पुस्तकाला आणि प्रेमाला... दोघांनाही जात नसते!
सदर - चैत्यभू'मी'तला 'मी'!
कीर्तिकुमार शिंदे​
  • ‘गौतम बुक सेंटर’चे सुलतानसिंह गौतम आणि ‘नवयानचे ’एस. आनंद
  • Sat , 03 December 2016
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar सुलतानसिंह गौतम Sultan Singh Gautam गौतम बुक सेंटर Gautam Book Center नवयान Navayana एस. आनंद S. Anand

यंदाचा सहा डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६०वा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने हे विशेष सदर, चैत्यभू'मी'तला 'मी'! आजपासून ६ डिसेंबरपर्यंत रोज हे सदर प्रकाशित होईल. हे सदर पत्रकार, प्रकाशक कीर्तिकुमार शिंदे लिहीत आहेत. विविध चळवळींतील कार्यकर्त्यांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असून राजकीय विषयांवरही त्यांनी लेखन केलेलं आहे. ६ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर घडणाऱ्या फिनॉमेननचं विविधांगी दर्शन घडवणारं हे सदर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन प्रचंड होतं. त्यांना उत्तमोत्तम पुस्तकं जमा करणं आणि ती वाचणं यांशिवाय दुसरं कोणतंही व्यसन नव्हतं. त्यांच्या प्रत्येक चरित्रलेखकाने त्यांचं हे पुस्तकांचं व्यसन आवर्जून ठसठशीतपणे नमूद केलेलं आहे. कदाचित हेच कारण असेल की, बाबासाहेबांना मानणारा प्रत्येक जण, मग तो त्यांच्या जाती-धर्मात जन्माला आलेला असो वा त्यांना वैयक्तिक पातळीवर विचारवंत म्हणून आदर्श मानणारा असो, तो पुस्तकप्रेमी असतोच असतो. सहा डिसेंबर हा दिवस त्याच्यासाठी जसा ‘महापरिनिर्वाण दिन’ असतो, तसा पुस्तक खरेदीचाही दिवस असतो. जे लोक नियमितपणे सहा डिसेंबरला चैत्यभूमीला किंवा दादर परिसरात येत असतील त्यांनी तिथं नेहमीच पुस्तकांची विक्री करणारे शेकडो स्टॉल्स, लहानमोठे विक्रेते पाहिले असतील. यातील बहुतेक विक्रेते हे मराठी पुस्तक विक्रेते असतात. शिवाजी पार्कवर जे स्टॉल असतात, त्यात अगदी मोजकेच, दोन-तीनच स्टॉल हे हिंदी आणि इंग्रजी पुस्तक विक्रेत्यांचे असतात. नवी दिल्लीच्या गौतम बुक सेंटरचे सुलतानसिंह गौतम हे त्यांमधलं एक प्रमुख नाव.

१९९४ पासून गौतमजी आंबेडकरी-दलित साहित्य प्रकाशन व विक्रीच्या व्यवसायात आहेत. त्यापूर्वी दोनेक वर्षं आधी ते दिल्लीतल्या एका आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात गेले होते. तिथं त्यांना केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आंबेडकरी विचारधारेची पुस्तकं आढळली. त्यांना धक्काच बसला. तिथंच त्यांनी आपण आंबेडकरी साहित्याचे विक्रेते बनायचं, असा निश्चय केला. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी प्रकाशनालाही सुरुवात केली. सुरुवातीला हिंदी आणि पाठोपाठ इंग्रजी पुस्तकं प्रकाशित करण्याचा त्यांनी धडाका लावला. गेल्या २० वर्षांत गौतमजींनी दलित समाजाशी संबंधित, बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित अशी अक्षरश: शेकडो पुस्तकं हिंदी व इंग्रजीत प्रकाशित केली आहेत. वीसेक पुस्तकांचं लेखन-संपादनही केलंय. नवी दिल्लीतल्या शहादरा भागातल्या एका चिंचोळ्या गल्लीतलं त्यांचं ‘गौतम बुक सेंटर’ हे आता देश-विदेशातल्या आंबेडकरी साहित्याच्या अभ्यासकांसाठी एक हक्काचं ठिकाण बनलं आहे. 

गौतम बुक सेंटरची पुस्तकं

दरवर्षी नागपुरात दीक्षाभूमीवर आणि मुंबईत चैत्यभूमीवर ते त्यांची सर्व पुस्तकं घेऊन हजर असतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या मुलानेही या घरच्या व्यवसायात चांगलं लक्ष घातलं आहे. हे दोघे बाप-लेक देशातल्या प्रत्येक प्रमुख राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात आवर्जून सहभागी होतात. महाराष्ट्रात आंबेडकरी, विद्रोही साहित्याची विक्री-प्रकाशन करणारे बहुतेक जण जरी बौद्ध असले तरी उत्तर भारतात म्हणजे, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये अशा साहित्याची विक्री-प्रकाशन करणारे बहुतेक जण चमार आहेत. (कारण तिथल्या समाजव्यवस्थेत महार जात नाही.) सुलतानसिंह गौतम हेसुद्धा चमारच. नागपूरच्या दीक्षाभूमीवर तीनेक वर्षांपूर्वी ते मला भेटले होते, तेव्हा त्यांनी हा मुद्दा सांगितला होता. गौतमजींनी आंबेडकरी साहित्याच्या प्रचार व प्रसारात एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. उत्तर भारतात त्यांच्यासारखे इतरही दोन-तीन मोठे विक्रेते-प्रकाशक आहेत. 

आंबेडकरी इंग्रजी साहित्य प्रकाशनाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून चमकलेलं, तळपलेलं आणखी एक नाव आहे- एस. आनंद. त्यांचं नाव सर्वसाधारण मराठी वाचकाला माहिती आहे की, नाही याबाबत मी साशंक असलो तरी पुरोगामी, विशेषत आंबेडकरवादी साहित्याच्या वाचकांना, त्यातही आंबेडकरवादी इंग्रजी पुस्तकांचं नियमित वाचन करणाऱ्यांना एस. आनंद निश्चितच परिचयाचे आहेत. एस. आनंद हे नवयान ही प्रकाशन संस्था चालवतात. 

नोव्हेंबर २००३मध्ये डी. रवीकुमार यांच्यासोबतीने त्यांनी नवयानची स्थापना केली. जातीयतेला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या १३ वर्षांत या प्रकाशनाने जात संकल्पनेवर, जातीय विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेवर कठोर टीका करणारी अनेक दर्जेदार इंग्रजी पुस्तकं प्रकाशित केली आहेत. एस. आनंद आणि त्यांच्या प्रकाशन संस्थेचा आणखी सविस्तर परिचय करून देण्याआधी तिच्या लोगोची, बोधचिन्हाची कहाणी जाणून घेणं अधिक उदबोधक ठरेल.

दोन गाई किंवा बैल एकमेकांचे चुंबन घेताहेत, असं चित्र असलेला नवयानचा लोगो आहे. या लोगोत दडली आहे एका शी-बफेलो (म्हैस) आणि ही-बफेलो (रेडा) यांची प्रेमकहाणी. अरविंद मळगट्टी यांच्या 'गव्हर्नमेंट ब्राह्मण' या आत्मचरित्रात ही अजब प्रेमकहाणी आहे. अरविंद यांना त्यांच्या आजीने ही गोष्ट सांगितली होती. एक 'दलित म्हैस' म्हणजे दलित व्यक्तीकडे असलेली म्हैस आणि एक 'ब्राह्मण रेडा', म्हणजे ब्राह्मण व्यक्तीकडील रेडा यांच्या नैसर्गिक प्रेमकहाणीचं अनोखं वर्णन त्यात आहे. जात ही संकल्पना किंवा जातीयतेचा विचार जर प्राण्यांनाही नैसर्गिकपणे प्रेम करू देणार नसेल तर माणसांना हवं त्याच्यावर प्रेम करण्याचा अधिकार तर कधीच देणार नाही, असा एक गंभीर निष्कर्ष त्या कहाणीतून निघतो.

हा लोगो चितारला आहे तामीळ चित्रकार चंद्रू यांनी. चंद्रू यांनी या गोष्टीवर काढलेलं चित्र २००३ च्या 'द दलित'च्या अंकाचं मुखपृष्ठ होतं. त्याच अंकात वरील गोष्टही होती. एस. आनंद तेव्हा या अंकासाठी काम करत होते. पुढे नवयानच्या लोगोसाठी चंद्रू यांनी काढलेल्या मूळ चित्राचा फक्त वरचा, किसिंगचा भागच एस. आनंद यांनी निवडला.

नवयानची पुस्तकं

आनंद यांचा जन्म एका तामीळ ब्राह्मण कुटुंबात झाला असूनही आणि पत्रकार म्हणून ‘आउटलुक’ आणि ‘तेहेलका’ यांसारख्या दर्जेदार नियतकालिकांमध्ये काम केलेलं असतानाही २००३मध्ये जाणीवपूर्वक त्यांनी प्रकाशनाचं क्षेत्र निवडलं. प्रकाशन संस्थेला ‘नवयान’ हे नाव देण्यामागची प्रेरणा होती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नव्याने मांडलेल्या सामाजिक-नैतिक बांधिलकी मानणाऱ्या नव-बौद्धधम्माची. म्हणून नवयान.

