अशी करा रागांशी सलगी
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 03 December 2016
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag लोकप्रिय संगीत Popular music केशव परांजपे Keshav Paranjpe हार्मोनियम\पेटी Harmonium

राग-गायन/वादनाचे बारकावे जाणणाऱ्या मर्मज्ञ श्रोत्याची शास्त्रीय संगीत व्यवहाराला नक्कीच गरज आहे. अशा श्रोत्याला काही एक भूमिका आहे आणि म्हणून स्थान आहे; पण म्हणून राग ओळखू न शकणारा श्रोता शास्त्रीय संगीताला नको आहे किंवा त्याला एका विशिष्ट परिघाबाहेरच उभं राहायचं आहे, असं मुळीच नाही. श्रोता रसज्ञ असणं सर्वांत महत्त्वाचं; आणि सर्वांत कठीण! आपण ज्या अर्थानं मर्मज्ञ म्हटलं, त्या अर्थाने ‘मर्मज्ञ’ बनणं एक वेळ सोपं; मर्मज्ञ 'रसज्ञ' असेलच, अशी कोणतीच खात्री देता येत नाही. सर्वच कलांच्या बाबतीत हे खरं आहे. 'जाणकारी' हासील करता येते; अर्थात त्यासाठी तंत्राशी थोडी सलगी करावी लागते आणि तेही काही फार कठीण नाही. 'जाणकारी'ला वस्तुनिष्ठ मोजमाप आहे. आपल्या शास्त्रीय संगीताच्या संदर्भात बोलायचं, तर राग, ताल ओळखणं, त्या रागाचे काही बारकावे माहिती असणं; त्या रागाच्या जवळचे राग माहिती असणं आणि त्यांपासून एक विशिष्ट राग वेगळा ओळखता येणं, बंदिश माहिती असणं, त्या रागातल्या इतर बंदिशी माहिती असणं, इतर कलाकारांचा तो राग ऐकलेला असणं इ. गोष्टी चौकसपणा या पातळीवरच्या आहेत आणि ऐकत राहिलं की, त्या बऱ्याच प्रमाणात 'हासील' होतात. 'वाहवा' द्यायच्या विशिष्ट जागा ठरलेल्या असतात; त्यांची माहिती होते आणि टोल नाक्यावर टोल द्यावा तशी दाद दिलीही जाते.

या तुलनेत रसज्ञपणाचं काय? 'रसज्ञ' जरा मोठाच शब्द आहे, नाही का? आपण 'रसिकता' म्हणू. रसिकता जोपासता येते, वाढवता येते, प्रगल्भ करता येते. रसिकता हीसुद्धा एक साधना आहे; एक आत्मशोध आहे. रसिकतेत खूप उंची गाठता येते. पण रसिकतेला वस्तुनिष्ठ मापदंड मात्र नाही. आपल्याला काय आणि किती आवडतं, कसं आवडतं हे त्रयस्थपणे कळणं, ही रसिकतेची वरची पायरी आहे. आपल्या आवडीचा (निवडीचा) पाठपुरावा करावा लागतो, भौतिक आणि मानसिकही! आवडलेल्या गोष्टीबरोबर मनाने राहावं लागतं. आपल्याला एखादं चित्रपट गीत आवडतं. त्याचे सर्व शब्द समजावे लागतात, त्याचा भावार्थ उलगडावा लागतो; त्याच्या सर्व ओळींच्या चाली मनावर कोरल्या जाव्या लागतात; त्यातला मधला वाद्यमेळ खूप परिचयाचा व्हावा लागतो... आणि त्यानंतर, ते गीत कोणाचं, संगीत कोणाचं हे समजावं लागतं. त्या गीतकाराच्या आणि संगीतकाराच्या शैलीची ओळख व्हावी लागते... त्या गीताचा वेगळेपणा नेमका उमगून वेगळा, खास आनंद अनुभवाला यावा लागतो. कोणी म्हणेल, 'कशाला हवं हे एवढं सगळं; गाणं ऐकलं, आवडलं, संपलं!' यावर माझ्यासारखा माणूस म्हणेल, 'असू दे! गाणं आवडलं एवढं तरी म्हणतोय ना!'

राग म्हणजे काय? खूप वेगवेगळ्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत. दहा (की बारा) लक्षणं सांगितली गेलेली आहेत. रागांची कुटुंबं कल्पिली गेली आहेत. राग - राजा, रागिणी - राण्या इ. दिनचक्राशी, ऋतुचक्राशी रागांचं साहचर्य जोडून दिलेलं आहे. विविध देव-देवतांशी, प्रकृतीमानाशी... अनेक गोष्टींशी रागांचा संबंध जोडून दाखवलेला आहे. शृंगार, करुण, वीर... अशा नऊ रसांशी तर राग बांधून दाखवलेलेच आहेत. रागांकडे पाहण्याचे हे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत आणि ते समजून घेणं खूप रंजक आहे; पण श्रोता म्हणून, रसिक म्हणूनसुद्धा ते अपरिहार्य नाही. राग म्हणजे एक 'सांगीतिक सुसंगती' आहे आणि ही सुसंगती उमजणं हे रसज्ञ असण्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. रागांचे परंपरासिद्ध नियम हे नैसर्गिक सुसंगतीचे नियम असतात आणि गाणाऱ्या-वाजवणाऱ्याने ते पाळले, तर गायनात आपोआपच ती सुसंगती येते. नियम माहिती असणं वेगळं आणि सुसंगतीचा (किंवा असंगतीचा) अनुभव घेणं वेगळं. माहिती महत्त्वाची की अनुभव? आपल्याला माहितीच्या रस्त्याने जायचंय की अनुभवाच्या, हे आपणच ठरवायचं! दोन्ही रस्ते खुले आहेत आणि त्यांच्यावर आपल्या कुवतीप्रमाणे दोन-चार पावलं आपण टाकू शकतो. शेवटी अनुभवाला पर्याय नाही; पण माहितीचा रस्ता शॉर्ट कट देऊ शकतो.

हार्मोनियम\पेटी हे सर्वांत सोयीचं सोपं वाद्य आहे. सांगीतिक जाणिवा जागृत झालेल्या नसतानासुद्धा ज्या वाद्यात हात घालता येतो, असं हे वाद्य आहे. या वाद्यावर स्वरांची व्यवस्था समजून घेतली की, क्रमिक पुस्तकाच्या आधारे रागाचे आरोह, अवरोह, पकड, सोपी बंदिश वाजवता येते. साधारणपणे तीन-चार महिन्यांमध्ये कोणालाही एवढी मजल मारता येते. मग असं होतं की, 'राग' वाजवता येतो, पण ओळखता येत नाही! कारण वाजवणं ही डोळे आणि हातांचीच क्रिया असते आणि ओळखणं ही कानांची क्रिया असते. पेटीवर फिरलेली बोटं पाहून राग ओळखता येतो, पण डोळे बंद करून ऐकलं तर मात्र राग ओळखता येत नाही, अशीही परिस्थिती येऊ शकते. याचा अर्थ संगीताशी अजून कोणतंही नातं जुळलेलं नाही. पेटी वाजवण्याची क्रिया यांत्रिकपणे होते आहे. ‘ऐकण्याला’ अजून सुरुवात झालेली नाही. पेटी वाजवण्यापेक्षा ऐकण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

वाचलेलं समजलंय का हे कसं तपासायचं, तर स्वत:ला विचारायचं “काय वाचलंस, चल सांग”. तसंच पेटीवर बोटं दाबून जे संगीत उत्पन्न झालं ते आपण ऐकलं का हे कसं तपासायचं? गुणगुणून लोकांत किंवा मनात. सुरुवातीला वाजलेलं आणि गुणगुणलेलं यात बरीच तफावत असेल, पण अशा प्रयत्नामुळे ऐकण्याची सवय लागले. आणि हळूहळू तफावत कमी कमी होत जाईल. शेवटी हा सर्व प्रयास सांगीतिक जाणीव जागृत करण्यासाठी आहे! हे सर्व चऱ्हाट वळलंय ते ज्यांची सांगीतिक जाणीवेची जागृती अगदीच कमी आहे, अशा लोकांच्या संदर्भात. बऱ्याच जणांची सांगीतिक जाणीव जात्याच बऱ्यापैकी जागृत असते. अशा लोकांसाठी हा प्रयास बराच विनासायास असतो! तर अशा तऱ्हेनं संगीताला सामोरं जाऊन भिडता येतं, चक्क दोन हात करता येतात! या हाणामारीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होतं बरं का! आपल्या वाजवण्यामुळे आपल्या परिचयाची झालेली स्वरावली मग आपल्याला ओळखता येऊ लागते. राग ओळखण्याच्या पहिल्या पायरीवर तर तुम्ही आलातच!

आता तुम्हाला संगीताशी एवढी अंगमस्ती करायची नसेल तर दुरून झुरून प्रेम करता येतं. काही निवडक राग घेऊन ते नक्की ऐकायचे. सुरुवातीला ज्या रागाला आपली खूप विशिष्ट ओळख आहे असा राग निवडावा. या निवडीसाठी जवळपासची संगीताची जाणकार मंडळी नक्कीच सल्ला देतील. अशी सलगी फलदायीच ठरते. केदार, तोडी (मिया की तोडी), ललत, जोग हे असे राग आहेत ती, त्यांचा तोंडवळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते पटकन ओळखू येतात. वेगवेगळ्या कलाकारांनी गायलेले आणि वेगवेगळ्या वाद्यांवर वाजवलेले हे राग ऐकायचे. यू-ट्यूबमुळे आजकाल श्रवणभक्ती फारच सुकर झालेली आहे. अगदी निर्मळ श्रवण करावं, कोणताही चष्मा (कानावर!) न लावता, त्यात काही डोळसपणे न शोधता, तुम्ही जाणीवेत जितके निष्क्रिय असाल तेवढी नेणीव चांगलं काम करेल. पारंपरिक सिद्ध राग हे श्रवणाने तुमच्या मनात उतरल्याशिवाय राहणार नाहीत.

या रागांमध्ये मनाशी संवाद करण्याची अमोघ शक्ती आहे. तुमचा तुमच्यावर कदाचित कमी असेल तरी चालेल, पण रागांवर जास्त भरवसा खुशाल ठेवा. अगदी सुरुवातीला काय होतं, श्रवण रागापर्यंत पोचत नाही. ते साहजिकच आहे. आपल्या परिचितांत नव्याने एक नायजेरिन माणूस आला तर काय होतं? आपला त्याच्याशी परिचय कसकसा वाढत जातो? तमीळ भाषा आपल्याला येत नसताना आपण तमीळ संभाषण ऐकू लागलो तर काय होईल? आपला रागदारी संगीताशी परिचय नसेल तर श्रवणांची सुरुवात रागदारी संगीताच्या ठळक, सर्वसाधारण आणि ध्वनि या पातळीवरच्या वैशिष्ट्यांची नोंद घेण्यापासून होते. वेष्टणातली भेटवस्तू हातात घेतली की, प्रथम वेष्टनच दिसते. (ही उपमा फार ताणू नये) या पातळीवरच्या परिचयासाठी पुरेसा वेळ द्या. तुम्ही शास्त्रीय संगीत फारसं ऐकलं नसलं तरी संगीत नक्कीच ऐकलेलं असतं आणि भारतात, भारतीय लोकप्रिय संगीत जे कानावर पडतं त्याची नाळ शास्त्रीय संगीताशी, रागदारीशी बांधलेलीच असते. त्यामुळे हा काळ फार दीर्घ नक्कीच असणार नाही. पेरलेलं बी जसं अंकुरू लागतं, तसंच रागसंगीत मनात रुजु लागतं आणि त्याची सुखद चाहूल तुम्हाला लागू लागते. एकानंतर एक असे येणारे आलाप, त्यात परिचयाचे शब्द नसले किंवा तेच ते शब्द असले तरी, ओळखीचे होतात. पहिल्या आलापानंतर दुसरा आलाप कोणता अशी तोंडी परीक्षा कोणी घेतली तर तुम्हाला उत्तर देता येणार नाही, पण दुसरा आलाप सुरू झाला की, त्याची ओळख पटून आनंद वाटतो. इथे समजावं की, रागसंगीताच्या सुखसागरात तुमचं अवगाहन सुरू झालं! रागगायन जसजसं पुढे पुढे जातं, तसतसं ते पटत जाऊ लागतं. ते एकाच वेळी नवं आणि ‘अरे हो...’ म्हणजे माहितीचं, ओळखीचं वाटू लागतं.   

लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......