अजूनकाही
मी नुकताच हिचकॉकचा ‘द ३९ स्टेप्स’ पाहिला. थ्रिलर कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणता येईल इतका सुंदर सिनेमा! १९३५ साली प्रदर्शित झालेला. थ्रिलर हा चित्रपट प्रकार सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून अस्तित्वात आहे. त्यात अॅक्शन, साहस, फँटसी व सायन्स फिक्शन यांचा अंतर्भाव असू शकतो, पण थ्रिलिंग कथानक हा त्याचा पहिला गुण आहे. तो नसेल तर इतर बाबी अप्रभावी ठरू शकतात. त्यामुळे हा प्रकार योग्यपणे हाताळणं ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच यात कुशल असणार्या हिचकॉकनं एकाहून एक सरस थ्रिलर्स दिले आहेत. जे आजही अभ्यासले जातात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक दिग्दर्शकांनी या सिनेप्रकारात नव्यानं भर घातली आहे. कमल हासन दिग्दर्शित ‘विश्वरूपम २’ हा सिनेमा सिक्वेल असला तरी थ्रिलर सिनेमासाठी लागणारा पहिला गुण मात्र तो विसरतो. त्यामुळे त्याचं सामान्य पातळीवर येणं हासनसारख्या मोठ्या दिग्दर्शकाकडून निराशा करणारं ठरतं.
सिनेमाच्या सुरुवातीलाच पहिल्या भागात काय झालं हे सांगितलं जातं आणि श्रेयनामावलीत पहिल्या भागातले तुकडे दाखवले जातात. न्यू यॉर्क शहराला ओमार कुरेशी (राहुल बोस) याच्या कृष्णकृत्यातून जगाला वाचवलेला विश्वरूप/विश्वनाथ/रॉ एजंट मेजर वीसाम काश्मिरी त्याचा बॉस कलोनल जगन्नाथ (शेखर कपूर) न्यूक्लियर ऑन्कॉलॉजिस्ट बायको निरूपमा (पुजा कुमार) व साथीदार अश्मिता (अँड्रिया जेरमाया) बरोबर लंडनला जात आहे. त्याला माहिती मिळते की, ओमार तिथं येऊन परत एकदा न्यू यॉर्कसारखी परिस्थिती निर्माण करणार आहे. तिथं पोचला असला तरी भारत सरकारकडून त्याच्या विश्वासार्हतेची परीक्षा घेतली जाते. त्यातूनही तो बाहेर येतो व ओमार कुरेशीकडून लंडनवर होणार्या जीवघेण्या हल्ल्यातून लंडनवासीयांना वाचवण्यासाठी सज्ज होतो...
पहिला विश्वरूप आला, तेव्हा त्यावर वादग्रस्ततेची छाया होती. सिनेमाचं शीर्षक तसंच काही अराजकीय संघटनांना त्यातील मुस्लिमांचं चित्रण आवडलं नव्हतं. त्यामुळे आक्षेपाची धार वाढली होती. ठरलेल्या तारखेपेक्षा दोन आठवडे उशिरा प्रदर्शित झाल्यामुळे तिकीट विक्रीवर परिणाम झाला असं पुढे हासननीच सांगितलं. तरीही त्याच्या व्यावसायिक यशावर परिणाम झाला नाही. सगळीकडे तो स्वीकारला गेला. त्याच यशाचा फायदा उचलावा म्हणून हा पाच वर्षांनी आलेला सिक्वेल मात्र सिनेमाच्या सर्वच विभागात निराशा करतो.
हासनची सिनेमा बनवताना मानसिकता काय होती याचा अदमास घेता येत नाही, पण आधीच्या यशाची पुनरावृत्ती करावी असंच वाटत असणार. कदाचित घाईघाईत पटकथा लिहून ती चित्रित करावी असं वाटलं असणार. त्यामुळे पटकथेतले दोष हे सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कमी न होता वाढत जातात. उदाहरणार्थ फ्लॅशबॅकचा केलेला वापर. तीन वेळा कथानकाला मध्येच तोडून वीसामच्या आयुष्यातील गोष्टी दाखवल्या जातात. यातील त्यानं अफगाणिस्थानात ओमार कुरेशीच्या तळावर काय केलं हा भाग बर्यापैकी कथानकाची सुटलेली बाजू दाखवण्यासाठी योग्य ठरतो.
