एम. करुणानिधी मरणोत्तर अजून ‘लोकोत्तर’ होतील…
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • एम. करुणानिधी (३ जून १९२४ - ७ ऑगस्ट २०१८)
  • Wed , 08 August 2018
  • संपादकीय Editorial अक्षरनामा Aksharnama एम. करुणानिधी M. Karunanidhi द्रविड मुन्नेत्र कळघम Dravida Munnetra Kazhagam जयललिता Jayalalithaa

तमिळनाडूमधील जनतेचं सिनेमा-वेड सर्वश्रुत आहे. आपल्या आवडत्या नेत्याची मंदिरं उभारण्यापासून त्याच्यासाठी जीव देण्यापर्यंत हे वेड टोक गाठतं. त्यामुळेच करुणानिधी, एम.जी. रामचंद्रन, जयललिता यासारख्या सिनेकलावंतांना राजकारणातही मोठी लोकप्रियता मिळाली. लोकानुनयी राजकारण करून या नेत्यांनी जनमानसांत आपलं स्थान घट्ट केलं. त्यामुळे आधीच विभूतीपूजक असलेल्या तामिळ जनतेमध्ये त्यांचा फॅन-क्लब विस्तारला आणि व्होट बँकही. त्या जोरावर त्यांनी त्यांचं राजकारण यशस्वी केलं. करुणानिधी या त्यांपैकीच एक.  

‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ या पक्षाचे नेते आणि द्रविड राजकारणाचे प्रणेते एम. करुणानिधी यांचं काल वयाच्या ९४व्या वर्षी निधन झालं. मागचा सबंध आठवडा त्यांच्या आजाराच्या बातम्या येत होत्या. त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या एक्झिटची कल्पना आली होती. त्यामुळे मागचा संबंध आठवडा त्यांचे चाहते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात होते. तो चाहत्यांचा जनसागर मंगळवारी शोकसागरात बुडाला. मात्र करुणानिधींचं निधन तसं अनपेक्षित नाही. आणि वयाची एवढी मोठी इनिंग मारल्यानंतर तर नाहीच नाही. करुणानिधी दीर्घीयुषी जगले. त्यामुळे त्यांना फार मोठा काळ मिळाला. राजकारणापासून साहित्य-चित्रपट क्षेत्रातही भरीव कामगिरी करता आली.

‘द्रविड मुनेत्र कळघम’ या पक्षाची स्थापना १९४९मध्ये झाली. १९५७मध्ये करुणानिधी पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. १९६७मध्ये द्रमुकला सत्ता मिळाली, तेव्हा अण्णादुराई मुख्यमंत्री तर करुणानिधी सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. १९६९मध्ये अण्णादुराई यांचं निधन झाल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून करुणानिधी मुख्यमंत्री झाले. त्यांनी या पक्षाची घडी बसवली. पक्षात जान आणली, पण पक्ष पातळीवरील भ्रष्टाचाराला त्यांना शेवटपर्यंत आवर घालता आला नाही. त्यांच्या पक्षाचे तब्बल पन्नास वर्षं म्हणजे तहहयात ते अध्यक्ष राहिले.

पुढे करुणानिधी यांनी आपले घनिष्ठ मित्र आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार अभिनेते एम.जी. रामचंद्रन यांना पक्षात आणलं. आमदार केलं. अण्णा दुराई यांच्या निधनानंतर करुणानिधींना मुख्यमंत्री बनवण्यात एमजीआर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण पुढे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेनं घात केला. एमजीआर-करुणानिधी यांच्यातील संबंध विकोपाला गेले. शेवटी एमजीआर यांना पक्षातून काढून टाकलं गेलं. एमजीआर यांचं व्यक्तिमत्त्वही करिश्मा असलेलं होतं. महिलावर्गामध्ये त्यांची लोकप्रियता मोठी होती. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी एमजीआर यांनी ‘एडीएमके’ हा नवीन पक्ष स्थापन केला. तेव्हा त्या पक्षालाही तमिळनाडूमध्ये लोकप्रियता मिळाली. एमजीआर मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांच्या वारसदार जयललिता करुणानिधी यांच्याप्रमाणेच चार-वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या.

१९८०नंतर भारतीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचा आणि त्यांच्या प्रभावाचा मोठ्या प्रमाणावर उदय झाला. या पक्षांनी सत्तासमतोलाच्या नव्या राजकारणाला सुरुवात केली. त्यातून ‘प्रदेशाभिमान आणि राज्याचा विकास यांचा पुरस्कार करण्यात काहीही गैर नाही’, हे नवं तत्त्व भारतीय राजकारणात प्रस्थापित झालं. प्रादेशिक असूनही राष्ट्रीय प्रश्नांबद्दल भूमिका घेणं, राष्ट्रीय राजकारणात सहभागी होणं या गोष्टी या पक्षांकडून केल्या जाऊ लागल्या. प्रसंगी आघाड्यांचं सरकार असल्यामुळे या प्रादेशिक पक्षांनी केंद्र सरकारमध्ये सहभागी होऊन वेळप्रसंगी हवं ते पदरात पाडून घेणं, आडमुठेपणा-हटवादी भूमिका घेणं, केंद्र सरकारची अडवणूक करणं अशा विविध गोष्टी करायला सुरुवात केली. करुणानिधी यांचं राजकारणही यांपेक्षा वेगळं नव्हतं.

१९७२मध्ये द्रमुख पक्षात फूट पडून एम.जी. रामचंद्रन यांनी अण्णा द्रमुक हा वेगळा पक्ष स्थापन केला, तेव्हापासून हे दोन पक्ष तामिळनाडूमध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले. त्यांचं एकमेकांविरोधातलं राजकारणही अधिकाधिक द्वेषाचं होत गेलं. उदाहरणार्थ, १९९६मध्ये करुणानिधींच्या सरकारनं अण्णा द्रमुखच्या नेत्या जयललिता यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात केली. २००१मध्ये सत्तेत येताच जयललिता यांनीही करुणानिधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात केली.

जयललिता आणि करुणानिधी, यांच्यात बरंच साम्य होतं. सर्वांत मोठं साम्य म्हणजे त्यांची लोकप्रियता शेवटपर्यंत कायम राहिली. दीडेक वर्षांपूर्वी म्हणजे ५ डिसेंबर २०१६ रोजी जयललिता यांचं निधन झालं, तर आता करुणानिधी यांचं. एमजीआर यांनी लोकानुनयी राजकारणाचा कित्ता गिरवला. शालेय विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण मोफत, टुथ पावडरपासून चप्पलांपर्यंत गरिबांसाठी अनेक मोफत योजना राबवून एमजीआर यांनी लोकप्रियता मिळवली होती. करुणानिधी यांच्या राजकारणाची जातकुळीही तीच होती. २००६मध्ये वयाच्या ८२व्या वर्षी करुणानिधी पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी स्वस्तात तांदूळ आणि मोफत टीव्ही देण्याचं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं होतं. १९९१मध्ये जयललिता पहिल्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर त्या २००१, २००२ आणि २०११मध्ये मुख्यमंत्री झाल्या. या चारही टर्ममध्ये त्यांनी तांदूळ, सांबार मसाला, मिक्सर, ग्राइंडर, टीव्ही संच अशा अनेक वस्तू जर्वसामान्य जनतेला मोफत दिल्या. लोकप्रिय, लोकानुनयी, विभुतीपूजा या पद्धतीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाही केली जाऊ शकत नाही. करुणानिधीही याला अपवाद नव्हते.

एक मात्र खरं की, जयललिता यांच्याप्रमाणेच करुणानिधी यांनीही फारशी कधी देशाचा पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. किंबहुना दक्षिणेतील राजकीय नेत्यांना पंतप्रधानपदाची फारशी ओढ नसते (ती उत्तरेत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते!). त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात स्वत:ची विश्वासार्हता त्यांनी कधी पणाला लावावी लागली नाही. मात्र त्यांचं राष्ट्रीय राजकारण हे नेहमीच हटवादी, अडेलतट्टूपणाचं राहिलं. अर्थात भारतीय राजकारणात अशा आडमुठ्या भूमिका घेतल्याशिवाय निभावही लागत नाही. पण करुणानिधींचा शरद पवार झाला नाही आणि नीतीशकुमारही. ते कायम प्रादेशिक नेतेच राहिले. त्यांना स्वत:लाही याची पुरेपूर कल्पना होती. किंबहुना हे त्यांनी समजून-उमजून केलेलं राजकारण असावं.

करुणानिधी यांचं राजकारण मात्र गुंडगिरीचं राहिलं. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर, त्यांच्या मुलांवर, नातेवाईकांवर आणि त्यांच्या पक्षातील इतर अनेक नेत्यांवर झाले. पण तरीही त्यांची लोकप्रियता अबाधित राहिली. सिनेमा आणि राजकारण ज्या राज्यात हातात हात घालून जातात, तिथं कधीही, कुठलाही चमत्कार होऊ शकतो. मात्र करुणानिधी समाजवादी मूल्य मानणारे होते. त्यांनी तामिळनाडूमधील बससेवेचं सार्वजनिकीकरण केलं. जमीन सुधारणा घडवून आणल्या.

वयाच्या १४व्या वर्षी करुणानिधी पेरीयार रामस्वामी नायकर यांच्या आत्मसन्मान आंदोलनात सामील झाले होते. त्यांनी ‘पराशक्ती’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. त्यातून द्रविडीयन चळवळीची तत्त्वं मांडली होती, ब्राह्मण्यावर सडकून टीका केली होती. त्यामुळे या चित्रपटाला सवर्ण हिंदूंनी विरोध केला. या चित्रपटावर बंदी आणली गेली. पण नंतर तो सुपरहिट झाला. ‘पनाम’ व ‘थंगरतनम’ हे त्यांचे चित्रपट पुनर्विवाह, अस्पृश्यता या विषयांवर आधारित होते. त्यांनी तब्बल ३९ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. त्यांनी शेवटची पटकथा लिहिली ती वयाच्या ८७व्या वर्षी, २०११ साली.

चित्रपटांच्या पटकथालेखनाबरोबर करुणानिधी चांगले लेखकही होते. त्यांनी कविता, नाटकं, कादंबऱ्या आणि आ‌‌ठवणीपर अनेक पुस्तकं लिहिली. त्यांची संख्या शंभराच्या पुढे जाईल. मात्र त्यांचं एकही पुस्तक मराठीमध्ये अनुवादित झालेलं नाही आणि त्यांचे चित्रपटही मराठीमध्ये फारसे लोकप्रिय झालेले नाहीत किंवा महाराष्ट्रातील चित्रपट महोत्सवात दाखवले गेले नाहीत. त्याची काय कारणं असावीत, हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. तेव्हा ते असो.

तामीळनाडूतील आत्मसन्मान आंदोलनानं द्रविड भाषा व संस्कृतीचा अभिमान बाळगला, जोपासला आणि वाढवलाही. तिनं हिंदीचं आक्रमण सुरुवातीपासून झुगारून दिलं. करुणानिधींनी तर वयाच्या १४व्या वर्षी हिंदीच्या सक्तीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन घडवून आणलं होतं.

करुणानिधी यांच्यासारखा राजकारणी, साहित्यिक, पटकथालेखक, वक्ता, प्रशासक, संघटक भारतीय राजकारणात विरळा म्हणावा असाच आहे. करुणानिधी यांचं संबंध आयुष्यच तसं वादळी राहिलं. वाद-विवादांनी घेरलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर लगेचच त्यांचं स्मारक कुठे करायचं यावरून वाद होणं यातही नवीन वा अघटित असं काही नाही. तामिळनाडू सरकार आठवडाभर त्यांचा दुखवटा पाळला जाणार आहे, तर उद्या देभरात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. जयललिता काय किंवा करुणानिधी काय, हे नेते-कलावंत कितीही वादग्रस्त, भ्रष्ट असले तरी त्यांच्याकडे करिष्मा होता. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कायम राहिली. विभूतीपूजा हा काही एकट्या तमिळनाडूमधील राजकारणाच्या मानगुटीवर बसलेला समंध नाही. तो अखिल भारतीय राजकारणाच्याच मानगुटीवर बसलेला समंध आहे.

करुणानिधींना ‘द्रविड योद्धा’ म्हटलं जाई. त्यांचे समर्थक त्यांना आदरानं ‘कलाईनार’ म्हणजे ‘कलाक्षेत्रातील विद्वान’ म्हणत. असे नेते मरणोत्तर लोकोत्तर होतात. आणखी मोठे होतात. पण त्यांच्या राजकीय वारशाच्या मात्र चिरफळ्या होतात. जयललिता यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचं जे झालं, तेच कमी-अधिक फरकानं करुणानिधी यांच्या पक्षाचंही होईल. उलट त्यांची मुलं, भाचे, पुतणे राजकारणात असल्यानं त्यांच्या पक्षाचे काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही, पण त्याची वाटचाल मात्र घसरतीच असेल.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......