अजूनकाही
विश्वातलं सर्व ज्ञान एका छताखाली असावं ही माणसाची फार जुनी महत्त्वाकांक्षा आहे. ही आकांक्षा ग्रंथालयांच्या रूपानं प्रत्यक्षात आली आहे. ग्रंथालय ही ग्रंथांची राहण्याची जागा असते. तेथून ती कुठं कुठं जातात पण बहुदा परत येतात. अर्थात ती फक्त ग्रंथांची राहण्याची जागा नसते. तिथं माणसं येतात आणि ती ग्रंथ वाचतातही. मानवी संस्कृतीच्या वाटचालीत या ग्रंथालयांचं स्थान मोठं आहे. अज्ञानावर मिळवलेल्या, छोट्या का होईना विजयाचं ते जागतं स्मृतीशिल्प आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ज्यांनी ज्ञानाचं महत्त्व जाणलं होतं त्यांनी ग्रंथांचे लाड केले, वाचन हा एक उत्सव मानला आणि त्यासाठी ग्रंथालयांची निर्मिती केली. ‘द लायब्ररी – वर्ल्ड हिस्ट्री’ या जेम्स कॅम्बेल यांच्या अत्यंत नयन मनोहर पुस्तकात ग्रंथालयांच्या इमारतींचा इतिहास दाखवला व सांगितला आहे. मेसोपोटेमियातील साधारण इ.स.पूर्वपासूनचं वाचनालय, जिथं मातीच्या टॅब्लेटस साठवल्या जात होत्या, तेथपासून ते बिजिंगमधल्या अत्यंत आधुनिक वाचनालयांच्या इमारतींचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
आज ग्रंथ म्हटल्यावर जे रूप डोळ्यासमोर येतं ते अर्वाचीन आहे. दगडांवर कोरणं, मातीवर काही लिहून नंतर ते वाळवणं, चामड्यावर लिहून ठेवणं, रेशमी वस्त्रांवर लिहिणं, कागदाच्या अनेक व क्रमाने प्रगत होत गेलेल्या स्वरूपांवर लिहिणं आणि आत्ताचं आधुनिक स्वरूप म्हणजे डिजिटलाइझ अर्थात संगणकीय स्वरूपात लिहिणं ही ग्रंथांची बदलत गेलेली स्वरूपं आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांची साठवण करण्याचे व प्रदर्शित करण्याचे मार्ग वेगवेगळे, ते वाचण्यासाठी येणाऱ्या वाचकांना लागणाऱ्या सोयी वेगवेगळ्या. अशा विविध प्रकारच्या ग्रंथांची काळजी घेण्याचे मार्गही वेगवेगळे. ग्रंथांच्या वाढत्या संख्येचाही त्यांच्या साठवणीवर परिणाम होणं साहजिक होतं.
धर्मानं माणसाचं जीवन ज्या काळात व्यापलं होतं त्या काळात ग्रंथ अर्थातच धार्मिक रचना व आज्ञा जतन करण्याचं साधन होतं. आजही ‘कोडॅक्स’ (कोड म्हणजे काही संज्ञा व ते उलगडून सांगतं ते पुस्तक) वा ‘द बुक’ म्हणजे धार्मिक पुस्तक. त्यामुळे चर्च वा बौद्धविहार यांनी ग्रंथालयांची निर्मिती केली. १४व्या शतकाआधी पश्चिमेत वाचनालयं संख्येनं कमी व अर्थातच आकारानं लहान होती. ग्रंथ हे महागडं प्रकरण होतं. १३३८सालच्या सार्बोन येथल्या प्रसिद्ध ग्रंथालयात केवळ ३३८ ग्रंथ होते. अनेक मोठ्या चर्चच्या ग्रंथालयांत १००० पेक्षा कमी ग्रंथ होते. त्याच वेळेस चीनच्या काही वाचनालयांत दहा लाख ग्रंथ होते. याचं कारण आर्थिक होतं. पश्चिमेतले ग्रंथ कातड्यांवर लिहिलेले होते. हजार पानांचं ‘बायबल’ लिहावयास २५० मेंढ्या लागायच्या. त्यात लिहिण्याच्या मजुरीचा व शाईचा खर्च! हे सगळं महागडं प्रकरण होतं.
एवढे ग्रंथ साठवणं हे काही अवघड काम नव्हतं. ग्रंथ साठवण्याची खोली अंधारी असे. ग्रंथ बाहेर खिडकीजवळ नेऊन वाचावे लागत. त्यासाठी खिडक्यांजवळ कॅरेल म्हणजे बंद बाक बनवण्यात आले होते. आताच्या सायबर कॅफेंमध्ये अगदी तसेच कॅरेल असतात. वाचणं हे मोठ्यानं केलं जात असे, पण कॅरेलमुळे आवाज बाहेर कमी जाई. नंतर आतून ग्रंथ आणण्याऐवजी कॅरेलमध्येच ठेवण्याची सोय करण्यात आली. पण ग्रंथ अजूनही किमती वस्तू होती. त्यांची चोरी होण्याची भीती होती. १३३८साली फ्रेंच ग्रंथालयातल्या १७२८ ग्रंथांपैकी ३०० ग्रंथ हरवल्याची नोंद आहे. त्यावर उपाय म्हणून ग्रंथांना साखळीनं बांधून ठेवण्यात येऊ लागलं. पण मग ग्रंथांची संख्या वाढली व ते सरकवण्यातही अडचणी येऊ लागल्या. यावर मात करण्यासाठी बाकांना जोडून फडताळं आली, लोखंडी सळया आल्या. त्यांच्याशी ग्रंथांना साखळीनं बांधण्यात आलं. या सगळ्यांची छायाचित्रं अचंबित करणारी आहेत.
याच काळात चीनमधली ग्रंथालयं खूप मोठी होती. मध्ययुगातले तेथील सर्वांत मोठं ग्रंथालय १००,००० ग्रंथांचं होतं. ज्ञान सुरक्षित राहावं याची तत्कालीन प्रकल्पांची भव्यता ते जेवढे काळ चालले त्यावरून येते. हा प्रकल्प इ.स. ६०५ साली सुरू झाला आणि इ.स. १०९१मध्ये संपला. या ४८६ वर्षं चाललेल्या प्रकल्पात १०५ बौद्ध सूत्रांमधील ४० लाख शब्द ७,००० दगडी पाटांवर कोरण्यात आले आणि गुहेत साठवण्यात आले. त्याचा शोध लागला तेव्हा दुर्दैवानं त्यातली अनेक पुस्तकं पाण्यानं झिजली होती.
नंतर रेशमी कपड्यावर काजळीनं लिहिण्याचा प्रयोग झाला, पण रेशीम महाग होतं. दक्षिण कोरियात ‘त्रिपिटीक’ या ग्रंथाचा ब्लॉक हा लाकडी पाट्यांवर कोरला होता. त्या पाट्या त्याआधी मिठाच्या पाण्यात उकळून तीन वर्षं वाळवण्यात आल्या होत्या. कोरून झाल्यानंतर त्यांना किडा-मुंगीपासून वाचवण्यासाठी औषधी लिंपण लावण्यात आलं. त्या साठवण्याच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची व्यवस्था करण्यात आली. १९७२साली हा संग्रह व्यवस्थित राहावा म्हणून खास त्यासाठी बांधलेल्या काँक्रिटच्या बंकरमध्ये हलवला असता तो खराब होऊ लागला. त्यामुळे त्याला परत त्याच्या पहिल्या जागी हैन्साच्या देवळात हलवण्यात आलं. यात महत्त्वाचं म्हणजे ‘त्रिपिटिक’ छापण्याच्या ब्लॉकचा हा संग्रह आहे.
चीनमधल्या काई लुन या माणसानं कागदाचा शोध लावला असं मानण्यात येतं. त्यानं ग्रंथविश्वात क्रांती घडली. रेशमी रस्त्यावरून कागदाचं १४व्या शतकात युरोपमध्ये आगमन झालं. सुधारणांचं युग सुरू झालं होतं. ग्रंथांची संख्या वाढली होती. छापण्याच्या यंत्राचा शोध नुकताच लागला होता. ग्रंथ अजूनही बाकांना व फडताळांना बांधलेली होती. ती फडताळं हॉलमध्ये रांगेत, भिंतीशी काटकोनात लागलेली असत. ती अजून भिंतीपाशी सरकायची होती, पण वाचनालयासाठी स्वतंत्र इमारतींची गरज जाणवू लागली होती. फ्लॉरेन्समधील लारेन्सियल वाचनालयाची रचना मायकेल अँजेलोनं केली होती. बांधकाम चालू असताना तो मध्येच प्लॉरेन्स सोडून गेला तरी त्यातल्या जिन्याचं मातीचं मॉडेल त्यानं करून पाठवलं. उंच छत, एकमेकांसमोर असलेल्या रंगीत नक्षीदार खिडक्या हा त्याचा विशेष. मेडिसीचा जिओव्हनी द बिसी हा श्रीमंत होता. त्याच्याकडे केवळ तीन पुस्तकं होती, पण त्याच्या मुलानं मात्र अनेक हस्तलिखितं पैसे खर्चून गोळा केली आणि बॅब्लिओटिका एक मार्को ग्रंथालय उभं केलं. ज्ञान व विद्वानांना आश्रय देणं हे सत्तेचं लक्षण बनलं. हे ग्रंथालय लोकांसाठी खुलं होतं.