पहिली पाच-सहा वर्षं नवयानने जातीयतेला कडाडून विरोध करणारी, त्याची वैचारिक मांडणी करणारी अनेक पुस्तकं प्रकाशित केली. पण लवकरच एक गोष्ट आनंदच्या लक्षात आली, ती म्हणजे, न्याय आणि समता यांसाठी चाललेल्या इतर लढे व चळवळींना, त्यांच्या विचारांना सामावून घेतल्याशिवाय जातिअंताचा हा वैचारिक लढा यशस्वी होणार नाही. म्हणूनच त्यांनी इतर देशांतील समविचारी लेखकांची, विचारवंतांची पुस्तकं प्रकाशित करण्यास सुरुवात केली. नवयानच्या पुस्तकसूचीवर एक नजर टाकली तर या प्रकाशन संस्थेने केलेल्या कामगिरीचा अंदाज येतो. 

बाबासाहेबांनी मांडलेलं विचारधन नवयानने कधीही जसंच्या तसं प्रकाशित केलं नाही. प्रत्येक वेळी एखादा विशिष्ट विषय निवडून त्यावरील बाबासाहेबांचं लेखन एकत्र करणं, त्याविषयीच्या तळटीपा टाकणं आणि त्या विषयावर एखाद्या मान्यवर विचारवंताची अभ्यासपूर्ण प्रस्तावना असं स्वरूप त्यांनी जाणीवपूर्वक ठरवलं. अशा पद्धतीने नवयानने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राह्मण्यवादी पितृसंस्थेवरील विचार 'अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनू' (संपादन- प्रा. शर्मिला रेगे), जातविध्वंसनासंबंधीचे विचार 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट' (प्रस्तावना- अरुंधती रॉय), हिंदू धर्मातील कोड्यांसंबंधीचे विचार 'रिडल्स इन हिंदुईजम' (प्रस्तावना - कांचा इलाया) या पुस्तकांमधून आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाचकांपुढे आणले. त्यांपैकी 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकासाठी अरुंधती रॉय यांनी लिहिलेल्या भल्यामोठ्या प्रस्तावनेमुळे अनेक दलित अभ्यासकांनी-कार्यकर्त्यांनी रॉय, आनंद यांच्यावर टीकाही केली. नंतर या टीकेची पातळी प्रकाशक ब्राह्मण आहे, इथवर गेली.  

लेखक कीर्तिकुमार शिंदे​ ए.आनंद यांच्यासोबत (छायाचित्र - निनाद सिधये)

मराठी वाचकांना माहीत असलेल्या काही लेखकांची पुस्तकंही नवयानने प्रकाशित केली आहेत. उदाहरणार्थ, नामदेव ढसाळ (‘अ करंट ऑफ ब्लड’, अनुवाद- दिलीप चित्रे),  प्रेमानंद गज्वी (‘द स्ट्रेंग्थ ऑफ अवर रिस्ट्स’, अनुवाद- शांता गोखले), आनंद तेलतुंबडे (‘द पर्सिस्टंन्स ऑफ कास्ट’) तसंच नामदेव निमगाडे (‘इन द टायगर्स शॅडो’) ही त्यातली काही पुस्तकं. यांशिवाय इलियानेर झिलियट (‘आंबेडकर्स वर्ल्ड’), भगवान दास (‘इन पर्स्युट ऑफ आंबेडकर’), डी. एन. झा (‘द मिथ ऑफ होली काऊ’), गेल ऑम्वेट (‘सिकिंग बेगमपुरा’) यांच्यासह स्लॅवोज झिझेक, जेरेमी सीब्रुक, शशांक केला, अॅंजेला डेव्हिस, के. बालगोपाल, अजय नवारिया यांचीही पुस्तकं प्रकाशित केली. स्वत: एस. आनंद यांनी ‘भीमायना’ (दुर्गाबाई आणि संतोष व्याम) तसंच ‘फाइंडिंग माय वे’ (वेंकट श्याम) या पुस्तकांचं सहलेखन केलेलं आहे. या दोन्ही पुस्तकांच्या निर्मितीसाठी एक प्रकाशक आणि संशोधक, लेखक म्हणून त्याने घेतलेले परिश्रम वादातीत आहेत. 

(नोंद - हा लेख लिहिण्यासाठी या दोन्ही प्रकाशकांशी लेखकाने चर्चा केलेली असली तरी त्यांनी प्रकाशित केलेली काही निवडकच पुस्तकं वाचलेली आहेत. अनेक पुस्तकांबाबतची, तसंच त्यांच्या संस्थांविषयीची सविस्तर माहिती ही आंतरजालावरून घेतली आहे. या प्रकाशकांची तसंच त्यांच्या प्रकाशन संस्थेनं केलेल्या कार्याची साधकबाधक माहिती वाचकांना व्हावी, या प्रामाणिक हेतूनेच हे लेखन केलेलं आहे.)

 

लेखक नवता बुक वर्ल्डचे संचालक आहेत.

shinde.kirtikumar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......