आज जी समकालीन कविता लिहिली जाते, त्यात षांतारामांची कविता बेमालूम मिसळून जाऊ शकते!
ग्रंथनामा - झलक
सतीश तांबे
  • षांताराम पवार आणि त्यांच्या ‘कळावे’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 11 August 2018
  • ग्रंथनामा Granthanama झलक षांताराम पवार शांताराम पवार Shantaram Pawar कळावे Kalave सतीश तांबे Satish Tambe मौज प्रकाशन गृह Mouj Prakashan Gruh

चित्रकार षांताराम पवार यांचा ‘कळावे’ हा कवितासंग्रह जुलै २०१७मध्ये मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केला आहे. या कवितासंग्रहाला कथाकार सतीश तांबे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश.

............................................................................................................................

षांताराम पवार हे नाव मराठी कलाक्षेत्राशी संबंधित असलेल्या मंडळींना चांगलंच परिचयाचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतील अनेक पुस्तकांच्या त्यांनी चितारलेल्या मुखपृष्ठांनी त्यांच्या खास ‘षांताराम टच’मुळे जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं. साहजिकच त्यांची ओळख बव्हंशानं आहे ती चित्रकार म्हणून. मात्र षांताराम जसं कुंचल्यानं व्यक्त होतात, तसंच लेखणीनंही व्यक्त होऊ शकतात, हे सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांचा ‘कळावे लोभ असावा ही विनंती’ नावाचा एक कवितासंग्रह प्रकाशित होऊनही तुलनेत कमी मंडळींना ठाऊक आहे. त्यानंतरही त्यांच्या कविता अधनंमधनं इथंतिथं प्रकाशित होतच असतात, जसं की गेल्या अनेक वर्षांपासून ‘अक्षर’ दिवाळी अंकाची सजावट जशी ते करतात, तशीच त्यांची एक कविताही बहुतांश अक्षर दिवाळी अंकांत प्रसिद्ध होत असते. २००९ सालात तर त्यांच्या कवितांचं एक साप्ताहिक सदरच ‘आपलं महानगर’मध्ये चालू होतं. असो.

षांताराम पवारांच्या कवितेच्या खाली त्यांचं नाव लिहिलेलं असतं ते ‘षांताराम’ असं. षांताराम पवारांना जे ओळखतात त्यांना त्यांचा हा अपभ्रंशच योग्य वाटेल. याचं कारण असं की, षांताराम या शब्दात जो ‘शांत आणि आराम’ या शब्दांचा संधी आहे, त्यातील ‘शांत’ हा शब्द त्यांना त्यांच्या प्रकृतीशी मिळताजुळता वाटत नसावा. षांताराम पवारांच्या आचारविचारात एक रसरशीतपणा आहे. त्यामुळे ‘शांत’ या शब्दातून ध्वनित होणारा मिळमिळीतपणा त्यांना मान्य नसावा. शिवाय त्यांना सतत काहीतरी करावंसं वाटतं. त्यामुळे ‘आराम’देखील त्यांच्या प्रकृतीला साजेसा नव्हे. तेव्हा आपल्या नावावरून आपल्यावर काहीतरी भलतं बालंट येऊ नये म्हणून त्यांनी आपलं आपणच ‘षांताराम’ असं नामांतर केलं असावं.

या संग्रहाच्या मुखपृष्ठावरही त्यांनी ‘इति षांताराम’ असं लिहिलं आहे. षांताराम यांचं कवित्व मुखपृष्ठापासूनच आपलं वेगळेपण दर्शवतं. एरवी सर्वसाधारणपणे ‘पांढऱ्यावर काळे’ हा शब्दप्रयोग रूढ आहे, परंतु षांतारामांनी आपल्या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठासाठी कुळकुळीत काळा रंग योजला आहे आणि त्यावर ‘कळावे’ ही अक्षरं पांढऱ्याशुभ्र रंगात ठसठशीतपणे लिहिली आहेत. त्यात पुन्हा शीर्षक सर्वसाधारणपणे जसं आडवं लिहिलं जातं आणि त्याखाली लेखक/कवीचं नाव; तशी पारंपरिक मांडणी इथं करण्यात आलेली नाही. तर ‘क ळा वे’ ही तीन अक्षरं उभी लिहिण्यात आली आहेत. त्यातही ‘वे’ हे शेवटचं अक्षर ‘क’ आणि ‘ळा’ सारखे सरळसोट न लिहिता ते घड्याळ्याच्या काट्यांच्या भ्रमणाच्या उलट्या दिशेनं कलंडवण्यात आलं आहे. आता आपली नजर सर्वसाधारणपणे सरावलेली असते ती घड्याळ्याच्या काट्यांच्या भ्रमणाच्या दिशेला, ज्यामुळे ‘कळावे’ हे शीर्षक पाहताक्षणीच काहीतरी तिरपागडेपणाची चाहूल दृक्-संवेदनेतून लागते. पुन्हा कवीचं नाव ‘शांताराम/षांताराम पवार’ असं न लिहिता ‘षांताराम’ एवढंच लिहिलं आहे. त्याला पुन्हा ‘इति’ या संस्कृत शब्दाची जोड देऊन त्यांनी आपल्या म्हणण्याला जो भारदस्तपणा आणला आहे तो वेगळाच!

‘कळावे लोभ असावा ही विनंती’ या पहिल्या संग्रहानंतर षांतारामांनी या संग्रहाचं शीर्षक ठरवताना कोणतीही विनंतीच केलेली नाही. वाचणाऱ्याचा लोभ असेल/ नसेल, त्याची फारशी तमा न बाळगता त्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि त्यांचं ते सांगणं ‘हट के’ असल्याची जाणीव ते करून देतात ‘कळावे’ या शीर्षकाच्या शेजारी ‘इति षांताराम’ हे शीर्षासनात मांडून! एरवी कवीचं नाव हे आडवं सरळसोट लिहिलेलं असतं. पण षांतारामांचा खाक्याच वेगळा आहे. हा कवी काहीतरी वेगळे ‘कळवू’ इच्छितो, हे मुखपृष्ठ पहाताक्षणीच मनावर कोरलं जातं.

कोणतंही पुस्तक -विशेषत: कवितांचं पुस्तक- हाती आलं की आपण तडक पहिल्या पानापासून वाचायला घेत नाही तर आधी ते सहजपणे पुढेपाठी चाळतो. त्या चाळण्यात ‘काही पानं/ ओळी’ आपल्या नजरेत भरतात. ‘कळावे’चं याबाबतीतलं वैशिष्ट्य असं की, या पहिल्याच फेरीत वाचकाची नजर दर पाच-सात पानानंतर आपसूकच थबकते ती मांडणीच्या दृष्टीने वेगळ्या असलेल्या कविता पाहून, ज्यामध्ये अक्षरलेखनाचे अत्यंत विचारपूर्वक प्रयोग केलेले आहेत. या कवितांमध्ये जी मांडणी आहे त्यात एक ‘उभट आयताकृती चौकट’ योजलेली आहे, जी ‘कळावे’ या मुखपृष्ठावरील अक्षरलेखनातूनही जाणवते. एरवीच्या अक्षरांपेक्षा बऱ्याच मोठ्या आकाराची ठसठशीत अक्षरे आणि साधलेला लक्षवेधक आकृतिबंध यामुळे वाचक या कविता वाचायला आपोआपच सुरुवात करतो.

या सर्व कविता एकपानी आहेत, मात्र त्यामध्ये असे काही खटके आहेत की, वाचणाऱ्याने थक्कच व्हावं. वानगीदाखल एकाच कवितेतील शब्दयोजना वाचा. ती अशी आहे :

‘ये रे ये रे माणसा

तुला देतो पैसा,

माणूस आला खोटा

पैसा झाला मोठा’

साहजिकच चाळता चाळता वाचल्या गेलेल्या या मेन कोर्सआधीच्या स्टार्टर कविता वाचून वाचकाला षांतारामांच्या ‘चैत्रिक’ संवेदनशीलतेची आपोआपच तोंडओळख होते. 

