नवी ‘बहुपडदा’ संस्कृती आणि मनसे
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 08 August 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar राज ठाकरे Raj Thackeray मनसे MNS Maharashtra Navnirman Sena मनसे चित्रपट सेना MNSe Chitrapat Sena शिवसेना Shiv Sena

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चित्रपट सेना ही आजच्या घडीला मराठी (सह) हिंदी चित्रपटसृष्टीत सातत्यानं कायरत असलेली सेना आहे. त्यांचं ‘खळ्ळखट्याक’ किंवा ‘मनसे’ स्टाईल अनेकांना पसंत नसली, तरी याच जोरावर त्यांनी मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो मिळवून दिले. हिंदीतल्या मोठ्या रिलीजच्या वेळी चालू असलेले अथवा नव्यानं प्रदर्शित होणाऱ्या मराठी सिनेमांना साईड लाईन किंवा थिएटरबाहेर करण्याचा उद्दामपणा त्यांनी मोडून काढला. आणि हिंदी सिनेमावाल्यांनी समेटाला मान्यता दिली ती मनसेचिसेच्या दबावानंच. तिकिटाचे दर, खानपान सेवा दर आणि बाहेरील पदार्थ आत नेण्याची परवानगी हेसुद्धा त्यांचंच कार्य. खरं तर शिवसेना राज्यात व मुंबई महापालिकेत सत्तेत आहे व त्यांचीही चित्रपटसेना आहे. पण आदेश बांदेकर, शरद पोंक्षे आणि अमोल कोल्हेसारखं आजही कार्यरत नेतृत्व असताना सारं कसं शांत शांत.

मनसेचिसेनं यावेळी जो खाद्यपदार्थ दराचा आणि बाहेरील पदार्थ आत घेऊन जाण्यासाठी आवाज उठवलाय, तो वरकरणी योग्यच आहे. पण ज्यांच्यासाठी हे आंदोलन केलंय ते ‘प्रेक्षक’ या मागणीबाबत प्रामाणिक आहेत का? त्यांना खरंच हे ‘चढे’ दर परवडत नाहीत? चित्रपट काही फक्त मराठी प्रेक्षक बघत नाही. आणि पदार्थाचे वाढते दर हा खरं तर सर्वच प्रेक्षकांचा प्रश्न व्हायला हवा. पण मनसेनं जिथं आंदोलन करून फटकेबाजी केली, तिथंही प्रेक्षक त्यांना साथ द्यायला पुढे आले नाहीत. परवा एका चित्रपटगृहात एक मराठी अभिनेत्री व्यवस्थापकांशी भांडली, पण व्यवस्थापकांनी तिलाच पोलिसांच्या ताब्यात दिलं! कारण सरकारी आदेश ना थिएटर मालकांकडे पोहचलाय, ना पोलिसांकडे!

या सर्व प्रकारावर शांतपणे विचार केला तर काय दिसतं? तर नाटक, सिनेमा, विशेषत: सिनेमाचा प्रेक्षक बदललाय. तो नव्या अर्थव्यवस्थेतला बाजारकेंद्री ग्राहक आहे आणि बदलत्या राहणीमानासह तो बऱ्यापैकी चंगळवादी झालाय. आज त्याला भांडून, हक्कानं मिळवण्यापेक्षा ‘अधिक पैसे’ मोजून विकत घेण्यात अधिक स्वारस्य आहे. “दिमाग को टेंशन नै चाहिए, दो पैसा और ले और मेरेको तू इधर लाके दे” ही आता सार्वजनिक वृत्ती झालीय. मोदीप्रणीत विकासाला लगटून येणारा हा चंगळवाद व्यवस्थेला प्रश्न विचारत नाही. भ्रामक प्रतिमा आणि मनोरंजन हा नव्या जगाचा मंत्र आहे. मागे एकदा एका कार्यक्रमात कवी अशोक नायगावकर त्यांच्या शैलीत म्हणाले होते की, ‘ही जी व्हीआरएस, सीआरएस घेऊन ऐन पन्नाशीत निवृत्त झालेली माणसं आहेत, ती नंतर वेळ घालवण्यासाठी रस्त्यावर उतरून ‘आमचं मनोरंजन करा, मनोरंजन करा’ असं म्हणायला लागतील.’ ती वेळ खरेच सुरूच झालीय!

आज भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वांत मोठी चित्रपटसृष्टी आहे. सिनेमाचं वेड असलेली आणि सिनेमापायी वेडी झालेली अशी दोन्ही प्रकारची माणसं या देशात आहेत. अभिनेता/नेत्री यांना देवत्व देऊन मंदिरं उभी करणारे लोक या देशात आहेत. भारत, पाकिस्तान, नंतर आखाती देशांपर्यंत पोहचलेला भारतीय सिनेमा आता सर्वार्थानं जागतिक झालाय. या सर्व बदलात एक मोठा व महत्त्वाचा बदल झालाय, तो सिनेमाच्या पडद्यात! आणि या बदललेल्या पडद्यानं चित्रपटसृष्टीचं दृश्यरूप जसं बदललं, तसंच तिचं सांस्कृतिक रूपही बदलून टाकलं, एखादं दुमदार गाव धरणात जावं आणि नवी वसाहत उभी रहावी तसं झालंय!

चित्रपटांचा ‘पडदा’हा अनेक पिढ्यांसाठी स्वप्नांचं व्यासपीठ होतं, भावभावनांचा भागीदार होता, मानवी जगण्याचे नवनवे विभ्रम, गोष्ट\सादरीकरण\अभिनय यांच्या संगमातून जे अपूर्व रसायन पडद्यावर उतरत असे, त्यानं स्तिमित होणं, शहारून जाणं, खळाळून हसणं, अंधारातच हमसून रडणं, अशा अनेक प्रकारांनी या पडद्याशी अनेक पिढ्यांचं नातं होतं. जगभरात ‘आश्चर्य व विस्मयकारक ठरणारी चित्रपटातील गाणी म्हणजे तर ‘लागी कलेजावाँमा कट्यार’ अशीच स्थिती! या गाण्यांवर काही पिढ्या घडल्या, बिघडल्या. याच गाणी प्रकारावर नाकं मुरडणाऱ्या, नव्या प्रयोगशील, समांतर चित्रकर्मींनी पार्श्वभागी गाणं वाजवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. ही सगळी दुनिया होती, भारतात चित्रपटसृष्टीच्या स्थापनेपासून विसावं शतक संपेपर्यंत. याला आजच्या भाषेत ‘सिंगल स्क्रीन’ किंवा ‘एकपडदा’ म्हटलं जातं.

पण या सिंगल स्क्रीन संस्कृतीनंच ‘मुघले आझम’ ते ‘शोले’ असा देदीप्यमान प्रवास पाहिलाय. या एक पडदा सिनेमाच्या प्रेक्षकांचं या पडद्याशीच एक नातं होतं. घामाच्या धारा वाहत असताना लोखंडी बारनं चिंचोळ्या केलेल्या रस्त्यानं तिकीट विंडोवर पोहचून तिकीट मिळवण्यासाठीची धडपड, पतंगाच्या कागदासारखं कधीही टरकून फाटेल असं तिकिट, त्यावरचा शो टाईम, डेटचा निळा रबरी शिक्का, हातानं लिहिलेला सीट नंबर, ते हाती आलं की आजच्या भाषेत ‘ग्रीन कार्डच! अ‍ॅडव्हान्स बुकिंगलाही अनेकदा असंच दिव्य करावं लागं. आठवड्याचा तो फळा आणि त्यावरच्या छोट्या चौकोनात दिवसाच्या तीन शो खाली तिरप्या लाल अक्षरात ‘FULL’ लिहिलेलं पाहणंही रोमांचकारी असे!

आज जसे लोक गणपतीचे देखावे बघायला बाहेर पडतात, तसं थिएटर डेकोरेशन पहायला लोक गर्दी करत. या डेकोरेशनमधूनच एम.एफ. हुसैनसारखा कलावंत निपजला. या थिएटर डेकोरेशनसाठी जी पेंटिंग केली जात, त्यातले फटकारेही त्यावेळी शाळकरी मुलांना अनुकरण करावेसे वाटत. व्हिलन किंवा खलनायिकेचा चेहरा एकाच निळ्या किंव्या हिरव्या रंगात रंगवून ते पात्रंच उभं केलं जाई. क्वचित त्रिमितीचा आभासही बघायला मिळे. याशिवाय कट आऊटसचं आकर्षण वेगळंच असे. हे सर्व हातानं केलेलं असे. आजच्यासारखी डिजिटल सेवा तेव्हा नव्हती. चित्रपट २५, ५०, ७५ आठवडे चालत. मग त्यांचे समारंभ होत. कलाकार, तंत्रज्ञानांना स्मृतिचिन्हं मिळत. गाण्यांची प्रसिद्धी ही रेकॉर्डसच्या स्वरूपावरून मोजली जाऊन ‘हिट’ संगीताला गोल्डन डिस्क मिळे! ती गोल्डन रेकॉर्ड फ्रेम एखाद्या पुरस्काराएवढीच महत्त्वाची मानली जाई. सकाळी ९चा मॉर्निंग शो, १२ चा मॅटिनी व ३,६,९ रेग्युलर शो असं ठरलेलं वेळापत्रक. सकाळी ९चा मॉर्निंग शो व मॅटिनी शोला विद्यार्थी, युवक, तसेच सिनेवेडे गर्दी करत. कारण काही मॉर्निंग, मॅटिनी शो खास हॉलिवूड सिनेमांचे असायचे, तर काही जुने क्लासिक हिंदी.

इथं येणाऱ्या प्रेक्षकासाठी चहा, समोसा, वडा, वेफर, गोल्डस्पॉट, सोडा असे पाच-सात पदार्थच मिळत. पण प्रेक्षकांना सिनेमात अधिक रस असायचा. प्रेक्षागृहात चहा/क्लोड्रिंक वगळता पदार्थ नेता येत, पण चित्रपट सुरू असताना वेफर खाणाऱ्याच्या तोंडाचा आवाजही इतरांना सहन होत नसे. रिपीट आडियन्स पुढचा सीन/स्टोरी सांगू लागला तर त्याला गप्प बसवलं जाई. प्रेक्षक इतका मंत्रमुग्ध होई की पदडा आणि तो यात कुठलाही व्यत्यय त्याला सहन होत नसे. तरीही रिळ तुटणं, आवाज जाणं असं काही घडलं की सामूहिक हुर्ये होई.

या संस्कृतीत सिनेमा प्रदर्शित होण्याआधी रेडिओवरून गाजलेली गाणी चित्रपटात कधी व कशी येतात याची प्रचंड उत्सुकता असे. राजेश खन्नाच्या जमान्यात ‘दुश्मन’ व ‘कटी पतंग’ सिनेमातली हिट गाणी पहिल्या १० मिनिटातंच पडद्यावर आली, तेव्हा निराशा पसरली. कारण तोवर प्रेक्षक स्थिरावलेला नसे! गाण्यांप्रमाणेच राजकुमार, प्राण, राजेश खन्ना, अमिताभ यांच्या एन्ट्रीला जो काही हंगामा होई, तो म्हणजे या पडद्यावर प्रेम करणाऱ्यांच्या प्रेमाची मोठी पावतीच! मिट्ट काळोखात चिडीचूप प्रेक्षक इतका एकाग्र की, आजचे योग झक मारावेत! त्यावेळी (पुण्यात ‘माडी’) बाल्कनी नामक प्रकार असे. डोअर किपर तिकीट बघून ‘इधर नहीं निचे’ म्हणू नअसं बघे की, तुमची औकातच त्या डोळ्यात प्रकटे!

जागतिकीकरणानंतर जे बदल झाले, माध्यम स्फोट झाला, त्यात सिनेमा बहुपडदा झाला. तो वातानुकूल झाला. स्वच्छ कॅन्टीन, तिथं देशी-परदेशी पदार्थ, स्वच्छ स्वच्छतागृहं तीही आकारानं मोठी. खुर्चीतच पाण्याची बाटली, चहा-कॉफी ठेवायची सोय. एका पडद्यावर सकाळी एक, दुपारी दुसरा, तर रात्री तिसरा सिनेमा बघायची सोय आणि असे तीन, पाच, सात पडदे! ही मल्टिप्लेक्स अवतरली. ती स्वतंत्र नव्हे तर भव्य वा मध्यम मॉलचे अंग होऊन. हे मॉल म्हणजे आता पर्यटन स्थळंच झाली आहेत. प्रेक्षक मल्टिप्लेक्समध्ये चढ्या दरानं पदार्थ, पेय घेत होता, आहे. कारण ते ज्या मॉलमध्ये असतं, त्या मॉलच्या फुडकोर्टमध्येही असेच दर असतात. मॉलमध्ये सगळ्याच एमआरपी चढ्या किंवा सूट असेल तर अगदीच किरकोळ दरात मिळतात. अनेकदा एखाद्या वारी एकावर एक तिकीट फ्रीही मिळतं! हा बहुपडदा प्रेक्षक स्वत:ला मध्यमवर्गीय न मानता ‘अपवर्डली मोबाईल’ मानतो. तो स्वत:ला नव्या कॅपॅसिटीत पाहतो. बहुपडदा देत असलेल्या सुविधांची ती किंमत तो मानतो!

त्यामुळे मनसेचिसेनं आंदोलन केलं असलं तरी प्रेक्षक आता बदललाय. तो २०० रुपयाऐवजी प्रसंगी ४००/५०० मोजून रेडलाऊंजचा उपभोग घेतो. ‘कमवा आणि उडवा’ या नव्या संस्कृतीचा ज्वर ‘होऊ दे खर्च’ म्हणत ग्रामीण भागातही पोहचलाय. आज मनसेचिसेसह मराठी कलाकार सीसीडीऐवजी बरिस्ता किंवा स्टारबक्समध्ये मिटिंग करतात, जिथं उसाच्या रसाचा जो ग्लास असतो, त्यापेक्षा निमूळत्या ग्लासात कोल्ड कॉफी मिळते २५० रुपयांत! मनसेचिसेचे प्रमुख अमेय खोपकर यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकाचं पहिलं तिकीट असतं ५०० ते १००० रुपये. थिएटर, कँटिन, स्वच्छतागृहं तीच नेहमीची! जो प्रेक्षक ‘व्यक्ती आणि वल्ली’ व ‘हॅम्लेट’ १००० रुपये देऊन बघतो, जो एखादी बिस्लेरी ४० रुपयाला घेतो, कॉफी १५० रुपयाला. याचा अर्थ ती क्रयशक्ती आहे!

मनसेचिसेनं उलट मागणी अशी केली पाहिजे, चित्रपटगृहात आत खानपान सेवा बंद, पाण्याव्यतिरिक्त इतर काही नाही नेता येणार. स्वच्छ व मोफत पाण्याची सोय असावी. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मोबाईल जॅमर बसवायला हवेत. सिनेमा बघण्यासाठी लागणारी एकाग्रता या तिन्ही गोष्टी (खानपान, मोबाईल, आपसांत बोलणं इ.) भंग करतात. मनसेचिसेनं चित्रपट कसा बघावा हे शिकवावं. चित्रपटाला गेल्यावर पदार्थ स्वस्त की महाग का घरचा शिरा-पोहे न्यायचे, या उठाठेवी कशाला? तीन तासावरचा चित्रपट दोन तासावर आलाय. दोन तासात जीभ आणि पोट खवळत असेल, त्यांना घरीच बसू द्यावं. एकाग्रतेनं सिनेमा बघणारे ‘पडदाप्रेमी’ वाढवा!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Shashank

Wed , 08 August 2018

thik thak lekh..madhye thoda bharkatlah


vishal pawar

Wed , 08 August 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......