‘विश्वरूपम-२’ : कमल हासनच्या ‘चमत्कारांचा चमत्कार’!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘विश्वरूपम-२’ची पोस्टर्स
  • Sat , 11 August 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie विश्वरूपम २ Vishwaroopam 2 कमल हासन Kamal Haasan

दाक्षिण्यात्य अभिनेता कमल हासन एक बहुश्रुत कलाकार आहे. कथक नृत्यापासून इतर कलांच्या बाबतीत त्याचा हात धरणारा अन्य कलावंत क्वचितच दुसरा कोणी असू शकेल. अभिनयाबरोबरच लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीकडेही वळल्यानंतर त्यानं ‘दशावतारम’, ‘विश्वरूपम’सारखे बिग बजेट चित्रपट निर्माण केले. या चित्रपटात केवळ देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील दहशतवादाचं सध्याचं रूप दाखवण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. ‘विश्वरूपम-२’ हा सिक्वेल आहे. त्यामुळे ‘दहशतवादाशी संघर्ष’ या नावाखाली याही चित्रपटात भरपूर मारधाड, हिंसाचार पाहायला मिळतो. अर्थात त्यासाठी कोठेही तर्कसंगती नावाचा प्रकार दिसत नाही. त्यामुळे पडद्यावर जे काही चाललं आहे ते पाहणं एवढंच प्रेक्षकांच्या हाती राहतं. 

या दुसऱ्या भागात सुरुवातीला पहिल्या भागाची पार्श्वभूमी जोडण्यात आली आहे. पहिल्या भागात दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी एक दहशतवादी म्हणूनच त्यांच्या टोळीत सामील होण्यासाठी गेलेला रॉ या भारतीय गुप्तहेर संघटनेचा अधिकारी मेजर वासीम अहमद काश्मिरी (अर्थातच कमल हासन) यानं अफगाणिस्तानमध्ये जाऊन अल-कायदा गटाचा  दहशवादी ओमरच्या गटातील अतिरेक्यांची टोळी नेस्तनाबूत केली होती. मात्र त्यावेळी त्या टोळीचा म्होरक्या ओमर कुरेशी थोडक्यात बचावला होता. आता तो आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ओमरच्या टोळीकडून लंडनवर एक फार मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जातो आणि त्याचा सुगावा वासीमला लागतो. हा कट उधळून टाकण्यासाठी वासीम आपली पत्नी निरुपमा (पूजा कुमार), त्याची सहकारी अस्मिता (एंड्रिया जेरेमिया) आणि त्याचा बॉस शेखर कपूर यांच्यासह लंडनला दाखल होतो. रॉकेट हल्ला, बॉम्बस्फोट न्यूक्लिअर अॅटॅक अशा संकटांच्या मालिकांना तोंड देत तो हा दहशतवादी कट उधळून लावतो. त्यामुळे हताश झालेला ओमर आपला मोर्चा भारताकडे वळवतो आणि राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा बेत आखतो. अर्थात इथंही त्याची गाठ वासिमशी पडते आणि हा कट उधळून लावताना तो ओमर आणि त्याच्या टोळीचा खातमा करतो. 

पहिल्या भागाच्या मानानं ‘विश्वरूपम-२’ची पटकथा आणखी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा मनाला येईल तशी फिरत राहते. काही प्रसंग अमेरिकेतील आहेत, इंग्लंडमधील आहेत की, ते भारतातील आहेत, हे कळत नाही. मेहता नावाचं पात्र वासीमच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या जीवावर उठलेलं असतं. त्याचं नेमकं कारण कळत नाही. अर्थात या प्रकरणात मेहताचा  बळी पडतो, ही गोष्ट वेगळी. मात्र त्याची देशद्रोही भूमिका कशासाठी असते, ते स्पष्ट होत नाही. त्यानेच घडवून आणलेल्या हल्ल्यात मोटारीतून जात असलेले वासिम आणि त्याचे सहकारी ज्या पद्धतीनं वाचतात, त्याला ‘चमत्कारांचा चमत्कार’ म्हटला पाहिजे. असे अनेक ‘चमत्कारांचा चमत्कार’ नंतरही पडद्यावर पाहायला मिळतात. (यासंदर्भात जॅकी चेनच्या चित्रपटाची तीव्रतेनं आठवण होते. त्याच्या चित्रपटात अनेक गुंड किंवा अतिरेकी यांच्या हल्ल्यातून तो ज्या पद्धतीनं स्वतःची सुटका करून घेतो ती सर्वांनाच पटते.)

चित्रपटाचा शेवटच्या प्रसंगात ओमरनं वासिमच्या मानेला बॉम्ब लावलेला असताना आणि तो उडवण्यासाठी त्याला अवघ्या चाळीस सेकंदाचा टायमर दिलेला असताना वासीम जे काही कारनामे करतो, त्याला खरंच तोड नाही! कारण एकूणच या चित्रपटात नायकाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही वारंवार बिंबवलं गेलं आहे. अर्थात हे सारं पाहताना अतिशय बटबटीत अशा हिंसाचाराचं क्रौर्यही पाहायला मिळतं.  

चित्रपटात विनोद निर्मिती हवी म्हणून वासिम, पूजा आणि अस्मिता यांच्यातील संवादांमध्ये किरकोळ पद्धतीच्या विनोदाचं दर्शन घडतं. मात्र त्यामुळे अतिरेकी विरोधी मोहिमेवर जात असलेल्यांना असे विनोद सुचतातच कसे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तसंच  मूळ नाव विश्वनाथ असलेल्या वासिमचे आणि त्यासाठी स्मृतिभंश झालेल्या त्याच्या आईचे (वहिदा रहमान) काही प्रसंग केवळ भावनिकता निर्माण करण्यासाठीच वापरले गेले असावेत हे लक्षात येतं. 

चित्रपटात वेगवेगळ्या ठिकाणची रम्य लोकेशन्स तसंच भरपूर मारधाड आणि अॅक्शनचा मालमसाला आहे. शिवाय हा मसाला कमी पडू नये म्हणून गाणीही आहेत. कमल हासननं वासिमची भूमिका करताना ‘अॅक्शन’ची आपली सर्व हौस भागवून घेतली आहे असं म्हणावं लागेल. पूजा कुमार आणि एंड्रिया जेरेमिया या नव्या अभिनेत्रींनीं त्याला चांगली साथ दिली आहे. तर राहुल बोस हा केवळ भयानक चेहऱ्यामुळे लक्षात राहतो. शेखर कपूर, जयदीप एहलावत यांचीही कामं ठीक झाली आहेत. थोडक्यात ‘विश्वरूपम-२’ हा चित्रपट सबकुछ ‘कमलरूपम’ आहे. तुम्ही कमल हासनचे चाहते असाल, तर कदाचित तुम्हाला तो आवडू शकेलही! 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख