अजूनकाही
धर्मसंकल्पनेचे एक शस्त्र करून दहशतीच्या हिंस्त्रतेतून जगाला हादरवून सोडणार पाकिस्तान हा देश. लोकशाही व्यवस्थेपेक्षा धर्मरक्षण आणि धर्मप्रसार हीच आपल्या देशाची ओळख असं ठासून सांगणारी या देशाची व्यवस्था - वस्तुतः कुठलीही व्यवस्थाच नसणारा. तरीही या देशाला एका पूर्वेतिहासाची भक्कम पार्श्वभूमी आहे. भारतासारखीच विविध जाति-जमातींची अनेकताही या देशाला आहे. परंतु या अनेकतेला नाकारत केवळ इस्लामचेच प्राबल्य पुनःपुन्हा अधोरेखित करणारा हा देश. या देशाचं भवितव्य कसं आहे नेमकं? पाकिस्तानमधली न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थकारण, राजकारण यांचे चेहरे कसे आहेत? सुधारणांना नकारच नोंदवणाऱ्या या देशाची अधोगती अटळ असेल तर या देशाचा यापुढील इतिहास कसा आणि कोणत्या दिशेने आपली पावलं उमटवत जाणार आहे? - पाकिस्तानबद्दलचे हे नि असे अनेक प्रश... अपरिहार्यही, गुतांगुतीचेही... या प्रश्नांची विश्लेषक उकल करणारं ‘पाकिस्तानची घसरण’ हे पुस्तक! हिंसा आणि व्यवस्थेचा अभाव या दोन पात्यांच्या कात्रीत अडकलेल्या पाकिस्तानची घसरण आणि एका अनघड देशाच्या सर्वांगीण प्रगति - अधोगतीचा आलेख मांडणारं हे पुस्तक नुकतंच मौज प्रकाशन गृहातर्फे प्रकाशित झालंय. त्यातील हा संपादित अंश.
.............................................................................................................................................
१९७४ साली नबाब अहमद खान कसुरी एका लग्न समारंभाहून परतत असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला होता. त्यात नबाब ठार झाले. हा हल्ला मला मारण्यासाठी होता, पण चुकून वडील मारले गेले अशी तक्रार नबाबांचा मुलगा अहमद रझा कसुरीनी दाखल केली होती. हा हल्ला फोर्सच्या लोकांनी भुत्तो यांच्या सांगण्यावरून घडवून आणला असा आरोप होता. अहमद कसुरी आणि भुत्तो यांच्यात वैर होतं. ते भुत्तोंवर सतत टीका करत.
झियानी ते जुनं प्रकरण काढलं आणि नवाब महंमद खान कसुरी यांच्या खुनाचा आरोप भुत्तोंवर ठेवला.
फोर्सच्या चार अधिकाऱ्यांना झियांनी पकडलं. तुरुंगात त्यांची चांगली मरम्मत केली. एकाला माफीचा साक्षीदार केलं. तुरुंगातच जबान्या घेण्यात आल्या. जबानी घेताना साक्षीदार उपस्थित नव्हते.
ट्रायल कोर्टाच्या न्यायाधिशानं पुरावे अपुरे आहेत, त्यात बऱ्याच त्रुटी आहेत असं जाहीर करून खटला रद्द केला. भुत्तोना सोडून दिलं.
झिया तुरुंगाबाहेर पडले आणि सभा घेऊ लागले. वातावरण तापलं.
जबानी दिलेल्या फोर्सच्या अधिकाऱ्यांना झियांनी पुन्हा तुरुंगात डांबलं, त्यांच्याकडून पुन्हा एक सुधारित जबानी घेऊन, पुन्हा त्याच गुन्ह्यावरून लाहोर हाय कोर्टात खटला भरला. खालच्या कोर्टात नव्हे तर थेट हाय कोर्टात खटला.
का?
लाहोर हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश मौलवी मुश्ताक भुत्तो विरोधी होते. भुत्तोंनी त्यांना लाहोर हाय कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी जाऊ दिलं नव्हतं. नाकारलेल्या बढतीचा त्यांना राग होता.
भुत्तो इस्लामविरोधी असून त्यांनी इस्लामी राज्यघटनेविरोधी वर्तन केलं असा आरोप ठेवण्यात आला. भुत्तोंची आई पूर्वाश्रमी हिंदू होती म्हणून भुत्तो इस्लामशी प्रतारणा करतात असं सुचित करण्यात आलं.
खटला पटापट उरकण्यात आला.
पाचपैकी दोन न्यायाधीशांना भुत्तो निर्दोष आहेत असं वाटत होतं. त्यांना सुनावणीपासून दूर ठेवण्यात आलं.
एक न्यायाधीश बेंचवर होते पण निवृत्त असल्यानं ते सुनावणीस जात नसत.
एका न्यायाधीशांची प्रकृती ठीक नसल्यानं ते सुनावणीस गैरहजर राहिले. त्यांना भुत्तो निर्दोष आहे असं वाटत होतं.
पाच पैकी चार जण गैरहजर असताना मुख्य न्यायाधीशांनी निकाल देऊन फाशी पक्की केली.
भुत्तोंच्या वतीनं पुनर्निरीक्षणाचं अपील करण्यात आलं. मुख्य न्यायाधिशांनी ७ जणांचं बेंच तयार केलं. त्यात चार न्यायाधीश पंजाबी होते. पंजाब्यांचा भुत्तोंवर राग होता कारण भुत्तो सिंधी होते.
चार विरुद्ध तीन अशा बहुमतानं फाशी पक्की केली.
भुत्तो स्वतः बाजू मांडू लागले, तेव्हां कोर्टानं कामकाज गुप्त रीतीनं चालवलं.
यात आणखीही एक धार्मिक गंमत आहे, शरीयाची गंमत आहे.
झिया उल हक यांनी पाकिस्तानात निझामे मुस्तफा म्हणजे शरीया कायदा २ फेब्रुवारी १९७९ रोजी म्हणजे भुत्तोंच्या फाशीच्या आधी दोनच दिवस लागू केला. शरीयातल्या जकात, उस्र, हुदूद, काझी न्यायालय, शरीया न्यायालय या तरतुदी जाहीर करण्यात आल्या. पण किसा आणि दिय्या या दोन तरतुदी लागू केल्या नाहीत.
किसा ही तरतूद रक्ताचा बदला रक्तानं या स्वरूपाची असते. समजा भुत्तोंवर नबाब खान यांच्या खुनाचा आरोप असेल तर किसा तरतुदीनुसार नबाब खानाच्या मुलानं किंवा वारसानं भुत्तो यांचा खून करायचा. भुत्तो यांनी नबाब खान यांचा खून केला असेल तर दिय्या तरतुदीनुसार भुत्तोनी नबाब खान यांच्या मुलांना काही रक्कम दिली की भुत्तो सुटतात. ती रक्कम दोन्ही बाजूंच्या लोकांनी मिळून समजुतीनं ठरवायची असते. नबाब खान यांची किमत पाच लाख ते पाच कोटी अशी कोणतीही होऊ शकते.
भुत्तोंचा जीव वाचवू शकणाऱ्या त्या दोन तरतुदी झियांनी गाळल्या.
भुत्तोंचं भवितव्य नबाबखान यांच्या हाती न जाता ते झियांच्या हाती आलं. शिवाय शरिया कायद्यानुसार धर्मविरोधी कृत्य केल्यास शासन करण्याचा अधिकार समाजप्रमुखाला असल्यानं भुत्तोंचा निर्णय झियाच करू शकत होते.
६ फेब्रुवारी १९७९ रोजी भुत्तोंची फाशी पक्की झाली.
२४ मार्चला सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्या आल्या झिया उल हक यांनी बैठकींचा सपाटा लावला. सुरुवातीलाच फाशीची तारीख आणि वेळ झियांनी आपल्या निकटच्या अधिकाऱ्यांशी बोलून ठरवून टाकली.
लष्करी आणि पोलिस अधिकाऱ्यांना बोलावलं. फाशीची बातमी फोडायची नाही असं ठरलं. भुत्तोंचा देह कुठं न्यायचा, कसा दफन करायचा याचा तपशील लष्करी अधिकाऱ्यांनी ठरवला. कराचीत आणि इतरत्र अशांतता माजली तर काय करायचं, कोणाला अटका करायच्या याचा तपशील मुलकी अधिकारी आणि पोलिसांसह ठरला. हे सारं ठरल्यानंतर झियांनी विधीमंडळाच्या सदस्यांची बैठक घेतली. फाशीच्या निर्णयाला आपला पाठिंबा आहे असं सांगून टाकलं. फाशी ताबडतोब झाली पाहिजे, लांबवता कामा नये असं म्हणाले.
भुत्तोंचा दयेचा अर्ज झियांच्या टेबलावर पडून होता.
१ एप्रिल १९७९ रोजी झियांनी टेबलावरची फाईल उघडली. त्यात जगभरच्या नेत्यांनी पाठवलेल्या तारा आणि पत्रं होती, फाशी रद्द करण्याची विनंती करणारी. भुत्तोंचा दयेचा अर्जही होता.
झियांनी भुत्तोंच्या अर्जावर लिहिलं - अर्ज फेटाळण्यात येतोय.
४ एप्रिल १९७९.
भुत्तोंना फाशी जाहीर झाली होती.
दुपारचे ११ वाजले होते. भुत्तो यांची पत्नी बेगम नुसरत आणि मुलगी बेनझीर भुत्तो रावळपिंडीपासून १६ मैलावरच्या सिहाला गावात होत्या. तिथून त्यांना रावळपिंडी तुरुंगात नेण्यात आलं.
दोघी झुल्फिकार अली भुत्तोंना भेटल्या.
झुल्फिकार पार खलास झालेले होते. तुरुंगात त्यांचे हाल झाले होते. धड खायला प्यायला नाही. डासांनी दिलेला मलेरिया. एकेकाळचे ऐटबाज झुल्फिकार हाडाचा सापळा झाले होते.
फाशीची वेळ त्यांना सांगण्यात आली नव्हती.
तुरुंगाच्या बाहेर पडता पडता बेगम नुसरतनी एक जपमाळ भुट्टोंच्या हातात ठेवली. त्यांनी पूर्वी कधीच जपमाळ वापरली नव्हती.
बेगम नुसरत आणि बेनझीर स्थानबद्धतेतल्या घरात परतल्या.
जेल सुपरिंटेंडंट यार महंमद त्यांच्या जाण्याची वाटच पहात होते. दोघी निघून गेल्यावर लगोलग मॅजिस्ट्रेट, जेलचे डॉक्टर आणि सुरक्षा अधिकारी अशा तिघांना घेऊन यार महंमद भुत्तोंच्या खोलीत पोचले.
यार महंमद यांनी फाशीचा आदेश वाचून दाखवला.
“मार्च १८, १९७८ च्या लाहोर हाय कोर्टच्या आदेशानुसार, मिस्टर झुल्फिकार अली भुत्तो, तुम्हाला नवाब महंमद खान यांच्या खुनासाठी फाशी देण्यात येणार आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टात केलेलं अपील ६ फेब्रुवारी १९७९ रोजी फेटाळण्यात आलय. त्यानंतर तुम्ही केलेलं रिव्ह्यू पेटिशन २४ मार्च १९७९ रोजी फेटाळण्यात आलय. पाकिस्तानच्या अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला फाशी होणार आहे.”
भुत्तो शांत होते. म्हणाले ‘तुम्ही ही ऑर्डर मला चोविस तास आधी द्यायला हवी होती. थोड्याच वेळापूर्वी माझी पत्नी आणि मुलगी मला भेटून गेली. तेव्हांच तुम्ही त्यांना सांगायला हवं होतं.’
भुत्तो म्हणाले ‘मला फाशीचं काळं वॉरंट पहायचं आहे.’
यार महंमदनी वॉरंट दाखवायला नकार दिला.
यार महंमद म्हणाले ‘तुम्हाला तुमची शेवटची इच्छा लिहायची आहे काय?’
भुत्तोंनी कागद आणि पेन मागवलं.
रात्रीचे आठ वाजले होते. भुत्तो एक कप गरम कॉफी प्याले. तुरुंगातला मदतनीस अब्दुर रहमानला बोलावून त्यांनी साबण आणि दाढीचं सामान मागवलं. १० वाजता दाढी केली.
सुरक्षा अधिकारी कर्नल रफीउद्दीनला भुत्तोंनी विचारलं ‘काय नाटकं रचलय तुम्ही लोकांनी’.
कर्नल काही बोलला नाही.
भुत्तोंनी दात घासले.
अंथरुणावर बसून भुत्तोंनी काहीतरी लिहिलं.
कर्नलला विचारलं ‘फाशीला किती वेळ आहे’.
कर्नल म्हणाला पहाटे चार वाजता फाशी होईल.
भुत्तोंनी खरडलेले कागद गोळा केले, फाडले, जाळले.
रात्रीचे साडेअकरा झाले होते.
भुत्तोनी मदतनिसाला बोलावलं ‘काल रात्री मला नीट झोप लागली नव्हती. मला जरा झोपू दे, त्रास देऊ नकोस. मध्य रात्री मला उठव.’
मध्यरात्रीनंतर जेल अधिकारी आणि डॉक्टर भुत्तोंच्या खोलीशी पोचले. दार ठोठावून उठवायचा प्रयत्न केला. भुत्तो प्रतिसाद देईनात. मंडळी दरवाजा उघडून आत गेली. भुत्तो झोपलेले होते. तीन चार वेळा हलवल्यानंतर त्यांनी डोळे उघडले. डॉक्टरांनी त्यांना तपासलं. ते ठीक होते.
मॅजिस्ट्रेटनी विचारलं ‘तुम्ही तुमचं इच्छापत्र लिहिलंय कां?’
भुत्तो म्हणाले ‘मी प्रयत्न केला. परंतु इतका अस्वस्थ होतो की संबद्ध असं काही लिहिता येईना. कागद फाडून टाकले.’
खोलीपासून दोनेकशे यार्ड अंतरावर फाशीची जागा होती.
‘तुम्ही चालत फाशीच्या जागी जाऊ शकता? की स्ट्रेचरवरून नेऊ?’ मॅजिस्ट्रेट.
भुत्तो काही बोलले नाहीत.
काही सेकंदांनी दोघे जण स्ट्रेचर घेऊन आले. भुत्तोंना उभं करून त्यांचे हात पाठीमागं बांधण्यात आले. बखोट धरून भुत्तोंना स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं. भुत्तो गलितगात्र झाले होते. स्ट्रेचर नेत असताना भुत्तोंचा शर्ट खाली लोंबत होता, शर्टाचं एक टोक स्ट्रेचर नेणाऱ्या माणसांच्या बुटात अडकत होतं.
तुरुंगाधिकारी झियांच्या सतत संपर्कात होते, घटनेची माहिती पुरवत होते. फाशीची वेळ पहाटे चारची होती. झियांना घाई होती. आधीच उरका असं त्यांनी सांगितलं.
भुत्तोंना स्ट्रेचवरून खाली काढण्यात आलं. भुत्तो जेमतेम उभे राहू शकत होते, इतरांनी त्यांना धरलं नसतं तर ते कोसळलेच असते.
भुत्तोंना प्लॅटफॉर्मवर नेण्यात आलं. तारा मसीह हा डोंब उभा होता. तो भुत्तोंच्या कानात काही तरी पुटपुटला. भुत्तोंच्या तोंडावर त्यानं बुरखा टाकला. गळ्याभोवती फाशीचा दोर पक्का केला. खटका ओढला.
भुत्तोंचा देह लटकला.
काही वर्षांनी एक बातमी पसरली. ती अशी.
भुत्तोनी कबुलीजबाब द्यायला नकार दिल्यामुळं त्यांना धोपटण्यात आलं, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. फाशी हे एक नाटक होतं. मृत शरीरालाच फाशी दिली होती. म्हणूनच भुत्तोंचं शरीर कोणाला न दाखवता दफन करण्यात आलं.
https://www.booksnama.com/book/4510/Pakistanchi-Ghasaran
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Sat , 11 August 2018
✔