कवितेचा क्रमांक न देता पानपूरकासारख्या वा सजावट स्वरूपात योजलेल्या या कवितांमुळे षांताराम यांचा ‘कळावे’ हा संग्रह मराठीतील एक प्रायोगिक संग्रह ठरतो, हे निश्चित. किंबहुना या कवितांना षांतारामांनी ज्याअर्थी क्रमांक दिलेले नाहीत त्याअर्थी एक तर ते या कवितांना कवितांमध्ये गिनत नसावेत, तर त्या त्यांना अर्धनारीनटेश्वराप्रमाणे ‘अर्धचित्री कविता’ वाटत असाव्यात. पण या ‘चीजा’ हे षांतारामांचं मराठी कवितेला मोलाचं योगदान ठरणार आहे, कारण अक्षरलेखनातून कवितेचं अवकाश विस्तारण्याचे वा सुस्पष्ट करण्याचे प्रयत्न मराठीत आजवर क्वचित कधी झालेले असले तरी ते तुरळकच होते. एवढ्या ठसठशीतपणे व ठळकपणे हे प्रथमच घडत आहे.

अर्थात या कवितांना क्रमांक न देण्यामागे अशीही एक शक्यता संभवते, ती अशी की या कवितांच्या आयोजनातून ‘षांताराम’ आपली स्वत:ची चित्रकार ही मूळ जातकुळी आपल्याला जास्त महत्त्वाची असल्याचं अधोरेखित करत असावेत. तसं असेल तर ठीकच आहे. याचं कारण असं की कवितेतील अक्षरलेखनाचा हा प्रयोग केवळ चित्रकारच करू जाणोत!

‘कळावे’ या संग्रहातून षांतारामांच्या अक्षरकविता एवढ्या संख्येनं आणि विविधतेनं वाचकांच्या व पर्यायानं कवींच्याही सामोऱ्या आल्या आहेत की, कवितेच्या ‘रूप’ जाणिवेवर त्यांचे संस्कार होणं अपरिहार्यच आहे. या कविता हा षांतारामांचा सवतासुभा असल्यानं काही जाणकारांना तर षांतारामांच्या कवितांच्या पिकातील ही नैसर्गिक उगवणच अधिक लक्षवेधी वाटण्याची शक्यता आहे. आणि यापैकी बहुतांश कविता या त्यातून व्यक्त होणारे जाणवून घेण्याच्या दृष्टीनं एवढ्या संपन्न आहेत की, ‘कळावे’ हाती आल्यानंतर हे होणं अपरिहार्यच आहे. उभा आयताकार सोडला तर यातील प्रत्येक कविता ही मांडणीच्या दृष्टीनं स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे आणि भाषा व चित्र या दोन्हींची सांगड घालत षांतारामांची जीवनाकडे पाहण्याची कलाजाणीव कशी घडली असावी ते या कवितांमधून नीटपणे जाणवते.

या सर्वच कविता कमी शब्दांच्या आहेत, मात्र त्यांची अशी वेगळी मांडणी करताना केवळ त्यांचा आटोपशीरपणा हाच निकष नाही हे ‘कळावे’मध्ये सुमारे तेवढ्याच कमी आटोपशीर आकारांच्या, संख्येनं साधारणपणे तेवढ्याच असलेल्या कविता वाचून कळतं. या कवितांचं वेगळेपण असं आहे की, त्या ‘कळावे’तील अन्य कवितांसारख्या कुणा विशिष्टाला संबोधणाऱ्या नाहीत तर ‘to whom so ever it may concern’ प्रकारचे जीवनानुभव मांडणाऱ्या आहेत. या कवितांमध्ये जे शब्दांतून व्यक्त होतं त्याला षांताराम मांडणीतून अधिक ठाशीव स्वरूपात सामोरं ठेवतात. जसं की, तुमच्याआमच्या बहुतेकांच्या वागण्याबोलण्यात असलेला आणि तरीही इतरांच्या बाबतीत मात्र तुम्हाआम्हाला खटकणारा असा जो ‘मी’पणा आहे त्यासंबंधी असलेली ही कविता वानगीदाखल पहा :

‘स्वत:भोवती फिरतो मी

भोवरा मी

गहिरा मी

गिरवतो मला मी

गढून जातो माझ्यात मी’

ही शब्दयोजना मांडताना त्यांनी ‘मी’ या शब्दाचा आकार तुलनेत बराच मोठा योजून आणि प्रत्येक ओळीतील अन्य शब्दांचा ‘मी’ शब्दाभोवती वेढा घालून या कवितेला जे रंगरूप बहाल केलं आहे, ते ‘मी’पणाच्या वर्मावर अधिक नेमकं बोट ठेवतं. तसंच कवितेला अधिक अर्थघनता बहाल करतं. वाचकाला अंतर्मुख बनवतं.

असंच आणखी एक उदाहरण द्यावंसं वाटतं ते या कवितेचं :

‘मी तुला    

आंथरले

तू मला

पांघरले

अंगांग

बिथरले

एकमेका

नांगरले

अवघे सारे मंतरले’

वास्तविक पाहता ही शब्दकळा संभोगाच्या क्रियेचं मिताक्षरी वर्णन आहे, एवढंच. शब्दकळेचा विचार करता यातील कवितापण तसं जेमतेमच आहे, पण षांताराम या शब्दांना मांडणीची जी जोड देतात त्यामुळे ही कविता केवळ संभोगाच्या क्रियेचं वर्णन करण्याएवढी सीमित राहात नाही, तर ‘संभोगत्व’ टिपण्यापर्यंत उंच भरारी घेते. षांताराम यात करतात काय तर ‘आंथरले, पांघरले, बिथरले, नांगरले’ हे कृतिदर्शक शब्द आकारानं मोठे करून कर्त्यांपेक्षा क्रियेचं असलेलं ठळकपण मुळात अधोरेखित करतात आणि जोडीला या चार क्रियावाचक शब्दांवरची शीर्षकरेषाही ते उडवून टाकतात. त्यामुळे ते ‘वस्त्र’ हा शब्द कुठेही न आणताच या क्रियेतील कर्त्यांचं विवस्त्रपण सूचित करतात. आणि मग जाणवतं की ‘एरवी कपड्यांनी झाकलेले देह विवस्त्र होतात’ हाच संभोगातील महत्त्वाचा भाग असल्याचं कवी आपल्याला दर्शवून देतो आहे. ज्याचं आपल्याला ती क्रिया परिचयाची असूनही भान असतंच असं नाही! या चार शब्दांचा फाँटसाइज जर अन्य शब्दांएवढाच असता आणि या चारही शब्दांवर जर शीर्षकरेषा असत्या तर ही कविता कदाचित कविता म्हणून गणलीही गेली नसती. याउलट ‘अवघे सारे मंतरले’ या शेवटच्या ओळीत षांताराम या तीनही शब्दांवर -एरवी शब्दागणिक असते तशी वेगळी रेषा न देता- एकच अखंड रेषा देऊन संभोगानंतर येणारी म्लानता सूचित करतात. शिवार ‘मंतरले’ हे क्रियापद ते आधीच्या चार क्रियापदांसारखं मोठं करून मांडत नाहीत. संभोगानंतरच्या थकव्यामुळे म्हणा किंवा तृप्तीमुळे म्हणा, पण हे क्रियापदही आता शांत झालं आहे जणू काही!

षांतारामांच्या या सर्वच ‘अर्धचित्री कवितांच्या’ खजिन्यात त्यांच्या चित्रजाणिवेतून शब्दांना अर्थाची जोड आणि आशयाला वेगळी परिमाणं बहाल करणारं खूप काही दडलेलं आहे. कवितेची मांडणी करताना शब्दांची आकारमानं, वळणं, स्थानं यांचा सर्वांगीण विचार करून त्यांनी आपला अवकाश खूपच समृद्ध केला आहे. या कविता वाचल्यानंतर कळतं की, षांतारामांचं चित्रनिगडित भान हे सर्वसाधारणपणे ज्याला दृक्-संवेदना असं म्हटलं जातं त्यापेक्षा काहीसं वेगळं आहे. तो वेगळेपणा लक्षात घेऊनच त्यांच्या संवेदनेसाठी मी ‘चैत्रिक’ हा शब्द योजला आहे. ही संवेदनशीलता कवितेच्या प्रांतात तशी विरळा आहे.

‘कळावे’मध्ये काही कविता या निखळपणे चैत्रिक संवेदनशीलतेच्या म्हणाव्या अशा आहेत. जसं की ‘हरण’, ‘देहावसान,’ ‘दिवस’ वगैरे कविता. ‘कळावे’तील अनेक कवितांमध्ये आरशांचा उल्लेख येतो तेदेखील चैत्रिक संवेदनशीलतेचीच प्रचिती देणारं आहे.

यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की, षांताराम हे मूलत: जरी चित्रकार असले तरी सुरुवातीला ते पेशाने कला-अध्यापक होते, तसेच उमेदीची काही वर्षं त्यांनी जाहिरातक्षेत्रातही आपल्या अंगची कला पणाला लावली होती. अध्यापन आणि विशेषत : जाहिरात क्षेत्रामध्ये केवळ स्वान्त:सुखाय कलानिर्मिती करता येत नसते, तर तिथं लोकांना मनवणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी लोकांशी संवाद साधणं ही मूलभूत गरजच ठरते. षांतारामांच्या कवितेत हा लोकांशी चाललेला संवाद सतत जाणवतो. षांतारामांची कविता ही सतत कुणाला तरी संबोधून असते.

षांतारामांची कविता ही मूलत: एक उत्स्फूर्त उदगार आहे, ज्यात ‘ऐशी कळवळ्याची जाती’ म्हणतात, त्याच धर्तीवर ‘ऐशा उमाळ्याच्या पंक्ती’ आपल्याला कवितेगणिक सापडतात. ते कधी एखाद्या स्त्रीला उद्देशून काही बोलतात, कधी परमेश्वराला, सूर्यदेवांना, कधी आम जनतेला तर एखाद्या कवितेत चक्क सचिन तेंडुलकरला किंवा लीना या आपल्या दिवंगत पत्नीलाही! ते जवळपास प्रत्येकच कवितेत आपल्या ‘कळावे’ ब्रीदाला जागलेले आहेत. या संग्रहात संख्येच्या दृष्टीनं सुमारे एक-तृतीयांश असणाऱ्या प्रेमकवितांमध्ये तर हे विशेषत्वानं जाणवतं. त्यातील काही कवितांमध्ये चक्क ‘गोरीसखी!’ असं थेट संबोधनच अवतरतं.

षांतारामांच्या कवितेचं रूपाबाबत चटकन जाणवणारं आणखी एक वैशिष्ट्य असं की, या कवितांना शीर्षकं नाहीत. मात्र त्यांच्या प्रत्येक कवितेत एखादा शब्द हा त्यांनी ठळक म्हणजेच ‘बोल्ड’ केलेला आहे. तो भले शीर्षक म्हणून चपखल नसेलही, पण षांतारामांना त्यातील जे काही ‘कळावे’ असं वाटतं ते व्यक्त करण्यासाठी कामाचा आहे. हा काही फार सघन प्रयोग नसला तरी याचा चटकन पूर्वाधार सापडायची शक्यता तशी कमीच असावी.

तर षांतारामांच्या चैत्रिक संवेदनशीलतेची अशी दृश्यात्मक दखल घेऊन आता आपण ‘कळावे’तील कवितांकडे वळूया. ‘कळावे’तील सुमारे दोन-तृतीयांश कविता या सामाजिक संदर्भ असलेल्या आहेत. आपल्या आसपास जे काही व्यवहार चालू असतात त्या सर्वांचाच आपल्यावर काही ना काही परिणाम होत असतोच. त्यातही कलाकाराच्या संवेदनशीलतेचं वैशिष्ट्य असं असतं की, तिला सुखही दुखू शकतं, तर दु:खाची काय कथा? (शांतारामचं ‘षांताराम’ केलं जातं ते त्यामुळेच ना?)

आता साधी गोष्ट घ्या की, मुंबापुरीची दिवसेंदिवस जी बजबजपुरी होत चालली आहे, त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस हा थोड्याबहुत प्रमाणात अस्वस्थ असतोच. षांतारामांमधील चैत्रिक संवेदनशीलता या बदललेल्या मुंबईकडे एक दृश्य म्हणून बघते. त्यामुळे त्यांना झोपडपट्टी ही चक्क ‘रूखवता’सारखी दिसते.

आपल्या आसपास जे घडत असतं त्याबद्दल षांतारामांची कविता ही बव्हंशाने नाराजीच व्यक्त करते. मात्र या सामाजिक आशयाच्या कविता त्यांच्या चैत्रिक संवेदनेला खटकलेल्या गोष्टी जरी मांडत असल्या तरी त्यात कुठेतरी दूरस्थपणा जाणवतो, जो पुसला जातो त्यांच्या स्त्री-पुरुष संबंधांवरील कवितांमध्ये.

‘कळावे’मध्ये स्त्रीला संबोधून असलेल्या अनेक कविता आहेत. मात्र या कविता या मराठीतील एकूण प्रेमकवितांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत, त्या अशा अर्थी की, त्यात सुप्त शारीर अभिलाषांची लपवाछपवी आणि त्या अनुषंगानं येणारी अव्वाच्या सव्वा भावनिकता तुलनेमध्ये खूपच कमी आहे. षांतारामांची प्रेमकविता ही शारीर पातळीवर मोकळेपणे व्यक्त व्हायला अजिबात कचरत नाही. याचं कारण हेच आहे की, ते शारीर संबंधांतील चैत्रिकता महत्त्वाची मानतात. शिवाय त्यांच्या कवितेतील स्त्रियादेखील स्त्री-पुरुष संबंधातील शारीरतेला न कचरणाऱ्या आहेत. पु.शि. रेग्यांच्या नंतर दिलीप चित्रे आणि नामदेव ढसाळ वगळता अशी शारीरता मराठी कवितेत अभावानेच दिसते. आणि कवितांच्या संख्येतील शारीरतेचं प्रमाण लक्षात घ्यायचं तर षांतारामांच्या कवितेतील शारीरता काहीशी जास्तच आहे.

त्यातही षांतारामांच्या कवितेतून त्यांचे स्त्रीबरोबरचे जाणवणारे संबंध हे ‘दोन देत दोन घेत’ प्रकारचे असल्याचं जाणवतं. या कवितांमधील स्त्री ही मराठी कवितांमध्ये विरळा आहे. तसंच या कवितांचं असंही वेगळेपण आहे की, स्त्रीकडून झालेली आपली अवहेलना मांडायला ही कविता अजिबात कचरत नाही. ‘कळावे’तील सुरुवातीच्या कवितेपासूनच षांतारामांच्या कवितांमधील स्त्री-पुरुष संबंधांचं वेगळेपण जाणवतं.

पुरुषांची प्रवृत्ती ही सहसा आपली मर्दुमकी मिरवण्याकडे किंवा आपल्या शल्याचं कौशल्यानं प्रदर्शन मांडून सहानुभूती मिळवण्याकडे असते. स्त्रीकडून आपण नाकारलं गेल्याचं सहसा कुणी सांगत नाही. त्यात त्याच्या पुरुषी अहंकाराला कुठेतरी धक्का लागतो. जो त्याला नकोसा वाटतो. षांतारामांच्यात मात्र असा एक विरळा उमदेपणा आहे की, ते मुळात आपल्या भावनेतला शारीर रांगडेपणा लपवत नाहीत की, आपण झिडकारले गेल्याचंही सांगायला कचरत नाहीत.

‘कळावे’तील कवितांमधील स्त्रिया आणि अर्थातच त्यांच्याबरोबरचे स्त्री-पुरुष संबंध हे मुलुखावेगळे आहेत. या कवितांमध्ये जशी कुणी ‘गोरीसखी’ म्हणून तीन-चार कवितांमध्ये उल्लेख आलेली; कविता करणारी आणि वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा, शिकारी कुत्रा, राजबिंडा घोडा, कोंबडा अशा प्राण्यांच्या तोलामोलाच्या तालेवार पुरुष मंडळींच्या गराड्यात रमणारी स्त्री आहे, तशीच ‘बाई’चा उच्चार ‘बै’ असा करणारी कुणी साधीसुधी शादीशुदा स्त्रीदेखील आहे. या ‘बै’च्या तीन छोटेखानी कविता या रासवट, रांगड्या शृंगाराचा इरसाल नमुना आहेत.     

‘कळावे’तील बऱ्याचशा कविता या प्रेमाच्या आठवणींच्या आहेत, पण त्यात विलक्षण खिलाडूपणा आहे. कुठलंही रडगाणं नाही. सहानुभूती मिळवायचा प्रयत्न नाही की लपवाछपवी नाही. यातील बहुतांश कविता या आटोपशीर आकाराच्या आहेत. बऱ्याचशा कविता तर चार-पाच ओळींच्याही आहेत. पण मराठीत गाजलेल्या चारोळ्यांपेक्षा त्या कितीतरी सकस आहेत.

‘कळावे’तील बहुतांश ‘स्त्रीपुरुष संबंधां’वरील कवितांमधील शारीर वर्णनं ही चैत्रिक संवेदनशीलतेचं दर्शन घडवणारी आहेत. त्यामुळेच त्यामध्ये प्रणयाचा शृंगारिक भाग जेवढ्या विस्तृत प्रमाणात आला आहे, तेवढा मानसिक भाग आलेला नाही, हे देखील या कवितांचं एक वेगळेपण आहे. अर्थात ‘कळावे’तील सामाजिक आशयाच्या कवितांपेक्षा स्त्रीपुरुष संबंधांच्या कविता या जास्त उत्कट वाटतात आणि त्यामुळेच मराठीतील प्रेमकवितांच्या शारीर भागामध्ये त्यांचं योगदान हे खचितच लक्षणीय ठरावं.

षांतारामांच्या कवितेचं आवर्जून दखल घ्यावी असं आणखी एक वैशिष्ट्य असं की, त्यामध्ये बेगडीपणाचा, कृतकपणाचा लवलेश नाही. म्हणजे असं की, बऱ्याचशा कविता वाचताना ही कवीची खरोखरची अनुभूती आहे की, भाषेनं नादावल्यामुळे केलेली शाब्दिक आतषबाजी आहे, अशी शंका उभी रहाते, तसं षांतारामांच्या कविता वाचताना सहसा होत नाही. याचं कारण असं की त्यांची कविता ही उत्स्फूर्त उदगारातून साकारते. त्यात घडवलेपणाचा भाग जवळपास नाहीच. त्यामुळेच त्यांची कविता ही झिलई लावलेली नाही. परिणामी त्यात सफाईदारपणा कमी जाणवतो खरा, पण त्यांच्या या कच्चेपणातच त्यांच्या कवितेचं सच्चेपण दडलेलं आहे. विशुद्ध कविता म्हणता येतील अशा कवितांचं प्रमाण या उदगारांमधून साकारलेल्या काहीशा ओबडधोबड वळणाच्या कवितांमध्ये विरळा आहे.

षांतारामांची कविता ही मूलत: विधानांची कविता आहे, जिला आपण त्यांचा स्वच्छंद असं म्हणू शकतो! या कवितेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की, या कविता वाचताना त्यांचं वय जाणवत नाही. आज जी समकालीन कविता लिहिली जाते, त्यात षांतारामांची कविता बेमालूम मिसळून जाऊ शकते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

.............................................................................................................................................

लेखक सतीश तांबे मराठीतील प्रसिद्ध कथाकार आहेत.

satishstambe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......