अजूनकाही
तत्त्वहीन राजकारण,
नीतिमत्तारहित व्यापार,
कष्टाविना संपत्ती,
चारित्र्याविना शिक्षण,
मानवतेविना विज्ञान,
विवेकहीन सुखोपभोग
आणि
त्यागरहित भक्ती
म. गांधी यांनी अशी सात ‘सामाजिक पापकर्मे’ सांगितली आहेत. या पापकर्मांच्या विरोधात लढण्याचे काम कम्युनिस्ट पक्षातील सगळ्याच संस्था-संघटना आणि नेते करतात, हे भारतातील कम्युनिस्टांच्या कार्यपद्धतीवरून कुणालाही सहजपणे कळेल.
सोमनाथ चटर्जी हे त्यापैकीच एक बिनीचे शिलेदार होते. ‘या क्रियावान सा पण्डिता’ असे एक संस्कृतवचन आहे (आणि पुणे विद्यापीठाचे घोषवाक्यही!). चटर्जी यांचे सबंध आयुष्य या विधानाचा मूर्तीमंत आविष्कार होता. सोमनाथबाबूंना ‘डाव्यांमधील खरा मवाळ किंवा उदारमतवादी’ असं म्हणावे लागेल. गंमत म्हणजे सोमनाथबाबूंचे वडील निर्मलचंद्र चटर्जी हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी हेही निर्मलचंद्र यांचे नातेवाईक होते.
कॉ. ए. बी. बर्धन पन्नासच्या दशकातल्या संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरातल्या संघ-कम्युनिस्ट यांच्यातील सौहार्दाच्या आठवणी सांगत. हिंदू महासभेचे लोक बर्धन यांना गणोशोत्सवात व्याख्यानासाठी बोलवत, बर्धन जात आणि संघावर सडकून टीका करत. ती परखड टीका उदार मनानं स्वीकारण्याची दृष्टी तेव्हाच्या संघनेतृत्वाकडे होती.
काहीसा असाच प्रकार प. बंगालमध्येही घडत होता. सोमनाथबाबूंचे वडील हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याची अनेक उदाहरणं सांगतायेण्यासारखी आहेत. उदा. १९४८मध्ये केंद्र सरकारनं भारतीय कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. आणि अनेक कम्युनिस्टांची धरपकड सुरू केली होती. तेव्हा निर्मलचंद्र यांनी महासभेचे अध्यक्ष असतानाही आपल्या वकिली पेशाला जागून त्याविरोधात प. बंगालमध्ये आघाडी उभारली होती. निर्मलचंद्र कम्युनिस्टांकडे आकर्षित झालेले नव्हते आणि कम्युनिस्टांचं त्यांना फार प्रेमही नव्हतं. पण ते तत्त्वनिष्ठ राजकारणी होते. देशातल्या नागरिकांचा कुठलाही अधिकार हिरावून घेतला जाऊ नये, यासाठी ते जागरूक असत. त्यासाठी कायमच तत्परतेनं मदत करत.
निर्मलचंद्र यांच्या या सहिष्णू दृष्टीमुळे कम्युनिस्ट पक्षाचं चटर्जींनी लक्ष वेधून घेतलं होतं. पण निर्मलचंद्र काही कम्युनिस्ट पक्षात जाणं शक्य नव्हतं. पण पुढे त्यांचा मुलगा, सोमनाथबाबू वयाच्या ३९व्या वर्षी सीपीएमचे सदस्य झाले. सोमनाथबाबूंचा जन्म २५ जुलै १९२९चा. कोलकाता आणि केंब्रिज या दोन ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. वडिलांचा वारसा पुढे चालवत ते वकील झाले. (आणि पुन्हा वडिलांचा वारसा चालवत त्यांचा मुलगा प्रताप चटर्जी कोलकाता उच्च न्यायालयात वकील आहे.) तब्बल १० वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी १९८९ ते २००४ या काळात सीपीएमचे संसदीय नेता म्हणून काम केले. १० मे १९९३ रोजी लोकसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश व्ही. रामास्वामी यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सोमनाथबाबूंनी दाखल केला होता. पण काँग्रेसनं मतदानावर बहिष्कार टाकल्यानं तो प्रस्ताव पास होऊ शकला नाही.
सोमनाथबाबू प. बंगालच्या औद्योगिक विकास निगमचेही अध्यक्ष होते. त्यांना प. बंगालमध्ये उद्योग यावेत यासाठी खूप प्रयत्न केले. सोमनाथबाबू सरकारमध्ये असताना परदेशात जात तेव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचा सर्व खर्च ते स्वत: करत. लोकसभा अध्यक्ष असताना त्यांना आपल्या सरकारी निवासावरील अनावश्यक खर्चात कपात केली होती.
युपीए-१च्या कार्यकाळात २००४मध्ये सोमनाथबाबूंची सर्वसंमतीनं लोकसभा अध्यक्षपदी नियुक्त झाली. सोमनाथबाबू ‘सर्वश्रेष्ठ संसदपटू’ होतेच. ते त्यांनी निर्विवादपणे सिद्ध केलं होतं. संसदीय राजकारणाच्या परंपरा आणि आदर्श यांचं उत्तम भान असलेल्या सोमनाथबाबूंनी पुढच्या पाच वर्षांत ‘(अलीकडच्या काळातील) सर्वश्रेष्ठ लोकसभा अध्यक्ष’ काम केलं. १९५२पासून लोकसभा अध्यक्ष हे अत्यंत महत्त्वाचं पद गणेश विष्णु मावळंकर, एम.एम. अय्यंगार, सरदार हुकूमसिंग, एन. संजीव रेड्डी, जी. ए. धिल्लन, बळीराम भगत, के. एल. हेगडे, बलराम जाखड, रवी रे, शिवराज पाटील, पी. ए. संगमा, जी.एम.सी. बालयोगी, मनोहर जोशी, सोमनाथ चटर्जी, मीराकुमार आणि (सध्या) सुमित्रा महाजन यांनी भूषवलं. अलीकडच्या लोकसभा अध्यक्षांचा विचार केला तर पी. ए. संगमा हे ‘लोकप्रिय अध्यक्ष’ होते आणि कुशलही. पण ‘सर्वोत्कृष्ट अध्यक्षा’चं नाव घ्यायचं झालं तर ते फक्त सोमनाथबाबूंचंच घ्यावं लागेल. त्यांच्या विरोधकांनाही हे सहजासहजी नाकबूल करता येणार नाही.
सोमनाथबाबू लोकसभा अध्यक्ष होते, तो कालखंड तसा आव्हानात्मकच होता. ते कम्युनिस्ट पक्षाचे, सरकार काँग्रेसचं. (कम्युनिस्ट पक्षाचा सरकारला बाहेरून पाठिंबा होता.) ही खरं तर यूपीए आघाडी होती. त्यामुळे त्यात अनेक प्रादेशिक पक्ष होते. त्यांचं दबावाचं, हेकेखोरपणाचं आक्रमक राजकारण होतं. त्याचं दर्शन लोकसभेत रोज पाहायला मिळे. लोकसभा हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आणि लोकसभा अध्यक्ष त्या लोकसभेचा मानदंड. त्यामुळे लोकसभेचं आणि लोकसभा अध्यक्षाचं पावित्र्य जपणं, तिची संसदीय परंपरा कायम राखणं आणि या सभागृहाचा दर्जा खालावू न देणं ही आव्हानं सोमनाथबाबूंसमोर होती. त्यामुळे त्यांना रोज अग्निपरीक्षेला सामोर जावं लागत होतं. सदसदविवेक, तत्त्वनिष्ठा, नि:पक्षपातीपणा, घटनेचं श्रेष्ठत्व आणि त्या श्रेष्ठत्वाची चांगल्या अर्थानं जाण, यांच्या जोरावर सोमनाथबाबूंनी हे दिव्य पार पाडलं. नंतरच्या काळात पक्षपातळीवर त्यांच्यावर सर्वांत मोठा आघात होऊनही.
सोमनाथबाबू तसे शांत आणि धीरगंभीर. आपल्या पन्नास वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत त्यांनी सदैव संसदीय परंपरांचं भान ठेवलं आणि त्यांचा मानही ठेवला. तेच त्यांनी लोकसभा अध्यक्ष असतानाही केलं. गोंधळमूर्ती खासदारांनाही ते सहसा न भडकता आवरण्याचं काम करत. आकांडतांडव करणाऱ्या खासदाराला कधी दटावून, कधी नियमावर बोट ठेवून, कधी त्यांच्यावर कारवाई करण्याचा मानस व्यक्त करत, कधी त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आल्याचं सांगत, तर कधी ‘देशातील जनता तुम्हाला पाहत आहे’ असं वास्तवाचं भान देत नरम करत असत. पण जे खासदार काहीच ऐकून घेण्याच्या मन:स्थिती नसत त्यांच्यावर मात्र ते प्रसंगी भकडतही. असाच त्यांचा पारा राजदच्या खासदारांनी चढवला होता, तेव्हा ‘हे सभागृह केवळ गोंधळ घालण्यासाठीच आहे काय?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला होता. अर्थात लोकसभा अध्यक्षपदाचा निरोप घेताना अनवधानानं एखाद्या सदस्याबद्दल आपल्याकडून वाईट बोललं गेलं असेल, कुणी आपल्या बोलण्यामुळे दुखावलं गेलं असेल तर त्याची जाहीरपणे माफीही मागितली होती. जाहीरपणे अशा प्रकारे माफी मागणं, यासाठी मनाचा खूप मोठेपणा लागतो. मन तेव्हाचं मोठेपणा दाखवू शकतं, जेव्हा तुमचं चारित्र्य, बांधीलकी आणि वर्तन हे आंतर्बाह्य स्वच्छ असतं. आपल्या चुकांची वाच्यता करणाऱ्या माध्यमांचा गळा घोटू पाहणाऱ्या सध्याच्या काळात, तर ही खूपच मोठी गोष्ट आहे.
सोमनाथबाबूंनी माफी मागितली होती, तसाच एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल खेदही व्यक्त केला होता. ती घटना म्हणजे ३३ टक्के महिला आरक्षणाचं विधेयक. सध्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात आरक्षणावरून जी अहमहमिका चालू आहे, त्यातून ‘प्रभावी जातीं’चं राजकारण नव्यानं उदयाला येत आहे. या आरक्षणाच्या गदारोळात ३३ टक्के महिला आरक्षणाचं विधेयक अजूनही संसदेत पडून आहे, याची जाणीव कुणालाच होण्याचं कारण नाही. मात्र १४व्या लोकसभा सत्राची सांगता करताना तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथबाबू म्हणाले होते – “माझ्या कार्यकाळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचं विधेयक मंजूर होऊ शकलं नाही, या गोष्टीचा मला खेद आहे.”
२००८मध्ये कम्युनिस्ट पक्षानं अमेरिका-भारत अणुकराराच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा कम्युनिस्ट पक्षानं चटर्जी यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असं त्यांना सांगितलं. त्यावर लोकसभा अध्यक्ष कुठल्याही पक्षाचा नसतो असं त्यांनी पक्षनेतृत्वाला सांगितलं. दरम्यान त्यांचे फिलॉसॉफर गाईड ज्योती बसू यांच्याशी सल्लामसलत केली. बसूंनीही सोमनाथबाबूंना राजीनामा देणं संसदीय परंपरेला धरून नसल्याचं सांगितलं. तेव्हा सोमनाथबाबूंनी पक्षनेतृत्वाला ठामपणे आपला नकार कळवला. परिणामी जुलै २००८मध्ये त्यांची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ती बातमी ऐकून ‘आयुष्यातील सर्वांत दु:खदायक दिवस’ अशी प्रतिक्रिया सोमनाथबाबूंनी दिली आणि ते आपल्या दैनंदिन कामाला लागले. पक्षनेतृत्वावर, विशेषत: प्रकाश करात यांच्यावर ते नाराज झाले, नाही असं नाही. पण तेव्हा आणि त्यानंतरही त्यांनी कधीही करात यांच्यावर कुठलाही आरोप केला नाही की, सार्वजनिक ठिकाणावरून हल्ला केला नाही.
चटर्जी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याचा आणि माकप या त्यांच्या पक्षाबरोबर न राहण्याचा निर्णय का घेतला? कारण संसदीय परंपरा आणि तत्त्वनिष्ठा. ज्याप्रमाणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल ही पदं पक्षविरहित असतात, तसंच ‘लोकसभा अध्यक्ष’ हे पदही असतं. त्यामुळे सोमनाथबाबू तेव्हा पक्षनेतृत्वाच्या दबावाला बळी पडले नाहीत, हे बरंच झालं. त्यातून त्यांनी संसदीय परंपरेची, भारतीय लोकशाहीची बूज राखली. लोकसभा अध्यक्षानं कसं असलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या लौकिकाला साजेसं वर्तन केलं.
आता हेही तितकंच खरं आहे की, सोमनाथबाबूंच्या या उघड बंडखोरीमुळे कम्युनिस्ट पक्षाच्या शिस्तीला तडा गेला. ‘पक्षापुढे कुणीही श्रेष्ठ नाही’ या त्यांच्या तत्त्वज्ञानाही तडा गेला. खरं तर कम्युनिस्ट पक्षात कुणीही एक व्यक्ती निर्णय घेत नाही. या पक्षात ‘पॉलिट ब्युरो’ नावाची यंत्रणा आहे. जे काही निर्णय घेतले जातात, ते हा पॉलिट ब्युरो घेतो. म्हणजे निर्णय सर्वसहमतीनं घेतले जातात असं म्हणायला हवं. पण तशी वस्तुस्थिती नाही, नसते हेच सोमनाथबाबूंविषयीच्या निर्णयातून सिद्ध झालं. प्रकाश करात हेच एकटे पॉलिट ब्युरो चालवत असावेत आणि त्यांचीच या पॉलिट ब्युरोवर एकाधिकारशाही चालत असावी. सोमनाथबाबू कम्युनिस्ट पक्षाचे निष्ठावान सदस्य असले तरी ते संसदीय परंपरेला सर्वोच्च मानणारे होते, तत्त्वनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देणारे होते. त्यामुळे ते काही या पक्षांतर्गत एकाधिकारशाहीला बळी पडले नाहीत.
तसाही कुठलाही सच्चा कॉम्रेड केवळ निवडणूक जिंकण्यासाठी सार्वजनिक जीवनात कार्यरत नसतो आणि निवडणूक हरला म्हणून त्याच्या सार्वजनिक कामाची गतीही मंदावत नाही. सोमनाथबाबूंचंही तसंच होतं. (त्यांचा तर १९८४ साली आणि तोही फक्त एकदाच निवडणुकीत पराभव झाला होता. तो ममता बॅनर्जी यांनी केला होता.)
दिल्लीच्या राजकारणात अनेक वर्षं राहून आणि इतकी वर्षं कम्युनिस्ट पक्षात राहूनही सोमनाथबाबू कधी सिनिक झाले नाहीत. हे त्यांचं दुर्दम्यपण त्यांच्या पक्षातल्या आणि पक्षाच्या बाहेरील अनेकांच्या चटकन लक्षात येणार नाही. त्यांचा पक्ष तर ‘ऐतिहासिक घोडचुका’ करण्यात माहीरच आहे. १९९६ साली ज्योती बसूंना पंतप्रधान होण्यापासून रोखून या पक्षानं जशी ‘ऐतिहासिक घोडचूक’ केली, तशीच यूपीए-२च्या काळात सोमनाथबाबूंचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सर्वसंमत उमेदवार म्हणून पुढे आणायला विरोध करून ‘ऐतिहासिक घोडचूक’च केली!
गुणवत्ता असूनही केवळ पक्षाच्या मर्यादेमुळे सोमनाथबाबूंना बऱ्याच गोष्टी मिळू शकल्या नाहीत. पण म्हणून उतारवयात अनेक कम्युनिस्ट कडवट होतात, पण सोमनाथबाबूंचं तसं काही झालं नाही, होण्याची शक्यताही नव्हती. सोमनाथ चटर्जीची पक्षावरील निष्ठा वादातीत होती. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी शिरसावंद्य मानून ते काम करत राहिले.
सोमनाथबाबू काय किंवा कॉ. ए. बी. बर्धन काय, त्यांना स्वत:बद्दल बोलायला अजिबात आवडायचे नाही. बर्धन यांनी तर त्यामुळेच अनेकांनी अनेकदा आग्रह करूनही आत्मचरित्र लिहिलं नाही ते नाहीच. सोमनाथबाबूंनी मात्र आपल्या संसदीय राजकारणाच्या आठवणी सांगणारं पुस्तकं लिहिलं.
भारतीय राजकारणात आजघडीला निष्कलंक चारित्र्य, सामाजिक नीतीमत्ता, साधी राहणी, व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, महत्त्वाकांक्षा न बाळगता निरसलसपणे आपलं काम करणं आणि तळागाळातल्या शोषितांचा कळवळा, हे फक्त कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांमध्येच दिसतं. त्यातील एक आघाडीचे नेते होते, सोमनाथबाबू!
त्यांनी ‘आदर्श लोकसभा अध्यक्ष’ कसा असतो हे भारतीय जनतेला दाखवून दिलं, तसंच आपल्या पन्नास वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत ‘आदर्श संसदपटू’ कसा असतो हेही. ते जर ‘राष्ट्रपती’ झाले असते तर ‘आदर्श राष्ट्रपती’ कसा असतो, हेही त्यांनी दाखवून दिलं असतं. आणि मग कदाचित डॉ. अब्दुल कलामांपासून राष्ट्रपतीपदाचं जे अवमूल्यन सुरू झालं, ते कदाचित निदान काही प्रमाणात तरी रोखलं गेलं असतं.
पण ते असो. जर-तरची चर्चा आता करून काही उपयोग नाही, ही गोष्ट जशी खरी आहे, तशीच ही गोष्टही तितकीच खरी आहे की, इंटरनेटवर उदंड माहिती असलेल्या भारतीय वंशाचे नोबेल विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांच्यावर लंबेचौडे लेख लिहून आपलं ‘शहाणपण’ सिद्ध करण्यापेक्षा सोमनाथबाबूंचं मोठेपण, त्यांची तत्त्वनिष्ठा यांची बूज राखणं, ही आजच्या घडीला भारतीय लोकशाहीसाठी नितांत निकडीची गोष्ट आहे!
............................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment