‘येरवडा विद्यापीठा’नं माझं जीवन घडवलं आणि बुद्धी शक्य तेवढी शुद्ध करण्यास साहाय्य केलं!
ग्रंथनामा - झलक
डॉ. कुमार सप्तर्षी
  • ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 10 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama डॉ. कुमार सप्तर्षी Kumar Saptarshi येरवडा विद्यापीठातील दिवस Yerawada Vidyapeethatil Divas

सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या आत्मकथनाची दुसरी आवृत्ती काल पुण्यात माजी अर्थमंत्री डॉ. यशवंत सिन्हा यांच्या हस्ते प्रकाशित झाली. प्रफुल्लता प्रकाशनानं ही दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्यानिमित्तानं पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीला डॉ. सप्तर्षी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

१.

हे पुस्तक प्रकाशित करावं की नाही असा संदेह मनात सतत दबा धरून होता. त्याला कारण होतं. तो साधा काळ नव्हता, ते एक पर्व होतं. ते संपून बराच काळ लोटला. आता वेगळं, निराळं पर्व चालू झालं आहे. काळाचा साधा बदल असेल तर पाव शतकापूर्वीच्या गोष्टी तशा अगदीच संदर्भहीन किंवा तद्दन नीरस होत नाहीत हे खरं. पण पर्वच बदललं म्हणजे जुन्या गोष्टींचा संदर्भ संपुष्टात येतो. ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकात ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ ही लेखमाला १९९५ साली प्रसिद्ध झाली. त्यामुळे मजकूर कधीचाच तयार झालेला. पण त्यात मासिक या माध्यमाच्या मर्यादांची अडचण होती. त्या त्या महिन्यात मासिकात उपलब्ध असलेल्या पृष्ठसंख्येनुसार मजकूर लिहावा लागे. विषयाला न्याय मिळाला असं म्हणता यायचं नाही. प्रत्येक लेख प्रत्येक वाचकानं वाचलेला असतोच, असं नाही. त्यामुळं अनेक लेखांत काही संदर्भांची, स्पष्टीकरणांची पुनरुक्ती करावी लागते. पुस्तकाचं लेखन मात्र सलग स्वरूपामध्ये असायला हवं. त्यामुळे पूर्वीच्या लेखांमधील पुनरुक्ती काढून टाकणं आवश्यक होतं. तसंच काही संदर्भ विस्तारानं सांगणं जरुरीचं होतं. वेळेअभावी हे काम पडून राहिलं.

दोन-तीन कारणांमुळं अखेरीस पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय झाला. अनेक वाचकांनी या लेखमालिकेचं पुस्तक निघावं असं सांगितलं. प्रकाशक अरुण जाखडे यांचा तर त्याबद्दल जबरदस्त आग्रह होता. त्यांनी चार वर्षं या आगामी पुस्तकाची जाहिरात चालवली होती. प्रत्यक्ष मुहूर्त निघाला नाही तरी जाहिरात चालू होती. पुस्तक निघावं असा विशेष आग्रह डॉ. आनंद यादव, डॉ. अंजली सोमण व ‘सत्याग्रही’चे त्या वेळचे कार्यकारी संपादक राजन खान यांचा होता. अखेरीस पुस्तकाची प्रत तयार झाली. संपादन विषयातले जाणकार पुरुषोत्तम धाक्रस यांनी ती प्रत वाचली. त्यांनी काही मोलाच्या सूचना केल्या. त्यांच्या सूचनांचा मी स्वीकार केला. त्यांचा या क्षेत्रातील अधिकार मी मानतो.

या क्षणी मात्र माझ्या मनात कोणताही संदेह नाही. हे पुस्तक तरुणांनी वाचावं अशी अपेक्षा आहे. जुन्या नैतिक प्रेरणा आणि नवे कार्यक्रम अशा वळणाने आज माझे विचार चालले आहेत. नैतिक प्रेरणा सनातन, अनादी, अनंत असतात. जनतेचे विषय, भाषा, कार्यशैली, कार्यक्रम मात्र त्या त्या काळाच्या चौकटीतले असावे लागतात. पण विश्वातले भावी संघर्ष अहिंसक मार्गाने, सत्याग्रही पद्धतीनेच यशस्वी होणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. काळाचे संदर्भ बदलले आहेत. जोपर्यंत मानवी मनाचा थांग कोणाला लागत नाही, जोपर्यंत अंत:करणाच्या ऊर्मीवाचून माणूस जगणं सिद्ध करू शकणार नाही, तोपर्यंत तो आत्मबलाचा शोध घेत राहणार. त्याला पर्याय नाही. संगणक, इंटरनेट, मोबाईल, व्हिडिओ कॉन्फरन्स यांच्या युगातही स्पर्धेचा अंतिम निर्णय आत्मबलावरच अवलंबून राहणार. हे पुस्तक ही ग्रामीण भागातील एका सामान्य मुलाच्या आत्मबलाच्या शोधाची साधी कहाणी आहे. ती आजच्या तरुण पिढीला आवडेल अशी आशा आहे.

शासनानं समाजातून बहिष्कृत करून कोठडीत कुलूपबंद केल्यानंतर आणि बाह्य जगाशी संवाद तोडल्यानंतर त्या अंतहीन भयाण एकांतामध्ये मन स्वत:शीच बोलू लागतं. ही आहे सक्तीची आत्मनिष्ठा! स्वत:च स्वत:कडे पाहावं लागतं. स्वत:ला चिंतनाच्या भट्टीत घालावं लागतं. १९६८ साली मला पहिला कारावास भोगावा लागला. मागं वळून पाहताना आज वाटतं की, ते माझं महद्भाग्य मानावं लागेल. नियतीनं दिलेली ती एक सुवर्णसंधी होती असं म्हणावं लागेल. कारावासानं मन एकारलेलं बनण्याचा धोका असतो. सुदैवानं माझ्याबाबत तसं काही घडलं नाही. किंबहुना प्रत्येक कारावासानंतर चैतन्याचा स्रोत वृद्धिंगत होत गेला. जीवन बहुआयामी बनत गेलं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तंत्रज्ञानाच्या विकासामुळं जगातल्या सर्व सत्ताधीशांची शक्ती आज प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळं गेल्या शतकात रशियात, चीनमध्ये किंवा व्हिएतनाममध्ये घडलेल्या क्रांत्यांप्रमाणे आगामी काळात संघटित हिंसाचारावर आधारलेल्या क्रांत्या होणार नाहीत. जोपर्यंत राजकीय पक्ष त्यांच्या गतकाळातील रचना, राजकीय मांडणी, शैली व व्यवहार यांवर अवलंबून आहे, तोपर्यंत त्यांच्यात फुसकेपणा राहणार. मग सत्ताधीशांवर अंकुश कोण ठेवणार असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा कारावास भोगण्याची तयारी असलेली सत्याग्रही माणसंच अंकुशाचं काम करतील असं एकमेव उत्तर मिळतं. जेव्हा हे उत्तर मिळालं, तेव्हा हे पुस्तक प्रकाशित करण्यामागचा संकोच गळून पडला.

या पुस्तकाचं लिखाण त्या वेळी लिहिलेली रोजनिशी किंवा अन्य पुस्तकांचे संदर्भ यांवर आधारलेलं नाही. केवळ स्मृतीच्या आधारे लिखाण केलेलं आहे. स्मरणानं धोका दिलेला नसावा असं गृहीत धरलेलं आहे. तथापि कोणाचा उल्लेख आवश्यक असूनही राहून गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मृती म्हणजे संगणक वा निर्जीव यंत्र नव्हे. त्यामुळं त्रुटीबद्दल क्षमायाचना रास्त ठरेल. हे माझे अनुभव व माझं चिंतन आहे. ‘या हृदयीचे त्या हृदयी’ पोचवण्याचा हा नम्र प्रयत्न आहे. त्या काळाची चुणूक या पुस्तकात डोकावत असली तरी हा इतिहास लेखनाचा प्रयत्न नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी. काही व्यक्तींची चित्रं विस्तारानं आली आहेत. परंतु त्यांचा संदर्भ लेखकाच्या मनावर, भूमिकेवर वेळोवेळी कसा झाला हे सांगण्यासाठी आहे. ती संपूर्ण व्यक्तिचित्रे नाहीत.

ज्या ‘येरवडा विद्यापीठा’नं माझं जीवन घडवलं, जीवनाचे दडलेले अर्थ उलगडून दाखवले, आत्मबल विकसित केलं आणि आत्मपरीक्षणाचे पाठ देऊन बुद्धी शक्य तेवढी शुद्ध करण्यास साहाय्य केलं त्या येरवडा विद्यापीठाचा मी कायमचा ऋणी आहे.

प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल हे माझे मित्र. त्यांनी सर्व पुस्तक मन:पूर्वक वाचून काढले. त्यानंतर मुखपृष्ठ तयार करण्यापूर्वी येरवडा कारागृहाची पाहणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नव्हे, तसा त्यांचा आग्रह होता. मी वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांशी बातचीत करून त्यांच्यासाठी अधिकृत परवानगी मिळवली. माझे स्नेही रविमुकुल व अरुण जाखडे यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाची आतून पाहणी केली. रविमुकुल यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आणि सुंदर मुखपृष्ठ तयार केल्याबद्दल त्यांचे आभार!

२.

२००१ साली ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ हे पुस्तक प्रथम प्रकाशित झाले. त्यातील कथनाचा काळ १९७०च्या दशकाचा होता. प्रत्येक आंदोलनानंतर माझी येरवडा कारागृह रवानगी व्हायची. एकट्यालाच कारावासात राहावे लागत असल्याने भरपूर चिंतन व्हायचे. त्या काळात मनात साठवलेले संचित वाचकांना सांगारची तीव्र इच्छा झाली. म्हणून हा ग्रंथ लिहिला. ज्या पिढीसाठी हे संचित उघडे केले त्यांची मुलेही अजून हे पुस्तक वाचतात. त्यांना ते रोमांचकारी वाटते. म्हणून मागणी संपत नाही. आधीच्या प्रकाशकाने पुनर्मुद्रण केले. तरी पुस्तकाची मागणी संपली नाही. आज नव्याने हा ग्रंथ सुधारित स्वरूपात दुसरी आवृत्ती म्हणून वाचकांसमोर रेत आहे. याचा अर्थ हे विचारविश्व आजच्या संदर्भातही वाचकांना महत्त्वाचे वाटते. काळ बदलला तरी काही विचारांची बीजे सुप्तावस्थेत समाजमानसाच्या पोटात पडून असतात. त्यांना जेव्हा केव्हा ओलावा लाभेल तेव्हा अंकुर फुटू शकतात. विशेषत: तरुणांकडून मागणी आहे. यासाठी दुसऱ्या आवृत्तीचा प्रपंच!

स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांचा आमच्या पिढीवर परिणाम होता. ते स्वाभाविक होते. भारतीय लोकशाहीच्या संदर्भात एक बाब ठळकपणे लक्षात येते. राजकीय क्षेत्रात नव्या पिढीतून सतत रिक्रूटिंग होत राहिले तरच लोकशाही व्यवस्थेची ऊर्जा व तिचे तेज अक्षुण्ण राहाते. १९८० सालापासून राजकारणाचा नवा टप्पा सुरू झाला. राजकीय पक्षांनी सामाजिक परिवर्तनापासून फारकत घेतली. राजकीय पक्षांना केवळ निवडणूक यंत्रणा असे स्वरूप आले. निवडून येण्याची क्षमता (इलेक्टिव्ह मेरिट) हा परवलीचा शब्द बनला. सत्ताप्राप्त करण्यासाठी फक्त तीस टक्के मतदान आवश्यक असते. परिवर्तनाच्या चळवळी करून जातिमुक्त मतदानाचा गठ्ठा तयार करणे शक्य आहे. परंतु या खटाटोपासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. त्याऐवजी ऐनवेळी काही जातिसमूहांचे मतदान गठ्ठ्याने मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली. जात ही संस्थाच मुळात स्पर्धेवर आणि वेगळेपणावर अवलंबून असते. समाजातली जात अजूनही भक्कमपणे टिकून आहे. धार्मिक अस्मिता देखील मतदान गठित करते. त्यासाठी परधर्माचा द्वेष मात्र आवश्यक. स्वातंत्र्यलढ्याच्या व्यापक मंथनातून जातिधर्मनिरपेक्षता, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुभाव, भारतीयत्व ही मूल्ये महत्त्वाची बनली. ती संविधानाच्या रूपाने अधिकृतपणे प्रस्थापित झाली.

१९८० नंतर हा टप्पा बदलला. प्रतिक्रांतीची प्रक्रिया सुरू झाली. राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांप्रमाणे समाजाची बांधणी करायची होती. ते ध्येय बाजूला पडले. उलटपक्षी जातिद्वेष व धर्मद्वेष सत्तास्पर्धेसाठी राजकीय पक्षांना सोपा मार्ग वाटू लागला. ते काळा पैसाधारकांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना व जातिवादाला पोषक असे उमेदवार निवडणुकीत उभे करू लागले. ६ डिसेंबर १९९२ला बाबरी मशीद पाडण्यात आली. तेव्हापासून तर हिंदू समाज व हिंदुत्व यांच्यामध्ये चढाओढ सुरू झाली. भारतीयत्व मागे पडले. स्वातंत्र्यलढ्याच्या आधी जो जात्यंध समाज अस्तित्वात होता, त्याच्यावर परक्यांचे राज्य होते. आता जात्यंधतेला धर्मांधतेची साथ लाभली. जनआंदोलनांची व राष्ट्रबांधणीची प्रक्रिया थंडावली. संविधानातील गाभ्याची मूल्ये सुप्तावस्थेत गेली.

हिंदू म्हणजे काही स्पष्टपणे अधोरेखित मूल्यव्यवस्थेचा समाज नव्हे. प्राचीन काळात सहनशीलता, अहिंसा, सहअस्तित्व अशी काही ढोबळ सामाजिक मूल्ये अस्तित्वात होती. कारण हिंदू नावाचा धर्म अमूक तिथीला वा पवित्र ग्रंथात शब्दबद्ध केलेल्रा मूल्यव्रवस्थेचे स्पष्ट प्रतिपादन करणारा धर्म नव्हे. हिंदू धर्माचा एक धर्मसंस्थापकही नाही. अंधार युगात जातीची उतरंड, सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठा यांची भयंकर विषमता, अस्पृश्यतेची क्रूर प्रथा, स्त्रीदास्य ही समाजरचनेची एकूण लक्षणे बनली. त्या लक्षणांचे पवित्र मूल्यांत रूपांतर करण्याचा धंदा भूतकाळात तेजीत होता. भूतकाळातील हे दोष गाडून टाकण्याचा संविधानाने संकल्प केला होता. ब्रिटिशांना हाकलताना आधुनिक मूल्यांचा समाज निर्माण करारचा संकल्प ठळकपणे अधोरेखित झाला होता.

आता मात्र गतकाळातील गाडून टाकलेल्या भूतांचा नंगानाच सुरू झालाय. १९९० सालानंतर जागतिक भांडवलशाहीने देशी भांडवलदारांशी हातमिळवणी केली. भांडवलशाहीला विषमतेचे विषारी फळ लागते, याबद्दल कधी संदेह नव्हता. या अभद्र युतीमुळे आर्थिक व सामाजिक विषमता वेगाने वाढू लागली. नागरिकांमधील बंधुभाव नष्ट होऊ लागला. सर्वसामान्य माणसे देखील पैशाला देव मानू लागली. सर्वत्र स्वार्थ बोकाळला.

ही प्रतिक्रांती रोखण्यासाठी पुन्हा एकदा सत्याग्रही अहिंसक जनआंदोलने व्यापक प्रमाणात उभी राहणे आवश्यक आहे. आता देशाला नव्या नेतृत्वाची गरज आहे. हे नेतृत्व हिंदुत्व, गोरक्षक दल, हिंदू-मुस्लीम दंगली, घरवापसी यातून मिळणे अशक्यप्राय आहे. नवे नेतृत्व फक्त सत्याग्रही आंदोलनातूनच आकाराला येईल, अशी माझी ठाम धारणा आहे. अतिरेकी मार्गांचा अवलंब करणारा नेता अल्पजीवी ठरतो. सम्यक् विचार करणारे नेतृत्व ही काळाची गरज आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मुस्लीम मुलीवर काश्मीरमधील कठुआ येथे मंदिरात गँग रेप झाली. ती आठ वर्षे वयाची मुलगी मुस्लीम आहे. म्हणून हिंदू मनाला अस्वस्थता येत नाही, ही फार गंभीर बाब आहे. ‘हिंदू एकता’ या संघटनेने आरोपी हिंदू आहेत म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. उत्तर प्रदेशात उन्नाव येथे भाजपच्या आमदाराने शेजारच्या मुलीवर बलात्कार केला. पोलीस आले. पण त्यांनी मुलीच्या बापालाच पकडले. पोलीस कस्टडीत त्याला मारून टाकले. भारतात माणुसकीची पातळी इतकी खाली जाईल असे कोणाला वाटले नव्हते. आपल्या सामाजिक संवेदना फारच बोथट झाल्या आहेत. जात व धर्म माणुसकीचा घास घेताना दिसताहेत. न्याय-अन्याय यातील फरक कळत नसेल तर तो माणूस कसा? त्याला सैतान म्हणावे लागेल. आज सैतान प्रतिगामी शक्तींच्या रूपाने थयथयाट करतोय. त्याला लगाम घालण्यासाठी सत्याग्रही जनआंदोलन हा एकमेव उपाय आहे.

महात्मा गांधींची टिंगल, नथुरामचा उदोउदो, कॉ. लेनिनचे पुतळे उद्ध्वस्त करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भगवा रंग फासणे, ओबीसी व दलित नेत्यांना मंत्री करून त्यांच्या डोक्यात हिंदुत्ववाद घालणे, पैसा व सत्तेचा वापर करून अल्पमतात असतानाही गोवा, मेघालय इ. राज्यांत सरकार स्थापन करणे ही सर्व लक्षणे एकाधिकारशाहीची, फॅसिझमची व भूतकाळाकडे प्रवास करण्याची दिशा दाखवणारी आहेत.

‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या ग्रंथातून तरुणांना योग्य दिशा मिळाली आणि देशाची अवनती काही प्रमाणात थांबली तर आयुष्याचे श्रेयस साध्य झाले असे मी म्हणेन. मूळ ग्रंथात १७ वर्षांनंतरही मूलभूत बदल करण्याची गरज भासली नाही. फक्त ‘युक्रांद’च्या पुनर्स्थापनेनंतरचे काही तपशील जोडले आहेत, एवढेच. सामान्य लोकांमधील निराशा हे प्रस्थापितांचे प्रभावी हत्यार असते. या ग्रंथाच्या वाचनाने निराशेचे सावट दूर होईल अशी आशा आहे. निराशा हा भयंकर संसर्गजन्य रोग आहे. तसाच डोळस आशावाद हाही संसर्गजन्य असतो. रोज सकाळी नवा सूर्य दर्शन देतो. तो निरम, वेळ कधी चुकवत नाही. म्हणून आशावादाला स्थान आहे.

दुसरी आवृत्ती प्रकाशित करणारे ‘प्रफुल्लता प्रकाशन’चे श्रीपाद सपकाळ यांचा मी आभारी आहे. वाचकांकडून या ग्रंथाचे स्वागत होईल याबद्दल खात्री आहे!

'येरवडा विद्यापीठातील दिवस' - हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......