अजूनकाही
उदारमतवादाचे, लोकशाहीचे मूल्य खऱ्या अर्थाने जीवनशैलीत रुजलेल्या द्रष्ट्या नेत्यास पक्षीय मर्यादा कधीच आड येत नाहीत. तसेच व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात वावरताना कुठले मुखवटे चढवावे लागत नाहीत. आधुनिकतावादाच्या अंगिकाराने ज्यांची वैचारिक बैठक पक्की झालेली असते, असे लोकच लोकशाही परंपरांची जोपासना मोठ्या आत्मविश्वासाने करत असतात. त्यांच्या प्रभावाने पक्षाच्या संकुचित चौकटीही खुज्या ठरतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी हे या पक्षीय राजकारणापलीकडच्या पण अस्सल लोकशाही प्रवाहाचे पाईक होते. डाव्या पक्षात असूनही भारतीय लोकशाही, संसदीय कार्यप्रणाली आणि सर्वसमावेशक, उदारमतवादी राजकीय प्रवाहाचे प्रणेते म्हणून ओळख असणारे सोमनाथदा सोमवारी कालवश झाले अन् देश एका सच्च्या आधुनिक विचारसरणीच्या सुपुत्राला मुकला.
आधुनिक शिक्षणासह देशाप्रती समर्पणाची भावना, उदारमतवाद, सर्वसमावेशक प्रवाहाची अनिवार्यता, सह-अस्तित्व व सर्वांशी असलेला सुसंवाद अशी वैचारिक पार्श्वभूमी चटर्जी यांना त्यांच्या कुटुंबात मिळाली. त्यांचे वडील निर्मलचंद्र चटर्जी, कायदेपंडित, न्यायमूर्ती व संसदपटू म्हणून ख्यातनाम होते. अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष व काँग्रेसेतर राजकीय वर्तुळात जनसामान्यांवर प्रभाव असणारे नेते अशी त्यांची ओळख होती. घरात सर्वच विचारसरणींच्या दिग्गजांची ऊठबस, वैचारिक देवाणघेवाणीची परंपरा होती. जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी हे निर्मलचंद्रांचे स्नेही; पण त्यांची राजकीय वाटचाल सर्वसमावेशक व उदारमतवादीच राहिली.
कट्टर हिंदुत्ववादी असूनही विरोधकांशी सुसंवाद राखून असलेल्या निर्मलचंद्रांचा हा वारसा सोमनाथ चटर्जी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत चालविला. भारतातील बहुतांश साम्यवाद्यांमध्ये आढळणारी पोथिनिष्ठा, वैचारिक संकुचितता, साचेबद्धपणा आणि इतरांकडे खुल्या दिलाने पाहण्याच्या दृष्टिकोनाचा अभाव अशी लक्षणे उपजतच आधुनिक विचारांच्या चटर्जींमध्ये कधी दिसली नाहीत. स्वत:च्या पक्क्या वैचारिक बैठकीमुळे डाव्यांमधील वैचारिक गोंधळ त्यांनी सहज दूर ठेवला. याबाबत चटर्जी हेच खऱ्या अर्थाने डाव्यांमध्ये उजवे ठरले.
कोणत्याही राजकीय विचारांचा पाईक होताना सोबतच्या इतर प्रतिस्पर्ध्यांशी आपली केवळ मतभिन्नता आहे आणि आपण एका विशाल लोकशाही प्रवाहातील सहप्रवासी आहोत, हा उदारमतवादाचा मतितार्थ उमगलेल्या चटर्जी यांची संपूर्ण वाटचाल अशी अनुकरणीयच राहिली. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेच्या सभापतिपदी विराजमान होताना भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने चटर्जी यांना समर्थन दिले होते. डाव्या पक्षांतर्फे लोकसभा सभापतीपर्यंत मजल मारणारे ते पहिलेच नेते ठरले.
सर्वच राजकीय विचारांच्या नेत्यांशी सुसंवाद असणारे चटर्जी हे सर्वांनाच आदरणीय असे होते. पक्षीय अभिनिवेश दूर ठेवून भारतीय राजकीय प्रवाहात जे काही उत्तम, विधायक घडेल त्या सर्वांशी असणारी बांधीलकी त्यांना कायम मोलाची वाटली. आपल्या दैनंदिन जगण्या-वागण्यात, राजकारणातही विधायक मार्गाने विरोध करणारे, संतुलित विचारांचे चटर्जी, आपण डायहार्ट कम्युनिस्ट असल्याचे सांगत. त्यांचा हा उदारमतवाद त्यांच्या पक्षासाठी कधीच अडसर ठरला नाही, उलट पक्षाची प्रतिमा उजळेल, अशीच त्यांची भूमिका राहिली.
सर्वपक्षीय मित्रांशी असणारा सौहार्द हा त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता. त्यासाठी पक्षातून सातत्याने होणारी अनावश्यक टीकाही त्यांनी सहन केली. डाव्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सभापतिपदाचा राजीनामा देण्यास नकार देत चटर्जी यांनी संसदीय कार्यपद्धतीच्या परंपरांमध्ये भर घातली. लोकसभेचा सभापती हा त्या सभागृहाचा प्रमुख असतो. त्या पदावर असताना त्याचा पक्षीय राजकारणाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही, संसदीय कार्यप्रणालीचा गाढा अभ्यास असलेल्या चटर्जी यांनी लोकनियुक्त सभागृहाचे पावित्र्य व सर्वश्रेष्ठता निदर्शनास आणून दिली. कारण ते या आधुनिक प्रवाहाचे भाष्यकार होते.
संघराज्यवाद, केंद्र-राज्य संबंध, संसदेतील कामकाजाची अधिकृत भाषा अशा अनेक संवेदनशील विषयावर संसदेत घमासान चर्चा झडत, त्यावेळी चटर्जी ‘सभागृहात न बोलणारा एकटा सभापतीच असतो हे मान्य, पण सभागृहासाठी बोलणारा तो एकमात्र असतो’ असे सुनावत आक्रमक सदस्यांना कार्यपद्धतीचे धडे देत असत.
सौजन्यपूर्ण वर्तन, धोरणात्मक लवचिकता अंगी असलेल्या चटर्जींना पक्षाने निलंबित केले, त्या दिवसाचे वर्णन त्यांनी ‘आयुष्यातला सर्वांत दु:खद दिवस’ असे केले. सर्वपक्षीय उतावीळ नेत्यांप्रमाणे ते पक्षात फूटही पाडू शकले असते; पण संयमी, मितभाषी चटर्जी यांनी त्याबद्दल पक्षातील निकटवर्तीय सहकारी ज्योती बसू आणि पक्षाबद्दल सार्वजनिक स्तरावर एक अवाक्षरही काढले नाही. मनाचा मोठेपणा हा त्यांच्या अंगी रुजलेला उपजत संस्कारच होता.
एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला चुकीच्या वार्तांकनाबद्दल सज्जड दम भरलेल्या चटर्जी यांनी प्रत्यक्षात त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यास मात्र नकार दिला. त्याला चुकीची जाणीव करून देणे महत्त्वाचे. शिक्षा होण्यातून काहीच साध्य होणार नसते, असे सांगणारे डाव्यांतले सोमनाथदा सर्वांच्याच कायम स्मरणात राहतील.
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment