शनिवारी, ४ ऑगस्ट रोजी पुण्याच्या केसरीवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या हस्ते ‘We The Change - आम्ही भारताचे लोक’ या संजय आवटे लिखित पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यानिमित्तानं पवारांनी लिहिलेला हा खास लेख...
.............................................................................................................................................
‘We The Change - आम्ही भारताचे लोक’ या संजय आवटे लिखित पुस्तकाचं लोकार्पण करण्याच्या निमित्तानं आज केसरीवाडा, नारायण पेठ, पुणे इथं उपस्थित राहण्याचा योग आला. समोरची गर्दी नेहमीची दिसत नव्हती. तेथील तरुणाईच्या उपस्थितीनं माझं लक्ष वेधलं गेलं. आवटेंचं पुस्तक याच तरुणाईच्या मनातील अस्वस्थतेशी प्रभावी संवाद साधणारं आहे.
संजय आवटेंच्या ‘We The Change - आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकातील लेखांची धाटणी पत्ररूपाची आहे. पत्रं चार्वी आणि आरव या नव्या पिढीच्या प्रतिनिधींना उद्देशून असली तरी ती नव्या पिढीपुढे भारतवर्षातील अनेक स्थित्यंतरांचा, संक्रमणांचा आणि सांप्रत स्थितीचा लेखाजोखा मांडणारी आहेत. लेखकाच्या मनात लेखाजोखा मांडताना एक प्रकारची अस्वस्थता आहे. नव्या पिढीसमोर ती खदखद मांडायची, परंतु तिचा हिरमोड न होऊ देता बदलासाठी प्रयुक्त करायचं, अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागत आहे. लेखकानं हे आव्हान सक्षमपणे पेललं आहे.
आवटेंच्या लिखाणातील भाषा नव्या पिढीची भाषा आहे. ही नवी पिढी संगणकयुगातील, माहितीच्या महामार्गावरून सुसाट वेगानं धावणारी फोर-जी आणि त्यापुढची पिढी आहे. तिच्याकडे एके ठिकाणी थांबून ऐकण्यासाठी वेळ नाही. तिच्या वेगाशी आपला वेग जुळवला तरच आपलं म्हणणं तिच्यापर्यंत भिडतं. हे आवटे जाणतात. त्यामुळे त्यांच्या पत्रांतून भारताच्या जडणघडणीविषयी वेगानं विचारमंथन केल्याचं दिसून येतं.
भारत सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असला तरी आर्थिक-सामाजिक जडणघडणीत अनेक आव्हानं अजूनही समोर ठाकलेली आहेत. मूलतत्त्ववाद (कोणत्याही धर्माचा असो), जातीयवाद, प्रतिगामित्व या रिपुंना मिळणारा राजाश्रय चिंतेची बाब बनली आहे. भारत आकाराला आला आहे, उभा राहिला आहे, परंतु अजून मोठी झेप घ्यायची आहे. समोरची आव्हानं पार करण्यासाठी तरुणाईला झिणझिण्या आणणारं हे पुस्तक आहे.
एकेक लेख वाचावयास सुरुवात केली आणि ‘फ्लिपकार्ट ते बुलककार्ट’ या शीर्षकावर नजर स्थिरावली. या लेखाचं शीर्षक ‘बुलककार्ट ते फ्लिपकार्ट’ असं चढता आलेख दर्शवणारं असावयास हवं होतं असं लेख वाचन सुरू करण्यापूर्वी वाटलं. पण ज्यावेळी लेख पूर्ण वाचला, त्यावेळी ‘फ्लिपकार्ट ते बुलककार्ट’ हेच शीर्षक सार्थ वाटलं. कारण सोशल मीडियासारख्या ऑनलाईन साधनांचा मार्केटिंग आणि ब्रँडिगसाठी वापर करणाऱ्या शासनव्यवस्थेनं नव्या पिढीची माहितीच्या महामार्गावरील गतिमान गाडी पलटी (फ्लीप) करण्याचा आणि ती सनातनाकडे वळवण्याचा प्रतिगामी घाट घातला आहे. ही पलटी झालेली गाडी फरफटत जाऊन वाईट वळणं घेईल की, खोल गर्तेत जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे.
आपला भारत देश हा अठरापगड जातींचा, अनेक धर्मांचा, भाषांचा, संस्कृतींचा खंडप्राय देश आहे. आसेतू हिमाचल, कच्छ ते पूर्वांचल असा विस्तीर्ण देश एकाच धर्मसूत्रात बांधणं अशक्यप्राय आहे. पण हे अतर्क्य कृत्य करणाऱ्या मंडळींच्या हाती आज कारभाराची सूत्रं दिली गेली आहेत.
भारताची देश म्हणून संकल्पना भलेही इंग्रजांच्या आगमनानंतर दृढ झाली असेल, तरीही भारताचं सृजन होण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली हे कुणी ठामपणे सांगू शकणार नाही. शंकुतलेच्या भरतापासून सुरुवात झाली असं पुराणवादी म्हणतील, पण प्राचीन इतिहासाचा मागोवा घेतला तर आर्यांचं आगमन (की आक्रमण?) मौर्य-गुप्त काळातला साम्राज्यविस्तार, अशोकाचं धम्मविजयाचं धोरण, शंकराचार्यांची भ्रमंती, मध्ययुगीन काळातील मोगल साम्राज्याचा अंमल अशा संक्रमणकारक ऐतिहासिक घटना तुकड्या–तुकड्याचा देश सांधण्याचं काम अप्रत्यक्ष रीतीनं करत होत्या.
भारत आकाराला येत होता. इंग्रजांनी ‘इंडिया’ नावानं भूपटलावर ‘भारता’चं नाव मोर्तब केलं. त्याच इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ धोरण राबवून याच देशाचे तुकडे करण्याचं कारस्थानही केलं. साडेपाचशेहून अधिक संस्थानं स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती धग संस्थानांपर्यंत पोहोचलीच. विविधतेतील समानतेनं ती बांधली गेली. गांधी-नेहरू-पटेल या त्रयींनी शिकस्त केली. आणि भारत एकसंध झाला. गांधीजींना दिली गेलेली ‘राष्ट्रपिता’ पदवी त्याच कारणानं सार्थ आहे.
पण आज काही विघातक शक्ती गांधी-नेहरूंना फाळणीसाठी जबाबदार धरत आहेत. गांधी हे भारताची आयडेंटीटी आहेत. त्यांचा विचार संपवणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. म्हणून गांधीजींना हायजॅक करायचं आणि नेहरूंना मलिन करायचं, असा दुहेरी कुटील डाव ही प्रतिगामी मंडळी करत आहेत. ‘नेहरूंनी केलं ते सगळं वाईट’ असं बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय. नेहरू श्रीमंतीत वाढले, भांडवलशाही परमुलुखात उंची शिक्षण घेतलं तरी गांधीजींच्या साधेपणानं भारावून गेले. समाजवादाकडे आकृष्ट झाले. सामान्यांसाठी त्यांच्या मनात अनुकंपा होती. नेहरूंनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचा आग्रह धरला, तुरुंगवास भोगला. परदेशी चालीरीती जवळून पाहिलेले जवाहर बॅरिस्टर पदवीच्या श्रीमंती तोऱ्यात राहू शकले असते. पंडितजी केवळ स्वप्नाळू आणि आदर्शवादी नव्हते, तर कणखरदेखील होते. देश स्वतंत्र झाल्यावर अमेरिका आणि रशिया या दोन्ही गटांपासून दोन हात दूर राहून आलिप्तवाद स्वीकारला. शीतयुद्धकाळात असं धोरण स्वीकारण्याची धमक त्यांच्यात होती.
संजय आवटेंनी विस्तारानं नेहरूंवर लिहिलं आहे. पण ‘५६ इंच छातीत’ चांगल्याला चांगलं म्हणण्याचं औदार्य नाही. नेहरूंना लांच्छनं लावण्यात तल्लीन झालेले लोक गांधींचं मात्र हेतूपुरस्सरपणे प्रात:स्मरण करतात. गांधींना त्याज्य अथवा मलिन केलं, तर खुद्द गुजरातमधून विरोधाला सामोरं जावं लागेल याची चाणाक्ष नेतृत्वाला जाण आहे. परंतु नवं सरकार संभ्रमातलं सरकार आहे. नव्या शासनकर्त्यांच्या आणि त्यांच्या विचारधारेच्या कळपाच्या मनात गांधी की, नथुराम अशी संदिग्धता आहे. गांधी की नथुराम यावर ठोस भूमिका ते घेत नाही. आज गांधी एक विचार आहे, पण त्यांच्या नावाचा कामापुरता हत्यार म्हणून वापर केला जातोय.
मनमोहनसिंगांनी उदारीकरणाचं धोरण आणलं आणि राबवलं. परंतु नवं नेतृत्व स्वत:चं उदात्तीकरण धोरण राबवत आहे. रशियामध्ये असं स्टॅलिननं केलं होतं. रशियात जिकडे तिकडे स्टॅलिनचेच पोस्टर्स, त्याचेच पुतळे दिसत. आपल्याकडे प्रत्येक पेट्रोलपंपावर पंपमालकावर लादून असे फ्लेक्सचे बॅनर्स उभारल्याचं दिसून येतं. डिझेल-पेट्रोल गाडीत भरणाऱ्यानं मान वर केली तरी हे महाशय समोर दिसायचे. ग्राहकाला देखील भाववाढ करणाऱ्याचं साक्षात दर्शन घडायचं. आता डिझेल-पेट्रोलच्या किमती खूपच भडकल्यामुळे त्या बॅनरचा आकार आता लहान झाला आहे. पण हे सारं छुप्या हुकूमशाहीवृत्तीचं द्योतक आहे.
थोर पुरुषांना हायजॅक करण्यावाचून यांच्याकडे पर्यायदेखील नाहीत. गांधींना बदनाम करून मॅडिसन स्क्वेअरमध्ये गोळवलकरांचे गोडवे गाण्याचा वेडेपणा नव्या नेतृत्वानं केला नाही. गांधी हे राष्ट्राची अस्मिता आहेत. त्यांना टाळून किंवा बदनाम करून त्यांच्या हाती काही लागणार नाही. ‘माझे सत्याचे प्रयोग’ गांधीजीनी आधीच लिहून ठेवल्यानं असत्य प्रचार करायला पुरेसे मुद्दे त्यांच्याकडे नाहीत.
सरदार पटेल या लोहपुरुषाला देखील उघड उघड हायजॅक केलं जात आहे. संजय आवटेंनी नेहरू-पटेल परस्परभेदाचं चित्र उभारलं जातंय यावर विस्तारानं विवेचन केलं आहे. मी तर म्हणेन की, एक दिवस पटेलांशीदेखील यांचं पटणार नाही. त्यांना मोठं केलं तर आपल्याला कोण विचारणार हाही विचार त्यांच्या मनात येईल. सरदार पटेलांचा उंच पुतळा उभारला गेला तर तो लवकरच डोईजड होईल. सरदार पटेलांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दुरान्वये स्नेह नव्हता. हेडगेवार, गोळवलकर वादी मंडळीना सरदार पटेलांचं उदात्तीकरण कसं भावेल? स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संघर्ष केला, कारावास पत्करला पण सर्वसमावेशक भूमिका ठेवली त्यांची नव्या पिढीला ओळख होऊ द्यायची नाही, यासाठी इतिहासाची तोडफोड केली जात आहे, भूगोलाच्या पर्यटन नकाशातून भारताचा मानबिंदू ताजमहाल गायब करण्याचा प्रयत्न झाला आहे. रस्त्यांची नावं बदलली जात आहे. इतिहास घडवणं दूर पण अभ्यासक्रमातला इतिहास बदलण्याची चाल ही मंडळी खेळत आहेत.
स्टॅलिननं याच धर्तीवर स्वपक्षातील व इतर विरोधकांचा काटा काढला. त्याला पर्जिंग (Purging) म्हणतात. स्वपक्षातील नेत्यांवर नजरा ठेवण्यात येत आहेत. त्यांची मानहानी आणि खच्चीकरण करणारी अंधभक्तांची टोळकी सोशल मीडियावर उच्छाद मांडताहेत. स्टॅलीननं सर्गेय किरॉव्हला ठार करवलं, लिओन ट्रॉटस्कीला विजनवासात धाडलं, पुढे मेक्सिकोत त्यांची हत्या घडली (की घडवली?), भ्रष्टाचार-देशद्रोह असे खोटे आरोप करून, जबरीनं जबाब घेऊन स्वपक्षातील विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याचे असे महाभयानक प्रकार अंगावर काटा उभा करतात. स्वयं उदात्तीकरणाच्या नादात भारतातदेखील असं काहीतरी घडतंय. तपास यंत्रणांचा गैरवापर त्यासाठीच केला जातोय. स्कॅम-घोटाळे, शहरी नक्षलवाद यांसारखे आरोप ठेवून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. स्वपक्षातील ज्येष्ठ मंडळी अडगळीत पडली आहेत.
एका लेखात आरएसएसच्या गोळवलकर गुरूंच्या दहा आज्ञा वाचल्यावर संघाच्या परमोच्च प्रतिगामी वृत्तीचा प्रत्यय येतो. शुद्रांवर, स्त्रियांवर गुलामगिरी लादणाऱ्या त्या मनू आज्ञांचा समाचार आवटे यांनी पुस्तकात घेतला आहे. ईश्वरानं मोझेसद्वारे प्रेषित केलेल्या दहा आज्ञा या प्रसंगी स्मरतात. मोझेसनं हिब्रूंची मुक्तता केली. पण ‘स्वातंत्र्यानंतर पुढे काय?’ याची संहिता त्या आज्ञांमध्ये होती.
मानवता-समता-चारित्र्य-सदवर्तनाचा पुरस्कार त्यांत होता. मात्र मनूच्या आज्ञा नेमक्या उलट आहेत. समाजातील बहुजनांना अंध:कारात ढकलणाऱ्या आहेत. ‘मनुस्मृती’ जळली तरी मनोवृत्ती खाक झाली नाही. मनोवृत्ती म्हणण्यापेक्षा मनोविकृती म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल. विशेष म्हणजे आता तिला सरकारी अभय मिळालं असल्यानं विखार वेगानं पसरतोय. एकेकाळी हिंदू कोड बिलावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘आधुनिक मनू’ संबोधणाऱ्या संघानं सध्या सावध पवित्रा घेतला आहे. मतांच्या पेटीकडे पाहून घेतलेली ती सावध भूमिका आहे. बिहार विधिमंडळाच्या निवडणुकीवेळी आरक्षणाची समीक्षा व्हावी हे संघाच्या प्रमुखांचं एक वाक्य सत्ता न येण्यासाठी कारणीभूत ठरलं होतं. त्यामुळे ही सावध भूमिका आहे. खरं तर बाबसाहेबांनी लाखोंच्या साथीनं बौद्ध धर्माची घेतलेली दीक्षा मनुवाद्यांसाठी एक शिक्षा होती. बाबासाहेबांचे धर्मांतर त्यांच्या पचनी पडलेलं नाही.
भिमा-कोरेगांव, उना मारहाण प्रकरणातून दलितांविषयीच्या विद्वेषाची भावना उफाळून येते. मनू संतांपेक्षा श्रेष्ठ असल्याचं विधान करणाऱ्यांनी भारताचं संविधान धोक्यात आणलं आहे. आवटे बहुतांशी लेखात मनू विकृतीनं पछाडलेल्या या टोळक्यांच्या टाळक्यांवर जोरदार प्रहार करतात.
संजय आवटे यांनी मुस्लीम समाजाच्या मानसिकतेचं अचूक निरीक्षण केलं आहे. हिंदूधर्माचं पुनरुज्जीवन करणं, त्याला गतवैभव प्राप्त करून देणं याचा अर्थ इतर धर्मीयांच्या जिवीतावर घाला घालणे असा होत नाही. मागील वर्षी अलिमुद्दीन अन्सारी नावाच्या मांस विक्रेत्याची झारखंडमध्ये जमावानं हत्या केली. त्या गौरक्षक जमावाला शिक्षादेखील झाली. तेच गुन्हेगार काल-परवा जामिनावर सुटून आल्यावर काल-परवा भाजपाच्या एका मंत्र्यानं त्यांचा गळ्यात हार घालून सत्कार केला. हे किती लांछनास्पद कृत्य आहे!
काश्मीरचा प्रश्न हाताबाहेर गेला आहे. वाजपेयींच्या काळात काश्मीर खोऱ्यातील जनतेत विश्वासाचं वातावरण झालं होतं. वाजपेयी हिंदुत्ववादी विचारधारेच्या पक्षाचे नेतृत्व करत असतानाही त्यांनी मानवीय आणि सर्वसमावेशक विचार आणि आचारांनी हा विश्वास कमावला होता. मात्र सध्याचं नेतृत्व काश्मीरप्रश्नी पूर्णत: अपयशी ठरलं आहे. शाळा-कॉलेजातली मुलं-मुली रस्त्यावर दगडफेक करण्यासाठी धजावताहेत. मुस्लीम समाजामध्ये इतकं असुरक्षिततेचं, अविश्वासाचं आणि भीतीदायक वातावरण कधीही नव्हतं. नोटाबंदीनंतर दहशतवाद थांबला नाही. सर्जिकल स्ट्राईक नंतर सीमेपलीकडून होणारा तोफांचा-गोळ्यांचा भडिमार शमला नाही. लष्करी आणि प्रशासकीय कारवायांचं जाहिरातीकरण करून शेवटी असं काय साध्य केलं सरकारनं हा मोठा प्रश्न आहे. हिंदूराष्ट्र संकल्पनेचे भूत ज्यांच्या मानगुंडीवर बसलं आहे, त्यांच्याच मानेवर देश चालवण्याची धुरा दिल्यानं अल्पसंख्याकांना या देशात आपणासाठी जागा आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत ‘कुणाच्या बापाच्या मालकीचा नाहीए भारत!’ असे ठासून सांगण्याची हिंमत आवटेंनी पानोपानी दाखवून दिली आहे. त्यांच्या निधडया वृत्तीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सामाजिक माध्यमांचा वापर असामाजिक तत्त्वेच सर्रास करताना दिसतात. इंटरनेट परिभाषेतील हे ट्रोल्स वैयक्तीक निंदा नालस्ती अतिशय बिभित्स भाषेत मॉर्फ चित्रे आणि आवाज यांचा आधार घेऊन करतात. जाती-धर्मात विद्वेष वाढेल, व्यक्ती अथवा संघटनेविषयी समाजात गैरसमज होईल असे अफवांचे विष पसरवतात. याविषयीचं स्वाती चतुर्वेदींचं ‘आय एम ए ट्रोल’ हे पुस्तक वाचून मला धक्काच बसला. ही डिजिटल आर्मी किती घातक आणि घाणेरडी आहे हे उमगलं. सोशल मीडियावर ज्यांना लाखो लोक फॉलो करतात अशा दस्तुरखुद्द प्रधानमंत्र्यांनी अशोभनीय भाषा वापरणाऱ्या ट्रोल्सना फॉलो करावं हे मात्र माझ्या बुद्धीला न पटणारं आहे. त्यांचा मौन धारण करणारा पवित्रा अशा विकृत ट्रोल्सना बळ देणारा आहे. डिजिटल आर्मी व्यतिरिक्त शॅडो आर्मीजची पायदळे विद्वेषाचं बीज पेरून समाजाचे ध्रुवीकरण करत आहेत. त्यांना पाठबळ दिलं जात आहे. दिसतंय ते हिमनगाचं टोक आहे. जे छुप्या रीतीने चाललंय ते अधिक विघातक आहे. आणि ह्या साऱ्या कारस्थानांवर पडदा टाकण्याचं काम मार्केटींग-ब्रॅंडिंग तंत्राचा वापर केला जातो. त्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर करून घेतला जातोय.
मार्केटिंग–ब्रॅंडिंगच्या अतिरेकी भडिमारामुळे मूल्यहीन चीजवस्तू झगमगू लागतात. ब्रॅंडिंग करणाऱ्यांचा बेबनाव दिसत नाही. हे अंधभक्तीचे प्रचारक नव्या पिढीचा ब्रेनवॉश करतात, त्यांची बुद्धी भ्रमिष्ट करतात, माथी भडकवतात. वक्तृत्त्व कलेतील माहीर नेते स्वप्ने दाखवतात, हिप्नोटाईझ करतात. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने मूलतत्त्ववाद्यांना दाखवल्या जाणाऱ्या जन्नतच्या स्वप्नांप्रमाणेच भयंकर आहेत, हे नव्या रक्ताला कळत नाही. स्वप्नातून ही पिढी जागी होऊच नये, संमोहित तरुणाईच्या डोळ्यावरची झापड उडूच नये अशी रचना फारच थोडक्या काळात नव्या व्यवस्थेने केली आहे. संजय आवटे मात्र धाडसानं नव्या पिढीच्या डोळ्यात अंजन घालण्याचा, डोक्यात लख्ख प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. नव्या पिढीतील वाचकांसाठी हे पुस्तक एक प्रकाशवाट ठरेल यात मला शंका नाही.
प्रसारमाध्यमांना सांप्रदायिकतेचा धोका दिसत नाही असे नाही. पण पुढे कुणी येत नाही ही शोकांतिका आहे. सध्या अशी आणीबाणी ओढवली आहे की, प्रसारमाध्यमांवर बंधन लादलेली नाहीत, पण त्यांनी स्वत:हून दोन पावले मागे घेतली आहेत. चौथ्या स्तंभातील संजय आवटेंनी मात्र प्रस्तुत पुस्तकात निस्पृहता दाखवली, त्यांच्या बाणेदार वृत्तीचं मला कौतुक वाटतं. मी ‘We The Change - आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकाचं मनापासून स्वागत करतो.
.............................................................................................................................................
‘We The Change - आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Mon , 06 August 2018
✔