बाकी दोन भाग का दाखवले गेले हे प्रश्न मात्र सिनेमा संपल्यावरही अनुत्तरित राहतात. कारण त्यांच्या असण्या-नसण्यानं कथानकाला बाधा येत नाही. उलट ते नसते तरी चाललं असतं. तसंच सिनेमाची वाढलेली अनावश्यक लांबी कमी झाली असती. पण कथानकाच्या प्रेमात असणारे हासन प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार न करता ते भाग तसेच ठेवतात.
लिहिलेली संहिता व प्रत्यक्ष चित्रीकरण यात बराच फरक पडत गेलेला असतो. दिग्दर्शकाला लिहिलेल्या गोष्टीपेक्षा काहीतरी त्यात भर घालणारं सुचलेलं असतं. त्यामुळे त्याचं चित्रण करायला काहीच वावगं वाटत नाही. ते वावगं ठरतं ते चित्रीकरण संकलित करताना. सिनेमा दोनदा बनतो असं बरेच दिग्दर्शक म्हणतात. पहिल्यांदा संहितेच्या पातळीवर आणि नंतर संकलनात. कारण मूळ गाभा जरी संहितेत असला तरी वर म्हटल्याप्रमाणे चित्रीकरणात अधिक झालेलं चित्रण कथेला पोषक असलं तरच ठेवायचं असतं. कथा चांगल्या पद्धतीनं आकार घेत नसेल तर त्यावर निर्दयपणे कात्री लावणं गरजेचंच असतं. दिग्दर्शकाकडून बर्याचदा हे होत नाही, कारण त्यांच्या भावना त्याच्याशी जुळलेल्या असतात.
स्पीलबर्ग म्हणतात सिनेमा वस्तुनिष्ठपणे जर कोण निर्माण करू शकतं तर ते संकलक. संकलकाला संहिता ते चित्रीत झालेला भाग हा आयता मिळालेला असतो. त्याला दिग्दर्शक ज्या मेहनतीनं, तादात्म्यतेनं चित्रीकरण करतो त्याच्याशी देणंघेणं नसतं. त्यामुळे तो भावनिक न होता कथानकाला पाहिजे तसा आकार देऊ शकतो.
कमल हासनसारखे अठ्ठेचाळीस वर्षांचा दांडगा अनुभव असणारे दिग्दर्शक बाळबोधपणे कथेकडे बघतात, तेव्हा ते पटत नाही. कलाकारानं उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणं त्याचं माध्यमावरच्या पकडीचं पहिलं लक्षण आहे. इथं मात्र तसं म्हणता येत नाही. वयाच्या या टप्प्यावर हासननी दोन-तीन सिनेमे करूनही प्रगल्भ न झालेल्या दिग्दर्शकासारखं करणं अनपेक्षित आहे. त्याचं एक दुसरं कारण आहे, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत आहे.
ते कारण त्यांचं स्वप्रतिमेच्या प्रेमात असणं. स्वप्रतिमेच्या प्रेमात असणारे कलाकार जगात सर्वत्र आढळतात. फार दूर कशाला दोन वर्षांपूर्वीच ऑस्कर जीवनगौरवानं सन्मानित केलेला जॅकी चॅन हा मोठा जागतिक स्टार सुद्धा स्वप्रतिमेच्या प्रेमात असणारा. ‘चायनीज झोडियॅक’ या सिनेमात सबकुछ तोच होता. त्यामुळे त्याच्या प्रतिमेपुढे इतर पात्रं खुजी व निरुपयोगी होती. संपूर्ण सिनेमा त्याच्याभोवती फिरणारा. कथानकात रंग भरण्याऐवजी ‘मी कसा एकमेव अॅक्शन स्टार’ हे दाखवण्याकडेच त्याचा कल होता.
‘विश्वरूपम २’मध्येही तेच झालेलं आहे. तसंच अभिनेता म्हणून प्रयोग करणं कमल हासननी सुरुवातीपासून सोडलेलं नाही. कथानकाची गरज असेल तर ते ठिकय, पण त्याचा वापर प्रत्येक वेळी करणं त्यांच्यातल्या अभिनेत्याला बाजूला सारतं, सोबत सिनेमालासुद्धा. ‘हे राम’पासून असणारी त्यांची व्हीएफएक्सची आवड इथंही गरज नसताना वापरलेली. तसंच प्रत्येक फ्रेममध्ये मी असावयास हवाच हा अट्टाहास का याचं उत्तर मिळत नाही.
याउलट नुकताच प्रदर्शित झालेला व अॅक्शनचा आलेख अजून वर नेणारा ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ हा सिनेमासुद्धा ईथन हंटच्या प्रतिमेलाच महत्त्व देतो ना की अभिनेता टॉम क्रूझला. तसंच स्वतःची प्रतिमा बाजूला ठेवून या वयात जीवघेणे स्टंट्स करून त्यानं इतर अभिनेत्यांपुढे एक चांगलं उदाहरण ठेवलंय. आधी कथानक, मग अभिनेता असं त्याचं समीकरण आहे. इथं ते बरोब्बर उलटं आहे. त्यामुळे याचा परिणाम हासनच्या कारकीर्दीवरच पडणार आहे. हा सिनेमा त्यांच्या अप्रभावी सिनेमांच्या यादीत वरच्या क्रमांकावर राहील हे नक्की.
इतक्या सगळ्या चर्चेत बाकी गोष्टींबद्दल बोलणं उल्लेख करण्यापुरतं राहतं. राहुल बोसपासून ते शेखर कपूरपर्यंत सर्वांची साथ ही जमेची बाजू. वाहिदा रेहमाननी हासनच्या अल्झायमर झालेल्या आईची भूमिका करणं फक्त हासनच्या नावाला भुलून केली असावी. काही प्रसंगात पार्श्वभूमीचं संगीत प्रभावी वाटतं, तर बर्याचदा अनावश्यक. थ्रिलर सिनेमात गाण्यांचा वापर मुळातच कशाला हा प्रश्न इथं उपस्थित करता येत नाही, कारण हा भारतीय सिनेमा आहे. इथं प्रेक्षकांना कथेपेक्षा त्यातली गाणी जास्त वेळ खुर्चीला खिळवून ठेवतात असं निर्मात्यांना वाटतं. त्यामुळे ती असतातच. त्यांच्यावर संकलनात कात्री लावली तरी चालतं असं त्यांच्या ध्यानीमनीही नसतं. त्यामुळे ही गाणी अनावश्यक व अप्रभावीदेखील. पंडित बिरजू महाराज यांचं नाव श्रेयनामावलीत दिसतं, तेव्हा त्यांचं इथं काय काम असा प्रश्न पडतो. जी दोन अनावश्यक फ्लॅशबॅक दाखवली जातात त्याच्यात एके ठिकाणी कथकचा क्लास दाखवला जातो, त्यासाठी असावेत असं वाटतं. पण तेही अप्रभावी व अनावश्यक.
एकुणात सिक्वेल करतानासुद्धा जगात अॅक्शन थ्रिलर या प्रकारात काय चालू आहे याचा अभ्यास केला असता तर गेल्या पाच वर्षांत झालेले बदल ‘विश्वरूपम २’मध्ये प्रतिबिंबित झाले असते. दुर्दैवानं कमल हासन त्याकडे कानाडोळा करून त्यांना आवडेल अशा पद्धतीचा सिनेमा करतात. पण त्याच्या परिणामांची तमा न बाळगता. त्यामुळे प्रेक्षक याच्यापासून दूर गेला तर त्याचं खापर मात्र प्रेक्षकांवर फोडता येणार नाही, हे नक्की.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Milind Kolatkar
Sat , 11 August 2018
नाय आवडला रावं! पिक्चर आण त्याच्या समिक्षेपेक्षा वायफळ चर्चाच जास्त हाय. तुमास्नी फार काय म्हायाताय ते सगळ कळलं. पण पिक्चरमध्ये काय, ते नाय. मजा नाय आली. आभारी हाय.