कागदामुळे ग्रंथ स्वस्त होत गेले तशी त्यांना साखळीनं बांधून ठेवण्याची गरज राहिली नाही. त्यांचा आकार आटोपशीर झाला. मोठ्या संख्येनं ते साठवणं शक्य झालं. मग ती भिंतीशी समांतर सरकली व नंतर त्याला चिकटलेल्या आखीर-रेखीव फडताळांवर चढली. फडताळांच्या उंचीलाही मर्यादा होत्या. त्यावर उपाय म्हणून खालून आधार देऊन गॅलऱ्या व सज्जे बनवण्यात आले. वर जाण्यासाठी शोभिवंत जिने आले. आता मधला हॉल मोकळा झाला. या प्रकारातलं सर्वांत सुंदर वाचनालय म्हणजे प्रागमधलं चर्चला जोडून असलेलं स्ट्राहोव्ह अॅबेचं ग्रंथालय. तेथील मधल्या मोकळ्या हॉलमध्ये पृथ्वीचा भव्य गोल ठेवला गेला, जो कोणालाही अस्थानी वाटला नाही. पोर्तुगाल मधल्या ग्रंथालयांना ब्राझीलमध्ये सापडलेल्या सोन्याचा मुलामा देण्यात आला. याआधीही युरोपात ग्रंथालयं होती, पण त्यांचा सौंदर्याच्या दृष्टिकोनातून कोणी विचार केला नव्हता. १७व्या शतकात इंग्लंडमधल्या रॉयल ग्रंथालयांचा संग्रह मोठा व नामचीन होता, पण ग्रंथ टेबलावर व जमिनीवर पडलेले असत. त्याविषयी ह्युगो ब्लॉटियस या व्हिएन्नामधल्या ग्रंथपालानं लिहिलं आहे, “इथं सर्व काही अस्ताव्यस्त पडलं आहे. धूळ, वाळवी व किटकांनी जागा व्यापली आहे. कोळ्यांची जाळी दाट पसरली आहे. अनेक वर्षांत खिडक्या उघडल्या गेलेल्या नाहीत वा ना त्यातून कधी सूर्याचा किरण आत येऊ शकला.”
युरोपातलं ग्रंथप्रेम अमेरिकेतही पोचलं. न्यू यॉर्क सिटी पब्लिक लायब्ररी १९११साली सुरू झाली, तेव्हाच त्यात दहा लाख ग्रंथ होते. त्याच्या अनेक वाचन कक्षांपैकी प्रमुख कक्ष २९७ फूट लांब व ७८ फूट रूंद आहे. त्याच छत ७१ फूट उंच आहे. एका वेळी ६२७ लोक या कक्षात बसून वाचू शकतात. इंग्लंडमध्ये २००९ साली उभारलेल्या ग्रंथालयात ८० लाख ग्रंथ ठेवण्याची सोय आहे आणि उंच उंच बांधलेल्या लोखंडी शेल्फपर्यंत जाण्यासाठी उदवाहक आहेत.
या पुस्तकाचा लेखक, वास्तूरचनाकार जेम्स कॅम्बेल लिहितो, “श्रीमंत व सत्ताधीशांनी ग्रंथालयांच्या इमारतींवर अमाप खर्च केला. ग्रंथालये चित्रकला, शिल्पकला, वास्तूकला, फर्निचर यांचा एक अदभुत संगम होती. तत्कालीन संस्कृतीची ही प्रतिबिंबं होती.” ते खरंच आहे. “माझा स्वर्ग म्हणजे ग्रंथालय आहे” बोर्जसच्या या वचनाची प्रचिती या ग्रंथातील छायाचित्रं पाहताना येत राहते. त्याच्या ग्रंथालयाचे किनारे कधी हाताला लागत नाहीत. अशा ग्रंथालयातले भव्य व मनोहर जिनेदेखील या ग्रंथातल्या जिन्यांप्रमाणेच असतील असं वाटत राहतं.
द लायब्ररी – वर्ल्ड हिस्ट्री - जेम्स कॅम्बेल, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस, अमेरिका, पाने – ३२०, मूल्य – ४७८४ रुपये.
लेखक युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.
kravindrar@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment