अजूनकाही
‘विकिपीडिया’ हा खुला माहितीकोश आणि ‘भारत देशाची संकल्पना’ यात विलक्षण साम्य आहे. दोन्हींची निर्मिती ज्यांच्या भल्यासाठी झाली होती, त्यांनीच त्यांची पुरी वाट लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.
मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असलो तरी ज्ञानाच्या क्षेत्रात विकिपीडिया जितका खुलेपणा दाखवतो, तो सर्वस्वी मारक ठरतो असे माझे मत आहे. लोकांच्या संदर्भातील नीतिनियम, शासनव्यवस्था, संपत्तीवाटप आदी सामायिक हिताच्या गोष्टींपुरताच लोकशाहीचा पल्ला मर्यादित ठेवावा लागतो. पृथ्वी गोल आहे की सपाट याचा निर्णय कुठल्याशा वृत्तपत्रात किंवा न्यूज-पोर्टलवर सर्व्हे घेऊन करता येत नसतो. त्याला भूगोल-खगोलाचे ज्ञानच आवश्यक आहे. तिथे ‘मूठभरांचे मत आम्ही का मानावे. बहुसंख्य लोकांना पृथ्वी त्रिकोणी आहे असे वाटते,’ म्हणून ती आपला आकार बदलून त्रिकोणी होत नसते.
तरीही माहिती-संकलन म्हणून विकीपीडियाचे स्थान नाकारता येणार नाही.
असे असले तरी भारताशी संबंधित सर्व पाने मी सर्वस्वी अविश्वासार्ह मानतो मी!
याचे कारण आपल्या वृत्तीत आहे. सर्व उत्तम शोधांची/पर्यायांची एकतर आपण स्वार्थासाठी वाट लावतो किंवा कुठल्या मसण्या जुन्या ग्रंथाचे नाव सांगून त्यात हे आम्ही आधीच शोधले होते म्हणून त्यावर ‘मेड इन इंडिया’चे लेबल लावून ‘जितं मया’चा शड्डू ठोकतो. त्या पलीकडे तिसरा पर्याय असतो, तो म्हणजे त्या जुन्या ग्रंथाचा आधार घेऊन पुढचा एखादा महत्त्वाचा शोध, पाश्चात्यांपूर्वी आपणच लावण्याचा. पण निर्मिती बुद्धीचे नि कष्टाचे काम आहे. त्यापेक्षा आयते आपले लेबल लावणे सोपे असते. तद्वतच विकीपीडियाची सर्व मिळून माहिती नि ज्ञान संकलनाची संकल्पना कितीही उत्तम असली तरी त्याचा वापर ज्ञानाच्या देवाणघेवाणीऐवजी अज्ञानाला ज्ञानाच्या पंगतीत बसवून ज्ञानाची महतीच कमी करतो आपण. इतर कुणी उंच असेल तर आपली उंची कशी वाढेल हा आपल्यासमोरचा प्रश्न नसतो, त्या उंच माणसाची कशी कमी करता येईल, हा प्रश्न आपण सोडवणुकीसाठी घेतो. राजकारणापासून, साहित्यकारणापर्यंत सर्वत्र एकाच माळेचे मणी.
याशिवाय आपण या साऱ्यांमध्ये प्रगतीचा विचार करण्याऐवजी, पुढच्या आवृत्तीत अधिक काय देता येईल, द्यावे अशी मागणी करावी या विचाराऐवजी आहे त्यात काय वाचवता येईल असा ‘दात कोरून पोट भरण्याचा’ प्रयत्न करतो. इतरांचे उत्पादन, नेता इत्यादींना आमचेच म्हणण्यामागेही नेमका हाच आळस असतो. आपल्याकडे मोबाईलचा शोध लागला नाही, पण मिस्ड कॉलचा शोध लागला, हे या संदर्भातील बोलके उदाहरण.
वीकिपीडियाचा असाच गैरवापर विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी भरपूर केला आहे. जगातले सगळे किंवा प्राचीन ग्रेट ते आमचेच असल्या ‘माहिती’ने पानेच्या पाने भरली आहेत. ‘आपण वापरतो त्या ग्रेगोरियन कॅलेंडर मधील सर्व महिने ही मुळात संस्कृत नावे आहेत’ अशी मखलाशी नेहमीप्रमाणे शाब्दिक खेळ करून सिद्ध करणारे पेज अस्तित्वात आहे. असल्या खोटारडेपणाने असंख्य पाने भरलेली आहेत. नेहरू कुटुंबियांच्या पेजेसवर हे पुंड वर्षानुवर्षे धुमाकूळ घालत आहेत. त्यांचे पूर्वज मुस्लिम होते, ही माहिती काढून टाकल्यावर पुन्हा पुन्हा भरली जाते.
आज प्रथमच या पुंडाना समोरून तसेच प्रत्युत्तर दिले गेले आहे. आता यात समाधान मानायचे की, आता ‘माझे असत्य विरुद्ध तुमचे असत्य’ असाच सामना या देशात पाहायला मिळणार आणि वस्तुनिष्ठ अथवा पडताळून पाहता येण्याजोगे खरे किंवा सत्य असे काही शिल्लकच राहणार नाही, याची खंत बाळगावी हे समजेनासे झाले आहे. सारे काही ‘मतांनी’ ठरवायचे, वस्तुनिष्ठतेला हद्दपार केलेला समाज काय लायकीचा असेल याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. या समाजात स्त्रीला आपले निष्कलंक चारित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातून नाणे काढण्याची सिद्धता मागणाऱ्या समाजात काही फरक असेल का? ‘तुम्ही या बाजूचे का त्या बाजूचे ते सांगा. याकूबाला फाशी देणे योग्य की अयोग्य या प्रश्नाचे उत्तर द्या मुकाट, मुळात फाशीच हवी का नको अशा फालतू तात्त्विक चर्चा नको,’ म्हणणाऱ्या स्वयंघोषित वैचारिक गुंडांची संख्या आणखी वाढत जाणार याची भीती वाटू लागली आहे.
रस्त्यावरची झुंड एकाच माणसाला घेरून मारते, हे स्वयंघोषित वैचारिक पुंड पिढीच्या पिढी... कदाचित आणखी पुढच्या काही पिढ्यांना ठार मारत असतात.
............................................................................................................................................
लेखक मंदार काळे तरुण अभ्यासक, ब्लॉगर आहेत.
ramataram@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Prashant
Tue , 07 August 2018
superb article Sir!
vishal pawar
Mon , 06 August 2018
✔
Alka Gadgil
Mon , 06 August 2018
Yalach post truth mhantat