याची शक्यता असे सारे धोके पत्करून ते त्यांचा निर्भय उद्गार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. आज मुख्य प्रवाहातील माध्यमांमधील मूठभर पत्रकार आणि पर्यायी वृत्तसंस्था चालवणारे शे-शंभर पत्रकार यांच्या खांद्यावरच भारतीय लोकशाहीचा चौथा खांब तोलला गेला आहे. पण खांबांचा पाया मात्र नेत्याचरणी लीन झालेल्या माध्यम-मालकांमुळे आणि संधीसाधू पत्रकारांच्या मांदियाळीमुळे डळमळीत होत चालला आहे.

आरडाओरडा करून खोट्या बातम्यांचे पीक काढणारे, जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नांवरून इतरत्र वळवण्यासाठी फडतूस घटनांचे जाळे विणणारे, अनेक महत्त्वाच्या घटना जाणीवपूर्वक दाबून टाकणारे पत्रकार घराघरांतील पडद्यांवर चमकत आहेत. त्यांचे लठ्ठ पगार, त्यांची सरकार दरबारची प्रतिष्ठा, हे सारे दिसामासा वाढत जाते आहे. आणि निरंजन टकलेंसारखा आवाज दाबल्यामुळे नोकरी सोडून दिलेला पत्रकार; ‘द वायर’, ‘द स्क्रोल’, ‘कॅरावान’सारख्या पर्यायी वृत्तसंस्थांमधून सत्याचा आवाज शाबूत ठेवणारे निवडक पत्रकार आणि मुख्य प्रवाहात असूनही स्वत्व न गमावलेले आणि जोखीम पत्करणारे काही पत्रकार निष्ठेने पत्रकारितेचा जीव जगवत आहेत.

या वातावरणात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांचा मागोवा घेत त्यावर लोकशाही मूल्यांनी केंद्रस्थानी ठेवत, आपल्या संस्कृतीचे अवगुणविशेषही लक्षात घेत देशाच्या भविष्याबद्दल टिप्पणी करणारे एक साधे सोपे कथन एका सच्च्या पत्रकाराकडून येणे फार महत्त्वाचे आहे.

या पुस्तकाची सुरुवातच होते ती निर्भयपणे न्या. ब्रिजगोपाल हरकिशन लोयांच्या प्रश्नांकित मृत्यूचा संदर्भ देत. भीतीवर मात करण्याचा रविशकुमारचा वैयक्तिक धडा पुस्तकाचा स्वर लावून जातो. हा स्वर कर्कश नाही, पण खुला आहे. अभिनिवेश न आणता निर्भय आहे. भावनाकुल न होता संवेदनशील आहे.

वेगवेगळ्या वेळी लिहिलेल्या निबंधांचाही यात अंतर्भाव असल्यामुळे यात तसे एकसूत्र नाही. पण पुस्तकाच्या शीर्षकातील तीन विषयांवरील भाष्य प्रत्येक प्रकरणात असल्यामुळे तेच सूत्र ठरते. आपल्या जगण्याला स्पर्शत असलेले विविध प्रकारचे भय आणि त्याचा सामना करायची गरज हा अंतःप्रवाह याच्या प्रत्येक पानातून वाहतो. रविशकुमार आपल्याला सांगतात, “सुरक्षित राहण्याच्या उपदेशामुळे लोक भेकड बनले आहेत. काळजीपूर्वक बोला एवढीच तंबी ते देत नसतात तर बोलूच नका असा उपदेश करतात.” हे अगदी पटतं- कारण बोलणाऱ्या प्रत्येकाला त्याचा वेगवेगळ्या पातळ्यांवर अनुभव आलेला असतो.

नव्या राज्यसत्तेच्या ट्रोल, शिलेदारांकरवी पसरवली जाणारी भीती, हिटलरच्या जर्मनीचा संदर्भ देत भारतातील बेलगाम झुंडींनी मनामनात पेरलेली, नेस्तनाबूत करणारी भीती, लोकशाही जिवंत राहण्यासाठी भीतीचा त्याग करण्याची गरज ओळखली नाही तर काय होऊ शकते यावर झोत, देव, दैव आणि अंधश्रद्धांतून विकल होत जाणाऱ्या जनतेला लोकशाही टिकवता न येण्याचा धोका, व्यक्तीच्या अगदी मानवी, प्रेमासारख्या, बुद्धिजन्य भावनांना वावच न देणारी भयाधारित समाजव्यवस्था या सर्व भयविक्षेपांबद्दल ते लिहितात. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांपर्यंत पोहोचून भय गाडून टाकण्याची एक शक्यता रविशकुमार सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात. स्वातंत्र्याबद्दल उठवळपणे बोलणे का चूक आहे हे त्यांनी अखेरच्या प्रकरणात अतिशय सुगमतेने सांगितले आहे. स्वातंत्र्यावरचा एक सुंदर निबंधच यात आपल्याला वाचायला मिळतो.

या संपूर्ण पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कुठेही थेट टीका नाही असे कुणी म्हणेल. पण सारे विवरण, सारे संदर्भ एकत्र केले तर धर्मविद्वेषाच्या पायावर उभारलेल्या संघटनेबद्दल हे पुस्तक धारदार टीका करते आहे, यातच सारे आले.

आजघडीला आपल्या देशात आपण फार विचित्र काळाच्या टप्प्यातून जातो आहोत. द्वेषप्रेरित झुंडींनी केलेले चेहरे नसलेल्यांचे खून, छुप्या पायदळांमार्फत ठरवून करण्यात आलेले लोकप्रिय निर्भय व्यक्तींचे खून हे जणू ताटात वाटी अपेक्षित असल्याप्रमाणेहोऊ लागले आहेत. आणि या सर्व विचित्र हिणकस घटनांबद्दल ज्या माध्यमांनी आवाज उठवायचा, ती माध्यमे आधीच पोलादी पंजाखाली की पोलादी पडद्याआड गेली आहेत.

रविशकुमार ‘आपण जनता आहोत’ (Being the People) या प्रकरणात नागरिकांच्या नेभळटपणाबद्दल आपल्याला सावध करतात. मननीय प्रकरण आहे हे. ते म्हणतात, “आपण लोक आहोत याचं भान ठेवून लोकशाहीवर आपला दावा ठामपणे सांगत राहणं हे लोकशाही संकल्पनेचं अत्यावश्यक तत्त्व आहे. परंतु लोकांचं भान भयामध्ये रूपांतरित होतं, तेव्हा ते निव्वळ नोकर बनतात. लोकशाहीमध्ये लोक कोणत्याही बाबतीत प्रथम क्रमांकावर हवेत, व्यवस्थेनं त्यांची सेवा करायला हवी, व्यवस्था त्यांना उत्तरदायी हवी. मात्र सत्ता याच्या नेमकं उलट करू पाहते आहे. जेणेकरून ती लोकांवर वर्चस्व गाजवेल. त्यांचं उद्दिष्ट हेच आहे की, ते जो काही निरर्थक वटवटीचा कडबा आपल्यापुढे टाकतील, तो आपण निमूटपणे गिळावा. निरंकुश सत्ता सदासर्वकाळ हाती ठेवणं हेच त्यांचं ध्येय आहे.’’

पुस्तक संपादित करता करता मूळ पुस्तक आणि अनुवाद असे दुहेरी वाचन झाल्यावर, दुहेरी खात्री पटली आहे की भारतीय नागरिकांना प्रचार झुगारून देण्यासाठी उद्युक्त करणे, स्वत्व आणि सत्याबद्दल संवेदना जागवण्याचे काम करणे, हे या दशकातले राष्ट्रबांधणीचे मुख्य काम असणार आहे. गेली नऊ दशके छुपेपणाने होत असलेल्या अपप्रचाराचा कालिया आता डोके वर काढून दंश करत विष पसरत चालला आहे. प्रथम त्याच्याबद्दलच्या भयाचे दमन करू शकलो तरच त्याच्या डोक्यावर थयथय नाचून त्याची शकले करू शकू. आणि वातावरण स्वच्छ करू शकू.

रविशकुमार यांनी सामान्यांना भिडणारे हे पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. मराठीत अनुवाद केल्याबद्दल पत्रकार सुनील तांबे यांचे आणि तो प्रकाशित केल्याबद्दल निर्भय प्रकाशक शरद अष्टेकर यांचेही आभार मानावेसे वाटतात.

निर्भयतेचा उद्गार आपल्या मनातही स्फुरावा.

.............................................................................................................................................

लेखिका मुग्धा कर्णिक यांची ‘अॅटलास श्रग्ड’, ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ इत्यादी अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

mugdhadkarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Wed , 22 August 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......